अरे संसार संसार
माझ्या शाळेत, शाळा सुरु होताना अन मधली सुट्टी संपता संपता रेकॉर्ड लागत असे. मराठी भावगीतं, अभंग, नाट्य संगीत, पोवाडे, वसंत देसाईंनी स्वरबद्ध केलेल्या कविता, गीत रामायणातील गाणी असं काही बाही. शाळेच्या जवळ पोचता पोचता जर गाणं ऐकू आलं तर पाय आपसूकच भरभर उचलले जायचे. मधल्या सुट्टीत अंगणात खेळणार्या मुलांना अन घोळक्याने उभ्या राहून कुजबुजणार्या मुलींना ती रेकॉर्ड लागली म्हणजे ' आता आवरायला हवं' हे न सांगता कळत असे. अनेक मराठी गाणी शाळेत इतक्यांदा ऐकली की ती कशी तोंडपाठ झाली ते कळलंही नाही.
बहिणाबाईंचं 'अरे संसार संसार' हे पण असंच शाळेत ऐकलेलं गाणं. पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा अर्थ नक्कीच कळला नसणार पण त्यातले शब्द, 'आधी हाताले चटके तेंव्हा मिळते भाकर' सारखं सोपं उदाहरण फार आवडलं होतं. आई वडिलांच्या प्रत्येक सूचनेला 'पण का?' ने उत्तर देण्याच्या काळात 'राउळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये' अशा अगदी साध्या शब्दात जो आशय दडलाय तो पण भावला होता. नंतर टिव्हीवर कार्यक्रमातून, इतर पुस्तकांमधून, मासिका-वर्तमान पत्रातल्या लेखांमधून बहिणाबाईंच्या कवितांची थोडी थोडी ओळख झाली. पण त्यांच्या सर्व कविता कधी वाचल्या गेल्या नाहीत.
अरे खोप्यामधी खोपा सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं खोपा झाडाले टांगला हे गाणं सुद्धा अनेकदा ऐकलंय, वाचलंय. तीनेक वर्षापूर्वी नव्या घरात आल्यावर मुलीच्या खोलीत सामान लावत होते तेंव्हा अचानक हे गाणं लागलं अन हात जागच्या जागी थांबले. नकळत भरुन आलेले डोळे पाहून नवरा काळजीत पडला. घराचं क्लोझिंग, सामान हलवण्याचा ताण, पहिलं घर सोडल्याची हूरहूर अशी कारणं मी त्याला सांगितली खरी . पण
'तिची उलुशीच चोच,
तेच दात तेच ओठ
तुला दिले रे देवाने
दोन हात दहा बोटं? '
ऐकल्यावर काय काय सगळं मनात आलं ते त्याला कसं कळणार. बहिणाबाईंनीच म्हटलंय
सुगरीन सुगरीन
अशी माझी रे चतुर
तिचे जल्माचा सांगाती
मिये ( मिळे ) गन्या गंप्या नर.
बहिणाबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या काही कविता अगदी भीत भीत आचार्य अत्र्यांना दाखवल्या. अत्र्यांनी ही सोन्याची खाण लगेच ओळखली व त्यांच्या पुढाकाराने सोपानदेवांच्या संग्रही असलेल्या थोड्या थोडक्या कवितांचं पुस्तक १९५२ साली प्रकाशित झालं. त्या पहिल्या आवृत्तीला अत्र्यांची प्रस्तावना आहे. नंतरच्या अनेक आवृत्त्यांना देखील इंदिरा संत, प्रभा गणोरकर, अशांची प्रस्तावना आहे. बोरकरांनी त्यांच्यावर
माझे आई बहिणाबाई तुझ्यामुखीं देव बोले
बोल तुझे गाता गाता माझे पाझरती डोळे
अशी कविताच लिहिली आहे.
गेल्या शतकाच्या सुरवातीच्या काळातील खानदेशातल्या शेतकरी घरातली बाई. रूढार्थाने शिक्षण, लेखन वाचन नाही. ( व्याकरण, वृत्त, छंद, समीक्षा, अलंकार, सौंदर्यशास्त्र वगैरे दूरच ) पण निरिक्षण किती अफाट ?
बिना कपाशीने उले त्याले बोंड म्हणू नये
हरिनामा इना बोले त्याले तोंड म्हणून नये
कापसाच्या शेतात बिना कपाशीचं बोंड सापडणारच. पण ते काही नॉर्मल नव्हे. किडकं, काही कारणाने न फळलेलं बोंड असणार. नामस्मरण न करणारं तोंड हे देखील तितकंच विचित्र, दुर्दैवी, अॅबनॉर्मल .
देखा संसार संसार
शेंग वरतून काटे
अरे वरतून काटे
मधे चिकने सागरगोटे .
कितीतरी जणांनी सागरगोट्यांचं काटेरी झुडूप अन टोकेरी, टणक काटे असलेल्या शेंगा पाहिल्या असतील . अनेकांचा संसार सुद्धा असाच वरतून काटे अन आत गुळगुळीत सागरगोट्यांसारखा असतोच. पण हे किती चपखल शब्दात त्यांनी मांडलंय.
माहेरचं, माहेरच्या वाटेचं वर्णन करणार्या ओव्या आहेत. त्यात अगदी कवि कालिदासाच्या यक्षाने अलकापुरीची वाट सांगितली नसेल तितक्या तपशीलाने अन अभिमानाने माहेरचं कौतुक सांगितलंय.
माहेरची श्रीमंती कशी, तर तिथे दुध दुभतं भरपूर, जमीन सुपीक, पाणी मुबलक, पक्षी सुद्धा पोटभर दाणा खाऊन जातील एवढी पिकं.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर
मनुष्य स्वभावाची कशी खरी ओळख सांगितलीय. मुलं लहान असताना वैधव्य आलं. शेतीसाठी घेतलेलं कर्ज सावकार पिढ्यानुपिढ्या वसूल करत असणार. शिक्षण नाही , व्याजाच्या हिशेबाचा अंदाज नाही. पारतंत्र्याचा काळ, तशात प्लेगची साथ. किती कडु अनुभव आले असतील. पण कोणा एकाला नाव न ठेवता नीच वृत्ती कशी असू शकते ते सहज सांगितलंय.
इथे मायबोलीवर कविता,कवितांचं रसग्रहण, समिक्षा, प्रतिक्रिया यावरुन अलिकडे फारच रणकंदन होतंय. कविता लिहायला प्री रेक्विझिट काय, चांगल्या कवितांचे निकष काय , कविता कळलीच पाहिजे का अशा अनेक गोष्टींची चर्चा प्रतिक्रियांमधे, एकमेकांच्या विचारपुशी मधे, क्वचित काही वाहत्या बीबी वर पण चालत असते. बरेचदा मला असं वाटत असे की मराठी कवितांची शंभर एक निवडक पुस्तकं वाचून त्यावर एक परिक्षा उत्तीर्ण झाल्या खेरीज कोणालाही इथे कविता लिहायला परवानगी मिळू नये. अशा शंभर पुस्तकांमधे बहिणाबाईंच्या कवितांचं पुस्तक नक्की पहिल्या दहात असेल माझ्या मते. पण जर असा नियम असताच तर बहिणाबाईंच्या कविता काही इथे टाकता आल्या नसत्या.
आपलं नशीब थोर की आचार्य अत्र्यांनी असला काही तरी सरकारी छापाचा नियम लावला नाही.
शोनू छानच
शोनू छानच लिहिलयस.
(No subject)
चांगल
चांगल लिहलय. शेवटच्या उतार्यावरुन ईथे v&C चालु व्हायची
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला फिरि येते पिकावरं ,
तसं किती ठरवलं तरी मायबोली वर कविता वाचायला परत परत येतच राहायचं
शोनू:
शोनू: आवडलं.
ड. शेख
ड. शेख मुझफ्फर सलीम,
शोनुताई,
मी बहिनबाईन्च्या कविता मराटी न येणार्या लोकाना ही वाचून दाख्विल्या व त्यानी ही
वाह वाह केली आहे, उदा. :
माय म्हण् ता म्हण ता
होट होटाशी हो मिळे
सासू म्ह ण ता म्ह णता
गेला तोन्डा वते वारा.
ह्म्म...
ह्म्म... भरपूर उत्तम असे वाचले, तर जे लिहिले जाईल ते नक्कीच थोडे तरी उत्तम असेल हे मलाही पटते. असे वाचन हे आपल्याला आवश्यक होय. याला अपवाद फक्त बहिणाबाईंसारख्या असामान्य प्रतिभेचा.
अरे हो, बाकी रसग्रहण आवडलं हे सांगायचंच राहिलं की
***
Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin
खुप छान
खुप छान आहे!
छान लिहिलं
छान लिहिलं आहे, शोनू.
सुरेख
सुरेख रसग्रहण !
>>> भरपूर उत्तम असे वाचले, तर जे लिहिले जाईल ते नक्कीच थोडे तरी उत्तम असेल ...
स्लार्टीशी सहमत.
सुरेख.
सुरेख. केवढी philosophy भरलेली आहे त्यांच्या ओव्यांमध्ये. छान लिहिल आहेस.
सुरेख.
सुरेख. आवडलं.
छान! शाळेत
छान! शाळेत असताना दूरदर्शनवर (हो तेन्व्हा तेवढ एकच होतं) एक कार्यक्रम झाला होता. त्यात बहिणाबाईंच्या जीवनावर, कवितांवर बरेच काही सांगीतले होते. पण सगळ्या चर्चांमधून लक्षात राहिली ती फक्त त्यांची वेगवेगळी कडवी.
पुन्हा त्या सगळ्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
छान लिहिलं
छान लिहिलं आहेस.. मला सगळ्यात आवडलेली बहिणाबांईंची ओळ म्हणजे..
एका ओळीत किती किती सांगितलय!
'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते!'
शोनू, मस्त
शोनू, मस्त लिहिलंयस. एकेक ओवी म्हणजे बावन्नकशी सोनं आहे खरंच.
मलाही त्यांची ओळख क्रमिक पुस्तकांतून, मराठी चित्रपटांतून आणि भक्ती बर्वेने काम केलेल्या लघुपटातून झाली तितकीच. (यशवंत देवांना संगीतबद्ध केली होती गाणी मला वाटतं.)
पुस्तक आहे हे माहीत नव्हतं. आता मिळवून वाचायला हवं.
"अरे जगनं
"अरे जगनं मरनं
येका सासाचं अंतर."
ह्या त्यांच्या ओळी माझ्या विशेष आवडीच्या आणि तेव्हापासून मनात ठाण मांडुन बसलेल्या. किती साध्या, दैनंदिन घटना, ऊदाहरणांतून अगदी सहज त्या खूप उदात्त असं काहितरी सांगुन जातात.
शोनू मस्त उतरलय!
मेधा, खूप छान!
मेधा, खूप छान!
छान लिहीता तुम्ही. आता लेख्स
छान लिहीता तुम्ही. आता लेख्स वर येतील तसे वाचायला मिळतील.