भेटी लागी जीवा

Submitted by तुषार विष्णू खांबल on 20 August, 2020 - 13:36

भेटी लागी जीवा

शब्दांकन - तुषार खांबल

मोबाईलच्या स्क्रीनवर पडलेला अश्रूचा थेंब पुसत साई देव्हाऱ्यातील गणपतीच्या फोटोकडे पहात होता..... त्याच्या काही नशीबवान मित्रांनी आणि इतर मंडळींनी त्यांच्या गावी सुरू असलेल्या गणपतीच्या तयारीचे सोशल मीडियावर टाकलेले फोटो त्याला बेचैन करत होते.... एव्हाना त्याला येत असतील-नसतील तितक्या सर्व शिव्यांचा पाढा त्याने या कोरोना आणि सरकारी यंत्रणेसाठी वाचून झाला होता....

मूळचा कोकणातील असलेला साई हा दहा वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आला होता.... गावातील एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला एका खाजगी कंपनीत ऑफिसबॉय म्हणून नोकरीला लावले होते.... त्यांच्याच घरी राहून, नोकरी आणि आपले पुढील शिक्षण साईने पूर्ण केले आणि आपल्या हुषारीच्या जोरावर आज तो बऱ्यापैकी स्थिरावर झाला होता.... एका चाळीत स्वतःची खोली घेतली, गावाकडे पक्के घर बांधले... भावाचे शिक्षण आणि शेती याकडे त्याचे बारकाईने लक्ष असे.... गणपतीवर त्याची अपार श्रद्धा होती... त्याचाच आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण इतकं सर्व करू शकलो हे तो सर्वांना आवर्जून सांगत असे.... बाकी कधी जमले नाही तरी गणपतीला मात्र तो नक्की गावी जात असे...

यावर्षी कोरोना सारख्या आजाराने सर्व जगाला हादरवून सोडले होते.... जगातील सर्व व्यवहार ठप्प झाले.... आर्थिक बाजू कमकुवत होत होत्या.... साईला कंपनीने "वर्क फ्रॉम होम" सांगितले होते.... आणि गणरायाच्या कृपेने पगारही व्यवस्थित सुरू होता.... यावर्षी गणपतीला चांगलं महिनाभर गावी रहायचं अस त्याने मनोमन ठरविले होते.... पण बाप्पाच्या मनात काही वेगळेच होते..... गावी जाण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना साईला यश येत नव्हते.... अखेर गावी जाण्याची शेवटची तारीख उलटली तसे साईच्या डोळ्यात अश्रू जमा झाले..... दिवसभर कशातही त्याचे मन लागत नव्हते..... आपल्याला कसली शिक्षा मिळाली ह्याचा तो राहून राहून विचार करीत होता.....

इकडे गावी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते.... आरत्या, भजने यावर मर्यादा आणल्या होत्या.... कोणी कोणाच्या घरी ये-जा करू नये, गर्दी टाळावी असे अनेक नियमांनी संपूर्ण कोकणवासी हैराण झाले होते...

साई गावी न आल्यामुळे पांडुरंग काका आणि रुक्मिणी काकी (साईचे आईवडील) यांना काळजी वाटत होती..... गणपतीची मूर्ती बुक झाली असली तरी बरीचशी तयारी बाकी होती.... साईने पैसे पाठवले असले तरी तो स्वतः इथे नसल्याने दरवर्षी सारखा आनंद त्यात नव्हता...... साईची आई तरी सारखी त्याच्या आठवणीने व्याकुळ होत होती.... वडिलांनी ग्रामपंचायती तर्फे काही व्यवस्था होतेय का याची देखील चौकशी करून पहिली.... परंतु सर्वांच्या पदरी मात्र निराशाच येत होती.... काय करावे काही सुचत नव्हते..... साईच्या घरातील परिस्थिती सर्व गावकऱ्यांच्या लक्षात येत होती.... परंतु सर्वच जण हतबल होते.....

गणपतीला आता अवघा एक आठवडा राहिला होता... काही तरी करायलाच हवं या उद्दिष्टाने सकाळीच पांडुरंग काका घराबाहेर पडले.... ग्रामदेवतेच्या देवळात येऊन त्यांनी आपली मनातील इच्छा बोलून दाखवली आणि तिचा आशीर्वाद घेऊन ते पुढे निघाले..... काही अंतर चालून गेल्यावर त्यांना शंकरने आवाज दिला.... शंकर हा त्या गावातील एक होतकरू तरुण.... प्रत्येकाच्या गरजेच्या वेळी तो सदैव हजर असायचा.... काकांनी त्याला आपली अडचण सांगितली..... शंकरने लगेच दोन-चार फोन केले आणि काकांना घरी जाऊन त्याची वाट पाहण्यास सांगितले..... काहीतरी चांगलं घडतंय या आशेवर काकांनी घराची वाट धरली......

आपली दिवसभरातील सर्व कामे आटपून संध्याकाळी शंकरने साईचे घर गाठले..... आता आपण काय करणार आणि कसा ह्यातुन मार्ग काढून पुढे जाणार याविषयी पांडुरंग काकांना माहिती दिली..... साक्षात परमेश्वरच आपल्या मदतीला आला असे मानून काकांनी त्याच्या समोर साश्रु नयनांनी हात जोडले.....

शंकर घरातून निघाला तसे काका घरात गेले.... कपाटातील आपले काही कपडे त्यांनी एका बॅग मध्ये भरले..... काकींना आणि आपल्या लहान मुलाला सुद्धा त्यांचे कपडे बॅगेत भरण्यास सांगितले..... काय घडतंय याची काहीच कल्पना त्या दोघांना येत नव्हती...... पण काहीतरी नक्की चांगलं चाललं आहे त्याची खात्री त्यांना काकांच्या चेहऱ्यावरून दिसत होती.....

दुसरा दिवस उजाडला..... काकांनी शंकरला फोन केला आणि आपण तयार असल्याचे सांगितले.... "संध्याकाळी चार वाजता बस स्टॉप वर भेटा" असा निरोप देऊन शंकरने फोन ठेवला.... संध्याकाळी ठरल्यावेळी पांडुरंग काका कुटुंबासाहित बस स्टॉप वर येऊन दाखल झाले...... साईला फोन करणार इतक्यात एक कार त्यांच्या बाजूला येऊन उभी राहिली.... आत शंकर बसला होता.... त्याने सर्वांना गाडीत बसण्यास सांगितले तसे सर्व निमूटपणे आत बसले..... त्यानंतर शंकरने सर्वांना आपला प्लान सांगितला......

"काका-काकी गणपती इथे बसवला काय आणि मुंबईत बसवला काय.... श्रद्धा महत्वाची आहे.... आणि साई इतकी गणपती वरची श्रद्धा कोणीच करू शकत नाही हे सर्व वाडीला माहीत आहे.... त्यामुळे जेव्हा काकांनी मला त्यांची अडचण सांगितली मी लगेच सर्व तयारी सुरू केली.... आता आपण मुंबईत साईच्या घरी गणपती साजरा करणार आहोत..... साईला मात्र अजून याची काहीच कल्पना नाहीय.... त्याच्यासाठी हे एक सरप्राईज आपण देणार आहोत..... तेव्हा आता तुम्ही निश्चिन्त रहा...."

शंकरच्या ह्या प्लानने सर्व सुखावून गेले होते.... रुक्मिणी काकूंना तर त्याचे आभार कसे मानावे हेच सुचत नव्हते.... सर्व स्थिरावर झाल्यानंतर शंकरने गाडी सुरू केली..... गणपतीच्या चित्रशाळेत जाऊन काकांनी आपल्या गणपतीची मूर्ती गाडीत ठेवली.... गावच्या मुख्य वेशीवर सर्व गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शंकरचे तोंड भरून कौतुक देखील केले.... गाडी पुढच्या प्रवासाला निघाली.....

काही अंतर गेल्यावर शंकरने साईला फोन केला आणि दुसऱ्या दिवशी एक सरप्राईज तुला पाठवत आहोत असे सांगितले..... गावी जाण्याची तिकिटे असतील असे वाटून आनंदाने साईने गणपतीला नमस्कार केला.... पण त्याला कुठे माहीत होते की तो नाही यंदा स्वतः गणरायाच त्याच्या भेटीला येत होते.....

Group content visibility: 
Use group defaults

छान कथा ..
गणपती बाप्पा मोरया..