यार आले ...

Submitted by द्वैत on 25 June, 2020 - 12:06

यार आले ...

नाही घरी कुणीही.. पाहून यार आले
संकेत वादळांचे घेऊन यार आले

फिरतात घेउनी ज्या डोईवरी प्रतिष्ठा
बाहेर उंबर्याच्या ठेऊन यार आले

संपर्कक्षेत्र ह्यांचे भलतेच "स्ट्रॉंग" आहे
ठेचाळलो कुठे की धावून यार आले

जेव्हा गढून गेलो चिंतेत मी उद्याच्या
अत्तर जुन्या स्मृतींचे लावून यार आले

लिहिण्या नवीन काही मी लेखणी उचलली
घटकेत कागदावर उतरून यार आले

"द्वैता" खरी कमाई नक्की कशात आहे ?
मैतास ज्या कुणाच्या लोटून यार आले

Group content visibility: 
Public - accessible to all site users