भेट !

Submitted by Swati Karve on 5 June, 2020 - 23:04

भेट …

भेट ...सुखावून टाकणारी …
भेट...मनाला हुरहूर लावणारी …
भेट...पुढच्या भेटीची तीव्र आस निर्माण करणारी …
भेट ...विरहाच्या कल्पनेने व्याकुळ करणारी …
भेट … निसटत्या स्पर्शातुन ओढ व्यक्त करणारी …
भेट ...निशब्द संवादातून उत्कटतेची जाणीव करून देणारी …
भेट ...दोन जीवांना आयुष्यभरासाठी एकमेकांशी जोडणारी …
भेट ...राधाकृष्णासारखी, अद्वैताची अनुभूती देणारी …

भेट ...एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या अनपेक्षितपणे जवळ घेऊन जाणारी ..
भेट ...मायेने, आपुलकीने दुखावलेल्या मनावर फुंकर घालणारी…
भेट … आपल्या अगदी जवळच्या माणसांची संभ्रमात टाकणारी रूपे दाखवणारी…
भेट ...काही जुने हिशोब पूर्ण करणारी …
भेट … नावापुरती, भावनाशून्यता आणि कोरडेपणा दर्शविणारी…
भेट ... निर्मळ, निकोप सात्विक वृत्तीचे दर्शन घडवणारी , चांगुलपणावर विश्वास ठेवायला लावणारी...
भेट ...एखाद्याच्या सौंदर्याच्या मोहात पाडणारी …
भेट ...शब्दांविना झालेली , नजरेच्या कटाक्षापूर्ती, पण शब्दांहूनही अधिक समर्थपणे अंताकरणातील गहिरे रंग उलगडून दाखवणारी …

भेट… हलकी फुलकी, निर्मळ, निखळ आनंद देणारी…
भेट … एखाद्या वास्तूशी, अलगदपणे आठवणींच्या जगात घेऊन जाणारी ..
भेट … त्या पावसाशी, पावसाची सर तीच, परंतु प्रत्येकाला त्याच्या आतल्या जगाच्या अवस्थे प्रमाणे भिजण्याचा , चिंब होण्याचा निराळा अनुभव  देणारी…
भेट ...मनमोकळी, प्रांजळपणे मनातले सारे काही व्यक्त करणारी …
भेट ...नात्याला एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवणारी …
भेट ...प्रेरणादायी, एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी…
भेट ...त्या परमेश्वराशी, समर्पण, विश्वास , भक्तीभाव व्यक्त करणारी …
भेट ...इवल्याश्या , निरागस जीवाशी , वात्सल्याने मन व्यापून टाकणारी …
भेट ...एखाद्या पिकल्या पानाशी, आयुष्याच्या अशाश्वत खेळात कमावलेल्या अनुभवांची शिदोरी, पुढच्या पिढीकडे आनंदाने, मायेने सुपूर्त करणारी …
भेट … स्वतःची स्वतःशीच, स्वतःची  नव्याने ओळख करून देणारी ...
भेट … एक अनोखी भेट वस्तूच जणू , प्रत्येकाला माणूस म्हणून कोणत्या ना  कोणत्या प्रकारे समृद्ध करणारी ...

- स्वाती

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर!

स्पेस द्याल का? प्रत्येक कडव्यानंतर.. सुटसुटीत छान दिसेल कविता.. Happy