शुध्द आलेल्या क्षणी बेधुंद केले

Submitted by सुप्रिया जाधव. on 5 July, 2020 - 03:19

मान्य की नुकसान अंदाधुंद केले
जाणिवांना जखडल्या बेबंद केले

सागराने, डोंगराने, पावसाने
सांग ना कोणी हवेला धुंद केले ?

राजरस्ता बनवला नाही परंतू
पायवाटेला जरासे रुंद केले

दाटले डोळ्यांत माझ्या मेघ त्याचे
निवळले वातावरणही कुंद केले

पाजली भलत्याचवेळेला धुक्याने
शुध्द आलेल्या क्षणी बेधुंद केले

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users