तिला वनवास इतकाही नको देवूस तू

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 July, 2020 - 08:55

सुखाला फास इतकाही नको देवूस तू
मनाला त्रास इतकाही नको देवूस तू

गृहीतक मांडले जाइल तुझ्याबद्दल नवे
तुझा अदमास इतकाही नको देवूस तू

तुझा उपयोग होइल सरपणाला चंदना
तुझा सहवास इतकाही नको देवूस तू

दिशा अंधारल्या जातील फटफटण्याअधी
पिलांना घास इतकाही नको देवूस तू

तुझ्यावरती भरवसा ठेवणे टाळायचे
तुझा विश्वास इतकाही नको देवूस तू

विसरली खेळणे, संवादणे, खाणे-पिणे
तिला अभ्यास इतकाही नको देवूस तू

पुन्हा घडवेल रामायण-महाभारत नवे
तिला वनवास इतकाही नको देवूस तू

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users