स्मिता! तिचं नाव! नावाप्रमाणेच सतत आनंदी रहाणारी. खरंतर अतिशय गरीब घरात जन्म झालेला तिचा. अतिशय हलाखीची परिस्थिती. वडिल एका खेडेवजा गावात साधे टेलर आणि आई गृहिणी. पाठचे दोन लहान भाऊ. आई घरीच शिवणकाम करून चार पैसे मिळवायची. घरांत कोंबड्याही पाळलेल्या. दुसरे काही उत्पन्नाचे साधन नाही. आता ही जन्मतःच बाळसेदार होती. गोरीपान आणि अतिशय रेखीव डोळे असलेली. पण पहिलीच मुलगी झाली, त्यामुळे वरवर नुसते लोकांना दाखवायला आईबापांनी खूशी जाहीर केली. पण मनात तिच्याबद्दल अढी पुढे कायमच राहिली. आता त्या चिमुकलीला याचा गंधही नव्हता. लहान मुले आपल्या आईवडिलांबरोबर कोणत्याही परिस्थितीत खूशच असतात. ती जिथे असतील तिथे त्यांचे सुंदर विश्व तयार करतात. तसेच तिचेही होते. आपल्या बोबड्या बोलांनी, बाललीलांनी, अल्लडपणाने ती जवळपासच्या सर्व लोकांची, शेजार्यापाजार्यांची आवडती झाली होती. दिसायलाही आकर्षक असल्याने सर्व तिचे कौतुक करीत. कुणी तिला हेमामालिनी म्हणे, तर कुणी अजून काही. पण तिच्या आईला मात्र हे रुचायचे नाही. वरवर ती हसून विषय बदलायची. आणि कपाळाला आठी पाडून, नाक मुरडून आत निघून जायची. आपल्याला मुलगी झाली हा तिला अपमान वाटायचा. तिला वाटे, पहिला मुलगाच झाला असता तर नातेवाईकांत मिरवता आले असते, कुणी आपल्याला हिणवू शकले नसते, पण हिच्यामुळे नाक खाली गेले. तिला मुलगी असण्यात कमीपणा वाटायचा. शिवाय पहिला मुलगा असेल तर लवकर हाताशी येतो, लवकर सून येते. लवकर चांगले दिवस येतात आणि आराम करता येतो, आपल्या ईच्छा पूर्ण करता येतात, अशी दोघां आईबापाची समजूत. शेवटी खेडेगावातले अर्धशिक्षित लोक ते! पण दुर्दैवाने विचार एखाद्या अशिक्षितापेक्षाही मागासलेले. गरिबी माणसाला कायकाय करायला लावते ! आईवडिल आपल्याच मुलीचा तिटकारा करत होते. पण आता दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजाने तिला वाढवून, मोठी करून,एकदाची कशीतरी उजवून टाकायची की, आपले काम संपले ह्याच त्यांच्या भावना! पण त्या छोट्या जीवाला याची जाणीवही नव्हती.
मग तिच्या पाठोपाठ दोन भाऊ झाले तिला. आईवडिल दोन्ही खूश. परिस्थिती बेताची असली तरी त्यातल्यात्यात जमेल तेव्हढे लाडकोड, चोचले पुरवले जायचे दोघांचे. हिच्याकडे अगदी जेवढ्यास तेव्हढे लक्ष दिले जाई.
पण गरीबी खूप काही शिकवते माणसाला. तिन्ही भावंडे शाळेत अतिशय हुशार! खरंतर तीच अभ्यास घ्यायची दोन्ही भावांचा. शिकवणी कुठली परवडायला? आणि परवडली तरी ती शाळेत हुशार असल्याने, तीलाच घ्यावा लागणार होता दोन्ही भावांचा अभ्यास. वेळ पडली तर दोन्ही भावांसाठी शिकवणी लावलीही असती आईवडिलांनी, पण हिला कशाला लावतील? गरीबीची पहिली आणि जास्त झळ बसते ती त्या घरातल्या मुलींनाच! याशिवाय घरातही तिला काही थोडे काम नसायचे. फक्त तिसरीत होती ती. पण रोज सकाळी लवकर उठून स्वतःचे आवरायचे, भावांना उठवून अंथरूण काढायचे, मग त्यांचेही सर्व आवरायचे. केर काढायचा. मग आई काहीतरी खायला द्यायची. खाऊन झाले की सर्व भांडी पटपट घासायची. आणि त्यानंतर जर काही अभ्यास राहिला असेल तर तो पूर्ण करायचा. तोपर्यंत शाळेची वेळ होई. मग भावाला बरोबर घेउन ती शाळेत जायची. जाताना त्याचेही दप्तर उचलून घेतले नाही, तर आई खाऊ की गिळू अशी बघायची तिच्याकडे. फार दमून जायची ती शाळेत जातानाच. भावाला त्याच्या वर्गात सोडल्यानंतर दोनदोन दप्तरे उचलून पाठ खांदे दुखायला लागायचे. तिला खूप वाटे, वडिलांकडे सायकल आहे, ते सकाळी लवकर दुकानात गेले तरी नाष्टा करायला घरीच येतात. मग आपल्याला नाही, निदान भावाला त्यांनी शाळेत सायकलवर सोडले तर खांदे दुखणार नाहीत. तिने खूपदा सांगितले घरी, 'शाळेत गेल्यागेल्या मला लगेच लिहायला येत नाही, खांदे दुखतात. तुम्ही दुकानात जाताजाता छोटूला शाळेत का सोडत नाही.? तो खूप हळू चालतो. मला त्याच्यामुळे उशीरपण होतो आणि छडी खायला लागते.' वडिल कोरडेपणाने म्हणायचे, 'ये! मला वेळ नाही!' आणि आई तर लगेच फटकारायची ,'तुले काय उचलून न्यायचं आहे का त्याला? दप्तर उचललंस तर लगेच मरशील का?' ती गप्प बसायची मग. सर्वात धाकटा बालवाडीत असल्याने त्याची शाळा वेगळी होती. तिला वाटायचे ,'बरं झालं, याची शाळा दुसरीकडं आहे.' त्याला न्यायला आणायला आई स्वतः जायची. शाळेतून आल्यावरही तिची सुटका नसायची. आधी दप्तर ठेऊन, हातपाय धुवून, कपडे बदलून झाले की,आईने भांड्यांचा ढिगारा घासण्यासाठी तयार ठेवलेला असायचा. त्यातून मान वर निघते तोच आई धाकट्याला तिच्याकडे खेळवायला द्यायची आणि मग निवांत स्वतः चे आवरून, चहा पिऊन स्वयंपाकाला लागायची. हिला भूकही लागलेली असायची आणि ती खूप दमलेलीही असायची पण खूप मागितल्याशिवाय तिला चहा किंवा खायला काहितरी मिळायचे नाही. तोपर्यंत मधला भाऊ निवांत आवरून, काहितरी खाऊन कधीचाच खेळायला गेलेला असायचा. तिला वाटायचे उगीच आपण सर्वात आधी जन्मलो. आपण सर्वात धाकट्या असतो, तर किती मज्जा आली असती. तेवढ्यात तिच्या मैत्रिणी तिला खेळायला बोलवायला यायच्या. ती समंजसपणे त्यांना नाही म्हणायची.
क्रमशः
लहान मुले आपल्या
लहान मुले आपल्या आईवडिलांबरोबर कोणत्याही परिस्थितीत खूशच असतात. ती जिथे असतील तिथे त्यांचे सुंदर विश्व तयार करतात>
छान लिहिले आहे.
वाचतेय. पुभाप्र
वाचतेय. पुभाप्र
वाचते आहे. छान आहे.
वाचते आहे. छान आहे.
छान.
छान.
धन्यवाद वीरू, जाई, अस्मिता.
धन्यवाद वीरू, जाई, अस्मिता.
धन्यवाद अज्ञातवासी !
धन्यवाद अज्ञातवासी !
वाचत आहे.. पुभाप्र!
वाचत आहे.. पुभाप्र!
छान आहे कथा.
छान आहे कथा.
धन्यवाद मन्या, रूपाली.
धन्यवाद मन्या, रूपाली.