बारशिंगे.

Submitted by Sanjeev Washikar on 12 June, 2020 - 09:22

बारशिंगे.
माझा गेली अनेक वर्षे मशिनरी व स्पेअर्स तयार करण्याचा कारखाना आहे . या कारखान्यात काम करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आम्हाला नेहमीच लागत असतात .यात मशीन ऑपरेटर ,वेल्डर ,क्लार्क यांची भरती हि सातत्याने चालूच असते . बरेच लोक अनेक वर्षे इथे काम करतात तर कांही लोक अल्प काळातच काम सोडून दुसरीकडे नोकरी साठी जातात .या गोष्टी अनेक वर्षे चालूच आहेत . माझ्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात माझ्या कडे श्री. बारशिंगे ( नाव बदलेले आहे ) नावाचा एक तरुण मुलगा मशीन ऑपरेटर म्ह्णून कामाला होता . बारशिंगे अतिशय बोलक्या स्वभावाचा,दिसायला रुबाबदार, मेहनती व खटपट्या असे एकूण त्याचे व्यक्तीमत्व होते. कांही दिवसांनी त्याचे लग्न ठरले. त्याने मला ,माझ्या पत्नीला व इतर कामगारांना देखील लग्नाचे आमंत्रण दिले होते . त्याच्या लग्नासाठी मी व माझी पत्नी तसेच आमचे सर्व कामगार दोनशे किलोमीटरचा परगावी प्रवास करून ,कार्यक्रमास उपस्थिती लावली होती . कालांतराने तो एक दिवस माझ्या कडे आला व म्हणाला " साहेब हे घ्या पेढे .मला मुलगा झाला" .
"अरे वां ! म्हणत मी पण त्याचे अभिनंदन केले .
" साहेब , बायको व लहान मुलगा माहेरीच आहे. त्यांना मी परगावी आणायला जाणार आहे . तेंव्हा मला दोन तीन दिवस सुट्टी पाहिजे आहे. तसेच बाळा साठी पाळणा, व इतर वस्तू आणायच्या आहेत तेव्हा कांही पैसे देखील मला अ‍ॅडव्हान्स म्ह्णुन हवा आहे" .त्याची हि मागणी मी ताबडतोब मान्य केली व त्याला हे हि सुचवले कि पाळणा वगैरे साठी तू पैसे खर्च करू नकोस .माझ्या कडे घरी एक चांगला लोखंडी स्टॅण्डचा पाळणा आहे .हवा असल्यास तो तू घेऊन जा.तुझे काम झाले कि मग परत केलास तरी चालेल .त्या नंतरही लागला तरी सुद्धा तू तो घेऊन जाऊ शकतोस. त्याला ते पटले . ह्या पाळण्याचे अनेक लोक इच्छुक असल्या मुळे, मी पण तो रंगवून ,त्याचे नाट बोल्ट व्यवस्थित सांभाळून ठेवले होते. कांही दिवसांनी तो माझ्या घरातून पाळणा घेऊन गेला व काम झाल्यावर त्याने परत हि आणून दिला . त्याच्या छोटेखानी खोलीत, त्याने "मुलगा झाला" म्हणून एक बारशा सारखा कार्यक्रम हि केला होता व या साठी त्याने मला व माझ्या पत्नीने देखील आमंत्रित केले होते. मोठ्या कौतुकाने आम्ही दोघांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती . कालांतराने या बारशिंगेनी आमची नोकरी सोडली व तो दुसरी कडे निघून गेला . त्या नंतर बरीच वर्षे तो मला भेटला नाही .

माझ्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात, कांही कंपनीची बाहेरची कामे मी स्वतः आवडीने करीत असे . त्याच त्याच कामाच्या वातावरणातून बाहेर पडल्या मुळे, थोडा वेळ का असेना, मनाला मोकळीक वाटे . ट्रान्सपोर्ट कंपनीत कार मधून मटेरियल घेऊन जाणे, हे एक माझ्या आवडीचे काम असायचे . या ट्रान्सपोर्ट कंपनीतील क्लार्क ,मॅनेजर ,हमाल हे देखील माझ्या चांगलेच ओळखीचे झाले होते . या कंपनीत मालाच्या रिसीटचे काम, एक मध्यम वयाच्या बाई करीत होत्या. कामाच्या निमित्ताने त्यांची हि माझ्याशी तोंड ओळख झाली होती . अशाच एका कंपनीच्या कामा साठी मी इथे आलो होतो. याच वेळी यांची जेवणाची सुट्टी असल्या मुळे दारा शेजारी असणाऱ्या खुर्चीवर मी बसून राहिलो होतो . इतक्यात एक व्यक्ती माझ्या समोरूनच चालत या बाईंच्या जवळ आली .दोघांचे कांहीतरी हास्य विनोदी बोलणे झाले व थोड्या वेळाने ती व्यक्ती बाहेर जाण्या साठी निघाली . मी या माणसाला कुठेतरी पहिले आहे असे मला सारखे वाटू लागले . अचानक माझ्या लक्षात आले, अरे ! हा तर आपल्या बारशिंगे. आपला जुना सहकारी भेटल्याने मलाही खूप आनंद वाटलं . मी खुर्ची वरून उठून "अहो बारशिंगे " म्हणून जोरात हाक मारली" . माझी हाक ऐकल्यावर ते चांगलेच चपापले .माझ्या जवळ येऊन "अरे ! साहेब तुम्ही इथे कसे काय ? " असे म्हणाला "तुम्ही सध्या कुठे आहात ,आम्हाला विसरलात काय ? तुमचा मुलगा आता मोठा झाला असेल ना ? हे प्रश्र्न मी विचारण्याचा आतच " साहेब मी फार गडबडीत आहे ,दोन दिवसात कंपनीत तुम्हाला भेटायला येतो ,मग आपण निवांत बोलू "असे म्हणत त्यांनी माझी बोळवण केली व तो घाईगडबडीने निघून गेला . मलाही त्यांचे हे वागणे फारच चमत्कारिक वाटले . माणसाचं सहवास संपला कि स्नेह देखील कमी होतो अशी मनाची समजूत घालीत मी पण माझ्या पुढील कामाला लागलो .

आता या लोकांची जेवणाची सुट्टी संपली होती.नेहमी प्रमाणे मी त्या बाईंच्या टेबला जवळ गेलो.सर्व कागदपत्रे त्यांना दिली व मालाची रिसीट घेऊन त्यांचे आभार मानले . मी खुर्ची वरून उठणार, इतक्यातच त्या बाई, स्मित हास्य करीत मला म्हणाल्या "तुम्ही या बारशिंगेना कसे काय ओळखता हो ?."
त्या वर मी म्हणालो " अहो! मी यांना का नाही ओळखणार " दीड दोन वर्षे यांनी आमच्या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम केले आहे ."
" खरच !! ते तुमच्या कंपनीत कामाला होते " ? बाई
"म्हणजे काय ,अहो ! याचे लग्न होते त्या वेळी मी ,माझी बायको व आमचे सर्व कामगार दोनशे किलोमीटरचा प्रवास करीत त्याच्या लग्नाला गेलो होतो . त्याच्या मुलाच्या बारशाला देखील मी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो . हे ऐकल्यावर त्या बाईनी "बाप रे " म्हणत कपाळावर हात मारून घेतला . त्यांचा चेहरा पूर्ण पणे ओशाळला होता . अचानक त्यांच्या या प्रतिक्रिये मुळे मला हि कांही कळेना . माझे बोलताना कांही चुकले तर नाही,असे वाटू लागले. मी त्या बाईना म्हणालो "का हो बाई ! काय झाले ,एकदम " बापरे का म्हणालात ? " त्या वर त्या बाई म्हणाल्या " काय सांगू साहेब ,पंधरा दिवसा पूर्वी या माणसाचा माझ्या धाकट्या बहिणी बरोबर साखरपुडा झाला आहे . दोन महिन्यांनी तिचे लग्न या माणसा बरोबर होणार आहे . हा विवाहित आहे ,याला एक मुलगा आहे याची कोणतीही कल्पना याने आम्हाला दिलेली नाही . गेली चार वर्षे हा एका केटरिंगच्या कंपनीचा मालक आहे असे याने आम्हाला सांगितले आहे. हे ऐकल्यावर कपाळावर हात मारून घेण्याची आता माझी पाळी होती ." हे बघा मॅडम, कदाचित त्यांने पहिल्या बायकोला रितसर घटस्फ़ोट हि दिला असेल. या गोष्टी त्याने तुमच्या बहिणीला सांगितल्या आहेत का ते बघा.हा माणूस माझ्याकडे कामाला होता व तो विवाहित आहे व त्याला एक मुलगा आहे ,हे सत्य मी नाकारू शकत नाही .याचे आनेक साक्षीदार देखील आहेत . त्याच्या इतर वैयक्तिक जीवना बद्द्ल मला कांहि माहिती नाही .पण हा लग्नाचं विषय असल्या मुळे तुम्ही योग्य ती चौकशी करून मगच पुढे जा" असा अनाहूत सल्ला देऊन कंपनीचे बाहेर जाण्याचे दार कुणीकडे आहे हे मी शोधू लागलो .

आता या गोष्टीचे दडपण माझ्यावर इतके आले होते . मी कारखान्यात न जाता सरळ घरचा रस्ता धरला .घरी गेल्यावर जे कांही घडले याचा इतंभूत वृत्तांत ,मी माझ्या पत्नीला सांगितला, निदान तिच्या सांत्वनाने माझा तणाव थोडा दूर होईल असे मला वाटले .
." तो बारशिंगे इतका भंपक असेल असे वाटले नाही . पण तुमच्या ह्या अती गप्पिष्ट स्वभावा मुळे, जे झाले, ते योग्यच झाले म्हणा ! आता त्या बाईंना तुमच्या कंपनीचा फोन, पत्ता माहित असणार .या घटनेची रुजवात, खरे खोटे करायला त्या आपल्या घरी देखील येतील .हे एक तुमचे नवीन काम वाढले. तेंव्हा काय करायचे ते आत्ताच ठरवा ." पत्नि. तिची ही उपरोधात्मक टीका माझ्या लक्षात आली
" हे बघ ,मी जे त्या बाईंशी बोललो आहे, त्या बोलण्याचा असल्या एखाद्या घटनेशी कांहीतरी सबंध असेल,असे मला थोडेच माहित होते ? .मी कांही कोणी दूरदर्शन मालिकेतील अंतर्ज्ञानाने कळणार देव नाही .जे झाले ते कदाचित योग्यही असेल किवा नसेल ही. ते इथे आले तर, जे कांही मला माहित असणारे सत्य आहे ,ते मी स्वतः त्यांना सांगेन. या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत ,मग तर झाले .जो होगा ,वो खुद्द निपट लेंगे" असे सांगून मी तिला शांत केले .नंतर मात्र मी समजत होतो त्या प्रमाणे मला भेटायला कोणी द्खील आले नाही.

दोन तीन महिन्यांच्या कालावधी नंतर मी कामासाठी पुन्हा या ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये गेलो होतो .नेहमी प्रमाणेच त्या बाईंना भेटलो ,माझ्या कामाची पूर्तता केली . या बारशिंगे चे पुढे काय झाले ,हे जाणून घेण्याची माझी फार इच्छा होती .जाताना या गोष्टी बाबत मी त्या बाईंना विचारणार देखील होतो इतक्यात त्याच बाईंनी माझ्याशी बोलायला सुरवात केली . " साहेब ! तुम्ही त्या दिवशी मला देवा सारखे भेटलात बघा ,नाहीतर माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लागली असती .बारशिंगे विवाहित आहे हे तुमच्या कडून कळल्यावर आम्ही त्या माणसाची पूर्ण चौकशी केली . मुलखाचा भामटा माणूस आहे हा .अनेक बायकांना भूलथापा मारून याने फसवले आहे म्हणे . माझी पण बहीण ह्याचा रूपावर अशी काय भाळली कुणास ठाऊक ? तिला चांगली नोकरी आहे हे हेरून ,तिला भूलथापा मारून फसवण्याचा त्याचा कदाचीत डाव होता . आपल्या पहिल्या बायकोला देखील भांडून , याने माहेरी हाकलून दिले आहे म्हणे . आमचे नशीब खरोखरच चांगले, कि तुम्ही त्या दिवशी आम्हांला भेटलात . मी मात्र "अरे बापरे " होय ! होय ! एवढ्या दोन शब्दातच बोलून तिथून बाहेर पडलो . माझ्या गप्पिष्ट स्वभाव मुळे कधी कधी मला त्रास होतो , मात्र कुणाचे भले होणार असेल तर त्याचे न कळत मिळालेले श्रेय देखील मला मिळायला हवे कि नाही ? .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कळत नकळत चांगले काम झाले आपल्या हातुन.
अवांतर : फक्त लिहितांना पुर्ण विराम, स्वल्प विराम देतांना स्पेस नका देऊ.

साहेब ! तुम्ही त्या दिवशी मला देवा सारखे भेटलात बघा ,नाहीतर माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लागली असती .बारशिंगे विवाहित आहे हे तुमच्या कडून कळल्यावर आम्ही त्या माणसाची पूर्ण चौकशी केली....

तुमच्यामुळे एका स्त्रीला मोठा मनःस्ताप होण्यापासून वाचला !!
अनुभवकथन आवडले.