बाबू न्हायाचं दुकान

Submitted by अरिष्टनेमि on 9 August, 2020 - 14:25

एक गावाकडची गोष्ट. विशेष करमणूकीची साधनं नसणा-या एखाद्या आडवळणाच्या खेडेगावी न्हाव्याचं दुकान ही एक लोकांची आवडती जागा असते. दुकानमालकही तितकाच कलंदर असेल तर मग काय! अशाच एका गावात खरोखर घडलेल्या या गोष्टी. डोळ्यापुढं गावाचं चित्र उभं करून आपापल्या माहितीतली पात्रं भूमिकेत टाकून वाचलं तर कदाचित आवडेलही.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

आज रयवार. पन शेतक-याला कह्याचा आलाय रयवार? सक्काळूच उठून गाई-म्हसराच्या धारा काढायच्या, दूध डेरीत न्हेयाचं, आल्यावं वावराकं जायाचं. समदं चालूच ह्ये. ज्याच्या जवा-या - बाज-या व्हत्या त्यांनी कापन्या चालू करुन उराकल्याय बी.

आता मळ्यातल्या पो-हांन्ला मायंदाळ रिकामा टाईम भेटल्यानी त्यांन्ही म्याच ठरीली व्हती; शिंदंमळा इरुद्ध पठारेवस्ती. खाल्ल्या शिंदंमळ्याच्या टीममधी गजाआप्पाचा इठ्या क्याप्टन व्हता. निब्बार काम्फिडन्स तेच्यात. त्यान्ही सांगूनच ठूलं व्हतं समद्या पो-हान्ला, “तुम्ही निस्तं मी सांगन त्यावढं करा. काय लय आवघाड नाय जिखाया. ह्या बारीनी म्याच आपुनच जिखायची. काही का व्हयीना.”
आख्खा मह्यना हायस्कूल शाळंच्या माघल्या ग्राऊंडवं शन्वार-रव्वार मोक्कार प्र्याक्टीस केली त्यान्ही. पार त्वांडं उन्हानी माकडावानी काळी व्हवूस्तर.

आता आज म्याच व्हनार. पोपट्या तं क्याप्टन नाय आन् काय नाय. पन सक्काळधरून म्याचच्या नावानी त्याचं काळीज निस्तं झुमकुळ्या खात व्हतं. काय व्हईन, कस्सं व्हईन? काय व्हईन, कस्सं व्हईन? आन न्यामकंच इठ्याचं म्हतारं खपलं. समदी प्वा-हं कावरी-बावरी, ‘आता म्याचचं कसं?’

पोपट्या लईच त्वांड बारीक करुन बसला. “आत्तीहायची येज्या. यालायबी आजच टाईम भ्येटला मराया. राह्यलं आसतं आझूक दोन दिस तं काय झालं आसतं? आजच उलाथलं” सकाळूच डबडं घेऊन वढ्यावं जाता-जाता मशेरी दातावं घाशीत पोपट्या दिलप्याला म्हनत व्हता. इधं म्वॉकळं-ढाकळं बोलाया काय आडचन नव्हती.

वढ्यातला कारेक्रम आटपून घरी यवूस्तर इठ्याचा धाकला भाव बल्हवाया हाजर. “पोपटभाव तुला बॉल्हावलंय लवकर. आन दिल्या, राजा, यशा, सु-या, नित्या समद्यान्हला घेऊन यी. लगीच बॉल्हावलंय हां का?”

पोपट्याला माह्यतीच व्हतं. ह्येच व्हनार ह्ये. त्यान्ही मंग समदीच क्रिकेटची टीम गोळा करुन इठ्याच्या घरी न्हेली. सु-याचा आजा पह्यलाच पव्हचला व्हता. समद्यास्नी काय-काय कराया लागातंय ते सांगत व्हता. पोपट्याला पाह्यल्याबरुब्बर त्यान्ही आरडून सांगितलं, “अय पोपट्या. जा. गाडी जुपून कॉन्ह्ला तरी संगं घेऊन जा आन पाटलाच्या वखारीतून धा मन लाकडं घीवून वढ्यावं जाय. आकरा वाजूस्तर पव्हच बरका.”
पोपट्याला हासाया आलं. ‘च्यायचं म्हतारं हिच्या. ह्ये गचकल्यावं ह्याचं कोन करीन?”

तरी पोपट्यानी दिलप्याला संगट न्हेला आन् बैलं जूपून गाडी घीवून गेला. पाटलाच्या वखारीतून लाकडं भरली आन वढ्यावं निघाला.

तो न्ह्यायाच्या दुकानाम्होरुन जातच व्हता, तव्हर बाबू न्हायानी पघितलं, पोपट्या सामाईन न्हेतोय. खुडचीत बसलेल्या गि-हायकाच्या दाढीला साबान लावता-लावता पोपट्याला इच्चारलंच, “अय पोपट्या, लाकडं कॉन्ह्ची रे?”

पोपट्यानी आरडूनच सांगितलं, “इठ्याचं म्हतारं.”
“कव्हा?”
“सक्काळूच.”
“आरारा. म्हनून तू घेऊन चाल्ला व्हय लाकडं? आताच तं गेल्या रयीवारी म्हातारं डोकी करुन ग्यालं माह्याकून.”
“व्हय काय? बरं.”
पोपट्या काय थांबला नाय. त्याला पक्कं माह्यती व्हतं. इठ्याच्या म्हता-याच्या गावभर उधा-या.

त्याला उजूक हासाया आलं. “बरं झालं बेन्याचं पैसं उधार ठुलं. आता घेशीन वर गेल्यावं.”
पिवळ्याधोट दाताचा दिलप्यायबी हासला.

पाच मिंटं झाली. यवढ्यात सायकलीच्या सांगाड्यात पाईंडेलच्या वर मनभर लाकडं ठिवून लव्हाराचा मध्या चालला व्हता माघून. त्याच्या घरची लाकडं सरली म्हनून त्याच्या लक्ष्मीनी त्याला पाठीवला व्हता लाकडं आन्हाया. बाबू न्हायानी खुडचीतल्या गि-हायकाच्या गालावं वस्तरा लावलाच व्हता. आता वढनार तव्हर त्यान्ही मध्याला पघितलं.

“अय मधू, काय रे?”
“काय नाय बॉ. बरं ह्ये.”
“लाकडं कॉन्ह्ची?”
“माव्हीच ह्येत.”
“आरं, तुही तूच घीवून चाल्ला व्हय?”

खुडचीतल्या गि-हायकासगट बाकड्यावं नंबराला बसलेली समदी हासून खाली पल्डी.
मध्याला काय समजना. तसाच सायकल ढकलीत ग्येला घरी.

बाबूनी तासाभरात तीन गि-हायकं आटापली.
दाढीचं तिसरं गि-हाईक खुडचीतून उतरुस्तर यक पाच-सात वर्साचं प्वार बसून ग्यालं खुडचीवं.

बाबू न्हायानी वाकून त्याचं त्वांड पघितलं, “अय, ह्ये क्यालेंडर कॉन्ह्चं ह्ये?”

माचिसमधल्या यका काडीनी कानातलं गबाळ अज्जात काढीत दिन्या शिपी येक डोळा बारीक करुन बाकड्यावं बसला व्हता. तव्हर बाळ्यानी त्याला ढोसला, “अय दिन्या. तुपलं प्वार.”

दिन्याला पह्यलं सुदारलंच नाय काय झालं ते. तव्हर त्याचं प्वारच म्हन्लं, “मी शिप्याचा नानू ह्ये.”
बाबूनी इच्चारलं, “काय करायचंय? दाढी करु का?”
प्वारगं हादरुन बसल्या जाग्यावच आराडलं, “अय पप्प्यव, तुम्ही म्हनले व्हते क्यासं कापायची. पन ह्ये पघ ना दाढी करत्यात मपली.”
समदी मंडळी हासली.

प्वार लगीच घायकुतीला आलं. बाबूच मंग बोल्ला. “बरं, बरं बस. दाढी नाय करीत वले. निसती क्यासं कापीतो.”
तव्हा नानू शांत बसला. कचा-कचा-कचा बाबूनी क्यासं कापली आन पोराला मोकळा केला. बाकड्यावं बसलेल्या बापाकून चाकलेटसाठी येक रुपया घेऊन प्वार उड्या हानीत घरी ग्यालं.

आंघूळ-बिंघूळ क्येली आन शिप्याचा नानू ख्याळाय ग्याला चिंतामन कासाराच्या घरी. चिंतामनचं प्वार म्हन्लं, “तुहायला तुह्या, क्यासं कापून आला व्हय रे? मलाय बी कापायची व्हती. दमसाक उलीसा. मी माह्या बापाला इचारतो.”

चिंतामनच्या क्यालेंडरनी तिधूनच आरडाया चालू क्यालं, “दादा, दादा, दादवै, मी कटिंगीला जातो.”
चिंतामन माघं येलाची दोडकी तोडीत व्हता. तोय बी म्हन्ला, “जा व्हय. आन बारीक कापशीन रे. सांगशीन बाबू न्हायाला माव्हं नाव. का माह्या बापानं बारीक क्यासं कापाया सांगितलंय.”

शिप्याचा नानू चिंतामनच्या प्वाराला घीऊन उजूक बाबू न्हायाच्या दुकानापशी ग्याला.
दुकानाम्होरं नानू उभा -हायला निस्तंच थोबाड वर करुन आन् चिंतामनचं प्वार माघंच. बाबूनी पघितलं दिन्याचा नानू दुकानाम्होरं उभा राह्यलेला.

बाबूनीच इचारलं, “काय रे?”
नानूचं ध्यानच नाय. यक नाय न दोन नाय. एका हातानी चड्डी वर वढून करगुट्याची गाठ आवळून चड्डीच्या व-हून घेत निरा उभाच राह्यला.

बाबू पुन्ह्या आराल्डा, “अय गैबान्या, काय ह्ये? काय पाहेन रे?”
नानू उलूसाक लाजला. नाकातून भायेर आल्याली घट श्यांबडाची चिगाट धार त्यान्ही उजूक नाकात वढली आन् नाकावं उरलेला बुडबुडा सद-याच्या बाहीला गरबडीनी पुसून फोडून टाखला. मंग बाबू न्ह्यायाला म्हन्ला, “ते. क्यासं.”
बाबूनीयबी त्याला काय इचारावा?
“काय? क्यासं काय? मघा कापल्याली उजूक चिगटून दिऊ का?”

दुकानातली मान्सं हसाया लागली. तसं नानूनी माघल्या चिंतामनच्या पोराकं ब्वॉट दाखावलं आन म्हन्ला याचीयबी अशीच शेम माह्यासारकीच कापायचीत.”
माघल्या प्वाराकं पघून बाबू म्हन्ला, “कव्हा सांगायचा रे मंग? चाल. बस इधं नंबर लावून तुव्हा. चिंतामनचा ना तू? पन का रे? तू तं आंघूळ करून स्नो पाऊंडर लावून आला. क्यासं कापल्यावं आंघूळ करायची का आधीच करीत्यात रे?”
चिंतामनचं प्वार काही ब्वॉल्लच नाय. निरं हासलं येड्यागत अन गप बसलं.

बाबूचं बोल्ला, “उगीच जुनी लॉकं म्हनत नव्हती?”
“काय? काय म्हनत नव्हती?”, किस्न्याच्या डॉस्क्यात उगीच किडा आला.
“ह्येच ते, यडी मा के चांद बेटे आन ढुंगान धोके हागनेको बैठे.”
दुकानातली समदी जन्ता हासू हासू परेशान.
मंग गपचिप बाकड्यावं बसलेला नानू आन् चिंतामन कासाराचं प्वार हाळूच उठून कडंला लिंबाच्या सावलीत गेन्याच्या पंचरच्या टपरीपशी खडं खेळाया लागली.

तिकडं राती यश्टी स्टॅंडच्या माघं घिसाड्याचं पाल उतारलं व्हतं. पंचर सायकल हातात धरुन घिसाड्याचं म्हतारं गावात आलं. आता न्यामकीच त्या दिशी इठ्याचं म्हातारं खपल्यानी गेन्यानी पंचरचं दुकान उघाल्डंच नाय. मळ्यात मयत झाल्यावं जावाच लागातंय. आता घिसाड्याच्या म्हता-यानी पघितलं तं लिंबाखाली गेन्या कुढंय जाग्यावं? निस्ता लिंबाला लटकल्याला पत्र्याचा बोर्ड व्हता.
Village_3.jpg

आता कसं करावं? म्हतारं गरबाडलं. त्यायबी म्हता-यानी आता इचारुन इचारुन कॉन्हला इचारलं तं बाबू न्हायाला. त्याचं दुकान लिंबापशीच व्हतं लगीच.
म्हता-यानी इचारलं का ब्वॉ आता इधं पंचरवाला नाय म्हनल्यावं मंग कुढं देतीन काढून? आता बाबू न्हायीच त्यो, त्यो सोडीन काय अशा टायमाला? त्यान्ही कनी डोक्याची टोपी सरळ क्येली आन् लगीच यकदम सज्जनवानी त्वांड करुन घिसाड्याच्या म्हता-याला म्हन्ला, “बाबा, कोन गावचे?”
“आम्ही सोलापूराचे.”
“मंग हिकडं कुन्हीकं?”
“आम्ही घिसाडी.”
“आसंह्ये व्हय? काय सायकल पंचर ह्ये जनू?”
“व्हय व्हय.”
“हात्तिज्यायला. बरुबर ह्ये, बरुबर ह्ये. लय काटं वो रस्त्याला. लय सायकली पंचर व्हत्यात. सायकली जाऊंद्या परवाच्याला जग्याचं म्हसाड पंचर झालं. ह्या ह्या ह्या.” त्वांडातली लवंग सम्हाळीत बाबू हासला.
“पन कनी आज न्यामकीच गेन्या मौतीला ग्येलाय. त्यो आता कह्याचं दुकान उघडीतोय? आता कनी आसं करा तुम्ही”, बाबू न्हायी डाया हातात कातर धरुन उज्या हातानी दाखून सांगत व्हता, “ह्या अंगाला जावा आसं खाल्लाकड. त्ये काळं कुतारडं बसलंय का टिपाडापशी सावलीला. दिसलं का? आंगं तिधपवतर गेल्यावं उज्या हाताला याक दुकान ह्ये, तात्याचं. त्यो तात्या काढीतोय पंचर. पन कामाचा लई कटाळा त्याला. पह्यल्याछूट तं गि-हाईकाला नाहीच म्हन्नार. पन त्याला लय आग्रेव केल्यावं श्या दीन बरका पन. लय म्हतारं बोड्याचं पघा. पन कामाला हुशार. येक नंबर पंचर काढीतंय. या गेन्याला काय करता?”

आता तात्याचं यावढं गुन आयकल्यावं जावा का नाय आसा इच्चार करीत घिसाडी तिधंच दाढी खाजीत उभा राह्यला.
बाबूनी त्याला पुन्ह्या सांगितलं, “हाय म्हतारं इपितार, पन जावा. द्यातंय काढून पंचर. लागन तं त्याची पंचरची औजारं शेवटून द्या त्याला संद्याकाळी.”

घिसाड्याच्या म्हता-यानी सायकल तात्याच्या दुकानाम्होरं अज्जात वट्याला टेकून लावली. दुकानात गल्ल्यावं तात्या बसला व्हता सुपारीचं खांड चघळीत गि-हायकाची वाट पघत. धंदंच नाय राह्यलं पयल्यासारखं तं आता काय करीन तव्हा? पन दुकानात सायकलीच्या सामायनावानी घिसाड्याच्या म्हता-याला काय दिसना. तव्हा त्यान्ही माघं वळून पघितलं. बाबू न्हायी हातात कातर आन् कंगवा घीऊन सोताच्या दुकानाम्होरं उभा व्हता. त्यान्ही घिसाड्याच्या म्हता-याला ‘त्येच दुकान’ आसं हातानी खुनवून सांगितलं.

म्हतारं दुकानापशी जाऊन बोललं, “शेट.”
“हं. काय पायजे?”
“सायकलीची पंचर काढायची व्हती.”
“तिथं लिंबाखाली जा गेन्याकडं. त्याचं हाये पंचर दुकान.”
“पन द्याकी शेट तुम्ही काढून.”
“आरं, ह्ये दिसना का रं तुला वाण्याचं दुकान? इथं पंचर काढत्यात काय?”
“नाय ना शेठ, त्ये बंद ह्ये गेन्याचं दुकान. द्याना शेठ यवढी पंचर काढून येवढ्या टायमाला.”
“आरं मी काय तुला पंचरवाला दिसंतोय का? सांगितलं कोन्ही रे इथं पंचर काढून देत्यात?”
“त्या लिंबापसल्या न्हायानी. त्यो म्हन्लाच व्हता.”
“काय?”
“का तुमी पंचर लवकर काडून नाय देत. लय इनवन्या कराया लागतीन. द्या वो शेट. लागन तं चाराने जादा घ्या. तुमची पंचरची औजारं काय आसतीन तं मी शेवटून दीन फुगाट. पन यावढं पंचर……….”

तात्यानी मोहोरं बोलूनच धिलं नाय.
“त्याच्या XXX घोडा लावला.” तात्याच्या त्वांडातली सुपारी बंदूकीच्या गोळीवानी फाटकन् भिताडावं आपाटली आन् असा काय तात्या वानी पिसाळला. आगागागा.
“तुझ्यायची…………” तात्यानी हाताला आल्याली टेकायची उशी घिसाड्याच्या म्हता-याला फेकून मारली. म्हतारं सायकल हातात घीवून तकाट. धोतार सुटून माघं लोंबातय आन् घिसाडी पळंतोय. तात्या वानी एका हातात वहान घीऊन श्या देत तेज्या माघं. मधीच रस्त्यावं उभा -हाऊन बाबूच्या नावानी श्या देतोय आन् हिकडं बाबू न्हायाच्या दुकानात मान्सं हासून हासून उल्टी-पाल्टी.

तात्या वानी श्या देतच बाबूच्या दुकानाम्होरं आला.
बाबू न्हायी रस्त्याकं पाठ करून दुकानच्या कोप-यात कात्रीला त्याल सोडीत उभा व्हता. “जय जय राम क्रिष्न हारी, जय जय राम क्रिष्न हारी”

“बाबू” रफिक फीटरच्या फटफटीवानी येकदम कडक आवाजात तात्यानी आरडून हाक मारली.
“औ, तात्या व्हय. तीन नंबर ह्येत आझून दाढीचे. झाल्याव मी आवाज देतो.”
“बाब्या, भाड्या.”
“अगं बाबौ. तात्या. आवो काय झालं यकदम?”
“XXXच्या, तुझ्या XXX ला लावला घोडा मी. तू लोकांन्ला माह्या दुकानावं पंचरला पाठवीतो?”
“कोन? मी?”
“मंग कोन?”
“बाबौ. म्या कव्हा? मी करीन का तात्या असली कामं? तुम्हाला कोन्ह्या सांगितलं? आन्हा त्या भाडखाऊला इधं. इधंच त्याला उभा भादरुन टाखितो XXXXला. मला निस्तं नाव सांगा.”
“त्ये काय, त्ये त्ये म्हतारं. आता ग्येलं तिकडं.”
“कंचं? त्ये? आरारारा. तात्वै. त्ये घिसाडी व्हय? आन् तेज्या भरुशानी तुम्ही मला श्या देता? आवो मी आसं करीन का? माही गि-हायकं मला आटपनात. आन मी कह्याला ह्या भानगडीत पडन? इचारा लागन तं. यावढी लॉकं हायेत इधं. अय किस्ना. म्या सांगितलं व्हय कॉन्ह्ला का तात्या वान्याकं पंचरला जा म्हनून?”
दुकानाम्होरचा आख्खा बाकडा नाय नाय म्हनून गदागदा हाल्ला.

“पघा तात्या. समदी साक्षीला हायेत. मी नाय आवो. बसा. शांत व्हा. कुन्ही काही बी सांगातयं आपली कलागत लावाया आन् सोता पघत्यात लांबून मज्जा. लय इच्चाक बोड्याची झालीय जन्ता. तुमच्यावानी प्रेमळ आन समजूतदार ल्वॉकं कुढं राह्यल्यात का आता? बसा. अय बाळ्या दोन पिव्वर सांग रे आंद्याच्या हाटीलात........ आन् पैशे लिव्हून ठुयाला सांग. बसा तात्या. रामभाऊ. ह्या अंगाला व्हय. बसूं दे तात्यान्ह्ला.”

चा ची फुरकी मारीत तात्या निवळत व्हता तव्हर दौल्या आला. “बाबू, उंद्या पूजा हाये मळ्यात भैरुबाची. येशीन. खा-याचा परसाद हाये. किस्न्या, रामभाऊ, म्हैशा. येसान रे. तात्या तुम्हीयबी या बरं का. पुन्ह्या म्हंसान का मला आवातनं नाय म्हनून.”
बाबू म्हन्ला. “अय दौल्या, बाटीतो का तात्यान्ला? आरं लिंगायत वानी मानूस त्यो. मास-मच्छीचं नाव बी त्वांडात घ्येत नाय. तू वशाट खायाला बोल्हीतो व्हय रे?”
किस्न्या हासला, “नाय नाय असं कर, तात्यासाटी गोडाचा परसाद करशीन उलसाक.”

तात्या निवला. ‘हाये. गावात मला आझूक किम्मत हाये. ईचारत्यात चार ल्वॉकं.’
सुकानं, खुशीत तात्या दुकानावं ग्येला. उजूक गल्ल्यावं बसला आन बरनीतून सुपारीचं खांड घीवून त्वांडात टाकून चघळीत बसला. ईचार करता करता बसल्या - बसल्या तात्याला थोड्या टायमानी डुकला लागला.

तव्हर रस्त्याच्या कामावं खडी फोडाया आल्याली यक लमानाची बाई व-हलाकून; बाबूच्या दुकानाकून तात्याचं दुकान गवशीत आली.
“ह्येच दुकान जनू. टिपाडापशी ह्ये कोन इधं कुत्रू ह्ये.” बरूबरचं प्वार सांगत व्हतं.

“तात्या..................औ तात्या”
तात्याची झोप मोडली. “काय बाई? काय पाहेन?”
“बोंबील एक पाव आन सुकाट आदपाव.”

तिकडं बाबू न्हायी रस्त्याकं पाठ करून दुकानच्या कोप-यात कात्रीला त्याल सोडीत उभा व्हता. “जय जय राम क्रिष्न हारी, जय जय राम क्रिष्न हारी”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास!

भारी लिहिलयं. सुरूवातीच्या क्रिकेट मॅच वगैरे च प्रयोजन कळाल नाही.

नगर, पारनेर कडची भाषा दिसते. वला, वले हे प्रत्यय तिकडं ऐकलं आहे.
>>>> पघा, पघितल हे पारनेरकडे ऐकलयं

मात्र वले... जुन्नर, मंचर साइडलाच

आमच्या बापू नाव्ह्याची आठवण आली... त्याचेपण एकसे एक किस्से आहेत.

वला, वले हे जुन्या पिढीतील लोकांच्या तोंडी ऐकलेत हे प्रत्यय. आता नाही कानावर पडत. पघा, पघितल हे रोजच्या भाषेतील शब्द आहेत.

झक्कास.. ईरसाल नमुना आहे बाबू न्हावी एकदम.
फक्त लिंगायत वाणी म्हंटलं की त्याला 'आप्पा' शिवाय दुसरे काही नाव नसतेच.

चंद्रा, अभ्या... , पोपटलाड, मानव पृथ्वीकर, अजिंक्यराव पाटील, mrunali.samad, निलुदा, सामो, आसा., टवणे सर, जिद्दु, हायझेनबर्ग, सुनील
धन्यवाद मंडळी. छान वाटलं आपल्या प्रतिसादांमुळं.

@ आसा. - बरोबर अंदाज. ही बोली मंचर-जुन्नर-नारायणगाव भागात ऐकलेली आहे. या काही प्रत्यक्ष घडलेल्या घटना असल्यानं ती क्रिकेट मॅच आली. ती वगळून मग थेट पोपटला लाकडं घेऊन जाताना दाखवायचं तर सुरुवात काही जमेना. मग नाही जास्त डोकं लावलं. बापू न्हावी वाचायला आवडेल. Happy
@ पोपटलाड - जून्नरचा पूर्वभाग आणि नगर पारनेर सांस्कृतिक दृष्ट्या एकच लोकजीवन आहे >>>> +१. खरंय.
@अजिंक्यराव पाटील - भेटलेल्या इरसाल नमुन्यांशी आमची गाठ इथं घालून द्या की . Happy

हसुन हसुन मेलो... ठिकाण कोणतं आहे पण..? मला तर माझ्या नगर जिल्ह्यातल्या मामांच्या गावची आठवण आली. तिथंही असंच एसटी थांब्याच्या मागे मोकळं मैदान आहे जिथं पालं लागतात, असंच नाभिकाचं दुकान आहे जिथं बाहेर ठेवलेल्या फळीवर कामाची अन बिनकामाची गिर्‍हाईकं सांभाळात नाभिक आपलं काम अरत असतो, असंच नाभिकाच्या दुकानाशेजारी लिंबाच्या झाडाशेजारी पंच्क्चरचं दुकान आहे... Proud पण असा प्रसंग तिथं होत नसावा कारण वाण्याचं दुकान थोडं आत गावात आहे Biggrin

@ चंद्रा म्हणतात तसं खरंच शंकर पाटलांच्या कथांचीच आठवण आली. फार महान लेखक/पटकथालेखक.