गझल तरीही जमली नाही

Submitted by निशिकांत on 23 June, 2020 - 10:29

गझल तरीही जमली नाही

मोजत मात्रा वृत्त पाळले, गझल तरीही जमली नाही
वाचकांस ती आवडली पण विद्वानांना रुचली नाही

जरी कराग्रे वसे लक्ष्मी, खिशात केंव्हा दिसली नाही
तिचा राबता महालात ती झोपडीत वावरली नाही

तू दिल्यास त्या भळभळणार्‍या जखमांचीही तर्‍हा निराळी
काळाच्या मलमाने त्यांवर कधीच बसली खपली नाही

बेगम झाली जरी कुणाची, बेग़म(*) होणे अवघड आहे
जनानखाना विश्व तिचे पण कधी कशी गुदमरली नाही?

मूठ झाकली तोवर होते मुल्य जरी सव्वालाखाचे
उघडे पडले पितळ ज्या क्षणी, बजारी पत उरली नाही

किती निर्भया आल्या गेल्या, क्षणेक आक्रोशाच्या लाटा
जरी कायदे झाले, त्यांची फरपट कांही सरली नाही

मैत्री होता फेसबुकवरी, रोमँटिक गप्पाही झाल्या
ती होती ती; का तो होता? बाब एवढी कळली नाही

बेमानीला राजप्रतिष्ठा, अस्त पावली इमानदारी
लाकुडतोड्या ! तुझी कहाणी मुलांस मी सांगितली नाही

पिऊन मृगजळ घसा जरासा ओला केला "निशिकांता"ने
आभासी या ओलाव्याची साथ कधीही सुटली नाही

(*) बेग़म= दु:खविरहीत, आनंदी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users