लहान मुलांच्या काही सवयीबद्दल माहिती हवी आहे

Submitted by दक्षा on 8 July, 2020 - 05:35

नमस्कार,
माझी 1 मैत्रीण आहे तिचा 7 वर्षाचा मुलगा आहे, हुशार आहे पण खूप चंचल आहे म्हणजे अभ्यास करताना सारखा इथे तिथे बघत राहतो पण अभ्यास करायचा. पण गेले काही दिवस झाले तो काही वेगळाच वागतो आहे म्हणजे जास्तच त्याचे मन अभ्यासातून बाहेर पडले आहे म्हणजे tv बघताना, खेळताना व्यवस्थित असतो पण अभ्यासला बसवले की तो आता करतच नाही जे तो आधी तरी करत होता म्हणजे बुक कडे बघत राहणे, 10 वेला सारखे उठणे त्याची आई तो हे पहिल्यापासून करायचा म्हणून मारत होती पण आता तो जास्त करायला लागला आहे 1 पान करायला तो 1 ते दीड तास लावतो आणि त्याच्या या विचित्र वागण्याने घरचे पण वैतागले आहेत पण त्याच्या आईला भिती आहे की ही काही विचित्र लक्षणे नाहीत ना की फक्त अभ्यास करते वेळीच तो हे सगळे करतो काही कळत नाही आहे, मला कृपया काही उपाय असल्यास सांगावा की त्याला डॉक्टर कडे दाखवले लागेल. त्याची आई आता dipression मध्ये जात चालली आहे.

धन्यवाद,

दक्षा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

७ च वर्षाचा? इथे तर माझी १२ वर्षाची मुलगी आणी १६ वर्षाचा भाचा दोघेही तसलेच आहेत. तुमच्या मैत्रिणीचा मुलगा अजून किती लहान आहे. या वयात असे व्हायचेच. एका जागी तो बसावा म्हणून कोणीतरी मोठ्याने शेजारी थोडा वेळ वाचत बसावे, जसे मुलाची आई किंवा आजी वगैरे. आणी मुले कितीही हुशार असली तरी अभ्यासाचा कंटाळा करतातच. सध्या शाळा सुरु नाहीयेत, पण त्याची शाळा सकाळची असेल तर झोप वगैरे पूर्ण होत नसेल. टीव्ही पहातांना कळत नाही पण अभ्यास करतांना हमखास झोप येते.

ADD ची समस्या दिसतेय. चांगल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अशा मुलांना पालकांनी समजून घ्यायला हवे. समस्येकडे दुर्लक्ष केल्यास शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

मुख्य म्हणजे 'अभ्यास करणे' म्हणजे नक्की काय करणे हे मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना ही कळलेले नसते.
हे वाक्य थोडेसे विचित्र वाटेल पण खूप समजून घेणे गरजेचे आहे.
मुलांना धड्यातले पान , चार सोडवलेली गणितं लिहून काढायला सांगा. ते 'काम' ते पटकन करून टाकतात. भाषेचे दोन धडे बघूनच वहीत लिहायचे. मग तूच पाहा की शब्द, चिन्हं बरोबर लिहिली आहेत का. चुका समजतात. सात दिवसांत तो बिनचूक लिहू लागतो.
नंतर एकेक शब्द वाचून लिहिण्याऐवजी एक वाक्य पूर्ण वाचून ते न बघता लिहिण्याची सवय लावायची.
गणिताचा प्रश्न आणि त्याचे उत्तर असे संपूर्ण लिहायचे. यामुळे काय विचारल्यावर काय करायचे हे डोक्यात जाते.

सर्वात म्हणजे 'अभ्यास' हा शब्दच उच्चारायचा नाही.
यातून मुलांचे लेखन शुद्ध आणि जलद होते, खाडाखोड कमी होते आणि त्यांच्या समजण्याच्या वेगाने समजत जाते.
जेव्हा दोन आठवड्याने तो आपलं लेखन पाहतो तेव्हा त्यालाही जाणवते की हे तर कित्ती सोपं आहे!!

शालेय अभ्यास म्हणजे सत्तर टक्के 'एवढं तुम्हाला करण्याची सवय लावणे' हेच असते. आणि ते एखादा अपवाद सोडल्यास सर्वजण साध्य करू शकतात. ( मी इथे वैद्यकीय मुद्दा घेतलेला नाही कारण तो इथे चर्चा करता येणार नाही.)

बाकी सगळे जण सांगतीलच पण मुलाला मारणं योग्य वाटत नाही. ते ताबडतोब थांबवावे असे वाटते. अभ्यास हा आनंददायी असला पाहिजे. तसा नसेल तर आपली अभ्यास घेण्याची पद्धत बदलून पहा.
बाकी त्याला गप्पांच्या ओघात काही वेगळे झाले आहे का? तुला काय आवडेल असे विचारून पहा. एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या. तुम्हाला शुभेच्छा!

आजच्या सगळ्या पिढिचा हाच प्रकार आहे. हातात असलेले गॅजेट्स या मुळे एकाच जागी बसुन मन लावुन अभ्यास करणे त्यांना जमत नाही. मग तो सात वर्षाचा असो की सोळा....... माझाही मुलगा असेच आहे. पण निदान परिक्षा जवळ आल्यावर थोडसे ओरडले की कसा बसा अर्धा तास बसतो. यात मुलांना मारून अथवा आपण डिप्रेशन मधे जाउन उपयोग नाही. त्यांना कहितरी आमिष दाखवाव लागत. खर तर हे पण चुकिचेच आहे, पण मारणे अथवा ओरडणे ह्या पेक्षा बरे आहे.
अभ्यासाची गोडी लागणे जरुरी असते. पण कधि कधी ते मुलांमधे दिसुन येत नाही. आम्ही मुलाला एवढेच सांगतो की तुला मोठा झाल्यावर जर छान फिरायचे असेल, हॉटेलिंग करायचे असेल, पैसे खर्च करायचे अस्तिल तर ते तुझे तुलाच कमवावे लगतिल, आम्हि देणार नाही . त्या साठी तुला चांगली नोकरी करावी लागेल ती अशीच मिळत नाही त्या साठी अभ्यास करने जरुरी आहे. कुठेतरी हे त्याला पटते आणि लाजेकाजे थोडासा अभ्यास होतो.

दक्षा,
सध्या परीस्थिती अशी आहे की मोठ्यांनाही बर्न आउट जाणवतोय. हा तर छोटा मुलगा आहे. मुलगा हुषार असेल आणि अभ्यासात नुसतेच रट्टे मारणे(पाठ करा, लिहून काढा) असेल तर मन उडू शकते. खरे तर एवढी लहान मुले १०-१५ मिनिटे यापेक्षा जास्त वेळ एका जागी बसून अभ्यास करणे कठीण. त्यामुळे मार देणे तर अजिबातच नको. त्याने समस्या सुटत नाही तर उलट वाढते. अभ्यास घेण्याची पद्धत बदलून बघा. तू एक पॅराग्राफ वाच, मग मी वाचेन असे केल्यास मुलं रमतात. गप्पा मारत हसत खेळत अभ्यास होईल असे बघावे. आई डिप्रेशनमधे चालली आहे असे लिहिलेय तेव्हा समुपदेशकाचा सल्ला घेणे योग्य!

इतक्या लहान मुलाला मारू नका ओ ... प्लिज...
आज मारलेले त्याला उद्या लक्षात पण नसेल.. उगाच कशाला शारीरिक वेदना देताय...
टाईम आऊट देणे हा प्रकार करून पाहिलाय का?? त्याचा फायदा होतो मारण्यापेक्षा...

मी आत्तापर्यंत फार कमी मुलं अशी बघितली आहेत की ज्यांना खरोखरच अभ्यास करायचाच नाहीये. बहुतेक मुलं ही बिचारी शाळेत, घरी ओरडा खावून गोंधळून गेलेली असतात. प्रत्येक मुलाची अभ्यासाची पद्धत, कसे शिकवले की समजते हे वेगवेगळे असते. बरेचदा आधीचेच नीट समजलेले नाही म्हणून आत्ताचेही जमत नाही असेही असते. मुलाला शिकवायची पद्धत बदलून , १५ मिनिटे अभ्यास ५ मिनिटे ठरवून ब्रेक, पुन्हा १५ मिनिटे अभ्यास जोडीला सुधारणा होते तसे कौतुक असे केल्यास बहुतेक मुलं 'मलाही जमते' या आनंदात हळू हळू आपणहून शिकण्यात रस घेवू लागतात. डिस्लेक्सिया, एडीएचडी वगैरे समस्या असलेली मुले देखील योग्य आधार उपलब्ध झाल्यावर आपणहून समस्येवर मात करण्यासाठी कष्ट घेतात.

तुमच्या मैत्रिणीला सांगा की मुलाचा अभ्यास घेण्याचा अट्टाहास सोडून दे. त्याच्या डोक्यात अभ्यासाबद्दल तिडिक निर्माण होइल असे वागणे थांबव. त्याच्या कलाने घे. त्या ऐवजी स्वत: जरा अभ्यास कर मुलांशी कस वागायच ते.

मुलगा चुकत नाहीये, ती चुकत आहे.

सिरियसली.

- थोडेसे मुलाच्या कलाने घेतले तर हळुहळू सगळे सुराला लागते. थोडा संयम बाळगणे याला पर्याय नाही. (ज्याला पर्याय नसतो ते काम सगळ्यात अवघड वाटते तरीही). बाह्य जगाच्या तालावरच मुलाने नाचावे ही अपेक्षा धरण्याऐवजी मुलाच्या आतल्या तालाशी बाह्य ताल जुळवण्यासाठी काय करावे याचा विचार फायद्याचा ठरतो.
- हे घे दप्तर आणि कर अभ्यास असे दामटवण्याऐवजी, चल, आपण आज काय काय नवीन शिकवलेय ते बघू या. अशी सुरुवात केली तर मुलाला नक्कीच हुरुप येतो. नाहीतर एकीकडे शाळेने, दुसरीकडे पालकांनी आणि/किंवा शिकवणीत, अशी कोंडी झाल्यावर त्याने काय करावे? आपण अशा कोंडीत कसे वागू?
- अभ्यास म्हणजे केवळ गणिते, पाठांतर नसून, गाणी म्हणणे, चित्रे काढणे, कोडी सोडवणे, नाच करणे, भेंड्या खेळणे (गावांच्या, नावांच्या, झाडांच्या, फळांच्या इ. भेंड्या), नकाशावरील ठिकाणे शोधणे, कविता वाचन (एक कडवे तू वाचायचे एक कडवे मी) याचाही *अभ्यासाच्या वेळातच* समावेश करावा.
- किमान मुलात पुन्हा आत्मविश्वास बळ धरेपर्यंत मार्कांची मोजपट्टी बाजूला ठेवावी.

आज शिकवलेली संकल्पना मुलाने आजच्या आज झोपायला जायच्या आधी पचवली नाही तर ते जगाच्या फार फार मागे राहील; जग कुठल्या कुठे निघून गेलेले असेल. मग आपल्या मुलाचे काय होईल? अश्या प्रचंड असुरक्षिततेचे ओझे पालकांनी आपल्या मानेवरून उतरवून खाली ठेवावे. आपले मूल हे फॅक्टरीत बनणार्‍या चॉकलेटच्या एकसुरी बॅचेस् मधले एखादे चॉकलेट नाही जे आपल्या बॅचबरोबर राहिले तरच त्याला फॅकटरीतल्या प्रत्येक स्टेपची टिकली लागेल आणि शेवटी 'टेस्टेड ओके'चा शिक्का बसेल, असा दृष्टीकोन ठेवल्यास अकारण ताण येत नाही.

दुर्दैवाने पालकच नाही तर काही शाळांचेही धोरण मुलांसाठी जाचक असते. मुलांवर किती दबाव टाकावा याला त्या धोरणात अजिबात थारा नसतो. शिकवणी असेल तर तिथे शिकवणारे कसे आहेत हेही पालकांनी त्यांच्याशी नियमित संवाद साधून जाणून घेतले पाहिजे.

अर्थात अशाही शाळा आहेत की ज्या मुलांच्या वयाचा, कुवतीचा, भावविश्वाचा विचार करून जाणीवपूर्वक अभ्यासक्रमाची आखणी करून तो राबवतात. गरज भासली तर शाळेतर्फेच मुलाचे समुपदेशन करतात. इतकेच नाही तर आपले समुपदेशन होतेय म्हणजे आपल्यात काहीतरी बिनसले आहे असा एकाकी विचार मुलाच्या मनात येऊ नये इथपर्यंत अशा शाळा विचार करतात.

मान्य आहे, की जर मुलाने लसावि कसा काढायचा, हेच शिकले नाही तर त्याच्या पुढची पायरी (उदा. अपूर्णांकांची तुलना) ते कशी चढणार? पण त्याने लसावि शिकावे यासाठी त्याच्यावर प्रचंड ताण देऊन कसेतरी ती संकल्पना त्याच्या गळी उतरल्याने खचितच त्याला पुढची पायरी चढणे सोपे होत नाही. आवडत नाही. याचा परिणाम एवढाच होतो की पहिल्या पायरीवर जेवढा ताण दिला त्याच्या दुप्पट ताण पुढच्या पायरीसाठी त्याला सहन करावा लागतो. यात मुल आणि पालक दोघांनाही आपापल्या पातळीवर तीव्र ताणाला सामोरे जावे लागते. दोघे एकमेकांना शत्रू वाटायला लागतात. एकमेकांबद्दल द्वेष, तिटकारा वाटू लागतो. जेवढा वरून दाब दिला जातो तितका मनातला ताण हाताबाहेर जाऊ लागतो.