नैराश्य आणि देव आनंद.

Submitted by बिथोवन on 4 July, 2020 - 05:41

नैराश्य आणि देव आनंद.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्युने नैराश्याशी झगडण्यास आभासी दुनियेतील तारे सितारे असमर्थ ठरत आहेत आणि स्वतःचे जीवन संपवित आहेत असा मतप्रवाह दिसतो. या पार्श्वभूमीवर मला हिंदी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आठवण येण्याचे कारण म्हणजे त्यांनीही त्यांच्या आयुष्यात बरेच अपयश पाहिले. आर्मी पोस्ट ऑफिस मध्ये क्लार्कची नोकरी करण्या पासून ते हिंदी सिनेसृष्टीत कित्येक दशकं पाय घट्ट रोवून उभे राहण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास पाहिला तर आपल्याला कळतं की अपयशातून ही माणूस मार्ग काढू शकतो.

देव आनंदच्या नवकेतनचा 'फंटुश' अपयशी झाला. फंटूशच्या सेटवर ' एे मेरी टोपी पलटके अा'या गाण्याचे चित्रिकरण करतांना भाऊ चेतन बरोबर वाद झाला आणि चेतन नवकेतन सोडून गेला. त्याने 'हिमालया' ही चित्रसंस्था काढून देव शी फारकत घेतली. त्या अगोदर सुरैय्या यांच्या आईने देवला सुरय्या बरोबर लग्नासाठी नकार दिला. देव आनंद शांत राहिला. स्वतःच्या प्रत्येक निर्मितीला 'माय बेबी' म्हणणारा देव, ते बेबी अकाली मरताना, आपला सख्खा भाऊ सोडून जात असताना अजिबात कोसळला नसेल? पुढे तर देविना या त्याच्या मुलीचं लग्न मोडल तेंव्हा तो हताश वगैरे न होता तिला नव्याने आयुष्य सुरू करायला सांगून तिला प्रोत्साहन दिलं. कोलमडणं तर दूरच, उलट झालेल्या गोष्टीचा फारसा विचारही देवने कधी केला नाही. "जो खो गया मैं उसको भुलाता चला गया" म्हणत झालेल्या गोष्टींना त्याने बाजूला सारले. दु:ख मनाच्या कुठल्यातरी अज्ञात कोपर्‍यात कायमचं ढकलून दिलं. फंटुश पडला पण मागोमाग आलेले काला पानी आणि काला बाझार सुपरहिट झाले. पण देव या यशाने बेधुंद वगैरे झाला नाही. लगेचच त्याने स्वतःला कामात झोकून दिले आणि 'हम दोनो'च्या निर्मितीला सुरुवात केली. आणि असच अव्याहत निर्मिती करतच राहिला.

देव अभिनेता नाही, दिलीपकुमार खरा अभिनेता अशीच धारणा होती कारण दिलीप ट्रॅजेडी किंग होता. ट्रॅजेडी सीन्स जो वठवेल तो खरा अभिनेता असा समज होता आणि देवला ट्रॅजेडी सीन्स जमत नाहीत अशी टीका देववर होत असे. पण तो केवळ गैरसमज होता. बंबई का बाबू चित्रपटात नायिकेचा भाऊ बनावं लागतं पण तिच्या प्रेमात पडल्याची भावना तिच्यापर्यंत पोहोचवताना झालेली तगमग देवने अशी व्यक्त केली आहे. की तसं दिलीपकुमारला च जमलं असतं. देवने अनेक नवोदित नायिकांना नाव आणि कीर्ती मिळवून दिली. मुमताज सारखी नयिका तेरे मेरे सपने मध्ये देवने निवडली आणि मग तिचा प्रवास ए ग्रेड कडे लवकर सुरू झाला. त्याचप्रमाणे लोकांना न आठवणाऱ्या नटांना पुन्हा पडद्यावर आणून नवसंजीवनी प्राप्त करुन दिली. प्रेमनाथकडे 'जॉनी मेरा नाम' नंतर पुन्हा खलनायकी भूमिकांसाठी निर्माते त्याचे उंबरे झिजवू लागले. मधुबाला चित्रपटात काम करु लागली तेव्हा तिला इंग्रजीची भीती वाटायची. देवने तिला मार्गदर्शन केलं. त्याचं इंग्लिश, हिंदी, आणि उर्दू यांवर अस्सल पकड होती. शत्रुघ्न सिन्हा याला प्रेम पुजारी मध्ये महत्त्वाची भूमिका दिली आणि त्यानंतर गॅम्बलर मध्ये. शत्रुघ्न सिन्हाची कारकीर्द त्यानंतर बहरत गेली.

लष्करातून मेजर म्हणून निवृत्त झालेल्या माझ्या एका मित्राने सांगितलेली एक हकीकत. १९६५च्या भारत पाक युद्धात त्याच्या मराठा लाईट इन्फन्ट्री या रेजीमेंटचे बरेचसे जखमी सैनिक अंबाला येथील लष्करी रुग्णालयात उपचार घेत होते.१९६५च्या सप्टेंबर किंवा आँक्टोबर महिन्यातल्या त्या दिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे लष्करी डाँक्टर आणि त्यांच्या समवेत असणारे अधिकारी राउंड घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या बरोबर एक व्यक्ती आली आणि बरीच लगबग सुरू झाली. प्रत्येक सैनिकांच्या खाटेजवळ येऊन ती व्यक्ती आस्थेने विचारपूस करीत होती. पुढच्या खाटेजवळ येताच त्यातला सैनिक उत्साहाने जोरात ओरडला .....' एक टांग तो है....एक.....टांग तो है...'. माझ्या भावाने नंतर सांगितले कि त्या व्यक्तीच्या भेटीनंतर पाय गमावलेल्या त्या सैनिकात सकारात्मक बदल झाला आणि त्याला लवकर डिस्चार्ज मिळाला. ती व्यक्ती म्हणजे देव आनंद. हम दोनो मधील पाय गमावलेला मेजर वर्मा. त्या सैनिकाच्या तब्येतीतील सुधारणा म्हणजे देव आनंदच्या मेजर वर्मा या पात्राच्या जीवंत अभिनयाचा आविष्कारच म्हणावा लागेल.

नंतर दुपारी आँफिसर्स मेसमधे लंच घेतेवेळी देवने अस्खलीत इंग्रजीत सर्वांशी संवाद साधला. देवने रुग्णालयाच्या कामाची प्रशंसा केली आणि कुठलेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. आपण फार मोठे कलाकार आहोत याचा जराही गर्व त्याच्या वागण्यात नव्हता.

त्यानंतर देव आनंद यांच्या वाढदिवशी (२६ सप्टेंबर ) एकदाच मी आणि माझा मोठा भाऊ मुंबईला त्यांना भेटलो तेंव्हा ते जुहू येथील सन अँड सॅन्ड होटेलात, दुसऱ्या मजल्यावरील स्वीट नंबर २२६ मध्ये त्यांच्या नव्या चित्रपटाची पटकथा लिहीत होते. विशेष म्हणजे त्यांचे घर तिथेच जुहू मध्येच " २ आयरिश पार्क " ह्या पत्त्यावर जवळच होते. ते स्वतः त्यांची हिरव्या रंगाची फियाट गाडी चालवत येत असत.

यश आणि अपयश पाठशिवणीचा खेळ खेळतच असतात. आपण अपयशाने खचून जाऊ नये आणि यशाने हुरळून जाऊ नये.

Group content visibility: 
Use group defaults

देव आनंद एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व वाटायचे. हा लेख वाचून त्यांची सकारात्मक बाजूही कळली.
लेख आवडला.
धन्यवाद.

उत्तम लेख.. आणि खरंच देव ग्रेट आहेत...

मुमताज ला जेंव्हा देव साहेबानी तेरे मेरे सपने मध्ये घेतले त्यावेळी ती आल्रेडी ए ग्रेड एक्टरेस झालेली होती असे दिसत आहे ... राजेश खन्ना बरोबर दो रास्ते , सच्चा झूठा गेले होते... खिलोना सुपरहिट झालेला होता- बेस्ट ऐक्ट्रेस फिल्मफेयर मिळाले होते..

हेमा मालिनी ने एकदा सांगितले होते की देव आनंद यांची त्यांच्या सगळ्या heroines बरोबर चांगली वागणुक होती: level headed, balanced and optimistic.

शिरीष कणेकर यांचा एक खूप हृद्य लेख आहे देव आनंदवर. देव आनंद यांचा फोन नंबर त्यावेळी डिरेक्टरी मध्ये होता आणि ते स्वतः फोन उचलायचे आणि सगळ्यांशी बोलायचे. त्यावेळी मोबाईल नव्हते. देव आनंद यांच्या मते ते मुंबईला येताना काहीही घेऊन आले नव्हते त्यामुळे काही गमवायची त्यांना भीती नव्हती. ते अतिशय आशावादी आणि उत्साही होते.

Thanks all you guys for nice responses.
मायबोली वर लेख लिहिण्याचा फायदा म्हणजे लेखाच्या अनुषंगाने बरीच अवांतर माहिती प्रतिसादाच्या रूपाने मिळते. प्रतिसादक ( की साधक?) बहुश्रुत असल्या कारणाने लेख लिहिण्यास हुरूप येतो. तुमच्या सर्वांचे आभार.

छान लेख आहे
कणेकर लेखात देवानंद मधुबाला वर प्रेम करत होते असाही उल्लेख आहे

छान लेख.
देव आनंद हा माझा कधीही आवडता कलाकार नव्हता, पण ही पोजितीव्ह साईड आवडली.
याच्याच विरुद्ध आपण गुरुदत्त म्हणू शकू. (माझा आवडता कलाकार.)

@ महाश्वेता... खरंच... हम एक हैं च्या सेट वर गुरुदत्त आणि देव यांच्या शर्टाची अदलाबदल झाली आणि दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त बनले. दोघांनी एकमेकांना सांगितलं की देव निर्माता बनला तर गुरुदत्त ला निर्देशक करेल आणि गुरुदत्त म्हणाला की तो निर्माता बनला तर देवला नायक म्हणून साईन करेल. देव ने शब्द पाळला आणि "बाझी" या नवकेतन चा सिनेमा गुरुदत्तने त्याचा खास गुरुदत्त टच देऊन निर्देशीत केला.

देव आनंदच्या चांगल्या गोष्टी म्हणजे अत्यंत सुसंस्कृत, वक्तशीर, आपुलकी दाखवणारा कलाकार. त्याचे जुने सिनेमे पाहायला मजा येते. त्याला त्याच्या मर्यादा माहीत होत्या. ऐतिहासिक सिनेमा एकदा केला आणि पुन्हा त्या भानगडीत पडला नाही हे आपले भाग्य! पण ७० क्या दशकानंतर त्याचे डोके फिरले. विजय आनंद सारखा प्रतिभावंत दिग्दर्शक सोडून स्वतः सुरू केले आणि अनेक पडीक सिनेमे बनवले. ८०, ९० क्या दशकातील अनेक सिनेमे हे अत्यंत हास्यास्पद होते. आता पुरे म्हणावेसे vatoo लागले. सेन्सॉर, लष्कर, prime minister असले सिनेमे आले आणि कचऱ्याच्या डब्यात गेले हेही कळले नाही! स्वांत सुखाय अशा विचाराने बनवले असतील हे सिनेमे कदाचित.
हे दोघे बंधू (देव आणि गोल्डी) उत्तम हिंदी बोलता येत असून सिनेमा बाहेर इंग्रजीत का बोलायचे देव जाणे. आज तमाम बॉलिवूड ला हिंदी ही केवळ पडद्यावरील काही संवाद बोलण्याची भाषा आहे असे वाटते त्याचे मूळ बीज ह्या मंडळींच्या वागण्यात आहे की काय असे वाटते.

आवडले लिखाण.
सकारात्मकता ही जन्मजात असते की ती प्रयत्नांती अंगी बाणवता येऊ शकते?