गाठी प्राक्तनाच्या

Submitted by रेव्यु on 30 July, 2020 - 04:40

पावसाची संतत धार लागली होती.सहसा अशा दिवशी रहदारी कमीच असते.त्यात म्हातारे लोक तर साहजिकच अश्या हवेत बाहेर पडायचं टाळतात्.अन तो पावसाचा दिवस तर दिल्लीतील जानेवारीतल्या जीवघेण्या थंडीचा.तरीही सत्तरीतले ते वृद्ध जोडपे ठरलेल्या वेळेस म्हणजे बरोबर दुपारच्या १२ वाजता आपल्या पुरातन मॉरिस मायनर गाडीतून उतरून "पिझ्झा हट्"च्या दिशेस चालू लागले.उतरण्यापूर्वी आजोबानी आजीस उतरतांना दाक्षिण्यापोटी दार उघडून धरले.जरा जुना पण अत्यंत स्टायलिश थ्री पीस सूट्,कोटावर ताज्या गुलाबाचे फूल ,वर ब्रिटिश बाऊलर हॅट्,हातात छत्री -अशी ही साडेपाच फूट उंचीची गौरवर्णी व्यक्ती दुरून रुबाबदार होती पण जवळ जाताच चेहेर्‍यावरीक सुरुकुत्या अन चिन्ताग्रस्त अन उदास भावमुद्रा काही वेगळेच व्यक्त करायचा प्रयत्न करीत आहे असे नक्की वाटत होते.सोबतच्या सह्धर्मचारिणी आज्जीबाईनीही तितकीच ग्रेसफुल शिफॉनची साडी परिधान केली होती ,गळ्यात शुभ्र मोत्यांची माळ परिधान केली होती,हातात वॉकिंग स्टिक होती.पण त्यांच्याही निकट पोहोचल्यावर चेहेर्‍यावरील ती उदासी अन क्लांत भाव स्पष्ट दिसत होता.
मी त्या भागात नेहेमी या वेळेस काही कामा निमित्त यायचा. त्या वसन्त विहारच्या अत्याधुनिक अन उच्चभ्रू भागातल्या शॉपिंग काँप्लेक्स मध्ये १२ च्या सुमारास पिझ्झा हट मध्ये मी अनेकदा पाहिले होते.दर वेळेस गाडीतून उतरताना वरील क्रमाची उजळणी व्हायची.त्याना सोडून मग ड्रायवर गाडी पर्किंगला घेऊन जायचा.ते मग हळू हळू पिझ्झा हट कडे चालत यायचे.डिलिवरी काऊंटरच्या जवळील बाकड्यावर आजीबाईंना हात धरून बसवून मग आजोबा त्यांच्या बाजूस बसायचे.ते कधीही कसलिही ऑर्डर ही नाही द्यायचे.शांतपणे बसून आजुबाजूचे जग निखारायचे.तिथे शाळकरू मुले थेट शाळेतून युनिफॉर्ममध्ये यायची,तरुण जोडपी यायची,आय टी क्षेत्रातील तरुण नोकरदार मंडळी क्विक लन्च साठी यायची.तरुण आया मुलांना सरळ शाळेतून घेऊन यायच्या-त्यांना खाऊ पिऊ घालून घरी घेऊन जायच्या्आ सर्व सोहोळा,समारंभ ते दोघे अनिमिष नेत्रानी,प्रेमाने अन कधी खिन्न भावाने पहायचे.कधी कधी मला ते डोळे मिटून त्या वातावरणात दरवळणार्‍या फ्रेश पिझ्झाच्या खरपूस वासात हरवलेले दिसायचे.एखाद वेळेला कोणी परिचिताचे अभिवादन त्यांच्या कानी पडून न पडल्यासारखे असायचे.तिथल्या वेटर्सना अन इतर काम करणार्‍या कर्मचार्‍याना ही त्यांचे तिथे असे विनाकारण बसणे आपत्तिजनक असल्याचे कधी माझ्या निदर्शनाला आल्याचे आठवत नव्हते.मला नेहेमी प्रश्न पडायचा-ते इथे काय करताहेत्?विशेषतः आजच्या सारख्या जिवघेण्या थंडीच्या दिवशी त्यांनी घरी असायला हवं नाही का-कुणा जिवलग मुला नातवंडांच्या सान्निध्यात्?पुढे गरम जेवणाचं ताट असायला हवं वा घरात रजईत गुरफटून गरम चहा चे घोट घेत थंडीवर मात करायला हवी यानी-नाही का?
पण या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
आज मात्र अट्टाहासाने या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवी असा मी पणच केला होता.मीही पिझ्झा हट मध्ये प्रवेश केला.आजही ते दोघे त्या बाकावर बसले होते.ते नेहेमीप्रमाणे आपल्याच तंद्रीत हरवले होते अन मी त्यांना निरखण्यात मग्न झालो.ते नेहेमीप्रमाणे वेटर्स्,येणार्‍या जाणार्‍या ग्राहकांकडे,आईमुलांकडे पहाण्यात गर्क होते. हे जवळ जवळ तासभर चालले होते.अन काही क्षणात एक उंचापुरा,देखणा ,कुरळ्या केसांचा अन चेहेर्‍यावरून सुसंस्कृत दिसणारा,मार्दव असणारा एक तरुण किचनमधून बाहेर आला.ते जोडपे अन तो एकमेकांची वाट पाहत असावेत्.आजोबा आजीस पहाता क्षणीच आनंदाने तो त्यांच्याजवळ आला अन "पैरी पोणा"म्हणत त्यांच्या पाया पडला.तिघांच्याही चेहेर्‍यावर आभाळातून सूर्यकिरणे प्रकटीत झाल्याप्रमाणे हास्य झळकत होते.मी दूर उभा असून ही त्यांच्या नात्यातील प्रेमाची ऊब मलाही जाणवत होती.जणू काही त्या घडीस त्यांच्या त्या चैतन्यहीन अस्तित्वास पुनः पुनरुज्जीवन मिळले होते.या छोट्याशा मुलाखतीनंतर तो तरुण पुनः किचनमध्ये अंतर्धान पावला.अन आपले जोडपे हळू हळू उठून उभे राहून परतायची तयारी करू लागले.आजोबांच्या हातावर हात ठेवून आजीबाई हळू हळू कारच्या दिशेने अंतर्धान पावल्या.दूरून गाडीत चढतांना मी त्या उभयतांना पाहिले अन क्षणार्धात ते दृष्टीआड झाले.त्यांचा ती पाठमोरी आकृती मनात चलबिचल निर्माण करून गेली हे मात्र नक्की.
काही क्षणात तो तरुण आपला युनिफॉर्म बदलून बाहेर आला.
"एक्सक्युज मी ,एक्सक्युज मी,मला एक मिनिट तुमच्याशी बोलायचय्,वेळ आहे का?" मी त्याला विचारले.
"सॉरी ,मी ऑफ ड्युटी आहे आता-मी माझ्या मित्राला तुम्हाला मदत करायला,तुमची ऑर्डर घ्यायला सांगतो"तो अदबीने उत्तरला.
"नाही नाही मित्रा,मला तुझाशीच थोडे वैयक्तिक बोलायचय्"मी पुनः प्रयत्न केला.
थोडा संशयाचा अन चिडचिडीचा,अविश्वासाचा भाव साहजिकच त्याच्या चेहेर्‍यावर झळकत होता.
"मला थोडं त्या वृद्ध जोडप्याबद्दल बोलायचय्,जाणून घ्यायचय्.थोडा वेळ द्या ना, "मी अजिजीने उद्गारलो.
अजूनही नापसंतीने पण जाऊदे या भावनेने त्याने मला संमती दिली.बाजूच्याच उडुप्याकडे आम्ही बसलो.कॉफी ऑर्डर केली.
"बोला,काय विचारयचय" तो म्हणाला.
"मला त्या जोडप्याबद्दल जाणून घ्यायचय्.तुम्हाला नक्कीच वाटणार -"का?" ---माझ्याजवळ कुठलेही योग्य कारण नाहीये.मी लेखक आहे अन मनुष्यस्वभावाचे निरिक्षण करणे मला आवडते,अन असे करतांना जर कुणास मदत करण्याची संधी मिळाली तर मी स्वतःस भाग्यवान समजतो.वृद्धावस्थेतील अनेक लोक मी जाणतो अन त्यांना सुखाचे काही क्षन देण्याचा मी प्रयत्न करतो.कधी रविवारी भेटून्,कधी सिनेमाला घेऊन जाऊन्,कधी वाचून दाखवून.
मी गेले कित्येक दिवस त्यांना पहातोय,ते दु:खी दिसतात्,हरवलेले दिसतात अण त्यांच्या पेहेरावावरून त्यांना आर्थिक विवंचना नाही हे स्पष्ट आहे.अशा हवेत घरात न रहाता,पिझ्झा हट मध्ये काय करतात्.आज पाहिले तू त्यांचा एकुलता एक सहारा आहेस असे वाटले्.मला थोडे आणखी काही समजले अन जर शक्य झाले तर त्यांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण देण्याचा मी ही प्रयत्न करेन."
आता मात्र माझ्यावर थोडासा विश्वास बसतोय अस मला वाटू लागलं.
तो बोलू लागला
"गेल्या हिवाळ्यात अशाच एका पावसाच्या दिवशी माझी त्यांची भेट झाली.ते आत आले अन त्यानी ऑर्डर दिली.मला जाणवत होते की ते कुणाशी तरी बोलायला आसूसले आहेत्.मी ही त्यांची विचारपूस केली.ते नुकतेच अमेरिकेहून परतले होते.मग आमचा हळू हळू परिचय वाढू लागला अन त्यांचे येणे जाणे ही वाढू लागले.त्यांच्या आवाजात ,हावभावात नक्कीच दु:ख होते,त्यांना त्यांच्या नातवाची आठवण सतावत होती.तो अमेरिकेत होता.मुलगा अन सून घटस्फोटित जीवन अमेरिकेत भोगत होतीं नातू परत येणार याची त्यांना आशावजा खात्री होती,हळू हळू पत्राचार रोडावत गेला.रोजची स्वप्ने मात्र तीच राहिली.त्याच्या परत येण्याची.वाढदिवसाची कार्डस ही एकच संपर्काची निशाणी राहिली होती.
अन गेला जून मध्ये आजोबांना एका अपघातात जवळ जवळ स्मृतीभ्रंश झाला.ढ्ळणार्‍या वर्षांनी आजीच्या ही स्मृतीचा र्‍हास केलाय.ते आता व्रुद्धाश्रमात राहू लागलेत.
अपघातानंतर ते पुनः पिझ्झ हट मध्ये आले अन मला पहाता क्षणी आनंदाने वेडे झाले.पिझ्झा चा तो गंध,तिथली सजावट अन मला पाहून त्यांना वाटले की मी त्यांचा नातू आहे.जगभर हे पिझ्झा हट सारखेच दिसतात्.इट्स अ मेक बिलीव्ह वर्ल्ड्.त्यांचा नातू ही पिझ्झा हट मध्ये पार्ट टाईम काम करतो ना!! आता मात्र पहिल्यापेक्षा नियमित -जवळ जवळ रोज येतात्.त्यांना खरोखर मी त्यांचा नातूच वाटतो -नव्हे आहे असे त्यांना कळून चुकले आहे.
----------अन मला ही यात आनंद आहे!!!"
अचानक त्याच्या डोळ्यात पाणी तरारल्याचा भास मला झाला
तो पुढे म्हणाला
"माझे आई वडील ही फ्रान्स मध्ये वेगळे वेगळे रहातात्.ते कधीच परतणार नाहियेत्.आजोबा आजींव्यतिरिक्त आता मला तरी माझे म्हणायला कोण आहेत्? "
एवढे म्हणून तो अचानक उठला अन बाहेर चालू लागला.हिवाळ्यातील मावळत्या सूर्यप्रकाशात त्याची पाठमोरी लांब सावली त्या वृद्ध जोडप्याएवढीच एकाकी दिसत होती.
माझ्या डोळ्यातला एकच अश्रू पुसत मीही बाहेर पडलो.
=इति
--

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय तुम्ही...लिहिण्याची पद्धत आवडली...पण कथा थोडी अपूर्ण वाटत आहे....आज्जी आजोबा आणि नातवाच्या नात्याला अजुन खुलवायला हवं होत...

कथेचा विषय चांगला आहे,
लिहिली सुद्धा छान आहे.
पण अगदी FM वरची 2 मिन वाली लव्हस्टोरी झालीये,
थोडी मोठी झाली असती तरी आवडले असते.

गोष्ट छान आहे.
सॉरी, पण भाषांतर केल्यासारखी शैली वाटतेय.