भाषांतरकारांचा बंदिवास

Submitted by नंबर१वाचक on 12 August, 2020 - 13:35

मी एक खरीखुरी देशभक्त आहे. भारताच्या लष्कराबद्दल आणि नेत्यांबद्दल मला नितांत आदर आहे. केवळ विचारांची सरमिसळ दाखवण्याच्या हेतूने हे लिखाण केले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. अजाणतेपणी कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून क्षमा मागते.
तरीही, आक्षेप असल्यास धागा काढून टाकला तरी चालेल.

---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
१९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन यद्धासंबंधी एक पुस्तक आहे. त्यातील दोन प्रकरणाचे भाषांतर करण्याचा योग आला. लॉकडाऊनमुळे सध्या सगळी कामं घरात करावी लागतात. नवरा परदेशी, आणि घरात दोन लहान मुलं आणि सासू-सासरे यामुळे घरात एक मजेदार युद्ध नेहमीच सुरु असत. भाषांतराच्या कामामुळे कधीकधी मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. जरी ऑनलाईन शाळा असल्या तरी, आई नंतर समजावेल या विश्वासाने, एखादा परभाषेतील सिनेमा बघावा तशी मुलं टीचरकडे बघत बसतात. बाहेर कुठे जायची सोय नाही. सोसायटीच्या आवारात, तेही हल्ली हल्ली, जायची परवानगी असल्याने संध्याकाळचा एखादा तास तरी मुलांसाठी ठेवावाच लागतो. पण कामाच्या गडबडीमुळे मी दोन-तीन दिवस मुलांना घेऊन खाली जाऊ शकले नाही. अभ्यासही तुमचा तुम्हीच करा असं सांगून मी माझ्या कामात बुडून गेलेले. शाळेमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त गाणी आणि चित्रकला स्पर्धा जाहीर झाली.मग काय! अभ्यासातून चांगलीच पळवाट मिळाली.
आता आम्ही चित्रकलेची प्रॅक्टिस करतो म्हणून, खोलीभर कागद, रंग, बश्या, पाण्याच्या वाट्या, खराब कापडं, ब्रश वगैरे मनसोक्त पसारा घातला गेला. एक मश्रूम, एक झाड आणि एक बेडूक कागदावर, आणि हिरवे, निळे, लाल, पिवळे रंगांचे ठिपके, फटकारे फरशीवर, कपड्यांवर, बेसिन मध्ये आणि बाथरूम मध्ये साकार झाले. गाण्याची प्रॅक्टिस या सदराखाली, युट्युब आणि सिंथेसायझर येथेच्छ बडवून झाले. तेव्हाच सासऱ्यांना बागकाम करायचा मूड आला. पूर्ण बाल्कनीमध्ये माती, पाचोळा झालेला.. पावसाने माती ओली झालेली.. नुसतं झाडून उपयोग नव्हताच पाणी टाकून खराटा करावाच लागणार होता..
एकीकडे कामाची यादी वाढतच चालली होती आणि डोक्यात: 'Daulat Singh was fully in picture' हे मराठीत कसं करावं ह्या विचारात असतानाच .... आईssss, आयुषने पाणी सांडलं अशी आरोळी आली. Athority & power, opposition & resistance, clear & categorical यातल्या नेमक्या छटा वेगळ्यावेगळ्या कश्या दाखवाव्यात हा विचार करत असतानाच, आईssss, ताई मला पियानो देत नाहीये.. असे दुहेरी युद्ध सुरु होते.
‘Trying for amicable settlement with China’ ऐवजी घरात मैत्रीपूर्ण समझोता कसा होईल या विचार मी होते. तेवढ्यात फर्माईश आली, आई आलू पराठे कर ना जेवायला. हरे राम !! गेले दोन तास. मी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला की, आज साधंच काहीतरी खाऊ, रविवारी करते पराठे. तर.. "एकतर तू माझा अभ्यास घेतला नाहीस, खाली खेळायला नेलं नाहीस, बाबा असता तर आम्ही क्रिकेट खेळलो असतो आणि आता मी आलू पराठे करायला सांगितले तर तेही नाही, हम्म!!! Not fair" असा म्हणून मुलगा रुसून बसला. त्याने केलेल्या तुलनेने याला बाबा आणि बटाटा सारखेच दिसतात की काय या विचारे मी व्याकुळ झाले. आणि रात्री जरा जागून काम करू असा विचार करून मी बटाटे कुकरला लावले. जेवणं आटोपून सगळं आवरून मी कामाला बसले. २-३ पाने झाली असतील डोळे गपागप मिटत होते. मॉनिटरच्या कोपऱ्यात १:३७ मि झाली होती. मी भारत-चीन-भूतानच्या तिकोनी सीमेवर होते. अजून १५-२० मिनिटे काम करू आणि झोपू या विचाराने मी पुन्हा कामात डोकं घातलं, आणि ....

नेहरू आणि मेनन यांनी हॉल मध्ये दूध सांडून फारशी चिकट केली होती. सैन्यदलाने मातीचे पाय न धुता कारवाई केली होती. वाळलेल्या कपड्यांच्या घड्या न केल्याने सीमेवर खूपच पसारा झालेलं होता. त्यातच जाऊबाईंची किमो झाल्याने जमल्यास पोळीभाजीचा डबा पाठवावा असे आदेश निमलष्करी दलाला दिले होते. तुटपुंज्या सुविधा, अपुरे सैन्यबळ याबद्दल सेनादलाने आपला निषेध नोंदवला होता. पण कितीही अडचणी आल्या तरी सीमाआघाडीवर बेल वाहीलाच पाहिजे असा कठोर आदेश सैन्यामुख्यालयाने दिला होता. त्यातच सोसायटी कमिटीच्या ग्रुपवर २०८ मेसेजेसचा मोठा पत्रव्यवहार झालेला होता. त्यात कामगारांना मास्क, हातमोजे आणि फिनेलचा तुटवडा असल्याच्या महत्वाच्या नोंदी होत्या. यावरून चीन आक्रमक भूमिका घेणार नाही असा विश्वास नेहरूंना वाटत होता...... ट्रिंग.. ट्रिंग.. ट्रिंग.. गजर वाजत होता.. सकाळचे ६ वाजलेले. मी मुलीला उठवायला गेले तर आत्ता मूड नाही असा म्हणून दुसऱ्या कुशीला वळून झोपून गेली.. मुलगा उठला पण ५ मिनिट अजून म्हणून पांघरूण घेऊन परत झोपला. आपणही ५-१० मिनिटांनी उठावं म्हणून मीही आडवी झाले. आणि ....
दुधाच्या पिशव्या न धुता हाताळल्याने सीमावर्ती भागात कोरोनाचा प्रसार होऊ लागला होता. त्यावर उपाययोजना करण्यासाठी भूतानमध्ये नेहरूंनी तातडीची बैठक बोलावली होती... ठाक, ठाक.. दारावर थाप पडली. सासऱ्यांनी हाक मारली, उठा! ७ वाजले शाळा आहे.

मी धडपडत हॉल मध्ये आले .. नेहरूंनी दूध सांडले नव्हते. सैन्य दलाने मातीचे पाय उठवले नव्हते.. आणि मी पूर्ण जागी झाले होते. रात्रीचे भेसळयुक्त स्वप्न आठवून मनाशी हसत मी आवरायला सुरुवात केली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहाहा,
नशीब, घरची मंडळी आघाडीवर मोर्चा सांभाळत नव्हती.

मस्त लिहिलंय.
खरेच जर भाषांतर करत असाल तर कुठल्या पुस्तकाचे करत आहात?

छान लिहितेस गं! नंबर १ लेखक पण आहेस की! भाषांतरात अननुवाद्यता नावाचा प्रकार असतो तसा प्रकार होतो आणि अनुवाद करताच येत नाही. मराठीत समर्पक शब्द नसतील तर भाषांतर काराचा दोष नाही. असो. खूप आवडलं तुझं लेखन.

टवणे सर... K.N. Rghavan यांच्या Dividing Lines या पुस्तकाचे भाषांतर करतीये

एविता!!! बरोबर आहे... भाषांतर, अनुवाद आणि स्वैर अनुवाद.. वरवर सारखे वाटले तरी वेगळे आहेत..
भाषांतर हे शब्दशः असावचं लागतं.. सरकारी सूचना.किंवा इतर औपचारिक लिखाणाचे भाषांतर करावे लागते

कथा कादंबरी चा अनुवाद चालतो.. अगदी शब्दशः नाही झाले तरी भावना पोहोचणे महत्त्वाचे

स्वैर अनुवादात बरचं स्वातंत्र्य मिळतं

भाषांतर करणाऱ्याचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. अशांचा मी खूप आभारी आहे, चांगली इंग्रजी पुस्तके मराठीत वाचता येतात ...

अगदिच रिलेट करता आले... मी स्वतः तांत्रिक अनुवादक म्हणुन गेले १५ वर्षे काम करतो आहे.. आणि फावल्या वेळात गुलजार किंवा इतर गैर मराठी कवींच्या कवितांचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न करत असतो.

Lol मस्तच लिहीलंय. आता १ नंबर लेखक पण होणार तू. (एक दोन टायपो आहेत ते नीट करणार का? योग्य, सोया च्या जागी योग, सोय)

च्रप्स धन्यवाद
प्रसन्न सर.... शेअर करा स्वैर अनुवाद... आवडेल वाचायला

छान.

मस्त लिहिलेयं... विचारांची सरमिसळ छान दाखवली आहे.

कुठेही सैन्याचा किंवा देशाचा अपमान वाटला नाही त्यामुळे पहिले डिस्क्लेमर नसते तरी चालले असते.

लेख मस्तच लिहिला आहे. आपल्याकडे असे म्हणले जाते 'मनी वसे ते स्वप्नी दिसे ' अगदी तसेच वर्णन लेखात वाचायला मिळते.
त्याने केलेल्या तुलनेने याला बाबा आणि बटाटा सारखेच दिसतात की काय या विचारे मी व्याकुळ झाले. हे पण भारी.

Pages