डोरोथीचे पुस्तक

Submitted by रेव्यु on 8 August, 2020 - 08:24

माझ्या कॅनडातील वास्तव्यातील, एका खेड्यातील जीवघेण्या थंडीतील ,एक मलूल एकाकी सायंकाळ.सूर्यास्तापर्यंत तापमान शून्याखाली २० एक अंश गेले होते,अन एवढेच पुरे नाही म्हणून पुनः हिमपात सुरू झाला होता.या परदेशात अन त्यात जेम तेम २००० लोकांची वस्ती असलेल्या आडगावात संध्याकाळी जायचं तरी कुठे-हा रोजचाच प्रश्न पुनः भेडसवू लागला.शेवटी कितिदा तुम्ही टॅक्सी करणार अन एकुलत्या एका मॉल मध्ये जाणार वा मॅक्डोनॉल्ड मध्ये तोच बेचव बर्गर खायला बाहेर पडणार?
त्या सायंकाळीही ते चिमुकले गाव अन गावकरी आपापल्या घरात लौकरच शिरून सुस्तावले होते ,निवृत्त झाले होते,आपल्या सग्यासोयर्‍यांसोबत शेकोट्याभोवती कोंडाळे करून सुखावले होते.माझ्या हॉटेलच्या खोलीतून मला त्या घरांतील लुकलुकणारे चिमुकले दिवे अन घराच्या पडद्यामागील काही हालचाली दिसत होत्या.कोणी टेबलाभोवती बसून जेवणापूर्वी प्रभूची प्रार्थना करीत होते तर कोणी माऊली आपल्या लेकराला झोपवायच्या प्रयत्नात होती.या व्यतिरीक्त फारशी हालचाल नव्हती.त्या गावातील सर्व जीवन जणू काही तासांसाठी थांबले होते.
मी या सर्व प्रकारास अखेर कंटाळून,टी व्ही बंद करून हॉटेलच्या माझ्या खोलीबाहेर आलो.थोडावेळ स्वागत कक्षाच्या आसपास सह्ज घुटमळलो,तिथल्या बाईंशी काही औपचारिक बोललो -पुनः कंटाळलो अन शेवटी तिथल्या एकमेव "गिफ्ट अ‍ॅंड क्युरिओस्"अशी पाटी असलेल्या दुकानवजा खोलीत शिरलो.
मी आत येता क्षणीच माझ्या आगमनाची वार्ता एका गोड किणकिणणार्‍या चिमुकल्या घंटेने दुकानातील मालकिणीस दिली.ती ऐकता क्षणीच माझे स्वागत एका वयस्क आजीबाईनी मोठ्या प्रेमाने,आपुलकीने अन् नम्र अभिवादनाने केले.त्या आपल्या टेबलावर टेबल लँपच्या प्रकाशात काही तरी वाचत बसल्या होत्या.सावरीच्या कापसासारखे शुभ्र केस्,चेहेर्‍यावर प्रसन्न अनुरूप सुरकुत्यांचे जाळे,नाकाच्या टोकावर विसावणारा मायाळू डोळ्यावरील चष्मा अन थोडीशी वाकलेली कंबर अन झोका देत असलेली डुलत डुलत चाल.या आजीबाईंनी पहिल्या द्रुष्टीक्षेपातच माझ्या मनात आदराच्या भावना निर्माण केल्या.त्या वयोमानानुरूप खूपच राजबिंड्या दिसत होत्या.चेहेर्‍यावरचे मार्दव अन डोळ्यातील दयार्द्र भाव वाखाणण्याजोगा अन कुणालाही आपलेसे करून टाकणारा होता.आजी बाई आपल्या सत्तरीत नक्कीच असाव्यात.मी दुकानातील वस्तू नजरेखाली घालत होतो अन त्यांची नजर माझ्यावर आहे असा मला पदोपदी भास होत होता.
शेवटी त्या माझ्याकडे डुलत डुलत आल्या अन प्रेमाने म्हणाल्या
--"मुला काही विशेष शोधत असल्यास मी तुझी मदत करू का?"
मी मंद स्मित करीत उत्तरलो
"नाही हो मॅम-सहज पहातोय काय काय आहे इथे ते."
तिथे सुस्थितीत जतन केलेली बरीच जुनी पुस्तके होती,त्यावर चामड्याचे आवरण होते.जाहीर होते की त्या पुस्तकांचा आधीचा मालक पुस्तकांची कदर करणारा होता.अन लेखकांची निवडही खूप उच्च प्रतिची होती.जॉन श्टाईन्बॅक्,पॉल गॅलिको,अर्नेस्ट हेमिंग्वे असे दिग्गज तिथे मांडीस मांडी लावून बसले होते.खरोखर अप्रतिम संग्रह होता!!माझ्या चेहेर्‍यावर हा प्रशंसेचा भाव कदाचित ओसंडून्,भरभरून वहात असावा.अन आजीबाईनी त्याची तो पर्यंत नोंद घेतली होती.
त्या संग्रहात मी कित्येक दिवसापासून शोधत असलेला रीडर्स डायजेस्टने प्रकाशित केलेला पॉल गॅलिकोच्या कांदबर्‍यांचा सन्कलित अंक (स्नो गूज्,स्मॉल मिरॅकल्,पोसयडन अडव्हेंचर असलेला) सापडला.मी ते पुस्तक बाजूला ठेवले.मला हे करताना आजीबाईनी पाहिले अन त्या पुन: माझ्याकडे डुलत डुलत आल्या,अन मला इतर अनेक पुस्तकांची लेखकांची,इतकेच नव्हे तर तिथे असलेल्या अन्य बर्‍याच पुस्तकान्च्या मूळ स्त्रोताची माहिती देवू लागल्या.या माहितीवरून त्यांच्या प्रकांड ज्ञानाची अन पांडित्याची जाणिव मला पदोपदी होत होती.मी पदोपदी मी काढून ठेवलेल्या पुस्तकाच्या किमतीबद्दल विचारत होतो,पण का कोण जाणे तो प्रश्न मोठ्या खूबीने डावलला जातोय असा भास मला होत होता,मला हे ही वाटत होते की हे त्यांच्या अनवधानाने अन वयोमानाने विस्मृती होवून तर होत नसावे?
त्या मला दुकानातील प्रत्येक वस्तू उत्साहाने अन अभिमानाने दाखवीत होत्या.त्या गावातील स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या बाहुल्या,मेणबत्त्या,द्वितीय महायुद्धातील जुनी मेडल्स्,नकाशे,झेंडे इतकेच नव्हे तर तिथला मेपल जॅम व बायानी विणलेली लहान अर्भकांसाठी झबली देखील.
मी देखील संयमाने अन आदराने ते सर्व ऐकत होतो,पहात होतो,उसने,खोटे कौतुक ही करित होतो,पण एका त्रयस्थाप्रमाणे.मला खरोखर त्यांच्या प्रयत्नाची जाणिव होती.पण का कोण जाणे त्या पुस्तकाचा उल्लेख बाई काही केले तरी टाळत होत्या.
अन मला मात्र फक्त त्या पुस्तकातच स्वारस्य होते.
शेवटी महत्प्रयासाने मी त्या पुस्तकाची किंमत त्यांच्या तोंडून वदवून घेण्यात यशस्वी झालो अन व्यवहार पक्का झाला.
मला खूप खूप आनंद झाला होता.इतक्या दिवसांची प्रतिक्षा संपली होती,मला हवे असलेले पुस्तक सुस्थितीत अन योग्य किमतीत मिळाले होते.
आता मात्र अचानक त्यांचा उत्साह मावळला होता .त्या खूप थकल्याशा वाटत होत्या.खूप जड पावलानी ते पुस्तक हातात घेवून त्या आपल्या मेजाकडे डुलत डुलत परतल्या.त्यांच्या चालीतच त्यांच्या मनातील काहीतरी खळबळ व्यक्त होत होती.त्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात एकदा शेवटच्या वेळेस त्यानी ते पुस्तक खूप मायेने स्वच्छ पुसले.एक लांब क्षणभर त्या पुस्तकास त्यांनी आपल्या स्निग्ध नजरेने जणू कुरवाळले.
एका सुंदर पिशवीत ते ठेवले,माझ्याकडून पैसे घेतले.आम्ही एकमेकास गुड नाईट केले,अन दारापर्यंत त्या आल्या - माझा निरोप घेतला.का कुणास ठावूक त्यांच्या त्या थकलेल्या डोळ्यात अश्रू तरळल्याचा आभास मला झाला.रात्र बरीच झाली होती.मी दुकानातून थेट खोलीवर आलो. हातात पुस्तक होते .खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली होती-आनंदात होतो मी.गाढ झोपलो त्या रात्री -पुस्तक उशाशी ठेवून.
दुसर्‍या दिवशी सायंकाळी पुनः दुकानापाशी आलो.माझी निराशा झाली.दुकाना बाहेर पाटी होती.
"माफ करा-आज दुकान बंद आहे--डोरोथी रूजवेल्ट"
मी खोलीत परत आलो अन पुस्तक उघडले.उत्साहाने वाचण्यास सुरुवात केली.
पहिल्या पानावर लिहिले होते--
"माझ्या लाडक्या डोरोथीस सप्रेम --
आपल्या विवाहाच्या काव्यमय वाटचालीच्या पन्नासाव्या महोत्सवी वाढदिवसाप्रीत्यर्थ
-तुझा लाडका पती--ग्रॅहॅम रूजवेल्ट"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला प्रश्न पडला आहे की मग ते पुस्तक आजीबाईंनी विक्रीसाठी का ठेवले असावे? त्यांची वैयक्तिक वस्तू होती ना ते पुस्तक.

>>>मला प्रश्न पडला आहे की मग ते पुस्तक आजीबाईंनी विक्रीसाठी का ठेवले असावे? त्यांची वैयक्तिक वस्तू होती ना ते पुस्तक.>>> अनेकदा घरातील प्राणप्रिय वस्तू विकाव्या लागतात, तो क्षण येईपर्यंत खोटी आशा असते की ती वेळ कदाचित येणार नाही......

>>आधी वाचल्यासारखी वाटत होती कथा. शोध घेतला तर हे मिळाले https://www.maayboli.com/node/24977?>> खरे आहे.... खूप वर्षे झाली... वाटलं नव्या वाचकांचा प्रतिसाद घ्यावा.... लोभ असावा