आठवणी ऑलिंपिक्सच्या - झाटोपेक

Submitted by मुकुंद on 2 August, 2020 - 12:34

आपल्या सगळ्यांना ठाउकच आहे की एक ऑलिंपिक पदक मिळवायचे म्हणजे किती कठिण काम असते पण काही काही अशाही व्यक्ती आहेत की ज्यांनी एकच नाही तर चार किंवा जास्त सुवर्णपदके ऑलिंपिकमधे पटकावली आहेत.. तेही ३ वेगवेगळ्या ऑलिंपिकमधे. ही पुढची गोष्ट तशाच एका अमेझिंग ऍथलिटबद्दल आहे. त्याने १९४८ ते १९५६ दरम्यान ४ सुवर्णपदके पटकावली त्याबद्दल तर ही गोष्ट आहेच पण मी ही गोष्ट का निवडली ते तुम्हाला नंतर कळुन येइलच! त्या झेक ऍथलिटचे नाव होते एमिल झाटोपेक...

Emil_Zátopek,_Erik_Ahldén,_London_1948c.jpgझाटोपेकने आपल्या ऑलिंपिक विजयाची सुरुवात केली १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्स मधे. त्यात त्याने ५००० मिटर्स व १०,००० मिटर्स शर्यतीत भाग घेतला पण फक्त १०,००० मधेच तो सुवर्णपदक पटकावु शकला. १०,००० मिटर्समधे दुसरा नंबर म्हणजे रजत पदक पटकावले फ़्रांसच्या (पण अल्जेरिया मधे जन्मलेल्या) अलाय मिमुने.

जोपर्यंत १९५२ च्या हेलसिंकीच्या ऑलिंपिकची वेळ आली तोपर्यंत झाटोपेकने आपल्या दिर्घ पल्ल्याच्या शर्यतीतील धावण्याच्या कौशल्याने सगळ्या जगात प्रसिद्धी मिळवली होती. त्यामुळे हेलसिंकीमधे त्याच्याचकडे ५००० व १०,००० मिटर्समधे संभावीत विजेता म्हणुन पाहिले जात होते.

त्यानेही १०,००० मिटर्सच्या शर्यतीत त्याच्या चाहत्यांची निराशा केली नाही व ७०,००० प्रेक्षकांच्या झाटो.... पेक!..... झाटो.... पेक! झाटो.... पेक!.... अशा गजरात त्याने सुवर्णपदक पटकावले. दुसरा नंबर म्हणजे परत रजतपदक मिळाले फ़्रांसच्या अलाय मिमुला.

२ दिवसांनी ५००० मिटर्सची फ़ायनल सुरु झाली. एव्हाना चार दिवसात झाटोपेक ५००० व १०,००० च्या प्रर्थमिक,उपांत्य व अंतिम फेर्‍या मिळुन ६ फेर्‍यांमधे धावला होता. त्यामुळे ५००० मिटर्सची अंतिम फेरी जेव्हा चालु झाली तेव्हा झाटोपेकची पुरी दमछाक झाली होती. ती दमछाक शेवटच्या ४०० मिटर्सची सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच दिसुन आली. झाटोपेक चक्क चौथ्या क्रमांकावर होता व धापा टाकत कसाबसा बाकीच्यांबरोबर धावत होता. पण ७०,००० प्रेक्षक एकच गजर करत होते... झाटो.... पेक! ....झाटो.... पेक!... झाटो..... पेक!... त्या गजराने बळ आले का कोण जाणे पण झाटोपेकने आपल्या धावण्याचा वेग एकदम दुसर्‍या गीअरमधुन चौथ्या गिअरमधे गाडी टाकतात तसा एकदम वाढवला व तो चौथ्याचा तिसरा... मग दुसरा असे करत करत २०० मिटर उरले होते तोपर्यंत परत पहिल्या स्थानावर तो आला. त्याच्या मागे पाचव्या क्रमांकावर असलेला अलाय मिमुन... तोही झाटोपेकचा पाठलाग करत त्याच्या मागे दुसर्‍या क्रमांकावर आला. शेवटचे १०० मिटर उरले असताना अलाय मिमुने झाटोपेकला मागेही टाकले! पण झाटोपेकने एक शेवटचा जोर लावुन शेवटचे २० मिटर्स उरले असताना मिमुला मागे टाकले व स्पर्धेतले दुसरे सुवर्णपदक अटीतटीच्या लढतीत पटकावले. दुसरा नंबर म्हणजे रजत पदक पुन्हा एकदा... फ़्रांसच्या अलाय मिमुला!

झाटोपेकचा पराक्रम एवढ्यावरच थांबला असता तर तो झाटोपेक कसला?

५००० मिटर्सच्या शर्यतीनंतर दोनच दिवसात मॅरेथॉन शर्यत होती. झाटोपेकने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात एकदाही एवढ्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेतला नव्हता पण तो म्हणाला की मला मॅरेथॉनमधे भाग घ्यायचा आहे. परवानगी मिळाल्यावर त्याने चौकशी केली की या मॅरेथॉनचा संभाव्य विजेता म्हणुन कोणाकडे बघीतले जात आहे? ती माहीती मिळाल्यावर त्याने ठरवले की त्या संभाव्य विजेत्याच्या पाठीमागे त्याच्या तो द्रुष्टीक्षेपात राहील अशा वेगात आपण धावायचे.

झाले.. मॅरेथॉन स्पर्धा सुरु झाली. ५ किलोमिटर, १० किलोमिटर असे हेलसिंकीच्या मंद उन्हाळ्यात सगळे ही ४२ किलोमिटर्सची स्पर्धा धावु लागले. १५ किलोमिटर झाले तरी संभाव्य विजेता अजुन झाटोपेकच्या द्रुष्टिक्षेपात होता.पण २० किलोमिटरच्या आसपास तो संभाव्य विजेता धापा टाकुन मागे पडु लागला. झाटोपेक मात्र त्याच वेगात पुढे धावत होता. ३० किलोमिटरपर्यंत झाटोपेक आघाडीवर सगळ्यांच्या पुढे गेला. ४० किलोमिटर.. झाटोपेक अजुनही प्रथम क्रमांकावर.... आणी जेव्हा तो मेन ऑलिंपिक मैदानात आला तेव्हा सर्व ७०,००० प्रेक्षक परत एकदा झाटो... पेक!... झाटो... पेक!.... झाटो...... पेक! च्या गजरात त्याचे कौतुकाने स्वागत करायला तयारच होते. त्यांना माहीत होते की त्यांच्या समोर एक इतिहास घडत आहे... झाटोपेक हा अजुनपर्यंतचा असा एकमेव ऍथलिट आहे की ज्याने एकाच ऑलिंपिकमधे ५०००,१०००० व मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला व तिन्हीमधे सुवर्णपदक पटकावले... तेही त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या मॅरेथॉनमधे भाग घेतलेला असतानाही त्याने ते सुवर्णपदक जिंकले हे अजुन एक विशेष!

आता साल होते १९५६... स्थळ... मेलबोर्न ऑलिंपिक. परत एकदा झाटोपेक मॅरेथॉन स्पर्धेत उतरला होता. मेलबोर्नचा उन्हाळा ४ वर्षापुर्वीच्या हेलसिंकीच्या मंद उन्हाळ्यासमोर फारच कडक भासत होता! शिवाय झाटोपेकचे फक्त ६ आठवड्यापुर्वीच हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. तरीही झाटोपेकला विश्वास होता की तो मॅरेथॉन जिंकु शकेल.पण झाटोपेकही शेवटी एक माणुसच होता! ४० किलोमिटरपर्यंत कडवी लढत देउनसुद्धा तो या वेळेला पहिल्या ३ मधे स्थान मिळवु शकला नाही. त्याला ५ जण मागे टाकुन पुढे ऑलिंपिक स्टेडिअममधे निघुन गेले होते. झाटोपेक जेव्हा दमुन सहाव्वा पोहोचला तेव्हा पहिला आलेला सुवर्णपदक विजेता झाटोपेकची आतुरतेने वाट पाहात होता... झाटोपेकने जेव्हा अंतिम रेषा पार केली तेव्हा तो सुवर्णपदक विजेता झाटोपेकला म्हणाला... मित्रा... मला बघ! मी एकदा तरी तुला हरवुन एकदाचा ऑलिंपिक विजेता झालो आहे... माझे अभिनंदन नाही करणार तु? झाटोपेकने त्याला पटकन मिठी मारली व त्याचे मनापासुन अभिनंदन केले.... झाटोपेकचा तो सुवर्णपदक विजेता मित्र होता............. फ़्रांसचा अलाय मिमु!:-)

अलाय मिमु शर्यतीनंतर पाणावलेल्या डोळ्याने म्हणाला..... माझ्या सुवर्णपदकापेक्षा झाटोपेकसारख्या अजरामर ऍथलिटने केलेले माझे अभिनंदन मला जास्त महत्वाचे वाटते...

(फोटो : पब्लिक डोमेन विकिमिडिया वरून)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults