( परवा आषाढीला कवितांची/अभंगाची रेलेचेल होती. मुद्दाम मी उशीर करून आज भारुड पोस्ट करतोय.)
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा
उचकी लागली गं मजला त्याची
जाते मी माहेरा ||धृ ||
लगीन जरी का झालय त्याचं
मला कई हरकत न्हाई
नव-यासाठी जुन्या प्रेमाला
जरूर कई फारकत न्हाई
सटवी खेटुन उभी तरी पण
बाई दिसतो गं दिसतो मला
प्रेमळ अन हासरा
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||१||
वेड मनाला लाउन गेलं
सोनं बावनकशी
लाज ठेवली गुंडाळुन म्या
उघड सांगते अशी
नकोय मजला दादला आता
जाते सोडुन गं सोडुन जाते
पोटीच्या वासरा
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||२||
मन बी माझं चंचळ भारी
इकडं तिकडं फिरतय
सरत्या शेवटी कुशीत त्याच्या
सुख अनुभव करतयं
नजर करडी मजवर त्याची
बाई धरतो गं धरतो माझ्या
वेसणीचा कासरा
बाई मी जाते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||३||
पंढरपूर हे माहेर माझं
चंद्रभागेच्या तिरी
मोक्षाची गं वाट दावतो
कनवाळू श्रीहरी
दिंडीमध्ये होउन सामील
बाई घेईन गं घेईन त्याच्या
चरणी मी आसरा
बाई मी जते गं जाते माझ्या
सोडूनी सासरा ||४|
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
छान
छान
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
भारुडाच्या आकृतिबंधात काही लिहिणे ही फारच कठिण गोष्ट. एक तर संसारात न रमणाऱ्या वरवर उत्शृंखल उनाड बाईची गोष्ट सांगायची, श्रोत्यांमधे तिच्याविषयी पूर्ण अप्रीती निर्माण करायची, - (अर्थात हे एक तंत्र किंवा अधिक करून गिमिक असायचे, कारण मग उनाड बाईची सुरस कथा ऐकण्यासाठी श्रोते सावधान होऊन सरसावून बसत आणि नंतरचा बोध त्यांच्या गळी उतरवणे सोपे जाई) आणि अचानक गोष्ट ईश्वरभक्तीकडे वळवायची.
अलीकडे गजल खूप लिहिली जाते, अभंग ओव्यासुद्धा लिहिल्या जातात पण भारुडे कमी. लिहीत राहावे.
फारच छान. आधी मला हा प्रकार
फारच छान. आधी मला हा प्रकार समजला नाही. नंतर हीरा यांचा प्रतिसाद वाचला. मग भारुड अजून आवडले . धन्यवाद हीरा.
फारच छान. आधी मला हा प्रकार
डूप्लीकेट. झाली . म्हणून डिलीट केली