व्हायचे आता कधी नॉर्मल दिवस?

Submitted by Prashant Pore on 6 July, 2020 - 02:52

व्हायचे आता कधी नॉर्मल दिवस?
चालले आहेत सगळे डल दिवस!

एकटा येतो नि जातो एकटा,
जन्मभर राहील का 'सिंगल' दिवस?

आपल्या तंद्रीत असतो नेहमी,
बावळट हा, मूर्ख, बेअक्कल दिवस!

बंक, कॉफी, पाखरू, कट्टा, नशा
यार ते होते किती चंचल दिवस!

आपल्यामधली कटूता संपवू,
आणि घालूया तिचे ये चल दिवस

रोज प्रत्येकास दिसतो वेगळा
रोज फसवत राहतो रास्कल दिवस

त्याच त्या कामास सगळे त्रासले
वाटतो आहे अता निष्फल दिवस

भूक, तृष्णा, द्वेष, चिंता, वासना
दावतो नशिबातली दलदल दिवस

खायला उठते अताशा शांतता,
विसरला की काय कोलाहल दिवस

रोजची घेतो परीक्षा वेगळी
देतही नाही करुन नक्कल दिवस

प्रेम कर, घे काळजी, नात्यास जप
धीर धर, होतील हे नॉर्मल दिवस

प्रशांत पोरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users