प्रवासातल्या सहवासाने मोहरले मी

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 July, 2020 - 01:01

प्रलोभनांचे निबीड जंगल... गांगरले मी
वाट मिळाली कवितेची अन सावरले मी

ह्या थेंबांचा जीव गुंतला बटेत माझ्या
म्हणून गालावरती रेशीम विखुरले मी

निरिच्छतेला नवे धुमारे फुटण्यासाठी
कल्पकतेच्या फांद्या छाटत वावरले मी

नकार देण्याइतकासुद्धा अवधी नव्हता
हुकमी होता कटाक्ष त्याचा, बावरले मी

भुयार सरता सरेचना मुस्कटदाबीचे
स्वातंत्र्याची मशाल घेउन भिर-भिरले मी

ऱस्त्यावरच्या रहदारीने व्याकुळला तो
प्रवासातल्या सहवासाने मोहरले मी

दार असावे सदैव उघडे माझ्यासाठी
अश्या मनाच्या प्रतिक्षेत युग-युग झुरले मी

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users