का पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 June, 2020 - 13:58

कोणती नक्की अवस्था गाठते आहे मला ?
का पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला ?

पाहते जेव्हा धरेला घातला विळखा धुक्याचा
वाटते घ्यावा लपेटुन गच्च शेला संभ्रमाचा
हे असे कोड्यात पडणे भावते आहे मला
अन पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला

गंध मातीचा अताशा मारतो हाका जुनेऱ्या
पावसाची सर अवेळी भिजवते मौनास कोऱ्या
हे असे बेबंद जगणे भुलवते आहे मला
अन पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला

वाटते की चालताना एक अवचित वळण यावे
जाणिवांचे वाढते गोंगाट जावे... दूर जावे !
मी जवळ माझ्याच येणे साधते आहे मला
अन पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला

कोणती नक्की अवस्था गाठते आहे मला ?
का पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला ?

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाटते की चालताना एक अवचित वळण यावे
जाणिवांचे वाढते गोंगाट जावे दूर जावे
मी जवळ माझ्याच येणे साधते आहे मला
अन पुन्हा निःशब्द व्हावे वाटते आहे मला<<<<<<<<<<<<<<<<खूपच सुंदर ... या शेवटच्या ओळी खूप आवडल्या

सुप्रिया ताई तुमच्या कविता मस्तच असतात. एक संग्रह करायला हवा. मी वाचते आवर्जुन. तुम्ही ठीक आहात ना? काळजी घ्या.

धन्स अमा, मी उत्तम
संग्रह लॉक डाऊनमुळे राहिलाय,
छान वाटलं चौकशीने असाच लोभ राहो !
तू कशी आहेस?

धन्यवाद रुपाली

खूप मस्त कविता! एकच छोटा मुद्दा - "जाणिवांचे वाढते गोंगाट जावे दूर जावे" ह्यात दोनदा 'जावे' बरोबर वाटत नाही. जरा बदल करता येइल का? जाणिवांचे वाढते गोंगाट सारे दूर जावे - असं काहीतरी?

सारे दूर जावे चेच जावे दूर जावे केले आहे

भावनांची तीव्रता व्यक्त करण्यासाठी जावे ह्या शब्दाची पुनरावृत्ती केलेली आहे

धन्यवाद