इतना तो याद है मुझे।

Submitted by मधुमंजिरी on 17 July, 2020 - 14:43

*इतना तो याद है मुझे* ---

आठवणी या तशा खोडकर असतात - गर्दीत असताना एकटं पाडतात आणि एकटे असताना गर्दी करतात !!
बरोबर ना?
आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, एकच ठिकाण, एकच समूह, एकच वेळ तरीही प्रत्येकाची आठवण निराळी असते!
बरोबर की नाही?
अगदी शाळा बघा! शाळा एकच, वर्ग तोच, मैत्रिणी त्याच, शिक्षक तेच। पण तरीही प्रत्येकीची आठवण निराळी, कारण ती व्यक्तिगत असते, बरोबर ना?
म्हणजे जिथे मी असते ती आठवण असते माझ्या साठी!
माझं अक्षर खूप छान होतं, त्यामुळे शाळेत असताना मी शाळेतले सर्व फळे, ज्यावर सुविचार, सूचना, स्वागत आणि अभिनंदन लिहितात ते सर्व! ( त्यामुळे मला वाटायचं तेव्हा की मी बहुधा साईन बोर्ड पेंटिंग ची कामं करणार)! किंवा मी दहावी पर्यंत वर्ग सेक्रेटरी होते, त्यामुळे माझ्या सर्व आठवणी या वेगळ्या आहेत, शाळेत असताना इतर कोणत्याही, म्हणजे स्पर्धा असेल तर हस्ताक्षर स्पर्धा नक्की, पण इतर स्पर्धा क्वचितच, जशा की वक्तृत्व स्पर्धा इ. हं, एकदा सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत भाग घेतला होता, पण इतर स्पर्धा, गायन नृत्य नाट्य किंवा काव्य, कशातही सहभागी होता आले नाही. काही विद्यार्थिनी असतात अशा ज्यांना सगळ्यातच गती असते - म्हणजे नाच पण येतो, गाणं - हो आवाज पण छान, पाठांतर उत्तम, दिसायला सुंदर, त्यामुळे त्यांनाच सर्व ठिकाणी भाग घेता येतो, बाकी सर्व दुय्यम होतात, म्हणजे हुशार वर्गात असूनही बाकी सर्व कमी हुशार असतात. सगळीकडे असेच असेल, नाही का?
तर आठवण ही अतिशय वैयक्तिक असते, म्हणूनच अनमोल असते!!
शाळा, तसेच कॉलेज, नोकरीचे ठिकाण, अगदी मैत्रिणींचा ग्रुप, पण प्रत्येकी बरोबर आठवण निराळी, युनिक!! मग अगदी भांडण का असेना!! फक्त जर आठवणी दोघांच्या एकत्र असतील तरच एकसारख्या असतील, पण कंगोरे वेगळेच राहतील!!
मला ती गोष्ट आठवते, हत्ती आणि चार आंधळे।
एकाला हत्ती सुपासारखा , एकाला खांबासारखा, एकाला सुतळीसारखा तर एकाला भिंती सारखा वाटतो, हत्ती एकच पण प्रत्येकाला वेगळा भासतो, तसंच काहीसं!
पण बऱ्याचदा वाईट किंवा दु:खद आठवणी अगदी कोरल्या जातात मनावर आणि मग पुन:पुन्हा कड येत राहतात आतून आतून ; राग ओसरतच नाही एखाद्या व्यक्ती वरचा, दरवेळी त्याच तीव्रतेने त्या आठवणी उसळी मारून वर येतात आणि संथ पाणी अगदी डुचमळून सोडतात..
आणि सुखद आठवण मात्र जपलेली असते, अगदी मोत्यासारखी, मखमली पेटीत, क्वचितच उघडायची आणि हळूच बघायची, धक्का लागू नये, नजर लागू नये म्हणून लगेच बंद करून ठेवायची।
पण मग तरीही, कधीतरी टिचकी बसते आणि मधमाशांच्या पोळ्या सारख्या या आठवणी मनाच्या आकाशात विखुरतात , आणि मग सावरता सावरत नाहीत, आवरता आवरत नाहीत.
म्हणून तर म्हणतात ना, की आठवणी या येताना मुंगीच्या पावलांनी येतात आणि जाताना हत्तीच्या पावलांचे ठसे सोडतात.....
त्यापेक्षा कधीकधी मला विस्मरण परवडतं, विनाकारण आठवपक्षी घिरट्या घालत नाहीत आणि त्रास देत नाहीत. हो, मला नाही आठवत सगळं अगदी संदर्भ आणि बारकाव्याने, एका मोठ्या अपघातात माझ्या मेमरी वेनला क्रॅक आहेत, तेव्हापासून ( अर्थात हे आठवत, अपघात आठवतो, पण अनेक गोष्टी अगदी माझ्या बाबतीतल्या देखील नाही आठवत!)
कारण,
विस्मरणाचे वरदान मला, जेव्हा अशक्य आहे क्षमा,
स्मृतीचे तुला वरदान दिले, अन् सहजी माफीनामा।

© सौ मंजुषा थावरे (१७.७.२०२०)

Group content visibility: 
Use group defaults