पत्त्यांची डायरी

Submitted by रेव्यु on 4 August, 2020 - 23:07

पत्त्यांची डायरी
काल रात्री सहज समोर पडलेल्या पत्त्यांच्या डायरीत कुठला तरी टेलिफोन नम्बर "वाचत" होतो.खरे तर त्याला काही अर्थ नव्हता कारण मला मनोमन माहित होते की हा नम्बर नक्की बदलला असणार्.पण मी नंबर शोधत नव्हतो,मी ती डायरी अन त्यातील नंबर अन त्यांच्याशी निगडित आठवणी जागवण्याचे प्रयत्न त्या "वाचण्यातून" करीत होतो.
नंबर शोधायचा प्रसंग हल्ली क्वचितच येतो.याचा अर्थ स्मृती फार तल्लख ज्ञाली असा मुळीच नाही..हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक युगामुळे म्हणा किंवा वयोमानाप्रमाणे अथवा सवय गेल्याने असेल्, हव्या असलेल्या नम्बरचा उगम तो स्क्रोल करून केला जातो-नावानुसार.त्यामुळे नंबर लक्षात ठेवण्याच्या सर्व ट्रिक्स अडगळीत गेल्यात्.म्हणजे कुणाचा नंबर ४२० ३८ २६ असला की लगेचच मेंदूच्या मेमरीत ४२० कलमाखाली अन ३८ २६ वेगळ्या प्रकारे आठवणीत रहायचा,(हा ३८ २६ ३६ पैकी ३६ हे विश्वसुंदरीचे माप वगळून लक्षात रहायचा-हे सूज्ञांस सान्गणे न लगे).असो
थोडे विषयांतर झाले.तर त्या जुन्या पत्त्यांच्या डायरीत पत्ते ,नंबर अन नावे वाचता वाचता मी दशकानुदशके केंव्हा मागे गेलो कळलेच नाही,
त्या डायरीतील कित्येक नंबर अस्तित्वात नव्हते,बदलले म्हणून किंवा ती व्यक्ति काळाच्या पडद्यामागे विलिन झाली म्हणून्.त्यात कित्येक नंबर केअर ऑफ होते."कालाय तस्मै नमः" -अन्तर्धान पावले होते.खूप कमी लोकांच्या घरी फोन "नसलेला" तो जमाना होता.लब्ध प्रतिष्ठितांचे "असणे" हे लक्षण होते.
काही नावे वाचताच त्यांच्या मायाळू सान्निध्यात घालवले क्षण पापण्यांच्या कडा ओलावून गेले.काही नंबर समोर येताच त्यासमोर लावलेला "इन्कमिंग कॉल ला दर मिनिटाला पन्नास पैसे -तीन मिनिटाहून अधिक बोलू नये-ही सोय फक्त बुधवरीच सायंकाळी ८ ते १०" हा बोर्ड -लेकीचे हॉस्टेल अन त्या अनुक्रमाने लेकीचा अन तिच्या मैत्रिणींचे निरागस "मेरा नंबर कब आयेगा" असे चेहेरे डोळ्यासमोर तरळून गेले.
मीही परदेशात असताना हिला अश्याच केअर ऑफ नं वर फोन करायचो अन त्यापूर्वी त्या केअर ऑफ च्या मालकाने केलेली लोभसवाणी अन मिश्किल चेष्टा आठवली.काही नंबर अन पत्ते वाचता क्षणीच घराबाहेरील झोपाळा,सुंदर बाग्, अन पाठमोरे बागकाम करित असलेले दिवंगत अजोबा अन त्यांच्या हातातील फुलांनी भरलेली प्रसन्न परडी,त्यात आकाशवणीवरील भजने वाजवणारा चिमुकला ट्रांजिस्टर हे सर्व डोळ्या पुढे आले.
मुंबई च्या काही टेलिफोन नं बरोबर दरियात अस्तंगत होणारा भास्कर आला.मामा कडे असलेली टूथपेस्ट च्या आकाराची बिनाका कंपनीची गाडी आली.या डायरीच्या बहुतेक नं मागे वर्षानुवर्षांचा इतिहास होता.टेलिफोन नंबर डिजिट तीन चे चार चे पाच चे ---आठ न आता बारा पर्यंत वाढले पण व्यक्ती शरिराने संकुचित झाल्या नाहीत उलटी त्यांची मने संकुचित झाली.
याच डायरीत काही आयत्या वेळेला केलेल्या नोंदी होत्या,काही निरोप होते,काही मुलांचे( आता अमेरिकेत असलेल्या) परिक्षेचे मार्क्स होते,कुठल्यातरी तारखेस कुठून तरी येणार्‍या वयस्क मावशीच्या ट्रेनचा नंबर होता,या निरोपाने मोहोरून जावून अख्खे घर दोन टांग्यात तिला भेटायाला भर ग्रीष्मात स्टेशनवर गेले होते.अशी आमची ही डायरी "आखुड शिंगी,बहुगुणी होती:" अन महत्वाचे असे की त्या हस्ताक्षरामागे एक चेहेरा होता -त्या अक्षराप्रमाणेच मायाळू,तिरसट्,विसरभोळा,त्रासलेला,आनंदलेला.
मधल्याच कुठल्या तरी पानांवर थोड्याशा उरलेल्या जागेत "टी या अक्षराच्या पानावर(टी नावाच्या फारशा नोंदी नसल्याने)" मुलींनी केलेली कलाकुसर होती.जुन्या क्यासेट प्लेयरच्या जमान्यात ,आवडणारी गाणी त्या टी डी के अथवा सोनी च्या क्यासेट वर "भरली" जात्.मग उरलेल्या जागी मुलांनी गायलेले श्लोक्,बालगीते ,"वक्रतुंड्,शुभंकरोति इत्यादी रेकॉर्ड केली जात,त्याची आठवण या उर्वरीत भरलेल्या पानांनी आली.
अन हो,ही डायरी ज्या उद्योजकाकडून वार्षिक भेट म्हणून आली त्याचा व्यवसाय ही केंव्हाच बंद झाला याची ही आठवण त्या क्षणी झाली. नव्वद टक्के फोन अन पत्ते कालबाह्य होते,पण त्यामागील व्यक्ति,पत्त्यामागील भूमिका करणारे नट,अन भावना माझ्या मनातून गेल्या नव्हत्या.
खरच या डायरीत काय नव्हते? चाळिस वर्षांचा व्यक्ति संचय होता अक्षररूपात्.
हल्ली नंबर पटकन सापडतो ही सोय सोडली तर अशा स्मृती तो जागवत नाही.मोबाईल मध्ये हे नंबर तिर्‍हाइतासारखे बसले असतात अन हुकुम देताच बाहेर येतात्,हुकुमाची परफेक्ट तामिली करतात.
त्यामुळे ही संस्थाही जुन्या खंडावशेषांसारखी अस्तंगत झाली आहे.
अन सगळ्यात वाईट म्हणजे फोन करणार्^या व्यक्तीच्या आवाजा पूर्वी त्याचे नाव झळकते अन मग औत्सुक्याची जागा कर्तव्य घेते.
जेवढा लौकर ज्याचा नंबर मिळतो तेवढ्याच लौकर त्याचा मालक सान्निध्यातून अन मनःपटलातून दूर जातो -हे ही खरे.
यात चांगले वाईट कोण ठरवणार??
"कालाय तस्मै नमः" हेच खरे.
वुईथ नो रिग्रेट्स.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या एका विशिष्ट काळाची आठवण आणणारा छान लेख...
आता त्या काळातल्या वाचकांच्या मनात त्यांच्या त्यांच्या फोन डायरीतील व्यक्ती उमटतील..

सुंदर!

मी पण एक जुनी फोन/पत्त्यांची डायरी जपून ठेवली आहे!

सुंदर लिहिलयं.
मलाही आठवतंय लहान असताना जुन्या गाण्यांची यादी बनवून वडील रिकाम्या कैसेटमधे भरून आणायचे.
पत्त्याच्या डायरीचा योग नाही आला गरज वाटु लागली तेव्हापासून मह्त्वाच्या नोंदी,माहिती, लैपटौप आणि मोबाईल मधेच.