रफी साहब, अपने शायराना अंदजमें...

Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2020 - 21:49

images_3.jpg

काही पदार्थ जसजसे जुने होत जातात जास्त मुरत जातात आणि चविष्ट होत जातात, काही वस्तु काळ जातो तसतशा जास्त शोभिवंत होत जातात. रफीसाहेबांच्या बाबतीत माझंही तसं होत आहे. सुरांच्या या शहेनशहाला जाऊन आज चाळीस वर्षे झाली आणि या वर्षात त्यांच्या बद्दल वाढलंय ते फक्त प्रेम, आदर, आपुलकी आणि विस्मय देखिल. आपले वय वाढत जाते तशी समजही काही प्रमाणास सुदैवाने वाढते. रफी या हिर्‍याचे आणखी पैलु वाढत्या वयाबरोबर दिसु लागले. त्याच्या गाण्यांचा आनंद जास्त घेता येऊ लागला, त्या स्वरातील मखमलीचा आस्वाद आणखी अवीट वाटु लागला. याचा अर्थ रफी संपूर्ण कवेत आला असं नाही. हे स्वर अथांग आहेत. त्यात जितके खोल आपण जाऊ तितकी आकर्षक, दुर्मिळ रत्ने आपल्याला मिळणार आहेत याची मला खात्री आहे. त्यामुळे रफीचे गाणे डोळे बंद करून ऐकताना तल्लीनतेबरोबरच आज काय मिळणार याची उत्सुकताही असते आणि आवडत्या पदार्थाने शीगोशीग भरलेले ताट समोर आल्यावर माणसाची जशी अवस्था होते तशीच माझीही अवस्था होते.

आज या शहेनशहाला विनम्र अभिवादन करताना मनात येतोय तो त्यांचा शायराना अंदाज. शायरी म्हणजे शब्द, काव्य, त्यातील तोफेच्या गोळ्याप्रमाणे थेट लक्ष गाठणारा सूत्रबद्ध विचार हे तर खरेच. पण जेव्हा ती सर्वांसमोर व्यक्त करायची असते तेव्हा मात्र "अंदाजे बयां" अतिशय महत्त्वाचे. अन्यथा अत्यंत प्रभावी शायरीही निष्प्रभ होण्याचा संभव अधिक. हिन्दी चित्रपटात जेव्हा जेव्हा हा शायराना अंदाज बयान करण्याचा "वक्त" आला तेव्हा सर्वांनी फक्त रफीकडेच पाहिले. कारण या क्षेत्राचा तो बेताज बादशहा होता. येथे मी गीतात गुंफलेल्या शायरीबद्दल बोलत नाहीये. तर वाद्यांची साथ नसताना मुशायर्‍यात जेव्हा शायर आपला शेर सादर करीत असतो तेव्हा अनेकानेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेव्हा चाल तर महत्त्वाची असतेच पण त्याबरोबरच शब्दांची फेक, योग्य शब्दांवर आघात, शराबी, धुंद उर्दु फारसीतील शब्दांचे उच्चार आणि अर्थातच या सर्वांना लपेटून राहिलेल्या भावना हे सारं त्या सादरीकरणात असतं. रफीच्या भात्यातील हे सारे तीर रसिकाला घायाळ करतातच पण हा भाता अक्षय आहे हे ही लक्षात घ्यावं लागेल. हे तीर संपणारे नाहीत. कारण प्रत्येक गाण्यात रफीसाहेबांचा अंदाज वेगळाच असतो. मुशायर्‍यात सादर करणारा समोर असल्याने भावभावना चेहर्‍यावर दाखण्याची सोय तरी आहे. हातवारेही करता येतात. रफीने मात्र हे सारे अत्यंत परिणामकाऱरित्या फक्त त्याच्या दैवी आवाजाने दाखवलं.

हा विचार करताना मला सर्वप्रथम आठवताहेत ती "लाल किला" चित्रपटातील दोन गाणी. "न किसी की आंख का नूर हूं" आणि दुसरं "लगता नही है दिल मेरा उजडे दयार में" मोगल साम्राज्याचा अत्यंत दुर्दैवी असा शेवटचा बादशहा बाहादूरशहा जफर शायरही होता. मात्र त्याला समकालिन गालिब त्याच्या दरबारातच असल्याने बहुधा त्याची शायरी फारशी लोकांना माहित नसावी. शेवटच्या काळात ब्रम्हदेशात रंगून येथे या बादशहाला इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. लाल किल्ल्याला आपला "यार" समजणार्‍या जफरने आपली व्यथा अत्यंत परिणामकारकरित्या या दोन गीतांमध्ये मांडली आहे. आपल्याला दफन करायला "दो गज जमीनही" या आपल्या मित्राच्या कुशीत लाभली नाही हे या बादशहाचं दु:ख आहे. आणि त्याची ही वेदना तितक्याच गहराईने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे रफीसाहेबांनी. "न किसी की आंख का नूर हूं" देखिल तसेच. अतीव नैराश्य आणि हताशा दर्शवणारे. "कोई आ के शम्मा जलाये क्यूं, मै वो बेकसी का मजार हूं" या शब्दांत सारे काही संपल्याची भावना दर्शविणारे. आणि हे ही दु:ख आपल्या आवाजात मूक वैफल्य आणून दाखवतात ते रफीसाहेबच. खरं तर रफीचा शायराना अंदाज दाखवायला ही दोनच गाणी पुरेशी आहेत. पण गुरुदत्तला आणल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही असे मला वाटते.

रफीचं प्यासा मधलं "तंग आ चुके है कशमकशे जिंदगीसे हम" हे विसरता येईल का? समोर पुर्वाश्रमीची प्रेयसी बसली आहे. तिने रोखठोकपणे व्यवहार निवडला आहे. दोन वेळची भ्रांत असणार्‍या कवीला सोडून ती आता श्रीमंताची झाली आहे. अशावेळी भग्न हृदयी कवी रसिकांसमोर "ठुकरा ना दे जहां को कहीं बेदिली से हम" असं च म्हणणार. पण समोर बसलेल्या रसिकांना हे रुचत नाही. एक उंट माणूस म्हणतो "अरे इस खुशी के माहौल में ये क्या बेदिली का राग छेड रख्खा है..." तेव्हा तोफेच्या गोळ्याप्रमाणेच शब्द येतात "देंगे वोही जो पायेंगे इस जिंदगी से हम" हा प्रसंग अविस्मरणीय झाला आहे तो गुरुदत्तच्या मुद्राभिनयाने हे तर खरंच पण त्याला तितकीच समर्थ जोड लाभली आहे ती रफीसाहेबांची. परिस्थितीच्या थपडा खाल्लेला, हताश कवी नुसत्या आवाजातून सादर केला आहे त्यांनी. हे सारं सांगतानाच त्यात संगीतकार आणि शायर यांचा वाटा नाकारता येणार नाहीच. पण आज पुजा रफीसाहेबांची मांडली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतंय. यानंतर शायरी म्हणजे त्यात इश्क मोहोब्बत की बातें तर असायलाच हवी. तशीही दोन गाणी मला चटकन आठवतात.

पहिलं मेरे हुजूर मधलं " रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर". ट्रेनमध्ये कोवळा जितेंद्रचे, बुरखा घातलेल्या माला सिन्हाला उद्देशून प्रियाराधन सुरु आहे. गाण्याची सुरुवात देण्याचा मोह आवरत नाहीये. रफीसाहेब प्रेमभरल्या मखमली आवाजात सुरुवात करतात " अपने रुखपर निगाह करने दो, खुबसूरत गुनाह करने दो, रुखसे परदा हटाओ जा ने हया, आज दिल को तबाह करने दो.." इतके आर्जव मधाळ स्वरात केल्यावर कुठली हसीना विरघळणार नाही? यानंतर दुसरे गीत आहे "कन्यादान" मधील "मेरी जिंदगीमें आते तो कुछ और बात होती". शशीकपूर सुरुवात करतो " उनकी जुल्फे उनके चेहरे से हटा सकता नही, दिलकी बेताबी किसी सूरत छुपा सकता नही, कितनी दिलकश है मोहोब्बत की जवां मजबूरीयां, सामने मंजिल है और पाओं बढा सकता नही" या शब्दांनी. यावेळी "मजबूरीयां" ज्या तर्‍हेने रफीसाहेब म्हणतात ते खास ऐकण्याजोगं. अशावेळी त्या शेरवान्या, ते उर्दु, फारसी शब्द, ते हंड्या झुंबरं असलेलं लखनवी वातावरण तर असायला हवंच. पण त्याबरोबरच असायला हवा तो रफीसाहेबांच्या आवाजाचा परिसस्पर्श.

आज चाळीस वर्षानंतर लक्षात आलंय की रफीसाहेबांच्या व्यसनात मी पार बुडून गेलो आहे. लौकीकार्थाने व्यसनमुक्तीसाठी काम करणारा मी...पण या व्यसनातून मात्र बाहेर यावंसं वाटत नाही. हिन्दी चित्रपटसृष्टीत जेव्हा केव्हा शायराना अंदाजाची चर्चा होईल तेव्हा रफीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. आणि रफी येण्याआधी पुकारा होईल बा अदब बा मुलाहिजा होशियार...आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या या छोट्या चाहत्याची त्यांना दिलेली ही मानवंदना.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही निवडलेली काही गाणी फार ऐकू न येणारी आहेत किंवा मी फार ऐकलेली नाहीत. न किसी की आँख का आणि रुझ से जरा नकाब चटकन आठवली. लगता नही है दिल मेरा सैगलच्या आवाजातलचं आठवलं.
तंग आ चुके है तर मी बहुतेक ऐकलेलंच नाही. याच जमितीतलं आशाने गायलेलं मात्र अनेकदा ऐकलंय. आता रफीचं ऐकतो.

तुमच्या यादीत भर -
कहीं बेखयाल होकर मुझे छू लिया किसी ने..

नौशाद - रफी जोडीने अनेक सुंदर गझला दिल्या आहेत.
शंकर जयकिशन - हसरत आणि रफी यांची काही सुंदर रोमँटिक शायराना गीतं आहेत. त्यातली दोन तुम्ही लिहिलीच आहेत.

प्यार का मौसम मधले रफी साहेबांचे - तुम बिन जाऊ कहान माझे अत्यंत आवडते गाणे आहे.

देखो मुझे सर से कदम तक सिर्फ प्यार हूँ मैं ...
गले से लगा लो कि तुम्हारा बेक़रार हूँ मैं ...
तुम क्या जानो के भटकता फिरा किस किस गली

तुम बिन जाऊं कहां

सुंदर लेख नेहमीप्रमाणेच.मला शिवरंजनी मधली आवाज देके आणि बहारो फूल आणि तुमने मुझे देखा ही अगदी आवडती गाणी आहेत..he had divine voice..

अतिशय सुंदर अतुल जी. दुर्दैवाने मी ह्यातलं एकही गाणं ऐकलं नाहीये. आज ऐकतो.

मेरा तो जो भी कदम है ..............दोस्ती.
कारवां निकल गया गुबार देखते रहे.....नयी उमर की नयी फसल..
यह लखनऊ की सरजमीं.... चौदवीं का चांद
खोया खोया चांद .....काला बाजार
अपनी तो हर आह एक तूफान है ....काला बाजार
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.........हम दोनों
तू गंगा की मौज मैं जमना की धारा ... बैजू बावरा
दीवाना हुआ बादल ( द्वंद्वगीत असले तरी).......कशमीर की कली
सुहानी रात ढाल चुकी ना जाने तुम कब आओगी ....आणि अगणित
दिल का भंवर करे पुकार हे राहिलेच ..तशी अनेक राहिली..
नैन लड गई हो ... वगैरे

भरत "कहीं बेखयाल होकर मुझे छू लिया किसी ने.." हे गाणं मला फार फार आवडतं. च्रप्स, सरनौबत, हीरा प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.
ज्येष्ठागौरी "तुमने मुझे देखा" माझंही अतिशय आवडतं गाणं.

छान लेख, मला राग बिग कोणता ते कळत नाही पण रफीचा आवाज प्रचंड आवडतो. मखमली आवाज. माझी आवडती काही गाणी :
१) ये हवा ये हवा
२) जवानियाँ ये मस्त मस्त बिन पिये
३) तुमने मुझे देखा
४) है दुनिया उसीकी जमाना उसीका ( खरंतर शम्मी कपूरची सगळीच गाणी आवडतात)
५) मै ये सोचकर उसके दर से चला था

रफी यांची गाणी खूप आवडतात. मागे मी एकदा म्हणाले होते, रफी अजिबात आवडत नाहीत. मी तेव्हा महेन्द्र कपूर यांच्याबद्दल बोलत होते. माझा गोंधळ झालेला.

अर्र्रररर माझ्या लिस्ट मधलं पहिलं गाणं महेन्द्र कपूरचं आहे. ये हवा ये हवा (सॉरी सॉरी)
सामो यांनी लिहिल्यामुळे माझ्या लक्षात आलं.

>>लेखाचा फोकस उर्दू रचनांवर / उर्दू शब्दांचा भरणा असलेल्या गीतांवर आहे बहुतेक.<<
मास्तर, शायराना अंदाज केवळ उर्दूतच व्यक्त होतो असं नाहि; इतर भाषांतहि होतो. फक्त तो ओळखण्याची जाण असावी लागते... Wink

मी मागेच म्हटलेलं..एखाद्याला ह्यांची गाणी ऐकून ऐकून डायबिटीज व्हायचा इतका गोड आवाज.. माझी टाॅप टेन लिस्ट -

टूटे हुए ख्वाबोंने -from madhumati
युही तुम मुझसे बात करती हो
मै कही कवी ना बन जाऊ
कुहू कुहू बोले कोयलिया
चाहूंगा मै तुम्हे सांज सवेरे
ये चांद सा रोशन चेहरा

मराठी -
शोधिसी मानवा
हा छंद जिवाला लावी पिसे
हसा मुलांनो हसा
अग पोरी संभाळ दर्याला

"है दुनिया उसी की जमाना उसी का" - दारुच्या थेंबाला स्पर्श न करता जर नशा करायची असेल तर हे गाणे कधीही, कुठेही ऐका. पडद्यावर शम्मी, रफीचा मखमली आवाज आणि मनोहारी सिंग यांचा सॅक्सोफोन यासारखे दुसरे इनटॉक्झिकेटींग कॉंबिनेशन नसेल.
"है सज्दे के काबिल हर वो दिवाना" ऐकून वाटतं सज्दा करावा तर या माणसाने, "बरबाद होना जिसकी अदा हो" कडव्यानंतर एक हलकीशी आह आहे. अप्रतिम.

"तेरी जुल्फों से जुदाई तो नही मांगी थी" हे एक आवडते गाणे. त्यातला कैद शब्दाचा उच्चार, "अपने बीमार पे इतना भी सितम ठीक नही" मधली आर्तता ऐका.

"मेरी आवाज सुनो" मधलं "मैंने एक फुल जो सिने पे सजा रखा था, उसके परदे मे तुम्हे दिल से लगा रख्खा था", आहा.

त्यांनीच म्हटलयं "क्यों सँवारी है ये चन्दन की चिता मेरे लिये, मैं कोई जिस्म नहीं हूँ के जलाओगे मुझे".

खरंच शरीराच्या क्षुद्र मर्यादांच्या पलिकडे जाणारा, लाखो लोकांच्या भावना त्यांच्यापेक्षा जास्त असोशीने व्यक्त करणारा दैवी आवाज होतात तुम्ही रफ़ीसाहेब. विनम्र श्रद्धांजली.

>> वय वाढत जाते तशी समजही काही प्रमाणास सुदैवाने वाढते. रफी या हिर्‍याचे आणखी पैलु वाढत्या वयाबरोबर दिसु लागले.

वाह... तंतोतंत सहमत. क्षणभर वाटले मीच लिहलंय कि काय Happy

>> तेव्हा चाल तर महत्त्वाची असतेच पण त्याबरोबरच शब्दांची फेक, योग्य शब्दांवर आघात, शराबी, धुंद उर्दु फारसीतील शब्दांचे उच्चार आणि अर्थातच या सर्वांना लपेटून राहिलेल्या भावना हे सारं त्या सादरीकरणात असतं. रफीच्या भात्यातील हे सारे तीर....

क्या बात !!

>> "न किसी की आंख का नूर हूं"

या गीताबाबत हे माहीत नव्हते. मोलाची माहिती खरेच, धन्यवाद

>> "तंग आ चुके है कशमकशे जिंदगीसे हम"

काढतो शोधून कुठे असेल तिथून आणि ऐकतो हे गाणे

>> रुख से जरा नकाब उठा दो

नाजूक तार छेडलीत. काही गाणी पहिल्यांदा ऐकताक्षणीच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. नन्तर कितीवेळा ऐकली तरी त्यातली गोडी संपत नाही. हे त्यातलेच एक.

सालाबादाने जसा सण येतो, तसा ठाकूर साहेब यांचा लेख येतो. आणि आपण सगळे इथे जमतो.
सोहळा असतो हा एक.

Original post and responses, both enrich the readers.

Thank you Atul, for one more in this series.

दिन ढल जाये ..
दिवाना हुआ बादल .
अभी ना जाओ छोडकर..

लगता नहीं है दिल मेरा हे गाणे सहगल साहेबांनी गायलेले आहे? मी तरी ऐकले नाही त्यांच्या आवाजात. बाबुल मोरा नैहर छूटो ही जाए हे अगणित वेळा ऐकले आहे के एल च्या आवाजात.

@श्रवु - आहाहा तीन्ही रम्य रम्य!!! अति सुरेल!
>>>>न किसी की आंख का नूर हूं>>>> अक्षरक्षः गलबलून येतं हे गाणे ऐकताना. एकेकाळचा बादशहा आणि किती दुर्दैवी त्याचे शेवटचे दिवस Sad त्यातही त्याची काव्यात्म अभिव्यक्ती, भावुकता. निव्वळ विलक्षण.

दिन ढल जाये ..
दिवाना हुआ बादल .
अभी ना जाओ छोडकर..>>>+१.
रंग और नुर की बारात..

प्यासा मधली शायरी... तंग आ चुके है आणि ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है! खुप वेळा ऐकलेली गाणी आहेत ही.. साहिर लुधियानवीचं लिखाण, रफीसाहेबांचा आवाज.

प्यासामधलंच जाने वो कैसे तर बेस्ट (हेमंत कुमार)

सगळे मूड सगळ्या छटा आहेत त्यांच्या गाण्यात. उडत्या चालीची ऐ गुलबदन, तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे चशमे बददूर, नैन लड गई हो, दीवाना हुआ बादल, दिल का भंवर करे पुकार , सर जो तेरा चकराए, हुस्नवाले तेरा जवाब नही, बार बार देखो (for that matter, जवळपास सगळा शम्मी कपूर...जंगली, दिल दे के देखो, तीसरी मंझिल) आप के हंसीन रुख पे आज नया नूर है, बहारों फूल बरसाओ, चाहे कोई मुझे जंगली कहे, अय्यय्या सुकू सुकू, आसमाँ से आया फरिशता, बंदा परवर... ओ पी आणि रफी यांनीसुद्धा धमाल केली आहे.

"प्यासामधलंच जाने वो कैसे तर बेस्ट (हेमंत कुमार)" +1111
विषयांतर होईल पण आज सजन मोहे अंग लगा दो ( गीता दत्त ) हे सुद्धा बेस्ट

मेरे सपनो की राणी रुही... हे के एल साहेबांचे गाणे आहे.. त्यात कोरस मध्ये गाणाऱ्या मुलांमध्ये एकाचा आवाज नौशाद साहेबानी बरोबर हेरला होता.. त्या गाण्यात कोरस मध्ये गाणाऱ्या त्या मुलाला त्यांनी एक स्वतंत्र ओळ गायला दिली.. बरोबर ओळखलंत.. ते म्हणजे आपले रफी...
गाणे नक्की ऐका.. शेवटी फक्त एक ओळ गायले आहेत रफी...

https://youtu.be/TySZbAkJdzM

" लाल किला" मधल्या दोन्ही गजला ऐकल्या आणि "लगता नहीं है दिल मेरा" आधी ऐकल्याचं आठवलं. माझ्या डोक्यात तिथे सैगलचं नाव का बसलंय कोण जाणे. त्यांच्या आवाजात नाहीए.

आता - तंग आ चुके - शोधून ऐकतो.
प्यासा चित्रपट पाहिलाय. हेही आठवलं. विविधभारती / आकाशवाणीवर हे गाणं खूप कमी वाजवलं जातं.

छान लेख. प्यासा मधलं माहीत नव्हतं.

दिवाना हुआ बादल.
अभी ना जाओ छोडकर
तू कहां ये बता( तेरे घर के सामने)
दिन ढल जाए
तुमने मुझे देखा हे तर प्रचंड फेवरेट
ये रेशमी जुल्फें ये शरबती आंखे
कभी खुद पे कभी हालात पे..
हम बेखुदी मे तुम को पुकारे..
सुख के सब साथी
मधुबन में राधिका
दोस्ती चे सगळे
ये दिल तुम बिन..
परदा है परदा
किती सांगावे .. अजून खूप आहेत. जुन्या गाण्यांची गोडी रफी आणि किशोर मुळेच लागली आहे.

आता - तंग आ चुके - शोधून ऐकतो.
भरतजी ऐकल्यावर कसे वाटले ते येथे नक्की लिहा. तुमचं मत जाणून घ्यायला खुप आवडेल.

Pages