Submitted by निशिकांत on 15 July, 2020 - 05:38
आस छोटी, राहण्यासाठी निवारा पाहिजे
लाख आकाशी असूद्या, एक तारा पाहिजे
केवढी स्पर्धा जगी या! जिंकणारा पाहिजे
पंख उडत्या पाखरांचे मोजणारा पाहिजे
गोडवे गाती तयाचे, सर्वसाक्षी तो म्हणे
भक्त एखादा प्रभूला बांधणारा पाहिजे
आजच्या मुमताज म्हणती, मी मरायाच्या अधी
राजबिंडा, ताज मोठा बांधणारा पाहिजे
कैक पदवीधारकांना मी अशिक्षित भेटलो
एक शिक्षित, माणसांना वाचणारा पाहिजे
केवढी जुजबी अपेक्षा! पूर्ण ना झाली तिची
अश्रितांच्या वेदनांना जाणणारा पाहिजे
उच्चभ्रू वस्तीत का संभाषणांची वानवा?
जाहिराती द्या अता की, " बोलणारा पाहिजे "
पिंपळाचे पान जाळीदार होते पुस्तकी
आठवांच्या मृगजळांना प्राशनारा पाहिजे
ऐक तू " निशिकांत " दुसर्यांच्या मतांनाही कधी
का तुला जो तो तुझी री ओढणारा पाहिजे
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!!!! व्वा!!!
व्वा!!!! व्वा!!!
सुंदर
सुंदर