विकतोय देव माझा

Submitted by निशिकांत on 7 July, 2020 - 23:09

का निर्मिले जगाला ? पुसतोय देव माझा
बाजार खास इथला विकतोय देव माझा

निर्माण माणसाला केले किती खुशीने !
देवास विसरला तो, झुरतोय देव माझा

नाठाळ राज्यकर्ते बेबंद राज्य करिती
वाटे कधी मनाला निजतोय देव माझा

गीते मधून ज्याने उपदेश काल केला
कंसा कडून इथल्या शिकतोय देव माझा

पापे अधर्म दिसता घेईन जन्म जगती
नुसतेच का असे हा म्हणतोय देव माझा ?

देवी रुपात केली स्त्री निर्मिती तयाने
पाहून हाल स्त्रीचे रडतोय देव माझा

जन्मा अधीच मृत्यू आम्ही दिल्या भृणांचा
आक्रोश ऐकण्याला नसतोय देव माझा

गाळून घाम कसता काळी जमीन, पदरी
नैराश्य, आत्महत्त्या खसतोय देव माझा

अंधार राज्य करतो हरवून सूर्य गेला
डोळ्यास हात लावुन बसतोय देव माझा

"निशिकांत" श्वापदांच्या गर्दीत एक दिसता
माणूस, त्यास मुजरा करतोय देव माझा

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अंधार राज्य करतो हरवून सूर्य गेला
डोळ्यास हात लावुन बसतोय देव माझा"

शब्द तोकडे कौतूकास.

--/\‌‌-- (हात जोडलेत. लॅपटॉप वरून सिंबॉल्स आणि इमोजिस टाकता येत नाहीते ' Happy ' आणि ' Sad ' सोडलं तर!! )