पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

Submitted by दुर्गविहारी on 21 July, 2020 - 13:57

आधीचा भाग ईथे वाचू शकता

चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते. पन्हाळ्यावर त्रिंबक भास्करांबरोबर बंदोबस्तासाठी बाजी, फुलाजी थांबणार होते. तर दहा हजार शाही फौजेला तोंड द्यायला पाच हजार मराठी वाघ निघाले. गोदाजी जगताप, वाघोजी तुपे,हिरोजी इंगळे, भिमाजी वाघ, सिधोजी पवार, महाडिक, जाधव, पांढरे, खराटे व सिद्दी हिलाल हे महाराजांचे साथीदार व अर्थातच सरनौबत नेतोजी होतेच. सोमेश्वराचे आशीर्वाद घेउन वेगाने सैन्य कोल्हापुरच्या दिशेने निघाले. थोड्या वेळात त्यांना आदिलशाही चाँदतार्‍याबरोबर असलेल्या फौजा दिसु लागल्या. फाझलला बहुधा शिवाजी ईतक्या लवकर आपल्या समोर असा उघड्या मैदानात येईल, याची अपेक्षा नसावी. पन्हाळ्यावर हल्ला करायची योजना तो तयार करत होताच, तो हि सगळी झुंड त्याच्यासमोर होती. धीर धरुन रुस्तमेजमान फौजेला तयार करु लागला.रुस्तम स्वतः मध्यभागी, रुस्तमच्या डाव्या अंगाला फाझलखान, उजव्या अंगाला मलिक ईतबार्,पिछाडीला अजिजखानचा मुलगा फतहखान, बाकी मुल्ला.बाजी घोरपडे, सर्जेराव घाटगे होतेच.
हे सगळे थोड्या अंतरावरुन मराठी फौज बघत होती.
नेतोजीने तातडीने आपल्या सैन्याला आदेश दिला आणि रचना केली.उजव्या अंगाला पांढरे,खराटे, डाव्या बाजु सिद्दी हिलाल,जाधवरावांवर सोपवली, सोबत हिरोजी ईंगळे,भिमाजी वाघ, गोदाजी जगताप, सिदोजी पवार्,परशुराम महाडीक होतेच. दोन्ही फौजा चढाईला सज्ज झाल्या. महाराज आपल्या फौजेला म्हणाले, "हिरोजी तु मलिक ईतबारला टिपायचे, महाडीक तुम्ही फत्तेखानाला धरा, सिदोजीची गाठ सादतखानाशी, गोदाजी तु सर्जेराव घाटगे आणि घोरपड्याला घेरायचे, नाईकजी राजे आणि खराटे राजे यांनी फौजेच्या उजव्या अंगाला कापायचे, जाधवराव आणि सिद्दी हिलाल डावी बाजु मारतील. रुस्तमेजमाशी आमचा स्नेह आहेच ,आम्ही जातीने त्याच्यावर यल्गार करतो.चला, उठा,झोडपा हि शाही फौज ! कळू देत विजापुर दरबाराला मराठी मुलुखात आल्याचा नतीजा".
राजाच्या शब्दांनी मावळ्यांना दहा हत्तीचे बळ आले, समोरच्या फौजेत हत्ती असले तरी आता मराठी वाघ त्यांना झोंबायला सज्ज झाले, भगवे झेंडे नाचु लागले, शिंग फुंकली, कर्ण्यांनी एकच गिलका केला. आपल्याला नेमून दिलेल्या सावजाच्या दिशेने पाण्याचा लोंढा फुटावा तसे मराठे आदिलशाही फौजेवर तुटून पडले.
आपली जुनी हुकलेली शिकार फाझलखानाच्या दिशेने नेतोजी मोठ्या तडफेने निघाला. राजांनी थेट रुस्तमेजमानचा वेध घेतला. शाही फौजेत हत्ती होते,त्यामुळे सरदारांना चपळपणे हालचाल करता येईना.बघता बघता मराठी फौजांनी विजापुरी फौजेला चारही बाजूनी घेरुन टाकले. राजांच्या जोरदार हल्ल्यामुळे रुस्तमेजम्याची फौज कापली जाउ लागली, तर नेतोजीचा आवेश फाझलखानाला आवरेना. विजापुरच्या सरदाराना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आणि अशावेळी काय करायचे ते त्यांना आता माहिती झाले होते. अगदी पुरंदरवर हल्ला केल्यानंतर फत्तेखानाच्या फौजेने तेच केले होते, अफझलखानाला फाडल्यानंतर त्याच्या फौजेने तेच केले होते.आताही काही वेगळे करायची गरज नव्हती. एकच गोष्ट म्हणजे "जीव वाचवून पळुन जाणे".प्रश्न ईतकाच कि आधी कोण पळून जाणार ? अर्थात नुकताच याचा अनुभव असलेल्या फाझलखानाशिवाय हे धाडस कोण दाखवणार. आणि फाझल मोहरा वळवून पळत सुटलाच. हत्तीवरुन उडी मारुन घोड्यावर मांड टाकून गडी विजापुरच्या दिशेने पळत सुटला. एकदा सेनापतीने पळायचे धाडस दाखवल्यावर फौजेला त्याच्या मागोमाग जायला अडचण नव्हती. रुस्तमेजमाही मागेमागे हटून एका क्षणी गर्रकन वळाला आणि पळत सुटला. याचीच वाट बघत असलेले बाकीचे सरदारही बेभानपणे विजापुरकडे दौडू लागले. रणभुमीत फक्त बेवारस हत्ती आणि घोडेच काय ते शिल्लक राहीले. शाही फौजेची पाठ बघणार्‍या मावळ्यांनी हसत हसत बारा हत्ती आणि दोन हजार घोडी ताब्यात घेतली आणि पन्हाळ्याचा चढ चढू लागले. अजून एक दैदीप्यमान विजय मिळवून राजे प्रसन्न मुद्रेने गडात प्रवेश करते झाले.
काय कमाल होती ना ? अवघ्या वीस वर्षापुर्वी हेच मावळे आदिलशाही नाही तर मोघली चाकरीत धन्यता मानायचे.आपण कधी जिंकु हा आत्मविश्वासच यांना नव्हता. बादशहासाठी प्रसंगी आपल्याच सग्यासोयर्‍यांचे खुन पाडयलाही यांनी कधी मागेपुढे पाहीले नव्हते. तेच मावळे आज पातशाही फौजेला सळो कि पळो करुन सोडत होते. सह्यशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्या कि काय चमत्कार होतो याचा अनुभव मराठी मुलुख घेत होता.
दुसर्‍या दिवशी सदरेवर सगळे मानकरी एकत्र जमले. एकुण पन्हाळा मराठी फौजेला शुभशकुनी ठरला होता. नेतोजी, गोदाजी कालच्या युध्दातील गंमतीजमती सगळ्यांना सांगत होते. सदरेवर हास्यकल्लोळ उठत होते.ईतक्यात महाराज येत असल्याची ललकारी आली.सगळे सावरुन बसले.
"महाराज, कालचे युध्द लाभदायक ठरले म्हणायचे. हत्ती,घोडे तर मिळालेच्,पण आदिलशाही फौजेला बसलेला हबका बघता आता तिकडून ईतक्यात कोणी पुन्हा स्वराज्यावर चालून येणार नाही असे वाटते" त्रिंबक भास्कर मुजरा घालून महाराजांना म्हणाले.
"खर आहे पंत ! मार मोठा जोरदार खाल्लाय. शाही फौजेला पराभव नवीन नव्हता. औरंगजेब द्क्षीणेत होता, तेव्हा विजापुर दरबार दबकून होता. ईकडे आम्ही त्यांचा मुलुख मारीत होतो, तिकडे आलमगीर किल्ले बळकावत होता. औरंगजेबाचा इरादा आदिलशाही बुडवावी असाच होता.नंतर त्याला आमच्याकडे लक्ष देता आले असते. पण नेमक्या वेळेला शहाजहान आजारी पडला आणि आम्हा दोन्ही दख्खनी शाह्यांचा हा मोघली दाब गेला. ह्याच संधीचा आता फायदा घ्यायचा आहे. विजापुर दरबार आता गलितगात्र झाला आहे. मोघलांचा कोणी नामी सरदार लगेच स्वराज्यावर येईल ईतका जवळ नाही. आपल्याला पुढची चाल लगेच खेळायला हवी. काका, तुम्ही आजच फौजा घेउन निघा. मिरज्,विजापुर परिसरात दौड मारा आणि शक्य तितका मुलुख मारा. आम्ही दोरोजीला कोकण ताब्यात घ्यायला दाभोळ, राजापुरकडे पाठविले आहे, त्याचीही काही खबर यायला हवी" राजे विचारात व्यग्र होते.
नेतोजी मुजरा घालून मोहीमेच्या तयारीसाठी निघाले.
पुढे चारच दिवसांनी सदरेत नेतोजीनी मिरजेच्या भुईकोटाला वेढा घातला आहे. आजुबाजुच्या गावातील जमीनीचे तंटे गडावर आले होते.कारभार्‍यांबरोबर बसून त्याचे निवारण सुरु असताना एक बातमीदार राजापुरकडून आला. मुजरा घालून त्याने खलिता पुढे केला आणि परामर्श सांगितला.
"महाराज, दोरोजीने दाभोळ बंदरावर झडप घातली,पण बातमी लागताच दाभोळचा सुभेदार महमुद शरीफ तीन गलबत घेउन राजापुरला पळाला आणि अंग्रेजांच्या आसर्‍याला गेला. पण आंग्रेजांना हे झेपणारे वाटले नाही, त्यांनी एक गलबत राखतो म्हणून सांगितले.आपला दोरोजी गप्प बसतोय होय.तो तातडीने राजापुरवर गेला. हि खबर लागल्याबरोबर शरीफ एका भाड्याच्या गलबतात बसुन वेंगुर्ल्याकडे पळाला. त्याची तिन्ही गलबत राजापुर बंदरातच उभी असल्याची पक्की खबर दोरोजीला मिळाली होती. गोर्‍यांनी युक्ती मोठी नामी केली होती, शरीफच्या गलबतावर त्यांनी आपली निशाणं लावली होती,पण दोरोजीला संशय आलाच्,त्यांनी गलबत तर ताब्यात घेतलीच पण फिलीप गिफर्ड म्हणुन एक गोरा अधिकारी पकडला आणि त्याला आपल्या खारेपाटणच्या भुईकोटात बंद करुन ठेवले आहे. त्याच्याबरोबर वाटाघाटी करुन काही कलम कबुल करुन मंजुरीला दोरोजीनं खलिता घाडला आहे".
जासुसाने बयाजवार सगळा मामला सांगितला. सगळ्या सदरेला वाटले, आता महाराज त्या गोर्‍याला सोडत नाहीत. पण महाराजांनी शांतपणे खलीता वाचला आणि लगेच मंजुरी दिली. सगळ्यांनाच या मसलतीचा धक्का बसला. न राहून त्रिंबकपंतानी विचारलेच,"महाराज टोपीकर तसे आपले शत्रुच आहेत. आपणही त्यांच्यावर नजर ठेवता.मग आयता आलेला हा गोरा का सोडायचा ?"
"पंत ! हे राजकारण आहे.ईथे दुरचा विचार करावा लागतो. साता समुद्रापलीकडून हे टोपीकर व्यापारी म्हणून येतात्,अलगद तागडी बाजूला करुन तलवार हाती घेतात.ईथल्या राजकारणात नाक खुपसतात.हे सगळे आम्हाला दिसते. पण त्याहून जास्त आम्हाला काय सलत असेल तर तो जंजिरा ! पाण्यात जैसा उंदीर असल्याप्रमाणे जंजिर्‍यात बसलेला सिद्दी. त्याच्या जीवावर तो आमच्या रयतेला उपद्रव देतो, मुलुख उध्वस्त करतो.त्याला मारायचे तर आरमार हवे,दारुगोळा हवा. या टोपीकरांनी मदत केली तर जंजिरा मोहीम अशक्य नाही. दोरोजीने नेमके हेच राजकारण आमच्या पुढे आणले आणि म्हणूनच आम्ही त्याला मंजुरी दिली. पंत काट्याने काटा काढलेला चांगला. अंग्रेजांची मदत घेउन सिद्दी बुडवला तर एक शत्रु कमी होईल आणि रायगडही सुरक्षित होईल. आमची नजर या पुढ्च्या चालीवर आहे. बघुया, टोपीकर कशी मदत करतात ते.नाही तर राजापुर आता आपल्याला फार लांब नाही."
सगळ्यांनीच या मसलतीला माना डोलावल्या आणि सदर पांगली.
राजे गडाच्या गडाच्या फेरीसाठी पुसाटी बुरुजाच्या बाजूला गेले होते. थंड वार्‍याच्या प्रसन्न झुळका मनाला सुखावीत होत्या. बरोबर असलेल्या सोबत्यांशी पुढचे बेत ठरविले जात होते. ईतक्यात हुजर्‍या जवळ आला आणि मुजरा घालून म्हणाला "महाराज, सदरेवर जासूस येउन थांबला आहे. मिरजेकडची खबर आली आहे".
मिरज ! म्हणजे नेतोजी काकांनी किल्ला घेतला कि काय ? सगळेजण लगबगीने सदरेकडे निघाले. नजरबाजाने खलिता पुढे केला, राजे उत्सुकतेने वाचू लागले. खलिता पुर्ण वाचून झाल्यावर त्यांनी बाजुला ठेवला. त्यांची मुद्रा काहिशी चिंताक्रांत दिसत होती.
"मिरज अडून बसले आहे तर ! काका मिरजेच्या कोटाबरोबर भांडत बसलेत्,पण मिरजेचा भुईकोट म्हणजे मातीचा. तोफा डागून उपयोग नाही.भोवती खंदकही आहे. आदिलशाही अंमलदारही हुशार दिसतो.काकांचा वेळ ईथे वाया जाता कामा नये. त्यांना मोठा आदिलशाही मुलुख मारायची आत्ताच नामी संधी आहे.असे एका ठिकाणी नेतोजी काका ठाणबंद होता कामा नयेत. दस्तुरखुद्द आम्ही उद्याच निघतो. काकांना मोकळे करणे गरजेचे आहे. गोदाजी,पंत,हिरोजी फौजेला तयार रहायचा हुकुम द्या.उद्या सुर्य उगवल्यावर आम्ही गडाबाहेर पडणार आहोत".
राजांनी एकाच मुक्कामानंतर मिरज गाठले. ईतक्या तातडीने राजे आलेले बघून नेतोजी घाईघाईने पुढे झाले आणि मुजरा घालून म्हणाले,"महाराज, वार्याच्या वेगाने आलात जणू. या कोटाला वेढा घातला, पण तोफा चालेनात, काही भेद दिसेना आणि किल्लेदार बी चिवट आहे. पण अजून मी हिंमत हरलो नाही.ह्यो चाँदतारा उखडून फेकणारच".
"काका ! तुम्ही पराक्रमाची शर्थ करीत आहात.पण या अश्या एका ठाण्याला वेळ घालवून उपयोगाचे नाही.अद्याप विजापुर दरबारातून काही हालचाल झालेली नाही. वेळ आहे तोपर्यंत त्यांच्या मुलुखात खोल शिरा.मिरजेच्या ठाण्याची आघाडी आम्ही सांभाळतो"
दुसर्या दिवशी सकाळी नेतोजी फौज घेउन आदिलशाही मुलुखात उगवतीकडे निघून गेले. महाराजांनी मिरजेच्या कोटाभोवती तातडीने वेढा आवळला. पण किल्लेदारावर त्याचा काही परिणाम झाला नाही, तो तितक्याच चिवटपणे पुन्हा उभा राहिला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
माघाची कडाक्याची थंडी पडली होती. विजापुरावर रात्र पसरली होती. बहुतेक घरातील दिवे, महालातील हंडयातील दिवे विझले होते. नाही म्हणायला रस्त्यावरच्या मशाली अजून जळत होत्या. शहराच्या तटबंदीवर मात्र पहारेकर्यांची गजबज जाणवत होती. फांजीवर फिरता फिरता त्यांचे "होशिय्यार"च्या आरोळ्या सुरु होत्या. सगळे शहर निद्रेच्या अधीन झाले तरी राजवाड्यातील एका दालनात अजून जाग दिसत होती. बडी बेगम अवस्थपणे आपल्या पलंगावर कुस बदलत होती. 'सिवाचे काय करायचे?' हाच तीच्या अस्वस्थपणाचे कारण होते. गेले दहा वर्ष विजापुर दरबाराने सैन्य,सरदार त्या शहाजीच्या बेट्यावर पाठवायचे आणि फौज मार खाउन परत यायची हा शिरस्ताच झाला होता. शहाजीला कैद करुन पाहीले, नतीजा! त्याला सोडावे लागले. फत्तेखान्,फाझलखान्,रुस्तमेजमा हि किमान जिंदा परत आले तरी, मुसेखान आणि अफझलसारख्या बड्या सरदाराला त्या मावळाच्या मुलुखाने गिळून टाकले. गेले दहा वर्ष मुहमदशहा आजारी, त्यात दरबारात दख्खनी विरुध्द पठाण अशी सरदारात दुफळी. तरी आपण हि आदिलशाही धुरा सांभाळली.चार साल मागे मुहमद बादशहा अल्लाला प्यारे झाले आणि अलिवरुन दरबारात फिर एक बार नाराजी झाली, पण कशीबशी ती मिटवली, पण त्या सिवाची बंडखोरी अशीच चालु राहिली, तर मुष्कील आहे.नेतोजी आपल्या मुलुखात धुमाकुळ घालतो आहे,त्याला रोखायला सरदार नाही. काय करावे ?
अखेरीस पलंगावरुन उठून बडी बेगम येरझार्या घालू लागली. तीचे विचारचक्र सुरुच होते,'आता दरबारातील कोणा सरदाराला सिवावर पाठवण्यात अर्थ नाही. एकतर सगळेच मनातून घाबरलेत. डरा हुआ सिपाही पहलेही हारा होता है. आता अशी सोंगटी हलवायला पाहीजे, जी या सगळ्या पटापासून लांब असेल.'
अचानक तीला पाच दिवसापुर्वी आलेल्या खलित्याची आठवण झाली. कर्नुल जहागिरीतून पत्र आले, म्हणल्यावर तीच्या कपाळावर आठी उमटली. कर्नुल म्हणजे तो बगावतखोर सिद्दी जोहर ! खलिता उघडून तीने जेमतेम नजर फिरवली. काही वेगळे नव्हते, मुआफीनामा होता. आधीही तीन-चार वेळा मसुदने असाच मुआफीनामा पाठवला होता.तीने खलिता कारकुनाच्या हवाली केला आणि बस्त्यात गुंडाळून ठेवायला सांगितला.
एकदम बडी बेगमला कल्पना सुचली,' हा जोहर त्या मराठी मुलुखावर कधी गेला नाही.लांब तिकडे कर्नुलला कुतुबशाही मुलुखावर राहीला, त्यालाच पाठविले तर ?' पेच थोडा तरी सुटल्याचे समाधान बेगमेच्या चेहर्यावर दिसु लागले. पण एवढ्याने तो सिवा संपणार नव्हता. यापुर्वी महमंद बादशहा आणि शहाजहान यांनी शहाजीच्या खिलाफ वापरलेली युगत वापरायला हवी. औरंगजेबाला खलिता पाठवून त्याचा एखादा सरदार सिवाच्या मुलुखावर पाठवायला सांगायचा आणि विजापुर दरबार सिद्दीला पाठवेल. बस्स !'
आता कोठे बेगम शांतपणे पलंगावर आडवी झाली आणि दुसर्या दिवशी हे दोन्ही खलिते रवाना करायचे हे नक्की करुन शांतपणे झोपण्यासाठी तीने डोळे मिटले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किल्ले कर्नुल ! आपल्या दालनात जोहर अस्वस्थपणे बसला होता. तो कोणाची तरी वाट बघत होता.इतक्यात पहारेकर्‍याने वर्दी दिली, "मसउद बाहेर आला आहे".त्याला ताबडतोब आत पाठवण्याची आज्ञा जोहरने केली. अदबीने मसुद आत आला, मुजरा करुन अदबीने समोर बसला. "अब्बाजान ! आप काफी फिकरमंद लग रहे हो ! क्या बात है ?"
"काय सांगु बेटा, विजापुर दरबार आमच्यावर सक्त खफा आहे, तीन मुआफीनामे आम्ही पाठवले, पण एकाचाही जवाब नाही. काय करावे समजत नाही?"
"पण अशी काय गलती झाली तुमच्याकडून ?" मसुदने विचारले.
"काय सांगणार बेटा ? तसे आपण सिद्दी या मुलुखाला परायेच ! आपल्या पुरखांचा देश अफ्रीकेतील हबसान. अरब व्यापार्‍यांना हिंदुस्थानात येताना गलबतावर स्वस्तात गुलाम लागायचे. हबसानातील आपले सिद्दी लोक स्वस्तात विकत घ्यायचे आणि त्यांना बरोबर घेउन या हिंदुस्थानात यायचे हा अरबांचा शिरस्ता. आज आपले जातभाई मराठ्यांच्या देशापासून , कर्नाटक, केरळ सगळीकडे गेले. मलिक अंबर्,जंजिर्‍याचा सिद्दी हे आपले लोग तर अधिकारी झाले.मी ईथे मलिक रेहमानचा चाकर म्हणून लागलो. मालकासाठी रात दिन देखी नही.बस मालिक हुकुम करणार, हा चाकर ती पाळणार.पण मलिक गेला आणि त्याचा बेटा निकम्मा असून हुकुम चालवायला लागला, त्याला बाजुला करुन मी या कर्नुलची जहागिरी घेतली, म्हणून सल्तनते आदिलशाही मुझपे खफा है". जोहरने त्याच्या मनाची व्यथा सांगितली.
"मसुद या आधी मी दरबारात तीन वेळा माफीनामा सादर केला,पण दरबाराकडून काहीच जवाब येत नाही".खुप वेळ जोहर व मसुद बोलत बसले.
एक आठवड्यानंतर जोहर रपेटीला बाहेर पडला, तोच हुजर्‍या धावतधावत आला आणि घाईत म्हणाला,"हुजुर जल्दी चलिये, बिजापुरसे कोई संदेशा आया है".
बिजापुर !!! तातडीने घोड्यावरुन उतरुन जोहर सदरेवर आला. सदरेवर विजापुर दरबाराचा खिदमदगार काशी तिमाजी वाटच बघत होता.जोहर आल्यावर त्याने खलिता पुढे केला आणि म्हणाला, "सरदार ! विजापुर दरबार आणि माबदौलतने आपल्याला याद फर्मावली आहे.आपको यहांसे लेके जाने के लिये मै आया हुं"
"खानसाहेब हा खलिता घ्या आणि वाचा" तिमाजीने खलिता पुढे केला आणि जोहर तो उघडून घाईने वाचू लागला, "आमच्या निसबतीस असे दुसरे पुष्कळ लोक आहेत की, जे आजच्यासारखे (शिवाजीला नेस्तनाबूत करण्याचे) काम करण्याची इच्छा करीत आहेत. एवढेच नाही, तर ते करुनही दाखवतील, पण तुम्ही स्वतः होऊन या चाकरीसाठी अर्ज केलात, म्हणून तुम्हास हुकूम करण्यात येत आहे की, हे काम तुम्ही करुन दाखवावे आणि बादशाही मेहरबानीस उमेदवार व्हावे".
विजापुर दरबाराला शेवटी आपली आठवण झाली तर ! आनंदाने तिमाजीचे हात हातात घेउन जोहर म्हणाला,"शुक्रीया काशिजी ! आपने मेरे इस अंधेरेभरे जीवन मे आशा का नया दीया जलाया. मै हमेशा आपका मेहेरबान रहुंगा. आप थोडा आराम फर्माईये. मै बिजापुर जाने कि तयारी करता हुं. हम कल सुबह ही रवाना होंगे"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
विजापुर दरबाराचे नेहमीचे कामकाज चालु होते, इतक्यात दरबाराच्या हुजर्‍याने वर्दी दिली, कर्नुलचे सुभेदार जोहर आणि काशि तिमाजी पधार रहे है. बडी बेगमेच्या चेहर्‍यावर स्मित उमटले,मात्र चिकाच्या पडद्याआड असूनही तीने लगेच भाव बदलले आणि जोहर आल्याची दाद न घेता, तीने अलिला दरबाराचे पुढचे काम सुरु ठेवायची आज्ञा दिली. जोहर आणि तिमाजी आदबीने आले, मुजरा करुन एका बाजुला उभे राहिले.बराच वेळ दरबाराने त्या दोघांची दखल न घेता काम चालु राहिले. शेवटी एकदाचे जोहरला पुढे बोलवण्यात आले आणि बेगम कणीदार आवाजात म्हणाली, "जोहर, वैसे तुम्हारी बगावतखोरी के वजहसे माबदौलत तुम पे खफा है, लेकीन तुमने सच्चे दिलसे इस दरबार को माफीनामा पेश किया ऐसा मान कर हम तुम को मुआफी बक्षते है. लेकीन तुला इनामदारी दाखवावी लागेल.या दरबाराशी तु एकनिष्ठ आहेस हे सिध्द करावे लागेल".
बडी बेगमचे हे बोल एकून जोहरला दिलासा मिळाला.निदान या दरबाराने आपल्याला स्विकारले तरी ! आता जी काही कामगिरी मिळेल ती जी जान से पार पाडू आणि पुन्हा गेलेली पत मिळवू असा विचार करुन जोहर नम्रपणे म्हणाला,"जी माबदौलत ! जीस मोहिमपे आप हमे तैनात करेंगे हम वहां जाने के लिये तैय्यार है".
त्याचे हे बोल एकून आलि आणि बडी बेगम विलक्षण खुश झाले.मुख्य म्हणजे दरबारातील सरदारांना हायसे वाटले.पुन्हा सिवावर जायचे या कल्पनेनेच अनेकांना घाम फुटायचा. हि बला जोहरच्या गळ्यात पडलेली बघुन बहुतेक सरदारांना सुटल्यासारखे वाटले.
बेगमने त्याला कामगिरी सोपवली, "जोहर, शहाजीका बेटा सिवा मावल परगणे मे बगावत फर्मा रहा है. तसे तर या दरबारात त्याला मारायला बर्‍याच सरदारांचे हात शिवशिवत आहेत.पण तुझा अर्ज आला आहे, म्हणून हा मोका आम्ही तुला देत आहोत.इस दरबार को यकीन है, तु तुझा पराक्रम दाखवशील. तुला किती फौज्,घोडे,हाती पाहिजेत ते वजीराला सांग.पातशाही खजान्यातून तुला हवी तितकी रकम मिळेल.लेकीन हमे फतेह चाहीये. सिवा को पुरी तरह बरबाद करना है. तुम इस मोहिम के लिये तय्यार होकर माबदौलत कि हुकुम को सर आँखोपर रखा.इस लिये ये दरबार तुम्हे "सलाबतखान" ( म्हणजे कबुलीचा अधिपती ) इस खिताबसे नवाजता है और काशि तिमाजी को "दियानतराव" ये खिताब देता है"
"वाह्हवा !!" दरबारातून एकच आवाज उमटला.
जोहरला हि अंगात बारा हत्तीचे बळ संचारल्यासारखे वाटले. ईतक्यात सरदाराच्या गर्दीतून फाझलखान आणि रुस्तमेजमा पुढे आले, मुजरे घालून म्हणाले,"जर हुजुरांची परवानगी असेल तर या मोहीमेत जोहरबरोबर हमे भी शामील होनेकी ख्वाईश है"
बेगमेला काहीसे आश्चर्य वाटले. दोनदा शिकस्त खाउन आलेला फाझल पुन्हा सिवावर जाउ इच्छीतो. त्याच्या जिद्दीचे तीला आणि अलिला कौतुक वाटल्याशिवाय रहावले नाही. दोघांना या मोहिमेत सामील होण्याची परवानगी मिळाली. या एकुण नव्या मोहीमेने वारंवार मार खाल्लेल्या विजापुर दरबाराला नवसंजीवनी मिळाली.एक चैतन्य सगळीकडे पसरले. घोड्यांना खरारा सुरु झाला, नवे नाल ठोकले जाउ लागले, हत्तीना रपेट सुरु झाली.धान्य भरुन बैलगाड्या विजापुरच्या वेशीबाहेर उभ्या ठाकत होत्या, गवत भरुन छ्कडे माळावर पसरले होते,तोफांच्या गाड्यांना तेलपाणी सुरु झाले. मोहीमेची तयारी झाल्यानंतर एके दिवशी १५ ते २० हजार घोडेस्वार, ३० ते ४० हजार पायदळ आणि सोबत सरदार होते रुस्तमजमान, फाझलखान, सादतखान, बाजीराव घोरपडे, पिउ नाईक, भाईखान, सिद्दी मसुद आणि अर्थात सलाबतखान सिद्दी जोहर. एके दिवशी मावळतीच्या वेशीतून हा सेनासागर बाहेर पडून निघाला. कोठे ? काफीर सिवा भोसल्याचा नायनाट करायला.
राजे इकडे मिरज उर्फ मुर्तिजाबाद किल्ल्याशी अजून झुंजतच होते. आत्तापर्यंत बहुतेक आदिलशाही ठाणी मराठी फौजेसमोर लोळागोळा होत असताना, हे एकच ठाणे झुकायला तयार नव्हते. वेढा चालु असताना खबरा येत होत्या, नेतोजींनी घातलेला आदिलशाही मुलुखातला धुमाकुळ समजत होता. एके दिवशी मात्र काळजीत पाडणारी खबर आली. विजापुरातून सिद्दी जोहर नावाचा सरदार भलीमोठी फौज घेउन मिरजेच्या रोखाने निघाला होता. आता वेढा चालविण्यात अर्थ नव्हता. उघड्या माळावर मोठ्या फौजेशी मुकाबला शक्यच नव्हता.
"राजे आता आपल्याला हालचाल करायला पाहीजे.पुन्हा प्रतापगड गाठायचा का? ईतक्या मोठी फौजेला मार द्यायचा म्हणजे तशीच अडचणीची जागा पाहीजे." खलबतासाठी बोलावलेल्या बैठकीत सुर उमटला.
"हुं! प्रतापगड सुरक्षित जागा खरी, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा कोल्हापुर ते वाई सगळा मुलुख नव्याने आमच्या स्वराज्यात सामील झाला आहे. आम्ही प्रतापगडी गेलो तर जोहर आमच्या मागोमाग येणार आणि हा सगळा मुलुख उजाड करत जाणार. हि आता आमची रयत आहे, त्यांना तोशिष न लागू देणे आमची जबाबदारी आहे. अफझलच्या स्वारीच्या वेळी तर आमच्या देवदेवतांनाही उपद्रव झाला होता.स्वराज्य हे यासाठी आहे का? तेव्हा आपल्या मुलुखात शत्रुला खोल घुसायची संधी न देता, त्याला सीमेवरच रोखूया. स्वराज्यात नव्याने सामील झालेला पन्हाळा मोठा बळकट दुर्ग आहे. धान्य, दारुगोळा पुरेसा आहे.तेव्हा पन्हाळगडी बैसून सिद्दीशी मुकाबला करावा हे उत्तम ! शिवाय नेतोजी काका विजापुर मुलुखात आहेतच.गरज पडल्यास ते विजापुरवर गेले तर सिद्दीवर दाब आणता येईल."
सगळ्यांनाच हि मसलत पटली.एके दिवशी राजे सर्व सैन्य गोळा करुन मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्याच्या दिशेने निघून गेले. बडे बडे सरदार ज्याचे नाव एकले तरी कापतात, त्या सिवाची आपण डाळ शिजू दिली नाही म्हणून किल्लेदार बुरुजावर उभा राहून पाठमोर्‍या फौजेकडे पाहून छद्मी हसत होता.
(क्रमशः)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम लिहलंय. जस जस वाचतोय तशी उत्सुकता वाढत आहे. महाराजां विषयी कितीही वाचन केलं तरी कमीच वाटतं. राजांची प्रत्येक मोहीमे बद्दल अस वाचायला मिळत असेल तर खुप आनंद होईल.