"दोपहर का ठहराव"

Submitted by ज्येष्ठागौरी on 20 June, 2020 - 22:57

ठहराव
खूप वर्षांपूर्वी मोहन गोखले आणि रामेश्वरी यांची "दोपहर का ठहराव" ही फार छान मालिका आली होती. कथानक फारसं आठवत नाहीये पण एका मध्यमवयीन जोडप्याच्या संथ आयुष्यात एक वादळ उठतं अशी काहीशी कथा होती. दोघांची कामं उत्तम होती. यातला ठहराव हा शब्द मला फार आवडला तेंव्हा.आताही आवडतो.पण दोपहार का ठहराव म्हणजे आयुष्यातली दुपार.मध्यमवय संथ,सुस्त, कंटाळवाणी रणरणीत.दोघेही ह्या शारीर आणि मानसिक स्थितीतून जात असतात.मुलं मोठी झालेली आहेत, नोकरीत स्थैर्य आहे. अशा वेळी एक कंटाळलेपण येणं स्वाभाविक असतं जसं दुपारी येतं अगदी अटळ.त्यामुळे दोपहर का ठहराव हा शब्द फार चपखल होता.
नंतर कधीतरी गाण्यात ठहराव आहे असं ऐकलं तेंव्हा परत एकदा हा अर्थ नव्यानं लागला.गायकीमध्ये एक सुकुन असणे ह्या अर्थी वापरला जाणारा हा शब्द.आणि आज वाचनात ही कविता आली....
फीकी ज़र्द दोपहर
ख़ामोश ढली दोपहर
आकाश का खोया खोया नील
थकी थकी बीमार हवा
वक़्त के चलते डोरे से कुछ देर अलग सूने लम्हे
एहसास की ज़र्द लकीरें
याद के फीके साए
दूर दूर बे-रंग उफ़ुक़
शांत समुंदर की सूरत इक फैला फैला सा ठहराव
बुझा बुझा उचाट सा दिल
ऊबी ऊबी सोच
उकताहट में इक अन-जानी वहशत सी
सूने लम्हों के बाहर
जीवन के गुज़रते शोर का इक बोझल सा ख़याल
इस फैले फैले ठहराव की बे-कैफ़ी में
ग़र्क़ाबी सी
वीरानी सी
अब्दुल अहद साज़
उफ़ुक़ (क्षितिज),उचाट(उदास), उकताहट(चिडचिड) वहशत(वेडेपणा किंवा रानटीपणा)ग़र्क़ाबी(तल्लीन)बे कैफी(अरसिकता)
सध्याच्या परिस्थितीचं आणि मनस्थितीचं योग्य वर्णन करणारी,
..ठहराव ह्या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे स्थिरता किंवा स्तब्धता.
आत्ताच्या ह्या परिस्थितीत हा शब्द काय बरोबर लागू पडतोय. कोरोनामुळे जगभर एक विचित्र ठहराव आलाय हे निश्चितचं आहे.कुठे दूरदेशी बळी पडणारी माणसं ,त्यांच्याबद्दल खंतवणारं आपलं मन आणि आपल्या देशापर्यंत यायला नको असा आशावाद बाळगून आपण त्या चक्रात ओढलो गेलो आणि आधी शाळा ,कॉलेज ,हॉटेल्स, दुकानं ,ऑफिसेस अशा पायऱ्या चढत आज संचारबंदीमुळे सगळं थांबलं.सगळे सूज्ञ लोक घरात बसले.आपल्याला घरी बसायची कधी सवय नव्हती.सतत काहीतरी करत राहण्याच्या नादात थांबायचं विसरलोच होतो आपण आणि ह्या आपत्तीनं आपल्याला चांगलंच खेचून स्तब्ध केलं.नवरा,मुलगा,मुलगी आणि सगळ्यात शेवटी मी ह्या क्रमानं घरी बसलो.साधारण दोन आठवड्यापूर्वी अंधुक का होईना पण ह्याची कल्पना आली आणि अचानक काय आठवलं तर प्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे ह्यांनी लिहिलं आहे की त्यांची आई इरावती कर्वे यांनी त्यांना सांगितलं होतं की तांदूळ आणि एक कडधान्य भरुन ठेव,उपयोगी पडतं. गौरी देशपांडे यांच्या संघर्षाच्या काळात त्यांना हा सल्ला उपयोगी पडला. आपण आता सगळं कायम मिळतं, घेतलं तर त्याची उस्तवार करावी लागते,नाहीतर वाया जातं, दर महिन्याला घेतलं तर त्यात विविधता मिळते,साठवायची जागा कमी असते अशा अनेक कारणांनी साठवत नाही.आज त्याची कमतरता खूप जणांना जाणवत असेल.पण खरंच माझ्या पन्नाशी उलटलेल्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग असेल.पुण्यासारख्या राजकीय सामाजिकदृष्ट्या शांत शहरात राहिल्यामुळे संचारबंदी वगैरे फारशी पाहिलेली नाही.त्यामुळे ही शांतता अंगावर येत आहे. आणि मुळात हे जे मृत्यूचं थैमान चालू आहे त्यानं मन विद्ध झालं आहे.स्वतःच्या कुटुंबाचा विचार आहेच पण heart is going for those who are suffering and working for those who are suffering.
काल इटलीमधल्या एका हॉस्पिटलमधल्या दोन परिचरिकांचा फोटो पाहिला.मृत्यूच्या तांडवामुळे एकीन हताश होऊन खाली बसकण मारली आहे आणि दुसरी तिला समजावते आहे.ह्या फोटोमुळे काटा आला.काय झालंय हे!
अशी ही शांतता, हे अस्वस्थ रिकामपण अंगावर येत आहे आणि अशा वेळेला आईची आठवण अगदी सहज आपसूक येतीये.तिच्यात एक प्रकारचा ठहराव होता.एक शांत स्वस्थचित्तता होती.ती कौटुंबिक आणि वैयक्तिक संकटांना अगदी शांतपणानी सामोरं जायची. तिच्या तोंडून ऐकल्या गोष्टी आता जास्त संगत वाटताहेत.ती लहान असताना दुसऱ्या महायुद्धाचे चटके बसलेले तिनं पाहिले होते.फार कोवळ्या वयात आईचा मृत्यू पाहिला होता.नंतरही अनेक दुःख सहन केली होती तिनं.पाकिस्तान आणि चीन युद्धाच्या वेळेस ब्लॅक आऊट्स तिनं शांत मनानी काढलेत माझ्या आजी आजोबांसकट.बापू पत्रकार त्यामुळे २४ तास कामावर. पानशेतच्या पुराच्या वेळी आमचं घर मोठं होतं म्हणून वस्तीला आलेली अनेक लोकं यांचं सात आठ दिवस तिनं केलंलं आतिथ्य.तेंव्हा सात दिवस नळाला पाणी नव्हतं असं ती सांगायची.मग तू कसं केलंस असं विचारलं की म्हणायची की अगं त्यात काय मागच्या विहिरीतून आणून उकळून घ्यायचं.मार्ग सापडतात आपोआप असं सांगायची.मी कधी अडचणींना घाबरले तर धीर धर जरा असं म्हणायची. बापू सांगायचे की त्यांची आजी याच प्रकारे "दम शीक" म्हणायची. मध्यंतरी एका कौटुंबिक अडचणीच्या वेळी मला असं आतून वाटलं की आईच्या ठायी असलेला ठहराव आपल्यात नाही.खंबीरपणे तोंड देत असतानाही तिच्याइतकं स्वस्थचित्त राहता येत नाहीये.प्रयत्न होतोय पण अजून पूर्ण जमलं नाहीये.आणि आता आपल्या दारात युद्धजन्य परिस्थिती उभी राहिली आहे याची गंभीर जाणीव झाली आहे.तुमच्याकडे वाहन आहे,इंधन आहे ,चालवणारे हात आहेत,रस्ता आहे,ठिकाण आहे पण परवानगी नाही.खिशात आणि कार्डात पैसे आहेत पण जीवनावश्यक वस्तू घ्यायला कष्ट आहेत.काही मूठभर लोकांच्या मूढतेमुळे सगळे कारा भोगताहेत ही चिडचिड आहे.स्वतः, कुटुंब आणि समाज ह्यांच्या आरोग्याची काळजी आहे,जे प्रियजन दूर आहेत त्यांची आणि त्यांना चिंता आहेच आहे.हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स,नर्सेस,आणि त्यांना मोलाची मदत करणारे मामा ,मावशी इतर लोक,पोलीस,जीव धोक्यात आहे हे ठाऊक असून दूध पोचवणारे, किराणा दुकानदार,बँकेतली माणसं ह्यांच्यासाठी फार हळवं व्हायला झालंय.
मग अशा बंदीवान स्थितीत ठहराव कसा आणावा याचा विचार सतत चालू आहे.आणि बघता बघता खूप गोष्टी सापडल्या.एक ओळ लावून कामं करता यायला लागली.केर काढणे ,फरशी पुसणे,स्वयंपाक करणे ,भांडी घासणे ही कामं न कंटाळता ,न चिडता करता येतात आणि तीही आपल्या वेगानं आणि उत्तम प्रकारे. घड्याळाकडे बघत पोळ्या करण्यापेक्षा मन लावून छान गोल पोळ्या करण्यात किती मजा आहे ते कळलं. भाजी किंवा इतर सामान थोडं कमी मिळणार आहे काही दिवस हे स्वीकारलं की आहे त्या सामग्रीमधून छान स्वादिष्ट पदार्थ करता येताहेत.सगळ्या वस्तू जपून वापरण्याचं शहाणपण पुन्हा एकदा समोर आलंय.कुठलीही गोष्ट वाया न घालवण्याची आईची शिकवण किती कमी येतीये. साड्यांचं कपाट परत लावताना मन भरुन येतंय आणि एवढा संग्रह का करतोय असा विचार येतोय. कागदपत्र आवरली जात आहेत. ह्या सगळ्यात विसमरणात गेलेलं क्षण इतक्या सहजपणे समोर येताहेत.
ह्या कोरोनानी सगळ्यात धक्का आपल्या अहंकाराला लागलाय.आपल्याला काही होऊ शकत नाही,हा गंड एक झटक्यात उतरवला आहे. विपश्यनेचं सूत्र आहे "अनिश्च" अगदी लखलखीतपणे समोर आलंय आणि ह्यापुढे असणाऱ्या परिस्थितिचा अंदाज येऊनसुद्धा आज आतून शांत वाटतंय. आपल्यासाठी खूप लोक लढताहेत मग मी घरात कंटाळणे हा त्यांच्यावरचा अन्याय आहे.माझ्या वेगवान गाडीला खीळ बसलीये पण ती अटळ आहे आणि त्यातून मी मार्ग कसा काढतीये हे महत्त्वाचं.माझं शारीर आणि मुख्य म्हणजे मानसिक आरोग्य मी कसं ठेवतीये हे येत्या काळात पडताळून पाहता येणारे.एक तिऱ्हाईत म्हणून मी आलेल्या परिस्थितीला प्रतिक्रिया देणार आहे का प्रतिसाद (react or respond)हे बघणं फार मजेशीर असणार आहे.
हाच ठहराव असावा का? शायरी के लिये घाव जरुरी है और जिंदगी के लिये ठहराव असं एका कवितेत वाचलं होतं.
परवाच्या जनता curfew मुळे एक सकारात्मकता आली आहे ,ती खूप महत्वाची आहे.माझ्या आयुष्यातल्या आलेल्या ह्या स्तब्धतेला मी किती आपलं मानणार आहे त्यावर खूप अवलंबून आहे.कसं स्वीकारणार आहे ते फार गरजेचं आहे.ह्या स्थिरतेतून स्तब्धतेतून काहीतरी चांगलं निपजावं असं वाटतंय.
बापू सोमवारी रात्री उपास करायचे,तसे ते उपास करण्यातले नव्हते.फार न कळणाऱ्या वयात त्यांना विचारलं की कसला उपास करता तुम्ही तर म्हणाले "शास्त्री उपास" मला हसायलाच आलं, हा कसला उपास!तेंव्हा म्हणाले बाळा पाकिस्तानच्या युद्धानंतर अन्न टंचाई झाली तेंव्हा त्यांनी आवाहन केलं की आठवड्यातून एकदा उपास केला तर खूप धान्य वाचेल.शास्त्री गेल्यानंतरही पुढची वीस वर्षं बापू उपास करत होते.आज मला हा दृष्टिकोन खूप जास्त भावतोय.हा वृत्तीमधला ठहराव फार जरुरी आहे नाही का!Storms don't last त्यामुळे हे दिवसही जाणारेत तोपर्यंत थोडा धीर धरणं जरुरीचं आहे.a little more patience,love,compassion,empathy,kindness is what is needed..कदाचित या दिवसात मला मी नव्यानं सापडीन, माझ्यातल्या भल्या बुऱ्याचा मला अंदाज येईल.काहीतरी लखलखीत झिलई असलेलं पुढे येईल नक्की.ही एक परमेश्वरानी संधीच दिली आहे जणू ताकद चाचपायची.SWOT analysis स्वतः चं करायची संधी.पुढचे दिवस कस लागणारे ,आपण इतके वर्षं काय शिकलो,कसे जगलो,कुणाकडून काय शिकलो आणि ते प्रत्यक्षात उतरवतो आहे का त्याचा.मन आणि शरीर कणखर, सकारात्मक आणि आहे त्यात आनंद मानणारे ठेवणं हे फार गरजेचं आहे.सृजन निर्मिती ही वेदनेतून असते त्यामुळे .नक्की नवं काहीतरी गवसणार आहे.माझ्या मना छान सकारात्मक,शांत आणि स्वस्थ रहा!
ठहराव हो तो माटी में दबे बीज सा
जिजीविषा की तान पर
अनुकूलता की बाट जोहता
दफ़न होकर भी
समेटे खुद में विशालता
तोड़ हालात की बेड़ियाँ
आखिर इक़ दिन अंकुर बन
फूटता ही फूटता....
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छानच आहे. हा गोड ठ्हराव मध्यमवर्गीय जीवनात आला आहे.

बाकी हजारो लाखो लोक विस्थापित झाले. धंदे बंद पडलेत आजारी पडुन वारलेत व त्यांची कुटुंबे वार्‍यावर आहेत. ह्यांना सकारात्मकता शिकवायला खूपच प्रयत्न लागतील.