स्थलांतर

Submitted by मानसी नितीन वैद्य on 30 July, 2020 - 09:55

संध्याकाळ झालीये...सान्यांच्या कॉलनीत गणपती बसलेत...सात वाजून जातायत आणि आरतीला जाण्याची तयारी चालू आहे..आसपासच्या घरातून मालिकांची गाणी ऐकू येतायत.. कोणाच्यातरी घरातला कुकर जोरदार शिट्ट्या मारतोय आणि या सगळ्या गदारोळात मंडळाच्या गाण्यांचीही भर पडलीये.. सान्यांच्या घरातील एक दार मात्र या सगळ्यापासून अलिप्त आहे.. त्यांचा चिनू बारावीलाय नं.. दिवसभर त्याचे कसले कसले क्लास आणि उरलेल्या वेळात अभ्यास... त्यामुळे तो आणि त्याची खोली काहीशी अज्ञातवासातच गेलीये..

सुजाता..चिनुची आई.. आता आरतीला जाण्याच्या तयारीत आहे..
“आज किती कमी लोक आहेत आरतीला... एरवी आपसात पटत नाहीच कोणाचं, पण आरतीला तरी सगळे हवेत..”,जोशी काकू सुजाताला म्हणाल्या..
“खरोखर, किती कमी लोक उरलेत आता कॉलनीत..”, सुजाता मनात म्हणाली.. कारण तिला ठाऊक होतं.. आज कमी जण आलेत असं नाहीये, मुळात इतके जण इकडेतिकडे निघून गेलेत की... ‘ सुखकर्ता....’ आरती चालू झाली आणि तिचे विचार तिथेच थांबले..

“तुला माहितीये?राणेकाकुंचा शिरीष अमेरिकेतच राहणारे आता..मन्या म्हणत होता..त्या धसक्याने काकांना बी. पी. झालं म्हणे..”, गौतम म्हणाला. सुजाताच्या मनात पुन्हा ते विचार चालू झाले..
‘खरोखर, किती सहजपणे लोक जातात.. इतके लांब.. अगदी सातासमुद्रापार.. त्यांचं शिक्षण, करियर , लग्न सगळं तिथेच.. परक्या मातीत.. इतकी सहज नाळ तुटते? आपण शहरात राहूनसुद्धा इथं त्यांचं करियर होऊच शकत नाही यावर इतका ठाम विश्वास यांचा?आणि जरी तिथं मिळणाऱ्या संधींसाठी तिथं गेले , तरी पुढं जाण्याची ही कुठली राक्षसी भूक जी मागं उरलेल्या आपल्या माणसांना सहज बाजुला करते? आणि मग असे जे मागे उरलेले कितीतरी राणेकाकाकाकू असतील त्यांचं काय?’ विचार संपत नाहीत... दुसरा दिवस उजाडला तरीही..
“चिनू कपाट आवर तुझं...मीपण आवरणारे माझं..” “तू घे नं आवरून.. मला वेळ नाही तुला माहितीये..”चिनू क्लासला गेलासुद्धा! मग सुजातानेच आवराआवर केली.. तिला कपाट आवरायला आवडायचं.. कितीतरी जुन्या, आपल्याच लाडक्या गोष्टी मिळाल्या की आनंद होतोच.. काही गोष्टी लाडक्या , तर काही नकोशा वाटणाऱ्या... कुठल्याशा खणात तिला आलेलं एक ऑफरलेटरही सापडलं..तिनं न स्वीकारलेलं. अमेरिकेहून, न्युयाॅर्कच्या एका कंपनीचं होतं ते. ते दिवसही आलेच मनात.. त्यांना कळतही नाही, असं मन ढवळून टाकायला येऊ नये..

गौतमची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली.. तेव्हा कुठे तिची आवराआवर झाली.. त्याच्यासाठी चहा गाळून ती बाहेर आली.. “ काय आहे गं हे?” “काही खास नाही.. “ “ खास कसं नाही? न्युयाॅर्कच्या इतक्या मोठ्या कंपनीचं ऑफरलेटर आणि इतकी वर्षं मला ठाऊकही नाही?..” “स्वीकारलं नाही नं पण. २० वर्ष झाली गौतम...” “ तेच तर.. मला माहीतही नाही..” “सांगण्यासारखं काही नव्हतंच गौतम. मी 24वर्षांची होते. आकर्षण वाटलं खूप. केलं अप्लाय. इंटरव्ह्युसुध्दा मस्त झाला. मी उत्तराची वाट पाहात होते. काही दिवस गेले. आमच्या बाजुला राहणा-या म्हात्रे काकांचं बीपी वाढलं. तुला ठाऊक आहे? त्यांना 3मुलं.. तिघंही युरोपात. एकदाही आली नव्हती त्यांना भेटायला. आयुष्याच्या संध्याकाळी ज्यांच्याकडं आशेनं पाहायचं तीच लेकरं भेटत नाहीत म्हणून आतल्या आत झुरले काका. मला क्षणभर वाटलं, जावं की न जावं? पण दुस-या क्षणी जाणवलं.. आता माझेही आईवडील थकताहेत.. आणि मी उत्तर ठरवलंच-नाही. लेटर आईबाबांकडच्या सामानात होतं. परवा दादाकडं जाताना सामान पोहोचवलं इथं , त्यामधे होतं. आवराआवरीत मिळालं.” काही क्षण स्तब्ध शांततेत गेले. गौतमनं फक्त तिच्या हातावर थोपटलं...“तू न्युयाॅर्कचं ऑफरलेटर तसंच ठेवलंस ममा?”, चिनू आत येत म्हणाला.. तो क्लासवरून आला होता. ”का पण???.. इट्स करियर ममा. मी तर सरळ हो म्हटलं असतं.” "अरे चिनू.. शिकायला जावं की. पण परतदेखील यावं बाळा... आपली वाट पाहणाऱ्या आपल्या माणसांकडे.” "कम ऑन बाबा, अरे आज कोण असा विचार करेल? तिथे किती रिच लाईफ जगतात लोक...आजकाल तेच किती नीडेड आहे.. मलातरी करियर सोडून बाकी गोष्टी खूप महत्वाच्या वाटत नाहीत. शिरीषकाका किती सांगत असतो मला फेसबुकवर." "शिरीष?आपल्या राणेकाकुंचा?" "हो. He is simply genius."हे ऐकून ती दोघंही चिनूकडे पाहत राहिली."बरं, मला तासाभारात परत लेक्चर आहे..मी बसतो अभ्यासाला.." चिनू आत निघून गेला. “सुजाता, जास्त विचार नको करू.. जे व्हायचं ते होणारच.” चिनूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काहीसं हताशपणे पाहात गौतम म्हणाला.

सुजाता चिनूच्या रूमच्या दाराशी आली.. समजावू नं एकदा,कळेल त्याला.. पण..भल्यामोठ्या पुस्तकांच्या गर्दीमागच्या तिच्याच मुलाशी बोलण्याची तिला भीती वाटली एकदम. 'आपले आईवडील आपल्या स्वप्नाच्या आड येतायत असं त्याला वाटेल', तिला नाही जमलं बोलणं.

‘आजकाल किती सहज झालंय हे निघून जाणं.. लोक म्हणतात मुली मोठ्या होऊन घर सोडून जातात.. पण मुलंसुद्धा जातात.. फक्त घरच नाही ; देश सोडून.. मागे उरलेली माणसं, कुटुंब.. हे नकोसं स्थलांतर टळणार नाही का? शिकायला जातोय म्हणून गेलेली लेकरं नंतर फक्त व्हिडीओकॉलवर भेटतात.. हे सगळं माझ्याही घरट्यात होणारे.. ठाउक आहे मला.. एकदा बोलावं म्हणून गेलेही.. पण आजची पिढी इतकी वेगाने पुढे जाते की आपल्या हाका पोहोचतच नाहीत.. पक्ष्यांचं बरं असतं नं, त्यांची पिल्लं उडता आलं की जातात उडून. आणि त्यांची घरटी वाटही पाहात नाहीत ती परत येण्याची. पण आपलं नसतं नं तसं. आपलं घर, आपण वाट पाहतोच. त्याची निष्फळता कितीदातरी माहिती असते तरी..’
तिच्या मनातलं हे सगळं कागदावर झरझर उतरलं.. पानावर ओघळलेल्या दोन थेंबांनीच फक्त ते ऐकलं होतं...
-मानसी नीतीन वैद्य.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults