अचूक ओळखलं तिने मला ..

Submitted by aksharivalay 02 on 20 June, 2020 - 02:21

ओळखलं तिने मला..

इतकं अचूक ओळखलं तिने मला
असं आजवर कोणी ओळखलंच नव्हतं
मान्य केलं हे मी, पण मनोमन
प्रत्यक्षात तिच्या दाव्यांना मी फेटाळलंच होतं

तिने वदले पुरुषी अहंकाराचे काही प्रकार
आणि जोडले त्यातले काही माझ्याशी
त्या क्षणी जरूर वाटले बुरखा फाटला माझा
पण ते स्वतःपाशीही मान्य करणं मी टाळलंच होतं

भावनिक होऊन एकदा मी दिली तिला
संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्याची हमी
पण यातही स्वातंत्र्य देण्याच्या हक्कांवरच
हक्क सांगणं माझं
तिने ओळखलंच होतं

"विश्वासच नात्यांचा श्वास" म्हणत मी समूळ नष्ट केल्या तिच्या मनातून माझ्या विषयीच्या अनेक शंका
पण तिला ठाऊक होतं
माझ्या मनातील शंकेने
अनेकदा तिच्या डायरीचं पानं चाळलंच होतं

मी म्हणालो तू तुझे निवड
कपड्यांचे प्रकार आणि रंगही
पण ती पाहत होती
"हेच तुला शोभेल" म्हणत
मी मला हवं ते वस्त्र तिला
गुंडाळलंच होतं

छातीठोकपणे सांगितलं मी
"स्त्रीपुरुष हे असले
भेदभाव मला मान्य नाहीत"
पण तिने जाणलं
मी घरकामांना स्त्री म्हणून नकळत
तिच्या पदराशी जोडलंच होतं

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

<<<भावनिक होऊन एकदा मी दिली तिला
संपूर्ण वैचारिक स्वातंत्र्याची हमी
पण यातही स्वातंत्र्य देण्याच्या हक्कांवरच
हक्क सांगणं माझं
तिने ओळखलंच होतं>>> हे मात्र अगदी बरोबर, पुरुष असतातच असले

छान!

या विषयावर अनेकदा मनातच विचार सुरू असतात.. हा विषय endless आहे खरंतर. हवं तसं जग म्हणताना, ही परवानगी देणारे आपण कोण हा प्रश्न मनात येतो, मग कळतं की ही परवानगी आपण द्यावी हीच मुळात "अपेक्षा" पुरुषाकडून ठेवली जाते. पितृसत्ताक पद्धती एवढी खोलवर रुजलेली आहे की, उच्चाटन करतानाच अजून अनेक प्रश्न निर्माण व्हावेत!

आपल्यापुरता आपण एकमेकांच्याप्रती असलेल्या अपेक्षा समजून घेणे, आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे एवढे जमले तरी बास!

पण यातही स्वातंत्र्य देण्याच्या हक्कांवरच
हक्क सांगणं माझं
तिने ओळखलंच होतं
>> क्या बात है!

<<< कळतं की ही परवानगी आपण द्यावी हीच मुळात "अपेक्षा" पुरुषाकडून ठेवली जाते. पितृसत्ताक पद्धती एवढी खोलवर रुजलेली आहे की, उच्चाटन करतानाच अजून अनेक प्रश्न निर्माण व्हावेत!>>> मला नाही वाटत की स्त्रियांना हे आवडत असेल, पण राहता येत आपल्याला आपल्या मनासारखे, अन असे वाटून पुरुषांचा इगो सुखावत असेल तर असो बापुडे हेच विचार येत असावे बहुतांशी स्त्रियांच्या मनात