मनाला ह्याहुनी कणखर किती ठेवू ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 July, 2020 - 12:20

तुझा माझ्यातला वावर किती ठेवू ?
तुझ्या माझ्यातले अंतर किती ठेवू ?

प्रकाशाची तिरिपही येत नाही तर
उन्हामध्ये सतत हे घर किती ठेवू ?

मने जिंकायला जातेस अन हरते
तुझ्या हाती दही-साखर किती ठेवू ?

परजली अनुभवांवर खुंटली बुद्धी
कळेना नेमका वापर किती ठेवू ?

मिळाले की निसटते ओंजळीमधुनी
सुखाच्या खालती घागर किती ठेवू ?

खचत नाही तुझ्याही ट्रोल करण्याने
मनाला ह्याहुनी कणखर किती ठेवू ?

किती देतोस रे हुलकावण्या मृत्यो
नकोसा जीव हा वरवर किती ठेवू ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users