©संततधार! - भाग ५

Submitted by अज्ञातवासी on 6 June, 2020 - 11:37

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.

भाग ४- https://www.maayboli.com/node/74931

पुढचा भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी ९ जून रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.

"मनू, काय बोलतोय हे." अण्णा भानावर आल्यासारखे म्हणाले.
"अण्णा, जेवताना हा विषय नको. या विषयावर बोलण्यासाठी टेकडी आहेच."
"अरे पण?"
"नाही अण्णा. जाऊ देत. आता फक्त जेवण." "सिंगसाब, और हाफ." त्याने आवाज दिला.
"माझं पोट भरलय मनू."
"थोडी तर घ्या. मला भूक लागलीये प्रचंड."
लगेचच अजून अर्धा प्लेट बिर्याणी आली, आणि मनूने तीही संपवली.
"मस्त जेवण झालं आज नाही? यापेक्षा बेस्ट बिर्याणी फक्त लक्ष्मीवहिनीच बनवतात."
"आधी सांगितलं असतस तर दुपारच्या जेवणाला रेडी करून ठेवली असती. घरीच जेवलो असतो."
"नको अण्णा, घरी नको. आज सगळा वेळ बाहेरच घालवायचाय मला."
"आपण टेकडीवर जाऊ. तिथे निवांत बोलता येईल."
तिथलाच एक पाण्याचा जग उचलून मनू मोरीत गेला, तिथे त्याने हात धुतले.
अण्णाही उठले.
त्यांचं जेवण उरकलेलं बघून सिंगने एक पोऱ्या प्लेट उचलण्यासाठी आत पाठवला.
तो प्लेट आवरू लागला.
"ये रुक. इधर आ." मनूने त्याला जवळ बोलावले.
खिशातून पन्नासची एक व पाचशेच्या दोन नोटा नोट काढत तो म्हणाला.
"ये तेरे लिये. और ये सिंगसाब को दे देना."
जी साब, म्हणून त्याने पैसे वरच्या खिशात कोंबले, व तो प्लेट उचलू लागला.
"सिंगसाब, शुक्रिया." मनू बाहेर जात गल्ल्यावर बसलेल्या सिंगला म्हणाला.
"पुन्हा लवकर या. "
"नक्की." मनू हसला.
ते दोघेही गाडीजवळ आले.
"आता सरळ टेकडीवर गाडी घेतोय. तिथेच गप्पा मारू."
"बरं."
गाडी भरधाव वेगाने निघाली. इतक्यावेळ वातावरणात असणारा हलकेपणा कुठल्याकुठे निघून गेला. एक निशब्द तणाव दोघांनाही जाणवत होता.
मनूने एका खडकाजवळ गाडी पार्क केली. टेकडीवर आता कुणीही नव्हतं. खडकाच्या बाजूलाच मोठा वटवृक्ष त्याची गार सावली देत होता.
"अण्णा," मनूच्या आवाजाने अण्णांची तंद्री भंगली.
"सात वर्षापूर्वी मी इथे आलो, तेव्हा इथे परु सोडली, तर कुणीही माझ्या जवळच नव्हतं. कुणीही म्हणजे कुणीही नाही. तुम्ही सोडून! परु आणि मी व्यवसाय चालू केला, तुमच्या आशीर्वादाने. आज सगळं चांगलं चाललंय, पण त्याकाळी अपयशी झालो असतो तर आज काय केलं असतं कल्पना करवत नाही."
"झालाच नसतास मनू, तुझ्याकडे डोकं आहे, माणसं जोडण्याची, सांभाळण्याची कला आहे, काय म्हणतात ती पर्सनॅलिटी आहे. नसता झालास."
"अण्णा हे सगळं मी नाकारत नाही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक पावलावर माझ्यासोबत परु होती. ही कंपनी जितकी माझी आहे ना, त्यापेक्षा जास्त परुची आहे. अण्णा, जीवापाड प्रेम केलंय मी तिच्यावर. एक काळ तर असा होता ना अण्णा, परुशिवाय क्षणभर राहणं ही कल्पनाच मी सहन करू शकत नव्हतो. "
"मनू, एक सांगशील?"
"काय अण्णा?"
"एकदा तू म्हणाला होतास, परुच्या आयुष्यातला तू सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहेस. मी मुद्दाम तेव्हा तुला जास्त खोदून विचारलं नाही. ते काय होतं नक्की सांगशील."
"ते खोटं होतं. तिचे शब्द असे होते.
मी विहिरीत जीव देईन तरी तुझ्याशी लग्न करणार नाही."
"काय?" अण्णा चक्रावले.
"अण्णा, कॉलेजला परु माझी ज्युनियर होती. कारण चार वर्षे जॉब करून ती कोर्सला आली होती. अण्णा, तिचा राग म्हणजे कायम नाकावर. आणि मीही जमदग्नीचा अवतार होतो तेव्हा."
"तू?" अण्णा न राहवून हसले.
"हो अण्णा. आणा एक सांगू? परु माझं प्रेम आहे, पण त्याचबरोबर परु माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अचिवमेंट आहे. जाऊ देत. तिच्याविषयी बोलत राहिलो आयुष्य कमी पडेल." मनू हरखून जात म्हणाला.
तो भानावर आला.
"अण्णा, मी परुवर प्रेम ना, जीव तोडून केलं. मी तिच्याविना राहूच शकत नव्हतो. पण तेव्हा तिच्यासाठी मनू फक्त एक बेस्ट फ्रेंड.खूपदा प्रयत्न केला अण्णा, तिच्या आयुष्यात जागा बनवायचा... पण त्या प्रयत्नांमध्ये कधी वाहवत गेलो ते कळलंच नाही, आणि नको ती चूक घडलीच."
"काय झालं मनू?"
"अण्णा, मी तिच्या घरी जाऊन तिला प्रपोज केलं, लग्नासाठी. उत्तर माहीत असताना.
मनू, अरे बाबा, असं तू वागूच कसा शकतो.
वेडा होतो अण्णा मी. आता स्वतःचीच लाज वाटते. तेव्हा तिने ते शब्द उच्चारले, आणि तिथेच जुना मनू संपला.
अण्णा जो हा मनू दिसतोय ना, तो मनू आहे एक नवा मनू. जुनं सगळं टाकून दिलेला. अण्णा सात वर्षांपासून मी प्रत्येक शब्द तोलून मापून बोलतोय, सतत धास्ती वाटते, काहीतरी चुकेल म्हणून. मी कधीही माझ्या भावना दाखवत नाही. अण्णा मी एक राक्षस आहे, एक पिंजऱ्यात बंद झालेला राक्षस. प्रेमाच्या पिंजऱ्यात. एक आदर्श नवरा, माणूस बनता बनता अण्णा, मी स्वतःला मिटवून टाकलं."
"मनू एक विचारू?"
"विचारा ना?"
"जे हे झालंय, ते चांगलं की वाईट?"
"वाईट की चांगलं माहिती नाही, पण सवय झालीये."
"पण हे फारकतीचं कारण असू शकत नाही."
"अण्णा, आमचं नातं अभेद्य होतं, प्रेमामुळे. त्यालाच तडा गेला तर?"
"काय म्हणतोस?
"हेमल पटेल. पूर्वाश्रमीच्या चित्रकार. परुचा एक्स बॉयफ्रेंड. प्रियकर म्हणा हवंतर. गेल्या दोन आठवड्यापासून परु दुपारचे चार तास त्याच्याबरोबर घालवतेय."
"अण्णा अश्या वस्तीत ती जातेय ना, ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. अक्षरशः जोव जातो अण्णा, पण बोलू शकत नाही. प्रेम केलंय ना! हे लग्न म्हणजे माझ्यावर शाप होता. तुझी परु तुला मिळेल, पण कधीही तुझी होणार नाही असा शाप.
अण्णा, सगळं मिळवून ऐनवेळी रथाचे चाक जमिनीत रुतलेल्या कर्ण झालाय माझा. पण एक सांगतो अण्णा.
...जर माझ्या परुला काही झालं, तिच्यासोबत काहीही वाईट झालं... तर मी त्याला संपवून टाकेन." मनूचा चेहरा लालेलाल झाला होता. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या.
अण्णा चकित होऊन मनूकडे बघतच राहिले...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञा, निमिता यांच्या मन वढाय वढाय सारखी कथा वाटतेय. हे माझे शब्द मी मागे घेते. Happy
पण तुझ्या इतर कथांपेक्षा ही कथा पुर्णतः वेगळी आहे. हे मात्र खरं!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

सदतीस! चाळीशीला तीन वर्षे उरलीत!
आणि मनू, तीन वर्षांपूर्वी त्याने तिशी पार केली होती.
दोघांचं वयाचं अंतर दिलं इतकं प्रकर्षाने जाणवेल, अस तिला कधीही वाटलं नव्हतं! पार्ट 2 मध्ये होतं आणि इथे लिहिलंय की ती त्याला ज्युनिअर होती....
माझ्या वाचनात काही चूक झाली का,?

@सोनाली 04 - ती जाॅब करत होती नंतर तिने अॅडमिशन घेतलेलं..

हे वाचा -

अण्णा, कॉलेजला परु माझी ज्युनियर होती. कारण चार वर्षे जॉब करून ती कोर्सला आली होती

मस्त लिहितोय. वेगळीच कथा. मनू नावही भारी वाटतय :हाहा:
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

नवीन Submitted by महाश्वेता on 6 June, 2020 - 21:42

+१
चालू द्या.

Mastt...

Uff... Complicated Relations.. कथा एकदम मस्त सुरु आहे . मनू पण आवडतोय Happy

@नौटंकी - धन्यवाद! तुमचा प्रतिसाद नेहमी हुरूप वाढवतो Happy
@महाश्वेता - सगळ्यात आधी वेलकम बॅक! आणि मनू नावच भारी आहे, गोड, गोंडस, लडिवाळ, लोभस, सगळ्यांना हवंहवं वाटणारं etc Lol
@रूपाली विशे - पाटील - धन्यवाद प्रेमत्रिकोण की चौकोन की पंचकोन? वाचत राहा Lol
@अजय चव्हाण - धन्यवाद
@ Snehalata - धन्यवाद
@ मन्या ऽ - शब्द वगैरे काही मागे घेऊ नकोस, ती कथा मुळातच खूप सुंदर आहे, वाचत राहा
@Urmila Mhatre - थँक्स
@सोनाली ०४ - तुमचं उत्तर अजयने दिलं आहे, पण तुमच्या आयडी नावावरून आठवलं पाटील पूर्ण करायची राहिलीये Lol धन्यवाद
@ पाथफाईंडर - धन्यवाद
@मऊमाऊ - धन्यवाद
@ प्रि तम - धन्यवाद
@ज्वाला -धन्यवाद
@Sadha manus - धन्यवाद, नक्की प्रयत्न करतो, पण काही भाग त्या त्या पॉइंटवर संपवलेले बरे असतात Happy
@Nisha07 - धन्यवाद
@आबासाहेब - धन्यवाद (एक अवांतर नोंद, आबासाहेब हे पूर्ण नाव टाईप करायला भारी वाटत
@ए_श्रद्धा - धन्यवाद Happy
@उनाडटप्पू - धन्यवाद

मस्त कथा...
पुढील भागाच्या आतुर प्रतीक्षेत....

हो आले ना परत.
मात्र दोन महिन्यांच पिल्लू मला ओळखतय, हा गजहबच म्हणायचा, की काही पूर्वजन्मीच्या पापांमुळे हा नवीन जन्म घ्यावा लागला Lol

अवांतर - लेखकाला विनंती, कुठल्याही वादात न पडता लिखाण चालू ठेव. दुर्लक्ष कर, फाट्यावर मार आणि ही कथा लवकर पूर्ण कर.

Pages