कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ??

Submitted by शैलपुत्री on 10 June, 2020 - 23:54

हे लिखाण माझे नाही...
माझे मित्र श्री गणेश चव्हाण यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्यांनी मला नाव न टाकण्यासाठी सांगितले होते. तरी पण मला तसे करणे सयुक्तिक वाटले नाही...

कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ??
लेखक - श्री. गणेश चव्हाण.

हा प्रश्न आज बहुतेकजणांना तितकासा परिणामकारक वाटणार नाही.आता हे काय नवीन खूळ ? असा तुमचा उलट सवाल असू शकतो कारण कोरोना मुक्ती कधी होईल हे कुणीच सांगू शकत नाही.
कोरोनाचा विळखा आणि लॉकडाउन ची मरगळ आजही कायम आहे,आमचा संपूर्ण दिवस घरात बसून कोरोना माहात्म्य ऐकण्यातच निघून जातो.आजवर आम्ही कोरोनामुक्ती साठी प्रार्थना करण्याशिवाय कसलच योगदान दिलं नाही.शक्य असणारं योगदान ही आम्ही दिलं नाही कारण आम्ही उंबरा ओलांडण्यास धजावत नव्हतो.गरजेपुरतेच घराच्या बाहेर पडा असं आम्हाला सरकारने आव्हान केले होत.
आम्ही सोयीस्कररीत्या त्याचा अर्थ "फक्त स्वतःच्याच गरजेपुरते बाहेर पडा" असा काढला.म्हणून आज प्रश्न असा आहे की,जर आम्ही जगलो वाचलो तर

कोरोनामुक्ती नंतर पुढे काय
कोविड ची कीड इतक्यात जायची नाही हे जितकं खरं आहे तितकच हे पण खरं आहे की तोपर्यंत कोणताच देश लॉकडाउन ही ठेवू शकत नाही.
तेव्हा आता कोरोनाला कुरवाळत बसण्यात काहीच अर्थ नाही.
WHO ने आणि भारत सरकारने सुध्दा स्पष्ट केलं आहे की,
आपल्याला कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे.आणि लॉकडाऊन चं म्हणाल तर तो आता अंतिम टप्प्यात आहे असं मानायला वाव आहे.एखादा दुसरा लॉकडाउन होऊ शकतो पण तो सरसकट सर्वांनाच करकचून बांधून ठेवणारा नसेल.जनतेचं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं,अर्थव्यवस्था अजून गाळात जाऊ शकते म्हणून हे सारं.तेव्हा आपल्याला आता गियर बदलायला हरकत नाही.
सुरवातीस वेगळ्याच भासणाऱ्या अनुभूतीने अगदी पहिल्या लॉकडाउन च्या मध्यावरच आपल्या सर्वांची साथ सोडली.
त्या मंद झालेल्या शारीरिक आणि मानसिक हालचाली आता गतिमान व्हायला हव्यात.
बऱ्याच घटकांनी आपापल्या परीने "डर का माहोल" तयार करून ठेवला आहे त्याचं आता "डर के आगे जीत है" मध्ये रूपांतर व्हायला हवं.निदान सध्यातरी आपले मानसिक आरोग्य फक्त आपणच उत्तम राखू शकतो.मानसिक आरोग्य किती महत्वपूर्ण आहे याची आम्हाला आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली.
लॉकडाउन हा उपभोग नसून कर्माचे भोग आहेत हे आता सर्वांनाच कळून चुकलं आहे.या बंदिवासात सव्वा लाखाच्या झाकल्या मुठी पूर्णपणे उघड्या पडल्या आणि त्यांची किंमत आता चवली पावलीचीही राहिली नाही.त्यामुळे आता सगळीकडेच नव्याने सुरुवात होणार हे नक्की.
हा प्रश्न पडण्याचं अजून एक कारण म्हणजे आजवरची सर्व संकटे ही त्या त्या क्षेत्रापुरती मर्यादित होती.अलीकडच्या काळातील अवघे जग कवेत घेणारा कोरोना पहिलाच.
जवळपास प्रत्येकालाच शारीरिक,आर्थिक वा मानसिक पैकी कोणती ना कोणती झळ बसली आहेच.जर या संक्रमणात सारं जगच घुसळून निघालं असेल आणि तरीसुद्धा या मंथनातून काहीच बाहेर पडणार नसेल तर हा कोरोनावर खूप मोठा अन्याय होईल.

पृथ्वीच्या विनाशासाठी पडलेलं पहिलं पाऊल ही कोरोनाची ओळख सार्थ वाटत नाही का ???
आपण काळाची पाऊले ओळ्खलीच नाहीत तर ???
जर कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ? असा प्रश्न विचारला गेला तर,अरे आधी कोरोना समूळ नष्ट तरी होऊ देत,कोरोना नायनाटा नंतर मी टाळेबंदी चा क्षीण घालवण्यासाठी मुक्त संचार करणार आहे किंवा साधं सरळ आणि सोप्पं उत्तर म्हणजे पुढचं पुढं.अशीच काहीशी पारंपरिक धाटणीतील उत्तरे पुढे येतील.
किमान त्यांचं प्रमाण तरी कमी असावं म्हणून हा लेख......
आज बरेच जण आपला जीव वाचला म्हणून लॉकडाउन चे आभार मानतात.युरोप आणि अमेरिकेत जे मृतदेहाचे खच पडत होते त्याला लॉकडाउन ला झालेला उशिर हे प्रमुख कारण मानलं गेलं.ही बातमी ऐकून आपण हादरलो नसतो तर नवलच.म्हणजे आपण आता असेच मानतो की आपण लॉकडाउन मुळेच जिवंत आहोत आणि सरकारने निर्बंध शिथिल केले किंवा पूर्णपणे हटवले तरीसुद्धा आपली जिवंत राहण्याची शक्यता जास्त असणार आहे कारण आमची जागरूकता वाढली आहे,
आम्हाला मास्कचा वापर,सोशल डिस्टनसिंग आणि साबणाने वारंवार हात धुणे या आवश्यक सवयी लागल्या आहेत.मधल्या काळात आम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे घेतली आहेत इत्यादी...

म्हणजे सरकारने योग्य वेळी धाडसी निर्णय घेऊन,अर्थव्यवस्था गाळात घालून आणि एका वर्गाला मरणयातना भोगायला वाऱ्यावर सोडून हा जो आपला वाचवलेला जीव आहे तो आम्ही कोरोनामुक्ती नंतर भुईला भार म्हणून जगवणार आहोत का ???

प्रश्न टोकाचा वाटत असला तरी तो रास्त आहे आणि आपल्या आजवरच्या इतिहासाचा आढावा घेऊनच विचारण्यात आला आहे. इतिहास हेच सांगतो की आम्ही एका आपत्तीतून कसेबसे निसटतो आणि नंतरच्या दुसऱ्या आपत्तीतूनही कसेबसेच निसटतो.कारण आमची पुढचं पुढं,वेळ येईल तेव्हा बघू ही वृत्ती या दोन आपत्तींच्या मधील काळात आमच्या हातून ठोस असं काही घडूच देत नाही
आपण वाचलो पण एक वर्ग देशोधडीला लागला.हा वर्ग आजही मरणयातना भोगत आहे. त्यांचं आर्थिक मागासलेपण इथून पुढची बरीच वर्षे पहिल्यापेक्षाही उठून दिसणार आहे.हे तर बाधित होण्यापेक्षाही भयंकर झालं.
हातावर पोट असणारे,नोकरी व्यवसाया करून जेमतेम शिल्लक असणारे,Start Up व्यवसाय आणि बऱ्याच घटकांना फटका बसला पण दुहेरी फटका बसला तो परप्रांतीय मजूर वर्गाला.पोटाची खळगी भरण्याबरोबरच त्यांच्यापुढे स्थलांतर करण्याचं डोंगराएवढं आव्हान होतं.ज्यांना पायीच आपला गाव गाठावा लागला त्यांच्या यातनांना समर्पित
था गुरुर तुझे लंबा होने पे ये सडक
गरीब के होसले ने तुझे पैदल ही नाप लिया

ते इतक्या दुरून तडफडायला येतातच कशाला ? त्यांना प्लॅनिंग,सेव्हिंग करता येत नाही का हे जर कुणाचे आक्षेप असतील तर ते धादांत खोटे आहेत.
हे संकट संपूर्ण जगास नवीन आहे तेव्हा उपाययोजनामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता जास्त होती पण असं असलं तरी थेट महिनाभरानंतर सरकारला या वर्गाची आठवण यावी ? असं म्हणतात की माणूस एकाच वेळी सर्वांना खुश ठेवू शकत नाही जर हाच नियम केंद्र सरकारला लावला तर असच म्हणावं लागेल की सरकार सुध्दा एकाच वेळी समाजातील सर्व घटकांची काळजी घेऊ शकत नाही.तसं असेल तर मग त्या वर्गाला वाऱ्यावर सोडून सरकारने आपल्याला पहिलं वाचवलं आहे,
याची जाणीव आपल्याला ठेवावीच लागेल.
आज जवळपास सर्वच क्षेत्रात पडझड झाली कोरोनामुक्ती नंतर क्षमतेपेक्षाही जास्त काम आणि भरीव योगदान द्यावच लागेल.
बहाणा शोधण्याची कोणतीच मुभा आपल्याला नसेल कारण जीव वाचवण्यासाठी जो प्राधान्यक्रम होता त्यात आपण फार वरती होतो.जाणीवपूर्वक आपल्याला या महामारीतुन वाचवण्यात आलेलं आहे.आता कुणी म्हणेल सरकारने त्यांचं कर्तव्य केलं मग देशाप्रती आमची कर्तव्ये आम्ही कधी पार पाडणार ?? मेल्यावर ?? अभी नही तो कभी नही,हे स्वतःसाठी भरपूर वेळा म्हणून झालं,निदान आता तरी देशासाठी म्हणू.

सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा
एक शंका अशी आहे की जर हा विषाणू खरच इतका घातक आहे तर तो आपल्या अपुरे डॉक्टर्स,
अपुऱ्या सुविधा,काही प्रमाणात का होईना पण अकुशल /आळशी कर्मचारी वर्ग,उदासीन प्रशासन अशा खिळखिळ्या सार्वजनिक आरोग्य विभागाला झेपला तरी कसा ? सरकारची बधितांवर उपचारासाठीची सारी भिस्त ही खाजगी हॉस्पिटल्स पेक्षा या सरकारी विभागावर जास्त आहे. ह्या अगोदर कायमच टीकेचा धनी ठरलेला हा विभाग आज लढण्यात आघाडीवर आहे.
त्यांच्यावर सरकारने पुष्पवृष्टी देखील केली.जनतेने सुध्दा टाळ्या आणि थाळ्या वाजवून आपली कृतज्ञता व्यक्त केली.या संकटानंतर त्यांनी बदल म्हणून एक ब्रेक जरूर घ्यावा,रिफ्रेश व्हावं,कुटुंबासोबत वेळ घालवावा,
विश्रांती घ्यावी पण पुरेशी.ही विश्रांती दुसरी एखादी साथ येईपर्यंत नको इतकीच माफक अपेक्षा.तुमच्यावर उधळलेल्या फुलांचा गंध नेहमीच स्मरणात असू द्यात ही विनंती आणि पुनःश्च धन्यवाद !!
एक कोरोना काय आला आणि इतर सर्व आजार पळून गेल्यासारखे वाटू लागलं.
अधूनमधून छळणारी मानसिक अस्वस्थता सोडली तर आजकाल आम्हाला दुसरा कुठलाच आजार होत नाही.काही किरकोळ आजार हे आपोआप बरे होतात तर काही घरगुती उपचाराने.हे आम्ही आजपर्यंत ऐकून होतो आता त्याची प्रचिती आली.
उठसुठ दवाखान्याकडे धाव घेण्याची सवय आता बऱ्यापैकी मोडली आहे.कोरोनामुक्ती नंतर ही आम्ही ही सवय कायम राखणार आहोत का ? तसही या संकटकाळी कोणत्या खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटल्सने धोका पत्करून जनतेची मनोभावे सेवा केली ? इतर वेळी 24 तास सेवा देणारे हॉस्पिटल्स कारवाई चा बडगा उगरल्या नंतर खुली केली गेलीत का ? पेशंटला दाखल करण्यास नकार दिला गेला का ? त्यांची अडवणूक करून अव्वाच्या सव्वा बिले आकारली गेलीत का ? याची माहिती आपण करून घ्यायला हवी.मग नंतर कधी गरज पडलीच तर आपण पुन्हा त्या दवाखान्याची पायरी चढणार का ? अशा हॉस्पिटल्सवर सरकारने कारवाई करावी,बंदी घालावी अशी अपेक्षा करणं चूक आहे.आजवरच्या प्रत्येक सत्तारूढ सरकारच लक्ष काही ठराविक विभागांवरच मर्यादित राहिलं आहे.त्यांचे लागेबांधे आणि हितसंबंध लपून राहिलेले नाहीत.
लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी सरकारी कारवाईची गरज नसते.जनतेचा निश्चय हाच सरकारी उदासीनतेवर चांगला उतारा ठरणार आहे त्यामुळे सरकारी कारवाईपेक्षा "जनतेची कार्यवाही" अधिक उपयुक्त ठरणार आहे.ती व्हायला हवी.

आता सरकारी कारवाईचा,बंदीचा विषय निघाला आहे म्हणून अजून काही मुद्दे.
कोरोनाच्या आधी दारूबंदी चा मुद्दा होता तो कोरोना काळात "दारूविक्री आवश्यकच" यात रूपांतरित झाला.सरकारने महसूल हे कारण त्याकरिता पुढे केले.म्हणजे दारूबंदी जवळपास अशक्यच आहे म्हणायची.या गोष्टीचा तळीराम आणि कंपनीला आनंदच होईल पण अपेयपान न करणाऱ्यांना सुध्दा दुःख व्हायचं काहीच कारण नाही.या काळात माल सहज उपलब्ध न झाल्याने जर काहींची सवय सुटली असेल तर त्यांनी आता पुन्हा बाटलीस स्पर्श करू नका.नवीन उमेदवार तयार होण्याची शक्यता कमीच होती पण जुन्या जाणत्या उमेदवारांनी मात्र नेहमीच काही पथ्य पाळावीत.जसे की,
अतिमद्यपान न करणे,पिऊन उघड्यावर चारचौघात धिंगाणा घालू नये,बरळू नये,दारू पिऊन वाहन न चालवणे,कारणास्तव केव्हातरी शक्यतो आनंदातच मद्यपान करणे,अनोळखी लोकांसोबत मद्यपान न करणे,
पिताना बोलताना मनावर ताबा असावाच,वादग्रस्त विषयास हात न घालणे इत्यादी इत्यादी.....
आता Daily Soaps बद्दल.या मालिका किती भिकार आणि टुकार आहेत हे बऱ्याचदा त्या पाहणाऱ्या प्रेक्षकांकडूनच ऐकायला मिळतं.तरीसुद्धा अखंडितपणे या मालिका पाहिल्या जातात.हे काय गौडबंगाल आहे हे ते प्रेक्षकच जाणो.(व्यसन म्हणायचं नाही कारण व्यसन हे फक्त दारूचच असतं,असो) नवीन भागाचं शूटिंग बंद असल्याने धूर्त आणि चाणाक्ष चॅनेल्सवाल्यांनी जुन्याच मालिकांचं पुनः प्रक्षेपण सुरू केलं.मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अशी भावनिक साद घातली गेली परिणामी हा प्रेक्षक वर्ग पुन्हा त्यातच गुंतून पडला.त्यांच्या हाती नवीन काही गवसलं नाही.कोरोनामुक्ती नंतर हा वर्ग पुन्हा daily soaps चे हक्काचे प्रेक्षक म्हणवून घेण्यात धन्यता मानणार आहे का ??
मालिका तर येणारच.दर्जा,विषय, आशय चांगला नाही म्हणून सरकार काय त्यावर बंदी घालणार नाही.हे अगदीच अपवादात्मक परिस्थितीतच होऊ शकतं आणि ते ही एखाद्या दुसऱ्या मालिकेबद्दल.चांगले विषय घ्या म्हणून प्रेक्षकांनी वाहिन्यांवर दबाव आणला तरी खूप झालं.नाहीतर आमचा वेळ जावा म्हणून नित्यनेमाने आमच्या पुढ्यात काहीतरी ढकलत चला इतकीच काय ती अपेक्षा असेल तर,ही अगदीच अगतिक आणि हतबल अवस्था आहे म्हणायची.
सरकारने जसे महसुलाचे कारण पुढे केले तसेच हा वर्गही "आम्ही मालिका नाही पाहिल्या तर या इंडस्ट्रीवर खूप मोठं संकट येईल" असे माणुसकीपर उदगार काढून त्या पाहणं सुरूच ठेवू शकतो.
शेवटी TV ही तुमचाच आणि रिमोट ही तुमचाच.
दारूबंदी होणार नाही की मालिकाबंदी.मग इथे सुद्धा उपभोग घेणाऱ्यांसाठी काही "मार्गदर्शक तत्वे" असू शकतात का ??
स्मार्टफोन विषयी इतकच सांगेन की स्मार्टफोन हा स्मार्टच असतो,वापरकर्ते मात्र इडियट्स ठरत आहेत.
दुर्दैवाने दिवसागणिक या इडियट्स वर्गाचे प्रमाण वाढतच जाऊन ते हाताबाहेरही गेलं आहे.

पुण्या मुंबईत कामानिमित्त आलेले छोट्या शहरातले आणि गावाकडचे मराठीजन
लॉकडाऊनची कुणकुण लागताच आता पुण्या मुंबईची फाळणी झाली आहे असा समज या वर्गाचा झाला असावा पण सरसकट सर्वांनीच गावाकडे येण्याची गरज होती का?? मला तर हे जहाज बुडताना सर्वप्रथम जहाजाबाहेर उडी मारणाऱ्या उंदरासारखे वाटले.
गावकीच्या खोलीत शिफ्टनुसार ऍडजस्ट करत दाटीवाटीने राहणारे चाकरमानी,जेमतेम शिल्लक असताना कुटुंबकबिला कसा चालवायचा या विवंचनेत असणारे,बॅचलर्स रूम घेऊन राहणारे काही नोकरदार,विद्यार्थी यांचं ठीक आहे.त्यांच्या जेवणाचे हाल होणार होतेच.पण इतरांचं काय ? तुमची गावची ओढ सर्वश्रुत आहे पण कर्मभूमीशी तुमची नाळ अजूनही का जुळली नाही ?? खरं तर याची तुम्हाला लाज वाटायला हवी.
तुम्हाला पुणे,मुंबई ही महानगरे कशाला हवी असतात ? लचके तोडायला,पैसे कमवायला की सुट्टीसाठी गावी येऊन रुबाब झाडायला ?? तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणात परत येऊन दोन्हीकडच्या यंत्रणेवरचा ताण अकारण वाढवलात.जे अगदी सुरवातीला परत आले त्यांनाही गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.काहींनी गुपचुप सहन केलं तर काहींनी बघून घेईन ची भाषा केली.15 दिवसांनी वरकरणी का होईना पण वातावरण निवळलं.पण आता दुसरा लोंढा येणार याची कुणकुण लागली तेव्हा मात्र हा पहिल्या टप्प्यात गावी सुरक्षित कवचात येऊन स्थिरावलेला वर्गही त्यांना विरोध करू लागला.याला स्वार्थ नाहीतर काय म्हणायचं ? एक लक्षात घ्या सामाजिक दुहीची विषवल्ली या विषाणूने नाही तर तुम्ही गावामध्ये आणली आहे. सुरवातीस आलेले काय किंवा आत्ता आलेले काय,तुमच्या न येण्याने बरच काही टळलं असतं. गाववाले कोरोना प्रसारासाठी तुम्हाला जबाबदार धरणार आहेत,चीनला नव्हे.तुम्ही गावच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहात हे मान्यच.गाव संकटात असताना तुम्ही भरभरून दिलं हे सुद्धा कुणीही विसरलं नाही.पण आजवरच्या संकटांशी कोरोनाची तुलना होऊ शकते का ? अहो कोरोनाची गोष्ट वेगळी,त्याने आता अलीकडच्या काळातील सर्व संकटांमध्ये अगदी वरचं मानाचं स्थान पटकावलं आहे.
साधी गोष्ट आहे जर कोरोना संसर्गजन्य नसता तर कशाला तुम्हाला कुणी अडवलं असतं ? आता आला आहात ना तर किमान नियम तरी पाळा.
ऐसपैस घरे,शेती शिवार,मोकळी हवा,डोंगर दऱ्या यांना किती दिवस कवटाळून बसणार ? तेव्हा कोरोनामुक्ती नंतर परत पुण्या मुंबईला जाल ना तेव्हा,पैसा कमवाच,त्या शहरांचं सौंदर्य वाढवता येतय का बघा,वाढवता येते नसेल तर किमान आहे ते तरी बिघडवू नका आणि सोबतच या महानगरांवर माया सुध्दा करा.
आपल्या आयुष्यात कर्मभूमीचं स्थान हे जन्मभूमीच्या मानाच्या स्थानापेक्षा यत्किंचितही कमी नसतं तर ते बरोबरीचं असतं हे ही नेहमी लक्षात असू द्यात.

स्वदेशी वापराची चळवळ
ही जुनीच चळवळ आता नव्या रुपात समोर आली आहे.पहिली देशभक्तीची किनार होती आता त्यावर चीनच्या पराकोटीच्या द्वेषाचा मुलामा चीननेच चढवला आहे.या चळवळीच्या प्रसारासाठी उदाहरण दिलं जातं ते जपानचं,
म्हणजे अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जपानने अमेरिकेकडून साधी सुई सुध्दा विकत घेतली नाही हे.आता कोरोनाचा प्रसारक हा चीनच आहे यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखीच परिस्थिती आहे. तेव्हा इथून पुढे चिनी वस्तूंवर बहिष्कार.ही भावना रास्तच आहे, याबद्दल कुणाचही दुमत नसावं. चीनच्या बाजारपेठेबद्दल आणि त्यांच्या जागतिक व्यापारातील अढळस्थाना बद्दल सांगायचं झालं तर हे एक महाकाय प्रकरण आहे आणि ते त्यांनी राक्षसी म्हत्वाकांक्षेतून आणि अफाट कार्यक्षमतेतून साकारले आहे,
नुसत्या घोषणाबाजीने नव्हे.
तूर्तास भारतीय औद्योगिकीकरण आणि बाजारपेठ याबद्दल....
ते जपानचं उदाहरण कुठं देता राव.औद्योगिकीकरण आणि नवनवीन तंत्रज्ञान यात त्यांचं स्थान जगात खूप वरचं आहे. नुसतं कामगार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर,जर भारतीय कामगार 8 तास काम करतो तर जपानी कामगार 480 मिनिटे काम करतो.आता बहुतांश भारतीय कामगार म्हणतील,अरे येड्या 8 तास आणि 480 मिनिटे एकच की.आहे ना गम्मत ? म्हणजे भारतीय कारखानदारी मध्ये "480 मिनिटे कामच" करण्याची संस्कृती रुजायला अजून किती वेळ लागेल ? ती रुजेल तेव्हा खऱ्या कष्टकरी कामगार वर्गाला न्याय मिळेल.
कारण एक वर्ग अजूनही टाईमपास करून जेमतेम काम करतो.सुपरवायझर चे,युनियन अध्यक्षांचे चमचे यांचं काम तर त्याहूनही जेमतेम किंवा नगण्यच.
शिवाय कायमस्वरूपी,
हंगामी,स्थानिक,परप्रांतीय ही वर्गवारी आहेच.त्यांचे प्रोडक्शन टार्गेट्स सुध्दा वेगवेगळे असतात.
या अशा वातावरणात उत्पादन सुध्दा जेमतेमच होणार.सर्व स्वदेशी कंपन्या ह्या संपूर्ण 137 कोटी भारतीय जनतेला फक्त पुरणारी ( पुरून उरणारी नव्हे ) उत्पादने देण्याइतक्या मोठया आकाराच्या आहेत का ? शिवाय भारतात भारतीय मजुरांकरवी उत्पादन काढून घेणाऱ्या काही विदेशी कंपन्या आहेत.मग त्या वस्तू स्वदेशी की विदेशी हे कसं ठरवायचं ? चीनमधुन बाहेर पडणाऱ्या उद्योगांना भारत सरकार पायघड्या घालत आहे, त्याला विरोध कसा करायचा ?
जागतिक व्यापारउदीम,निर्यात यांचं काय ? आता तुम्हाला वाटत असेल की मी या चळवळीच्या विरोधात आहे म्हणून,तर तसं काहीही नाही.मी सुध्दा पुरस्कर्ताच आहे आणि जमेल तसं अनुकरणही करणार आहे.मग आता तुमचा पुढचा प्रश्नही तयार असेल,आहेस ना पुरस्कर्ता मग कशाला हे विदेशी भारुड लावायचं ? अरे बाबांनो आता आपण ठरवलं आहे ना,की चिनी मालाला टक्कर द्यायची मग आपल्याला ही किमान मूलभूत माहिती असणं आवश्यकच आहे.
पहिलं हे अतिशय स्पष्टपणे ठरवावं लागेल की स्वदेशीचा पुरस्कार म्हणजे फक्त चिनी वस्तूंवर बहिष्कार की सरसकट सर्वच विदेशी वस्तूंवर बहिष्कार ??
हे ठरवण्यातच गफलत झाली तर मग "जुगाड क्रांती" च होणार !!

पठडीतील भारतीय राजकारण
पण त्या अगोदर मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा अगदी Typical असा समर्थक/विरोधक नाही.एक वर्ग असा आहे की जो सत्तारूढ सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो,त्याचं पारदर्शकपणे मूल्यमापन करत असतो.मी या वर्गातील आहे(हवं तर तुम्ही आम्हाला "अतृप्त आत्मा" असं म्हणा).या वर्गाचा सरकारच्या चांगल्या निर्णयांना नेहमी पाठिंबाच असतो आणि चुकीच्या निर्णयांना विरोधही.विरोध करण्याची वेळ येते कारण भारतात एक सरकार जाऊन दुसरं सरकार आलं म्हणजे असं कधीच होत नाही की,रावणाचं राज्य जाऊन रामराज्य आलं. फारफार तर,दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार घडतो.त्यामुळे या वर्गाचं अस्तित्व कायम असायलाच हवं.समर्थक/विरोधक या वर्गाच्या कात्रीत सापडून सुध्दा हा वर्ग आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे तो त्याच्या वैचारिक आणि निधर्मी वृत्तीमुळे.ह्यांना कोण विचारतो असं सत्ताधारी/विरोधी आपापल्या आंधळ्या समर्थकांना नक्कीच सांगू शकतील.पण ते वरवरचं असेल.
या वर्गाची उघडउघड दहशत नसली तरी त्यांचा अदृश्य धाक आणि आदर कायम असतो.
सोशल मीडियाने मात्र अविचारी आणि अनियंत्रित अशा करोडो समर्थक/विरोधकांची फौज देशाच्या माथी मारली आणि देशाच्या अधोगतीला हातभारच लावला
या वर्गाला हवा तो मजकूर उपलब्ध करून द्यायला एक स्वतंत्र यंत्रणा( IT Cell) ती ही प्रत्येक पक्षाची,प्रत्येक जाती धर्माची नेहमीच सज्ज असते.
आपण केवळ बळीचे बकरे आहोत हे जेव्हा या वर्गाला कळेल आणि तो वर्ग यातून बाहेर पडेल तो देशासाठी सुदिन असेल.

पहिलं लॉकडाउन सुरू झालं.
सुरवातीस सहकार्याच्या एकजुटीने लढण्याच्या आणाभाका घेऊन झाल्या.
सत्ताधारी,विरोधक यांच्यात एकवाक्यता दिसू लागली पण पहिलं लॉकडाउन संपण्याच्या आतच कलगीतुरे रंगू लागले.
अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली ती ममता दिदींपासून.मग आले धडाकेबाज कॅप्टन अमरींदर सिंग जी.आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मात्र मेटाकुटीला आलेले दिसतात.त्यांची सुरवात जोशात झाली पण नंतर त्यांचा ठाकरी बाणा पुन्हा बऱ्याच कालखंडाने एकदाच काय तो दिसला,तो ही आमदारकी पदरात पाडून मुख्यमंत्रीपद वाचवण्यापूरता.
उलट त्यांच्यापेक्षा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्रीच जास्त भाव खाऊन गेले जरी ते एका भ्रष्टवादी पक्षाचे आमदार असले तरी.
भाजपशासित मुख्यमंत्री मोदीजींच्या समोर तोंड उघडतील ही अपेक्षा त्यांच्याकडून नव्हतीच आणि झालं ही तसच.या सर्वात उठून दिसतात ते नुकतेच पंचाहत्तरी पूर्ण केलेले केरळचे तरुण तडफदार मुख्यमंत्री श्री पी.विजयन सर.केरळचा महिमा माहिती नसेल तर माहिती करून घ्या.या राज्यात गेली 11 वर्षे आंतरराष्ट्रीय आरोग्य आपत्तींना तोंड देण्यासाठी डॉ.अमर फेटल यांच्या नेतृत्वाखाली Health emergencies of International concern's, Kerala हे स्वतंत्र कार्यालय कार्यरत आहे.या राज्यात देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण सापडतो काय आणि हे राज्य संपूर्ण जगास घायकुतीला आणणाऱ्या या विषाणूला वठणीवर आणतं काय.तुम्हा आम्हाला सारच अविश्वसनीय पण केरळने करून दाखवलं इतकं करूनही ते गाफील नाहीत की त्यांनी त्यांच्या विजयाचा डांगोरा पिटायला सुरवात केली नाही प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली नाही की राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्याची सुबुद्धी सरकारला सुचली नाही.कोरोनाशी लढाईमध्ये जगाच्याही दोन पाऊल पुढे असलेल्या केरळमध्ये,
राष्ट्रीय पातळीवर नाकर्ते आणि अकार्यक्षम ठरलेल्या काँग्रेसचे सरकार कसे काय असू शकेल हा प्रश्न खरं तर मला सुध्दा पडला पण तेवढ्या पुरताच.केंद्र सरकारने मात्र फारच मनावर घेतलं आणि एक चांगली संधी वाया घालवली.तशी अजूनही वेळ गेलेली नाही पण तसं केलं तर मग राजकारणाचं काय ?? हीच गत केंद्र सरकारने राजस्थातील भिलवाडा पॅटर्नची सुध्दा केली.
घाईगडबडीत लॉकडाउन ची अंमलबजावणी केली.राज्य सरकारांना कल्पना दिली गेली असेल,पण त्यांच्याकडून कोणत्या सूचना मागवल्या होत्या का ? की त्यांना कोणते अधिकार दिले गेले होते का ? याबद्दल शंका घेण्यास वाव आहे.साथरोग प्रतिबंधक कायदा,आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत सर्व अधिकार केंद्र सरकारने आपल्या हातात घेतले.आपण दिल्लीतून सर्व नियंत्रित करू,श्रेयवाद लाटू असाच काहीसा केंद्र सरकारचा होरा दिसत होता.पण हा विषाणू काय सहजासहजी नियंत्रणात येत नाही हे लक्षात येताच मग राज्यांना अधिकार देण्याची भाषा सुरू झाली,सूचना मागवल्या गेल्या.पण राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा राजकारणीच.ते "तुम्ही म्हणाल तसं" असं अगदी लडिवाळ स्वरात केंद्र सरकारला सांगून मोकळेही झाले.ते प्रत्यक्षात असं होतं की,आता घेतली आहे ना जबाबदारी तर निस्तरा तुमचं तुम्हीच.म्हणजे कारण कोणतेही असो राजकारण अटळ आहे.मग कोरोनामुक्ती नंतर आपल्यासमोर जी आव्हाने उभी ठाकतील त्याकरिता फक्त राजकारण्यांवर अवलंबून राहून जमेल ?? आपण सर्वांनी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की,मनुष्यला लाभलेल्या "विस्मृती" या देणगीचे खरे लाभार्थी हे सर्व राजकीय पक्षच ठरतात.त्यांना कधीच कळालं आहे,जनता काय हो,जाईल विसरून.खरं तर जनमताचा रेटा ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे मग जनमताचा रेटाच नसेल तर जनतेच्या हालअपेष्टा,जनतेचा आक्रोश असं ही काहीच नसेल,जरी ते तसं समोर दिसत असलं तरीही
लॉकडाऊन चं थोडं फार यश कशात असेल तर ते ह्यात आहे की या काळात कोरोनाशी कोणत्याही पातळीवर लढण्यासाठी आवश्यक अशी सुसज्ज यंत्रणा तयार केली गेली आहे का ? कारण तज्ज्ञांच्या मते किमान काही महिने तरी बधितांचा आकडा चढाच राहणार आहे आणि पुरेशा प्रमाणात वैद्यकीय सेवा असेल तरच मृत्युदर अत्यल्प राखला जाणार आहे.या संकटाच्या सुरवातीलाच एका पाश्चिमात्त्याने असं म्हणलं होतं की जर या संक्रमणाची सुरवात भारतापासून झाली असती तर ?? त्याला कारण विषाणूचं उपद्रवमूल्य नव्हतं तर भारतातल्या अपुऱ्या सुविधा हे होतं.तेव्हा सरकार आम्हाला सांगणार आहे का,या सुविधांचं काय झालं ?? कारण यासाठी सर्वांनाच खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे.
काही दिवसांपूर्वीच सरकारी सूत्रांनी असा दावा केला की,
वेळीच लॉकडाउन केला नसता तर आजतागायत भारतात 29 लाख बाधित असते आणि 2 लाखापर्यंत मृत्यू.जरी हा जर तर चा दावा मान्यही केला तरी सरकारच्या या कृतीला आम्ही काय म्हणावं ? सरकारची कर्तव्यतत्परता की मार्केटिंग स्ट्रॅटेजी.दावा ठोकण्याची इतकी घाई कशासाठी ? लॉकडाउन म्हणजे कोरोनावर मिळवलेला सर्वंकष विजय नव्हे.त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला खरा पण ही झाली एक बाजू.दुसऱ्या बाजूला जी वाताहत झाली आणि अजूनही सुरूच आहे ती का दिसत नाही कुणाला ?
इतक्यातच लॉकडाऊन चं यश साजरं करण्याची जर सत्तारूढ पक्षाला,त्यांच्या समर्थकांना आणि अडाणी जनतेला घाई झाली असेल तर त्यांना सांगावंसं वाटतं की,जर तुम्ही आत्ताच यश साजरं करणार असाल तर तो तुमच्या अंतिम उद्दिष्ट साध्य होण्यापूर्वीच अर्धवट विजयश्री साजरी करण्याच्या परंपरेचा एक भाग असेल.........

कोरोनामुक्ती नंतर भारत विश्वगुरु आणि महासत्ता होणार
आम्हाला हे स्वप्न दाखवल्याबद्दल मोदीजींचे आभार आणि त्यांना आमचा पाठिंबाही.त्यांची दूरदृष्टी वादातीत आहे,कार्यक्षमता अफाट आहे आता थोडाफार आक्षेप आहे तो कार्यशैली बद्दल.कुणा एकट्यामुळे भारत स्वतंत्र झाला नाही तसेच तो कुणा एकामुळे महासत्ता ही होणार नाही.तुम्ही अधिकारांचं विकेंद्रीकरण करत नाही,सर्व जबाबदाऱ्या आपल्याच शिरावर घेता किंवा किमान त्यांचं श्रेय आपल्या पदरात कसं पडेल याची तजवीज तरी करून ठेवता.
अशाने आळशी,कठपुतली मंत्रीगणांचा काही प्रश्नच येत नाही पण ज्यांची क्षमता आहे ते सुद्धा ( काही सन्माननीय अपवाद वगळता ) निर्णय घेण्यात रस दाखवत नाहीत.म्हणजे तुम्ही अधिकारी वर्गावरच जास्त अवलंबून असता.अधिकारीच सगळं करणार असतील तर मग निवडणुका,लोकप्रतिनिधी हे निदान तुम्ही असेपर्यंत तरी बंद करा.तो पैसा तुमच्या अभियानाला वापरा.जनतेला जळी स्थळी तुम्हीच दिसता आणि सगळं काही तुम्हालाच करावं लागतं असाच त्यांचा समज आहे.कित्येकजण तर "एकट्या माणसानं काय काय करावं" म्हणून हळहळ व्यक्त करतात,
तुमच्याविषयी काळजी व्यक्त करतात आणि इतरांच्या नावाने बोटे मोडतात.तेव्हा आता तुम्हालाही जास्त त्रास नको म्हणून अधिकारांचं वाटप होऊच द्यात.तुमचा धाक कमी का आहे ? तुमच्या भीतीने आळशी मंत्री,खासदारही कामे करू लागतील.त्यांनी कितीही झेंडे गाडले तरी तुमचे स्थान कुणीतरी घेऊ शकतं का ? तुमचं अढळस्थान पुढची कित्येक वर्षे कायम राहणार आहे.
कोरोनासोबत किती काळ जगायचं माहीत नाही पण BJP सोबत म्हणजे पर्यायाने तुमच्या सोबत आम्हाला 2029 पर्यंत तरी नक्कीच जगायचं आहे.आमची तयारी सुध्दा आहे.सशक्त विरोधी पक्ष आहेच कुठे ? काय ते गांधी नेहरु घराण्यांचे वारसदार आणि काय ते त्यांची पायधूळ मस्तकी लावण्यासाठी धडपडणारे काँग्रेसजण.सगळाच आनंदी आनंद.2029 पर्यंत तरी तुमच्या सरकारला कसलाच धोका दिसत नाही.तोपर्यंत तुम्ही आम्हाला एक स्वप्न पूर्ण व्हायच्या आतच दुसरं स्वप्न दाखवत चला.
तेवढाच आम्हालाही आधार,...

भारतीय जनता
आता नुसतीच राजकारण्यांच्यावर टीका करून काय फायदा ? जनतेची म्हणून काय जबाबदारी असते की नाही ? राजकारणी आपल्या कोषात आणि जनता आपल्याच कोषात.मग बदल होणार तरी कसा ??
95% हून अधिक मतदार जनता ही षंढ(दचकलात की काय) म्हणजे 6 प्रकारात गुरफटली आहे.जात-धर्म,भावकी-गावकी,
रोजी-रोटी,व्यवसाय-नफा,
पॅकेज -मोडगेज आणि समर्थक-विरोधक.
जातीधर्मा विषयी बोलायचं झालं तर भारतातून एक वेळ विषाणूची साथ एकवेळ कायमची हद्दपार होईल पण जात धर्म कधीच नाही.सर्वधर्मसमभाव हे आता एक थोतांड होऊन बसलं आहे.त्या त्या धर्मातील वलयांकित नेते,धर्मगुरू हे कधीच होऊ देणार नाहीत.हे लोक आम्हाला स्वधर्मावरील श्रद्धा, निष्ठा शिकवत नाहीत पण परधर्म निंदा जरूर शिकवतात आणि आम्ही सुध्दा यांनाच प्रमाण मानतो ना की आमच्या धर्मग्रंथांना.कुठल्याही धर्माचा ग्रंथ आम्हाला परधर्म निंदेची शिकवण देणार नाही,इतकं साधं आम्हाला कळू नये मी हिंदू,मी मुस्लिम, मी मराठा,मी ब्राह्मण अशी ज्वलनशील बिरुदे लावून जगण्यात आम्ही धन्यता मानणार असू तर मग या समाजविघातक शक्तीचं फावणारच त्यांनी एक काढी टाकायचा अवकाश,आम्ही क्षणार्धात पेट घेणार.पण जर आम्ही मानवता या एकाच धर्मासोबत एकनिष्ठ राहून जगणार असू तर ह्या शक्ती सुध्दा आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत.
गावकीकडे दुर्लक्ष करण्याची कला आता आपल्याला अवगत झाली आहे पण भावकीचं काय ? भावकी हा "असून खोळंबा आणि नसून पंचाईत" असा न टाळता येण्याजोगा प्रकार आहे.असं असलं तरी इथे संघर्ष नको.उभं आडवं आयुष्य यांच्याशी संघर्ष करण्यात घालवलं तरीसुद्धा काहीतरी किंतु परंतु राहणारच.त्यांच्याशी कामाशी काम इतका संबंधही पुरेसा आहे.
जास्त उपद्रव असेल तरीसुद्धा दुर्लक्ष केलेलेच बरं.जर काय सूनवायची वेळ आलीच तर भूतकाळातील काहीच उगाळत बसू नका,मुद्देसूद बोला आणि एकदाच.भावकी आणि गावकीमध्ये अडकून पडण्यासारखं असं काहीच नाही.
रोजच्या भाकरीची भ्रांत असणारा वर्ग हा देशाकडे बघूच शकणार नाही आणि त्यासाठी या वर्गाला दोषही देता येणार नाही.
हा वर्ग स्वतःच्या अज्ञानाचा जितका बळी आहे तितकाच राजकीय अनास्थेचा आणि सामाजिक विषमतेचा ही बळी आहे.तेव्हा या वर्गाकडून जास्त अपेक्षा ठेवता येणार नाहीत.
व्यवसाय नफा,पॅकेज मोडगेज या वर्गाला काहीतरी करण्यास वाव आहे. नोकरी धंद्यात स्थिरस्थावर झाल्यानंतर ते करता करता अगदी थोडक्या काळासाठी का होईना या वर्गाने सुदृढ समाज व्यवस्थेसाठी आपलं योगदान द्यायला पुढं यायला हवं.
विरोधक/समर्थक या वर्गाने सुध्दा आता सारासार विचार करायला हवा.ते कट्टर का काय म्हणतात ते असेनात का त्यांच्या दैवताबरोबर.पण जे अंध आणि मध्येच लोम्बकळणारे आहेत त्यांनी तरी डोळे उघडा.हा तिसरा वर्ग काय आहे ते समजावून घ्यायचा किमान प्रयत्न तरी करा.

आपण सामाजिक जाणिवा/उणीवा,औद्योगिक क्रांती,अर्थ क्रांती,प्रगत शिक्षणपद्धती,
भ्रष्टाचार मुक्त भारत,चांगल्या वैद्यकीय आणि सरकारी सेवा इत्यादी विषयी नेहमीच बोलत असतो.कधी कधी तर अगदीच पोटतिडकीने बोलतो.हे सगळं साध्य कसं करायचं याविषयी तज्ञांकडून बरच लिहून झालं आहे.बोलून झालं आहे.ते वाचन करणाऱ्यांनी वाचलं आहे ऐकणाऱ्यांनी ऐकलं आहे.म्हणजे आमच्याकडे तज्ञ आहेत,त्यांना मनोभावे वाचणारे,ऐकणारे आहेत.समीक्षक,विश्लेषक आहेत.(या सर्व वर्गांबद्द्ल आदर आहेच) आम्हाला समृद्ध वारसा आहे,उपलब्ध साधनसामग्री आहे,देशात स्वातंत्र्य आहे,
लोकशाही आहे,आमच्या मस्तकात तिडीक आहे मग इतकं सगळं असतानाही डोळ्यात चटकन भरणारं शंभर नंबरी यश आज एकाही क्षेत्रात का दिसत नाही ?? कारण आमचा जास्त जोर हा लेक्चर्स, थेअरी शिकवण्यावर,उदाहरणे, दाखले देण्यावर असतो प्रॅक्टिकल आम्ही जेमतेमच करतो, निष्कर्ष येण्याअगोदरच आमचा प्रयोग थांबलेला असतो किंबहुना आम्ही अपयश किंवा जेमतेम यश असा निष्कर्ष आधीच काढलेला असतो आणि मग प्रयोगाचा डोलारा उभा केलेला असतो
निष्कर्ष - आज एक वर्ग अस्वस्थपणे काठावर येरझाऱ्या घालत आहे,किमान या वर्गाने तरी "दाग अच्छे है" म्हणत आनंदाने चिखलात उतरायला सुरुवात करायला हवी.
या कामी आम्हाला,माझ्या एकट्याने चिखलात उतरून काय होईल किंवा माझ्या एकट्याने नियम पाळून काय होईल या कुप्रसिद्ध वचनांचा अडथळा न येवो,हीच प्रार्थना.

माझ्या लेखनाने तुमचं समाधान झालं असेल किंवा नसेल.
तुम्हाला ते आवडलं असेल वा नसेल पण तरीही स्वतःला आज एक प्रश्न नक्की विचारा की कोरोनामुक्ती नंतर पुढे काय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Corona नंतर दुसरा कोणता भयानक विषाणू,जिवाणू प्रगट होवू शकतो ह्याचा अभ्यास होणे गरजेच आहे.
बाकी अगणित आपत्ती पृथ्वी भोवती घिरट्या घालत आहेत.

मस्त लेख,
बऱ्याच गोष्टींचा चांगल्यारित्या आढावा घेतला गेलेला आहे. Happy

कोरोनासोबत किती काळ जगायचं माहीत नाही पण BJP सोबत म्हणजे पर्यायाने तुमच्या सोबत आम्हाला 2029 पर्यंत तरी नक्कीच जगायचं आहे.आमची तयारी सुध्दा आहे.सशक्त विरोधी पक्ष आहेच कुठे ? काय ते गांधी नेहरु घराण्यांचे वारसदार आणि काय ते त्यांची पायधूळ मस्तकी लावण्यासाठी धडपडणारे काँग्रेसजण.

Proud
अमित शहाच्या ऑनलाइन सभेने दाखवले की ह्यांना समाजसेवेत रस आहे की प्रचार सभेत.

मोदी केअर फँडाचे काय झाले हे जनतेला करोना नंतरच्या काळात तरी समजेल का ?

काँग्रेस न आवडणारे लोक मोदी शहाने 6 वर्षात बांधलेली हॉस्पिटल शोधून त्यातच उपचार घेतील तर बरे होईल

*पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशाचा तपशील सादर करा; १०० माजी निवृत्त अधिकाऱ्यांचे पीएम मोदींना पत्र*

https://pudhari.news/news/National/100-former-bureaucrats-raised-questio...

<< पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशाचा तपशील सादर करा; >>

------ No Data Available, कुठलेही काम पारदर्शक नाही.
त्यांनी डेटा दाखवला तरी लोक कितपत विश्वास ठेवतील या बद्दल शंकाच आहेत त्यामुळे पण ते डेटा तयार करत नाहीत. आय टी सेल ला इतरही महत्वाची कामे आहेत. सध्या तरी शेतकरी आंदोलना पासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविणे याला प्राधान्य आहे.