कथा फेकबुक

Submitted by Kavyalekha on 7 June, 2020 - 14:58

फेकबुक
.. मम्मा आणि डॅड परत भांडताहेत. ह्या दोघांचे काही कळत नाही. सारखं भांडत असतात. ह्यांच्या भांडणापेक्षा मला त्याचाशी बोलणे बरे वाटते… किती छान आहे तो !.. डॅशिंग, स्मार्ट… त्याच्या फेसबुक वर असलेल्या प्रोफाइल पिक्चर मध्ये तर एखाद्या मॉडेल सारखाच दिसतो तो !.. ‘ तो ‘ म्हणजे माझा नवीन फ्रेंड्… मस्त आहे एकदम.. पण स्कूल किंवा ट्युशन मधला नाही काही… हल्लीच बनलेला फेसबुक वरचा.. न्यू फ्रेंड्… !!
रोज चॅटिंग करतो आम्ही… मम्मा-डॅडला कुठे काय कळतंय.. त्यांना वाटते की मी स्कूलचे प्रोजेक्ट करते रात्र-रात्र बसून… मला आवडत त्याच्याशी गप्पा मारायला… खूप सही वाटत… तो मला माझ्या मम्मा-डॅड वरून सारखे प्रश्न विचारून त्रास देत नाही माझ्या बाकी फ्रेंड्स सारखा… माझे फ्रेंड्स मला सांगतात की माझे मम्मा-डॅड ना वेगळे होणार आहेत.. मग मला त्या साऱ्यांचाच राग येतो.. पण तो त्यांच्या सारखा नाहीए.. तो मला माझ्या आवडीचं गिफ्ट सुद्धा पाठवणार आहे.. आणि कोणाला कळू नये म्हणून त्याने मला एक आयडिया सुचवलीए.. ट्युशन ला बंक मारून आम्ही भेटणार आहोत…ओह व्वाव…मी खूप एक्ससायटेड आहे..पण आम्ही भेटणार आहोत हे मी कुणाला नाही कळू देणार.. कारण कुणी मला नाही समजून घेणार.
तसाही माझ्याशी बोलायला त्यांना वेळ कुठे असतो.. आम्ही डिनरला कधी बाहेर गेलो तरी ही ते त्यांच्या ऑफिस विषयी बोलत बसतात. नाहीतर सेल्फीज आणि फोटोज काढून ते पोस्ट करण्यात बिझी असतात… माझ्या fb अकाउंट बद्द्ल त्यांना अजून माहित नाहीए… मी एका खोट्या नावाने फेसबुक वर एक ‘फेक अकाउंट ‘ उघडले आहे.. कारण सोशल मीडिया वर अकाउंट उघडायला वयाची अट लागते ना.. आणि मी अजून मायनर आहे… बट आय डोण्ट केअर.. ! माझ्या किती फ्रेंड्सची अशी अकाउंटस आहेत fb वर..
म्हणून आता मला मम्मा-डॅड बरोबर जायला कंटाळा येतो. ते दोघं सतत फोन वर असतात… मला त्यांनी माझा पर्सनल लॅपटॉप घेऊन दिला आहे… शिवाय फोन तर माझ्याकडे आहेच.. वेळ कसा जातो कळतच नाहीं… किती मजा येते.. आधीसारखं मला एकटीला बोअर होत नाही. माझे किती नवीन फ्रेंड्स झाले आहेत फेसबुक वर !..
पण तरीही कितीदा मला खरच मम्मा-डॅडशी बोलावंसं वाटत…मला खूप काही सांगायचं असत त्यांना….आणि मम्मा-डॅड… त्यांचं नीट लक्षच नसतं माझ्या बोलण्याकडे… फेसबुक वर मात्र पोस्ट करतात ‘माय डॉटर माय लाईफ ‘… हूं.. पण त्या डॉटर साठीच त्यांच्या पाशी वेळ नसतो…
कितीदा अस वाटत की हे फेसबुकवरच जग आणि प्रत्यक्षातल जग यात किती मोठा फरक आहे ना…
असंच असत का हे फेसबुक??.. पण सगळे असतात आजकाल फेसबुकवर… माझे फ्रेंड्स सांगतात कीं खरं काही पोस्ट करायचं नसतं इथे.. फक्त छान छान गोष्टीच टाकायच्या fb वॉल वर …
कुठेही गेलं की आधी फोटोज काढायचे… असंख्य फोटोज… आधी जेवणाचे… मग त्या जागेचे… शिवाय माणसांचे… कुठे कोण बघायला येतेय खरं काय आहें ते….
मला आधी नाही आवडायच हे सारं… सगळं कसं आभासी जग.. खरं काहीच नाहीं… पण आता नाहीं वाटत तसं… एक सवयच झाली आहे आता… उलट मजा येते किती लाईक्स आणि कोणी कोणी काय कंमेंट्स केलेत ते बघायला…. कोणी ही काही ही पोस्ट करू शकत इथे… त्यादिवशी नाहीं का.. माझ्याच क्लास मधल्या एका मुलीचा विडिओ वायरल झाला होता… कंमेंट्स मध्ये बिचारीवर सगळे हसत होते… मला नाही आवडला तो विडिओ… मी लगेच पुढे स्क्रोल करु लागले… पण पुढेही असेच पोस्ट्स होते… कुठेतरी चाललेला प्रोटेस्ट… कोणावर झालेले सेक्सुअल असॉल्ट चे आरोप…. कुणीतरी काढलेला विचित्र नाचगाण्यांचा टुकार विडिओ.. एका पोस्ट वर तर चक्क ऑनलाईन भांडण चालू होतं… माझं डोकं दुखु लागल्यावर मी लॉगआऊट केलं… नंतरचे दोन दिवस ना मी स्कूल मध्ये गेले ना लॅपटॉप उघडला..
मी तापाने फणफणत असून सुद्धा मला बाईनं बरोबर ठेवून मम्मा-डॅड बाहेर गेले… शिवाय उशिरा घरी आले… दोन मिनिट बोलून लगेच आपल्या रूम्स मध्ये निघून गेले… त्या रात्री मी खूप रडले… खूप एकटं वाटतं होतं मला.. तरीही मी उठुन त्यांच्या रूम जवळ गेले..नेहमीचेच भांडणाचे आवाज येतं होते… माझ्यावरूनच भांडत होते दोघ… असा राग आला होता त्यांचा… मी तशीच रडत कधी झोपले कळलेच नाही…
मला झोपेत एक स्वप्न पडले… की मला… मम्माला… डॅडला.. आम्हाला जे काही बोलायचे आहे ते आपोआप फेसबुकवर पोस्ट होत चालले आहे.. काही बोलायचं असेल तर ते पोस्ट करावे लागतेय… सारं जग सर्व काही वाचतय… जिथे तिथे कॉम्प्युटर्स , लॅपटॉप, मोबाईल्स आणि त्यावर असलेलं फेसबुक.. शिवाय ढेर सारे लोक त्या फेसबुकवर.. सगळे ज्याच्या त्याच्या आयुष्यात डोकावताहेत… सगळं जगच फेसबुकमय झालंय.. पण भांडण वाढली आहेत त्यामुळे… सगळ्यांना सर्व गोष्टी कळताहेत… नो फिल्टर्स.. आणि मग अचानक कुणी कुणाशी बोलत नाहीये… सगळीकडे चिडीचूप शांतता… !! बापरे.. किती विचित्र आणि भयानक स्वप्न होतं ते..!
अरे.. पण अजून कसा नाही आला ऑनलाईन तो आज…. पण हे काय… हे माझे अकाउंट नाही आहे… हे तर मम्माचे अकाउंट आहे… ती वापरते माझा लॅपटॉप कधी कधी… काल सुद्धा तिने…. ओह नो… म्हणजे… नो… हा मम्माच्या फ्रेंड्सलिस्ट मध्ये का आहे … ह्याचा अर्थ हा कुणी कॉलेज स्टुडन्ट नाहीय… तर मम्माचा फ्रेंड् आहे.. कारण प्रोफाइल पिक्चर तर सेम आहे… म्हणजे त्याची दोन अकाउंटस आहेत… एक खरं आणि एक फेक… माझ्या सारखंच. .शी… कदाचित मी नसताना हा माणूस घरी सुद्धा आला असावा … वीकेंड पार्टी मधला कुणी अंकल… शी… काय हवं होतं त्याला? आणि त्याने मला भेटायला का बोलावलं? किती फोर्स केलं त्याने…
पण सारं काही खोटं होतं… तो… त्याची ओळखं… आमचे चॅट्स…. !
ओह नो… मला भीती वाटते आहे आता त्याची…. काय करणार होता तो माझ्या बरोबर….?
खरंच हे फेसबुक आहे का फेकबुक !!...
इथे काय खरं आणि काय खोटं काही कळतच नाही… कोणाचं वय किती?.. कोणाचं स्टेटस काय? खरच सिंगल की मॅरीड?? कोण कोणाचे रिअल फ्रेंड्स?? सारी एक विचित्र भासमान दुनिया… एक उभारलेला सुंदर देखावा… खरंच का सारे आपल्या आयुष्यात एवढे खुश असतात…? की इथे दाखवण्यापुरता तो लिमिटेड आनंद असतो..? आपलं सुखदुःख.. आपल्या प्रायव्हेट गोष्टी आपण अशा सोशल करू शकतो? स्वतःच्या ‘पर्सनल स्पेस ‘आणि ‘प्रायव्हसी’चा सतत विचार करणारे आपण आज आपलं खाजगी आयुष्य असं जगापुढे अनोळखी लोकांपुढे मांडू शकतो? स्वतःच्या प्रॉब्लेम मधून फुरसत मिळत नसलेले आपण दुसऱ्यांच्या दुःखावर फक्त पोकळ कंमेंट् टाइप करण्या व्यतिरिक्त दुसरे काय करू शकतो?
कारण आपल्या कडे वेळ कुठे असतो …. तो तर फेसबुक वर स्क्रोल करण्यात कुठे जातो कळत नाही..
या वर्च्युल जगातून बाहेर येऊन खऱ्या आयुष्यात खऱ्याखुऱ्या माणसांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला, रिअल आयुष्य जगायला आपल्यापाशी कितीसा वेळ उरतो?
काहीही घडो… मग ते चांगलं असो वा वाईट ते अनुभवण्याआधी कधी एकदा पोस्ट करतोय आणि त्याला किती आणि काय कंमेंट्स येताएत ह्यातच आपल्याला समाधान मिळते… शिवाय कमी लाईक्स आल्या, कुणी पोस्ट बघितली नाही तर एक वेगळीच बेचैनी सतत वाटतं राहते…..
हा भास आभासाचा खेळ मला नाही खेळायचा…. इथे काहीच खरं नाही… काहीच शुअर नाही…. मला नको हे सुपरफिशिअल लाईफ…. खोटं खोटं तात्पुरतं सॅटीसफॅक्शन…
मी आजच माझं फेसबुक अकाउंट डिलिट करणार आहे….
मम्माला ह्या अंकल बद्दल सुद्धा आताच सांगायला हवं.. खूप उशीर होण्याआधी….
मम्मा….मम्मा…. !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Khup chan.
Dark side of Virtual world is explained beautifully

नाण्याची दुसरी बाजु छान दाखवण्याचा प्रयत्न..

छान आहे कथा.
सोमिच्या अशा काळ्या बाजू समोर आल्या पाहीजे.
कथेतल्या मुलीला जसा सोमिचा तिटकारा येतो तसाच तिटकारा कधी ना कधी प्रत्येकाला आला तर सोमिचा वापर आहे त्याच कारणासाठी होईल.

Thank you. धन्यवाद @ पाषाणभेद @बिपीन @अस्मिता @तुषार @देवकी Happy Happy प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

आवडली कथा, खरंच असं झालं तर बरं होईल. मुलांना आभासी जगाचं वास्तव कळेल, मुलांनाच नाही सगळ्यांनाच खरंतर.