उद्याची आस पोसावी

Submitted by निशिकांत on 1 July, 2020 - 22:40

उद्याची शक्यता का आज फेटाळून लावावी?
जरी मी आज खचलेला, उद्याची आस पोसावी

हवी जर सभ्यता तर मुखवट्याच्या आत शोधावी
दिसाया सर्व साधू संत, वरचे रूप मायावी

कधी अन् काय म्हणतिल लोक याची काळजी केली
मनाला मारुनी शिकलो, जगाची रीत पाळावी

दरोडे, खून, अत्याचार झाल्या रोजच्या खबरा
कसे सांगू मुलांना वृत्तपत्रे रोज वाचावी

जरी आक्राळ अन् विक्राळ असती सागरी लाटा
निरव रात्रीत एकांती दुरूनी गाज ऐकावी

खरोखर अंतक्षण येता, कुणीही आपुले नसते
दिसाया लागता मृत्यू, कुणाला हाक मारावी?

कशाला मरती घिरट्या, गिधाडे झोपड्यांवरती?
इथे वस्ती करोनाची, हिला म्हणतात धारावी

कुठे गुंतायचे नसल्यास घ्या सन्यास मर्जीने
इथे तो आज असतो तर उद्या असतो दुज्या गावी

तुला आहेत का "निशिकांत " कोणी आपुले खासे?
तुझ्यावर वेळ आली तर जयांची आठवण यावी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users