कबूल करते दिसायला मी सुमार आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 6 August, 2020 - 02:52

तुझ्या निवाड्यावरीच अवघी मदार आहे
कबूलनामा लिहून माझा तयार आहे

मनात माझ्या कुठून त्याचा विचार शिरतो ?
अभेद्य किल्ल्यामधे कदाचित भुयार आहे

बदाम राजा, बदाम राणी, गुलाम हाती
तरी अडवणे बदाम अठ्ठी, जुगार आहे

बघेल तेव्हा उगाच कुलटा तिला ठरवणे
सुशील मित्रा, असाध्यसा हा विकार आहे

मला विसरणे तुला कदापी अशक्य नाही
कधीतरी ओघळेल अश्रू, चुकार आहे !

विचार त्याचा मनात येतो, सुरेख दिसते
कबूल करते दिसायला मी सुमार आहे

कधीतरी पाय घाल तूही बुटात माझ्या
कळेल तेव्हा खरा कसा हा प्रकार आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर... मजा आली...
हे कोणी विस्कटून सांगेल का...
बदाम राजा, बदाम राणी, गुलाम हाती
तरी अडवणे बदाम अठ्ठी, जुगार आहे

Happy मस्त. विशेषतः 'सत्तीलावणी' चा रेफरंस खूप मस्त.
च्रप्स , तुम्हाला पत्त्यांचा बदाम सात खेळता येतो का?
त्यामधे, पत्ते अडविता येतात. पण आधी सुटेल तो जिंकला....त्यामुळे आपल्या कडेच राणी, राजा अशी भारी पानं असताना अठ्ठी अडवून ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पाया वर कुर्‍हाड मारण्या सारखे आहे...

कधीतरी पाय घाल तूही बुटात माझ्या >> टू बी इन समबडीज शूज चं शब्दशः भाषांतर असलं तरी इथे एकदम आवडल्या गेलं आहे Happy