पारद

Submitted by ज्येष्ठागौरी on 16 August, 2020 - 08:34

पारद
मी पाचवी सहावीत असताना माझ्या हातून थर्मामीटर फुटला. आजीनं वेंधळी कुठली अशी नेहमीची पदवी तात्काळ दिली आणि आधीच झाल्या चुकीनं भरून आलेल्या डोळ्यांना वाट सापडण्याआधीच बापू म्हणाले की अगं चिमटीत पकडून तर बघ.ती दहा मिनिटं डोळ्यातलं पाणी बिणी लांब,पण आयुष्यभर पुरेल आणि आठवणीत उरेल असा अनुभव मिळाला.चिमटीत पकडायचा प्रयत्न केला की त्याचे होणारे अनेक छोटे गोळे मग त्या छोट्या गोळ्यांचा बोटांनी सरकवत होणारा एक मोठा गोळा ,परत त्याचे लहान गोळे,असा बराच वेळ खेळ चालला आणि माझ्या मनात दाटलेला सल कुठल्या कुठे पळाला आणि पारा मनात घट्ट बसला.नंतर शाळेत द्रव असणारा धातू ,त्याची संज्ञा Hg असते वगैरे वगैरे हे कळलं,त्याच्याशी फार दोस्ती नव्हती. पण काचेला लावला की आरसा तयार होतो ह्याची मजा वाटली.कोणाचा पारा चढला की बोलणी खावी लागतात हेही समजलं.आंतरजालावर कळलं की आयुर्वेदात त्याला प्रधान द्रव्य म्हणतात कारण जसा सगळ्यांचं आत्मतत्त्व परमेश्वरात मिसळून जातं तसं पाऱ्यात धातू मिसळून जातात.खूप नंतर शर्मिला टागोर यांची एक मुलाखत वाचली त्यात त्यांनी त्यांच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल बोलताना सांगितलं की He is quite mercurial and she is very grounded.मला तो वाक्प्रचार आवडलाच एकदम..आपल्या मुलाचं अगदी खरंखुरं केलेलं परीक्षण! चांगलं वाईट नंतर!पण पाऱ्यासारखा पटकन राग वर जाणारा आणि तितक्याच पटकन खाली येणारा..
सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा अशा बा भ बोरकर यांच्या अप्रतिम शब्दांतून भेटलेला पारा..
आठवणींचे खेळ ह्या पाऱ्यासारख्याच असतात, मोठ्या गोळ्यांचे छोटे छोटे आणि पुन्हा एक मोठा गोळा.जितका हात लावाल तितक्या बारीक बारीक गोळ्या..
पूर्वीची आठवण पुन्हा आली,माझं मन भरून त्या पाऱ्याला पाहणं आणि हाताळणं झालं मग आई अंगठी तर ती घालायचीच नाही पण
तिच्या सोन्याच्या बांगड्या बिंगड्या काढून आली ,जे काही सोन्याचं होतं ते काढून येऊन, तिनं तो पारा कागदात गोळा करुन चांगला घट्ट बांधला प्लास्टिकच्या पिशवीत घालून आणि एका डबीत घालून जपून ठेवून दिला,मला वाटतं नंतर कुठल्यातरी प्रयोगशाळेत दिला असावा.पण मी तिला विचारलं की तू बांगड्या का काढल्यास तर म्हणाली की पारा एकदा सोन्याला चिकटला की सोनं सोनं रहात नाही.
आज हे सगळं आठवलं म्हणजे कोणीतरी दुखावलं आहे विनाकारण!आपल्या किंवा परक्या माणसांकडून काही कारण नसताना दुखावलं जाण्याची ही काही पहिली वेळ नाहीये,आणि वयानुसार आपली प्रगल्भता वाढतेय असं वाटत असेपर्यंत, अजून आपण कुठंतरी मधेच आहोत ह्याची झालेली जाणीव.असा पारा चिकटतो आपोआप आपल्याला!पारा कुठल्याही स्वरुपात असतो.
कधी कोणी तीक्ष्ण शब्दांनी केलेली जखम,कधी गोड शव्दामागची कडू भावना,कधी नात्याच्या किंवा अधिकाराच्या धाकलेपणामुळे झालेले अपमान,कधी मुद्दाम कोणी केलेला पाणउतारा.कधी आपलं उणं दुसऱ्यानं काही संबंध नसताना,काही काळजीकाटा नसताना नजरेला आणलेलं.
कधी टवाळी, कधी कौतुक करताना मागून टोचलेला काटा,पारा चिकटत राहतो मनाला..मनाची चांगली मशागत करत राहिलेल्या आपल्याला हिंदकळायला भाग पाडतो.मग थोडा काळ लागतो दुरुस्तीला कारण हा असा पारा लागला सोन्याला की तो पारा सगळं घेऊन टाकतो आपलं असं काही रहात नाही मग.पारा आणि सोनं एकत्र झालं की मग ते वेगळं करायला जशी शास्त्रात मोठी प्रक्रिया करावी लागते तशीच मन आणि ह्या दुखवणाऱ्या किंवा मन आणि नकारात्मक भावना एकत्र झाल्या की निघता निघत नाहीत.त्याला मोठी प्रक्रियाच करावी लागते.
कित्येक नकारात्मक गोष्टी ह्या पाऱ्यासारख्याच असतात, त्यांच्याकडे बघता बघता आपल्याला(ही) चिकटतात.. आणि मग आपल्या मनात जे सोनं असतं ते सोनं रहात नाही त्याचा पारा व्हायला वेळ लागत नाही.आतल्या एखाद्या सोन्याच्या गोष्टीचा पारा झाला की तो दुसऱ्याच्या ठायी असलेल्या सोन्याला चिकटायला लगेच सरसावतो..
हा पारा आपल्याला चिकटू द्यायचा नाही म्हणलं तर त्याला फार कष्ट लागतात.एकतर तुम्ही चांगले टगे असावे लागता किंवा अगदी निर्लेप असावे लागता. साध्यासुध्या आयुष्यात,अतीव संवेदनशील मन बाळगणाऱ्या व्यक्तींना हे कसं जमावं!माझ्या नवऱ्यानं त्याच्या वाढत्या वयात मनावर असे काही कोरडे खाल्ले आहेत पण त्याचा त्यानं फार उत्तम उपयोग करुन घेतला आयुष्यात.माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते हे त्याचं आवडतं वाक्य आहे.आपल्या मुलांची तर शिकवणी लावावी असा विचार मनात येतोय, अशा नकारात्मक गोष्टींना तोंड देण्याची त्यांची तयारी जबरदस्त आहे.आत्ता आत्तापर्यंत कोणी काही बोललं तर मुसमुसत येणारी मुलं आपल्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगताना ऐकलं की वाटतं की ह्या जगातली उत्तम जगण्याची मूलभूत कौशल्यं अगदी सहज आत्मसात केली आहेत ह्यांनी. आईही म्हणायची तसं "ज्याचं त्याच्याजवळ" हेही सतत बजावते आहे मी स्वतःला.तरी व्हायचा तो त्रास काही काळ होतोच,हेवा,मत्सर,तुलना, गैरसमज, संशय,बदल्याची भावना, अवहेलना, तिरस्कार, पूर्वीच्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी,ही निबीड अरण्यं आहेत ह्यातून मार्ग काढायला फक्त आतला प्रकाश उपयोगाला येईल.विपश्यना करताना हा प्रकाश कुठेतरी जाणवला,हे सगळं भंगुर आहे हे तिथं समजलं.नकारात्मक गोष्टींना बगल देण्यापेक्षा त्यांचा सामना समर्थपणे करणे आणि ते तिथेच सोडून पुढे जाणे हे उत्तम हेही कळलं. माझ्या एका अगदी जवळच्या मैत्रिणीनं कोणी असं तुला विनाकारण त्रास देत असेल तर तू तुझी कर्म उतरवत आहेस हे लक्षात घे असं सांगितलं आणि आणखी थोडं बरं वाटलं.कर्माचा सिद्धांत!मग आपसूकच स्वतःचं वागणंही निरखून बघणं आलं.
एखाद्या गोष्टीवरचा आपला प्रतिसाद असतो की प्रतिक्रिया ही गोष्ट पारखून पाहायला हवी सतत!काचेला लागलेल्या पाऱ्यातून आपलंही प्रतिबिंब दिसतंय आपल्याला..
आपणही सद्गुणांचे पुतळे नसतोच. काळ्यापांढऱ्याचं मिश्रण कायम.कधी काळा जास्त कधी पांढरा,कधी आत्ता पांढरा होता म्हणेस्तोवर तो काळा होतो आणि काळ्या रंगाबद्दल विचार करेपर्यंत धवल. तेंव्हा जास्त लक्ष मनावर ठेवावं हे खरं. आपण कोणाच्या सोन्याला चिकटणारा पारा होत नाहीये ना तेही बघायला हवं वारंवार!अजूनही काही कारणांनी,बाह्य गोष्टींनी जर आंतरिक शांतता भंग होत असेल तर जरा जास्तच आतल्या बाजूला वळावं हे उत्तम.
कासया गुणदोष पाहो आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे ।।
काय पाप पुण्य पाहो आणिकांचे । मज काय त्यांचे उणे असे ।।
नष्टदुष्टपण कवणाचे वाणू । तयाहून अणू अधिक माझे ।।
कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहो डोळा आपुलिये ।।
तुकाराम महाराज।।
इतकं परखड मन नाही आपल्याकडे पण स्वतःशी प्रांजळ आहे ह्या जाणिवांची सुरुवात तर झाली.चला एका मनाला लागलेल्या गोष्टींमुळे बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली.पारा निसटला हातातून..सोन्याला लागायच्या आधीच!
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माणसं वाईट नसतात परिस्थिती वाईट असते.

अगदी खरं...
खुप सुंदर लिहिलाय लेख.

आईही म्हणायची तसं "ज्याचं त्याच्याजवळ"

असा विचार केला की बराचसा मनस्ताप कमी होतो.

काय सुरेख लिहीता हो तुम्ही.
आज माझ्या स्वप्नात स्व. साबा आल्या होत्या. त्या एक फॉर्म भरत होत्या आणि त्या फॉर्मवरच्या एका प्रश्नापाशी त्या थबकल्या म्हणुन मी तो वाचला. तो प्रश्न होता - इज देअर राईट & राँग?
त्यांनी विचारांती उत्तर लिहीले 'नो.'
मला माहीत नाही हे स्वप्न का पडले. कदाचित मी सलग 'आय अ‍ॅम अ किलर' चे बिंज वॉचिंग करत असेन म्हणुनच असेल.
________
असो. तर तुम्हीही तेच लिहीले आहे. माणसे वाईट नसतात, परिस्थिती माणसाला वाईट बनवते. अर्थात मला ते पटत नाही ही गोष्ट अलहिदा. गोंदवलेकर महाराज म्हणतात - मनुष्य २ मार्गांकडे जाउ शकतो , उन्नती किंवा पशुतुल्य अधोगती . मनुष्याचे हे कर्तव्य आहे की त्याने सतत उन्नतीची कास धरली पाहीजे.
________
पार्‍याचे उदाहरण अतिशय सुंदर निवडले आहेत. त्यातुन आपली चिंतनप्रक्रिया झळाळुन उठावदार दिसते. विपश्ययना स्वतःकडे तटस्थतेने पहावयास शिकवते असे वाचनात आले. अर्थात प्रत्येकाला तो इन्टेन्स अनुभव सुट होतोच असे नाही असेही वाचनात आलेले आहे.

सामो तो अनुभव खूप सुंदर आहे ,जरुर घेण्यासारखा आहे, अगदी वेगळा आहे.मी तुमच्याशी वैयक्तिक बोलेन ह्यावर.मला हे धैर्य एकवटायला 10 वर्ष लागली.आता असं वाटतंय की खरच आधी केली असती तर खूप नुकसान टळली असती.