चिंचेवरचे भुत..

Submitted by वीरु on 17 August, 2020 - 15:26

(कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. काही चुकलंमाकलं असेल तर आजिबात माफ करु नका. तुमच्या तब्येतीचा विचार करुन ठोकुन काढा.)
भल्या पहाटे मोबाईलवर 'मेला दिलोंका' ची धुन वाजायला लागली आणि स्वप्नातली टि्वंकल गायब झाली. वैतागुन मोबाईलचा आवाज बंद केला आणि विचारात पडलो की आपण आर्लाम का लावला होता. तोच पुन्हा मोबाईलने 'मेला दिलोंका' सुरु केलं मग झोप उडाली. असा रातपहाटचा मोबाईल वाजायला लागला की भीती वाटते राव. कुठला निरोपबिरोप असला तर. जाऊ द्या पाल्हाळच खुप झालं.
तर आमचे परममित्र भाऊसाहेब उर्फ भावश्या मोबाईलच्या रिंगा देऊन रायले होते. "भावश्या ××× तुले काही लाजशरम शे रे? हाई येळ शे का फोन करानी??" सकाळी सकाळी आमच्या मुखातुन सुविचार प्रकट झाले. पण पलिकडे भाऊसाहेब चांगलेच तंतरलेेले दिसले. मग आम्ही पण शांत झालो.
"अरे इतला चिडु नकोना भो. मी काय सांगस ते ऐक तरी." भावश्या काप-या आवाजाने म्हणाला.
मग भाऊसाहेबांनी जो घटनाक्रम सांगितला तो असा, की दिवसभर मळ्यात काम करुन थकल्याने त्यांनी श्रमपरिहारासाठी गुपचुप रात्री ९ ते १२ चा सिनेमा बघण्याचा बेत केला होता. त्याने घरच्यांना चोरुन एकट्यानेच पिक्चरला जाणे आणि काही गडबड झालीच तर आम्हा मित्रांची मदत घेणे हे त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी नेहमीचं होतं. पिक्चर संपल्यावर तोंडात पानाचा तोबरा भरुन स्वारी सायकल ढकलत रमतगमत मळ्याकडे निघाली. हळुहळु शेवटच्या शोला आलेली मंडळी आपापल्या वाटेला गेली अन् भावश्या एकटाच राहिला. नाक्यावरच्या भुर्जी पाववाल्याला आवराआवर करताना पाहुन भावश्याला जास्तच उशीर झाल्याची जाणीव झाली. पानाची पिंक रस्त्याच्या कडेला उडवुन लगबगीने सायकलवर टांग टाकुन तो रस्त्याला लागला. नदीवरचा छोटा पुल ओलांडल्यावर जरासा चढावाचा रस्ता पार केला की वळणावरच्या चिंचेच्या झाडाजवळुन आपल्या मळ्याकडे जायची पायवाट लागेल असा विचार करत तो चालला होता. चिंचेचं झाड.. ब-याच कहाण्या होत्या त्या झाडाबद्दल. आवस-पुनवेच्या रात्री कुणाला किंकाळी ऐकु आली होती तर कुणाला बाळाचं रडणं. भावश्याला तसा काही अनुभव आला नव्हता पण रात्री झाडाजवळुन जातांना त्याला थोडी भीती वाटायचीच. आज जास्तच उशीर झाल्याने आणि लांबुन येणा-या कुत्र्यांच्या केकाटण्याच्या आवाजामुळे वातावरण गुढ झाल्यासारखे वाटत होते. पुल ओलांडुन चढावाचा रस्ता लागल्यावर अचानक भावश्याला सायकल कोणीतरी मागुन खेचत असल्याचा भास झाला. अशावेळी थांबायचे नाही आणि मागे वळुन पहायचे नाही असे गावातल्या जाणकारांकडुन ऐकुन असल्याने भावश्या जीवाच्या आकांताने पॅडल मारत होता. कसाबसा चिंचेच्या झाडापर्यंत आला. आता सायकल चालवणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर त्याने सायकल तिथेच टाकली आणि तो घराच्या दिशेने धावत सुटला. घरी पोहचल्यावर गुपचुप अंथरुणात पडुन राहिला होता. आता पहाटे सायकलचं काय झालं असावं याचा शोध घेण्यासाठी मला फोन लावला होता.
दोस्ताला मदत करणे परमकर्तव्य
असल्याने शेजारच्या मक्याला सोबतीला घेतलं आणि एम एटीला किक मारली आणि सुसाट निघालो. घटनास्थळावर पोहचतांना मनात थोडी धाकधुक होती. भावश्याची सायकल रस्त्याच्या कडेलाच पडली होती. अशा टायमाला मक्याच्या अंगात जासुस घुसायचा. तो धावत सायकलजवळ गेला आणि लगेच तपास सुरु केला. मी एमएटी स्टँडवर लावुन पोहचेपर्यंत त्याने तपास पुर्ण पण केला होता. मागच्या चाकात अडकलेले कापड काढुन ते माझ्या तोंडापुढे नाचवत मक्या बत्तीशी दाखवत होता आणि माझ्या मुखातुन भावश्या उर्फ भाऊसाहेबांसाठी पुन्हा सुविचार प्रकट होत होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विरेश - चांगला प्रयत्न... अजून फुलवता आली असती... स्क्रिप्ट मध्ये पोटेनशीयल आहे...
शेवट एकदम गुंडाळल्यासारखा वाटतोय...
पुढील लेखनाला शुभेच्छा .....

पहिल्याच प्रयत्नात कथा छानच जमली आहे. प्रेडिक्टेबल होती, पण शेवट वाचून स्माईल आलंच.

आणि अजून अवडण्याचं कारण म्हणजे थोडक्यात पण तरीही व्यवस्थित समजेल अशी लिहिली आहे. मला हल्ली भारंभार डिटेल्स, उगीच उपमा, तत्वज्ञान, ओढून ताणून विनोद आणि तो म्हणाला - ती म्हणाली करत संवादच्या संवाद लिहिले की वाचायला कंटाळा येतो. ( हा कंटाळा माबो मर्यादित. काही पुस्तक कितीही जाड आणि कितीही पारायणं झाली तरी परत वाचते)

धन्यवाद रुपालीजी.
धन्यवाद मीराजी, आपल्या सविस्तर प्रतिसादामुळे हुरुप आला.
धन्यवाद उमानुजी.
धन्यवाद श्रध्दाजी.

वीरू, disclaimer एकदम मस्त.
कथा पण छान आहे, आटोपशीर, उगाच पाल्हाळ न लावता..
अपेक्षित शेवट होता तरीही छान वाटलं वाचताना.

भुतानेच ओढली होती सायकल. भावशा सायकल टाकून पळाला तेव्हा भूत निराश झाले. सायकल व त्यावरील भावशा असे ओझे खेचत सायकलमागून धावत होते बिचारे, घामाने डबडबून गेला होता जीव नुसता. आणि एवढी मेहनत करून हाती लागले काय? तर फक्त सायकल, भावशा पशार.... डोक्याच्या टापशीने घाम पुसला, तिथे सायकलवरच टापशी टाकली आणि भूत परत चिंचेच्या फांदीवर जाऊन बसले. दुसऱ्या रात्रीची वाट पाहात.

भूत परत चिंचेच्या फांदीवर जाऊन बसले. दुसऱ्या रात्रीची वाट पाहात.>> साधनाजी तुम्ही ग्रेट आहात. एकदम खुसखुशीत शेवट सुचवला.
ते भुत पण तुम्हाला थँक्यु म्हणलं असेल. Lol