फक्त काहीच दिवस उरल्यात!

Submitted by अजिंक्यराव पाटील on 30 July, 2020 - 03:48

तर, आपल्याला काय ते गॉड गॉड लिहिता येत न्हाई,
पर, तुला सांगाव वाटतं माझा किती जीव आहे तुझ्याव..
असं बघ, आताशा वावरात नांगुर धरल्यावर जवा नजर आभाळात जाती,
मला तुझ्या चेहऱ्याचा चांदवा दिसतो, न मग तास तिरपा व्हत जातो.

दुपारनं भाकरीच्या टायमाला चटणीसंग तुकडा मोडताना वाटतंय,
तू आल्यावर हे असं कोरडं खावा लागायचं नाही.
मग नजर बांधाकडं जाती.. अन तू दिसतीस मला बांधावरून मुरकत, सावरत येताना.
वाऱ्यामुळं तुझ्या पातळाचा पदर, पायापासला सोगा मागं उडतो, तुझा बांधा डोळ्यात भरत जातो.

उगवतीच्या येळला सूर्यदेवाचा लाल गोळा दिसतो आभाळात, तसंच तुझ्या कपाळावर रुपयाएवढं कुकु..
कातळात कोरलेल्या हिरीसारखी तुझी खोल खोल, वाढून नेन्हारी बुबुळं.. पहाटंच्या दवासारखं पाणीदार डोळं..
बांधावरल्या चाफ्याच्या कळीगत नाकाचा शेंडा, आणि कशानंच सांगता येणार न्हाई अशी नाजूक जिवणी...
लिंबाखाली सावलीत तू एक तुकडा खावा, मी एक खावा. तुझ्याकडून बघून माझं पोट भरावा.
असं काय बाय दिसत ऱ्हातंय.. मी खुळ्यागत एकटाच हसत ऱ्हातो.

तिखटजाळ चटणीचा बुकाना तोंडात जाऊन जीव भानावर येतो. डोळ्यात पाणी येतं, जीवाला धोसरा लागतो..
पाणी द्यायला कुणी न्हाई, मग डोक्यात येतं, अजून काहीच दिवस...
मग ठसका लागणार न्हाई, लागला तरी पाणी हातात मिळल..

फक्त काहीच दिवस उरल्यात!

-राव पाटील!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@अजिंक्य राव घरापासून लांब आहात का?
शीर्षक वाचून वाटलं गणपती वर आहे
गॉड गॉड - हे गोड गोड आत्ता कळलं
Happy

@अजिंक्य राव घरापासून लांब आहात का?>>> लग्न ठरलेल्या शेतकरी तरुणाच्या नजरेतून लिहिलं आहे.

मला वाटले लग्न झालेल्या पण बायको लॉक डाउन मुळे माहेरी अडकलेल्या शेतकरी तरुणाच्या नजरेतून लिहिले आहे...

मला वाटले लग्न झालेल्या पण बायको लॉक डाउन मुळे माहेरी अडकलेल्या शेतकरी तरुणाच्या नजरेतून लिहिले आहे...>> तसेही चालून जाईल!