मळभ

Submitted by मधुमंजिरी on 29 July, 2020 - 04:13

मळभ

अलिकडे आदिती फारच चिडचिड करत होती, तिचा मूड ठीक नव्हता, घरातली कामं झाली की ती जास्तीतजास्त वेळ बागकामात घालवायची, म्हणजे घरात वादावादी नको ,. नवरा अमर तिला विचारायचा, आदित्य त्रास देतो का? घरकामात वैतागून गेली आहेस का? तुला तुझ्या आईवडिलांची काळजी वाटते का? तर यावर आदितीचं उत्तर असायचं, असं काही नाही. मग का अशी वागतेस तू ? यातून वाद व्हायचे, ती नीट बोलायची नाही. अमर ने मुलाला, आदित्य ला सांगून ठेवले होते की आईकडे हट्ट करू नकोस, तिला सारखं खायला मागू नकोस. आपण तिला अधूनमधून स्वैपाकातून सूट देऊ,त्याप्रमाणे ते दोघं काही तरी प्रयोग करून पाहत, तिला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत.
अमरला वाटलं की हे सर्व मेनोपॉज मुळे असेल, पण त्यावरचा उपाय मात्र नव्हता त्याच्याकडे! कधीकधी तो देखील वैतागत असे तिच्या वागण्याला, समजून घ्यायची देखील मर्यादा असते ना!
आणि सध्याच्या काळात तिला साधं डॉक्टर कडे नेता येत नव्हतं, तर कुठे फिरायला जाणं दूरच! सगळेच जण घरात अडकलेले। सुरुवातीला थोडे दिवस बरं वाटलं, उत्तम सरबराई झाली, नवनवीन पदार्थ, साफसफाई, कामाची विभागणी, सारं काही आलबेल! पण मग हळूहळू सतत एकत्र असण्याचा तोटा व्हायला लागला. आणि मग दिसायला लागल्या- आत्तापर्यंत न दिसलेल्या, जाणवलेल्या चुका, अगदी खुपायला लागल्या, टोचायला लागल्या, वाद विकोपाला जायला लागले. छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे वाद आणि मागोमाग घोंगावणारं वादळ।
यात भरडला जात होता तो छोटा आदित्य। तो देखील सतत घरात कोंडलेला, मित्रांबरोबर खिडकीतून बोलून कंटाळलेला, त्यात शाळा, क्लास काहीच नाही, सगळं online, सुरुवातीला छान वाटलं, हातात फोन आला त्याचं अप्रूप ओसरल्यावर घराच्या चार भिंती त्याला पिंजऱ्यासारख्या वाटत होत्या.
त्यात घरात हे असं वातावरण! त्यालाही कसं react व्हावं ते कळत नव्हतं. आणि सध्याच्या परिस्थितीत दुसरं काही करता येत नव्हतं. तिघंही घरात कोंडलेले !!
पण मार्ग काढणं तर भाग होतं, नाहीतर विषयाला वेगळं वळण मिळालं असतं! आणि तसे दोघंही सूज्ञ होते, त्यामुळे एक दिवस विचारांती त्यांनी दोघांनी सामंजस्यानी हा प्रश्न सोडवायचं ठरवलं.
रिकामं डोकं सैतानाचं घर! त्यामुळे नवरा सतत घरात, यातून आदितीला अनिश्चितता वाटायला लागली होती, त्याच्या लठ्ठ पगाराच्या नोकरीवर गदा येईल, मग कसं होईल, आपल्या सरकारी नोकरीत कसं भागणार? पगार कमी, कामाला फारशी किंमत नाही, कायम चेष्टेचा विषय ठरलेली तिची नोकरी! तिला आत्ताही मधून मधून कामावर जावं लागायचं आणि अमरला मात्र WFH, त्यामुळे ती ऑफिस ला गेली तरी तो घरीच असायचा, मग तिची चिडचिड व्हायची। पण ही तिची काळजी होती हेच तिला समजत नव्हतं आणि सांगता येत नव्हतं. मग ती स्वत:लाच दोष द्यायची. म्हणजे अशी परिस्थिती कधीच न आल्याने तिला ती हाताळता येत नव्हती. कायम तिची मर्यादित वेळेची नोकरी आणि घर एवढंच तिचं कार्यक्षेत्र आणि अमर सतत कामानिमित्त घराबाहेर, त्याच्या मीटिंग्ज,टूर्स , सेमिनार.! त्यामुळे तो घरात असायची सवयच नव्हती तिला आणि त्यातून त्याने स्वखुशीने केलेली मदत देखील तिला जड वाटत होती, किंबहुना तिच्या कामात अडथळा वाटत होता, तिला पाहिजे तो मोकळेपणा मिळत नव्हता। घर हे तिचं एकटीचं असल्यासारखं तिनं सांभाळलं होतं आणि आता तिला जणू काही स्पर्धा निर्माण झाली होती आणि त्यामुळे ती प्रचंड नाराज होती, तिच्या साम्राज्यात ढवळाढवळ तिला खपत नव्हती. आणि तिला तिची पकड ढिली होऊ द्यायची नव्हती.
मग अमर तिला म्हणाला, अगं थोडे दिवस मी घर सांभाळतो की। बघ, जमतंय का, अगदी तुझ्या सारखं नाही जमणार कदाचित पण अगदीच विस्कळीत नाही करणार तुझी बसवलेली घडी. मला पण जरा कामात बदल, अगदी रिकामं वाटणार नाही, माझा वेळ चांगला जाईल, creative ! तुला जसं हवंय तसं करूया। नाहीतरी म्हणतेस ना, घर दोघांचं असतं! मग आता त्रास नको करून घेऊ. तुला जेवढं जमेल तेवढं तू आनंदाने कर , उरलेलं मी करीन, आवरीन, अगदी पोळ्या सुद्धा शिकून घेतो, भाजी शिकतो. तुला complex देण्यासाठी नाही गं, तर तुला मदत म्हणून। किंवा घरात माझी पण काही जबाबदारी आहे, थोडा भार मी पण उचलतो, गेली १७ वर्ष तूच एकटीने हा गाडा ओढलास,आता मला करू देत. मला देखील जाणीव होईल ना! तू तुझ्या तालमीत तयार करण्यात मला आणि आदित्य ला, मग तर झालं?
तू ताण नको घेऊ गं, शांतपणे ऑफिस ला जा, सध्याच्या काळात तुम्ही जे काम करताय त्याला तोड नाही, आजच्या ह्या महामारीच्या दिवसात सरकारने राबवलेल्या योजना तुमच्या मार्फत जनसामान्यांपर्यंत पोचताहेत, किती वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडत आहात, आम्हाला घरून काम करायची मुभा आहे गं, पण तुम्हाला ते स्वातंत्र्य नाही, तुम्हाला - राष्ट्र प्रथम, म्हणून जावंच लागतं, ग्रेट आहेस तू आणि तुझ्या सारखे सर्व जण! विज, पाणी, फोन, टीव्ही सगळं सुरळीत चालू राहिलं तुमच्या मुळे, आणि त्यामुळेच आमचं WFH पण, याची सर्वांना जाणीव होते आहे आता। खाजगी डॉक्टर्स नाही म्हणू शकले पण सरकारी डॉक्टरांनी त्यांनी घेतलेली रूग्ण सेवेची शपथ निभावली, सरकारी संस्था, कर्मचारी, अधिकारी सर्व जण राबत आहेत अहोरात्र आणि हे मला समजलं ते तुझ्यामुळे आदिती! मला तुझा खूप अभिमान वाटतो! तू अजिबात कसलीही काळजी करू नको. माझी नोकरी, बघू काय होतंय पुढे जाऊन, पण करणाऱ्याला शंभर मार्ग सापडतात, अगदीच काही विपरीत झालंच तर आपण मार्ग काढू गं, आता अख्ख्या दुनियेत पडझड झाली आहे, सगळे मापदंड बदलले आहेत, तेव्हा नवीन संधी नक्की निर्माण होतील बघ! आपण हमी देऊ शकतो फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि दर्जाची, सचोटीची !
अगं, तुझी नोकरी तरी आहे आपल्याला तरून जायला! तू निर्धास्त रहा!
आदिती या आश्वासक शब्दांनी एकदम शांत झाली, स्त्रीला अजून काय हवं असतं? ओळख,कौतुक,जाणीव आणि सामंजस्य ,बस!! तिचा चेहरा बऱ्याच दिवसांनी खुलला, मळभ दूर झाल्यावर सूर्य चमकावा तसा! अमर आणि आदित्य पण खुश झाले, बऱ्याच दिवसांनी घरात पहिल्या सारखं खेळीमेळीचं वातावरण होतं. ती पटकन उठली, म्हणाली, मस्त शिरा आणि भजी करते पण अमर, तू मला कांदा चिरून दे हं। पण एक लक्षात ठेवा, बाकी सगळं जमलंना तरी तुला माझ्या सारखा चहा मात्र जमणार नाही, बरं का!!!

© सौ मंजुषा थावरे (२९.७.२०२०)

Group content visibility: 
Use group defaults