विश्वासाचा धागा

Submitted by ज्येष्ठागौरी on 5 June, 2020 - 11:10

विश्वासाचा धागा

मी साधारण दहावी अकरावीत असताना एक विलक्षण प्रसंग घडला.घरातला सिलेंडर संपला म्हणून मी आणि आई सिलेंडर बदलायच्या खटपटीला लागलो.त्यावेळी घरात तिसरं कुणीच नव्हतं.regulator फुटण्याच्या अनेक घटना होत असत त्यामुळे जरा जपूनच हे काम चालू असताना अचानक काय झालं माहिती नाही पण जिथे आपण regulator लावतो तिथून गॅसचा साधारण मुठीएव्हढा स्रोत माझ्या तोंडावर आला,मी खाली वाकून हे काम करत होते,सिलेंडरच्या सगळ्यात जवळ होते ती एकदम गुदमरल्यासारखी झाले. तो गॅसचा स्रोत एवढा मोठा होता की जवळ जवळ दोन पावलं ढकलल्यासारखं झालं आणि समोर एकदम धुक्यासारखं वातावरण झालं आई कुठंय ते दिसेना , मी अगदी आकांतानं जोरात "आई गॅस leak झालाय ,पळ "असं ओरडले.आमच्या गावातल्या स्वयंपाकघराला दोन दार होती. मी एका दारानं बाहेर पडले पण आई आलीय का नाही ह्या विचारांनी एकदम रडायला यायला लागलं आणि मी आईला जोरात हाका मारायला लागले.आई दुसऱ्या दारातून आलीही होती. पुढच्या काही मिनिटात सिलेंडरमधला पूर्ण गॅस बाहेर पडला.आमचं नशीब एवढं थोर होतं की देवाजवळ निरांजन ,उदबत्ती काही चालू नव्हतं.भयानक मोठा स्फोट झाला असता अन्यथा.आपण वाचतो ऐकतो की हा गॅस द्रवस्वरूपात असतो आणि त्याला मुळात वास नसतो पण leak झाला तर कळावं म्हणून त्याला हा विचित्र वास दिलेला असतो.त्यादिवशी साधारण चार पाच वाडे पलीकडचीही माणसं शोधत आली होती कुठं गॅसचा वास येतोय आणि संपूर्ण स्वयंपाकघर ओलं चिकट झालं होतं.मी आणि आई अगदी थोडक्यातच वाचलो.बापू बाहेरून आले तेंव्हा बरीच गर्दी जमली होती कोणीतरी गॅस agency ला फोन केला होता,त्यांनी येऊन पाहणी केली,नवीन सिलेंडर दिला,विषय खरंतर संपला पण त्या दिवसानंतर बापू रोज स्वतः रात्री regulator बंद करून नमस्कार करायचे.अग्निदेवाला कृतज्ञता म्हणून.ती सवय मलाही लागली. आजही ,कधी विसरत नाही पण झोप लागता लागता खात्री नसेल तर उठून गॅस खालून बंद केलाय ना ह्याची खात्री करून घेतेच घेते.एवढंच नाही पण ऑफिसला किंवा बाहेर जातानासुद्धा खालून गॅसचा regulator बंद करून जाते.गावाला जाताना regulator काढून सिलेंडर बाहेरच्या ड्राय बाल्कनी मध्ये संपूर्ण सावलीत ठेवते. त्यादिवशी अग्निदेवांनी वाचवलं हा बापूंचा विश्वासाचा धागा मी मनापासून जपलाय.कारण त्यात भीती नाही कृतज्ञता आहे.
श्रावणी पौर्णिमेला ज्याला आपण पूर्वी न चुकता , नारळी पौर्णिमा म्हणायचो राखी नाही,त्या नारळी पौर्णिमेला बापू संगम पुलावर न्यायचे नारळ वहायला, आणि कधीही कुठल्याही पुलावरून जाताना नदीला नमस्कार करायचे जीवनदायिनी म्हणून,समुद्राला हात जोडायचे, पहिल्या पावसाला नमस्कार करायचे. मीही करते, विश्वासाचा हाही धागा मी पुढे ओढलाय.
पण अशा सकारात्मक श्रद्धांच्याबरोबरच बरोबरीच्या , वयानी लहान ,मोठ्या लोकांचे विश्वास सोबत यायचे ना.साधं सुधं जगणं असलेल्या आजूबाजूच्या माणसांकडून काही अनुभवांतून काही ऐकिवातून गोष्टी सांगितल्या जायच्या.उदा शनिवारी नखं कापायची नाहीत,भावाच्या बहिणींनी सोमवारी नहायचं नाही,वाटीने पाणी प्यायचं नाही,उंबऱ्यात उभं राहून शिंकायचं नाही,जेवताना पालथी मांडी घालून बसायचं नाही.बरं याला काही बाही भीतीनं वेढलेलं असायचं.मग आईबापूंकडे डोळे डबडबून विचारलं की मग अगदी योग्य अशी उत्तरं मिळायची.शक्यतो जी ती कामं,त्या त्या दिवशीच करायची,दर रविवारीच नखं कापायची ,वाटीला आमटीचा वास येऊ शकतो म्हणून पाणी फुलपात्रातून प्यायचं, दारं बुटकी असतात,तिथे उंबऱ्यात शिंकलं की डोकं वर आपटतं ,पालथी मांडी घालून नीट जेवता येत नाही.अशी समाधानपूर्वक उत्तरं मिळाली की भीति पळायची, विश्वासाचा धागा आणखी पुढे सरकायचा.
वेणी घालणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करायचा हा आईचा दंडक माझ्या भावानी मोहननी मेकअप दादांना नमस्कार करून पाळला.ताटात मीठ वाढल्याशिवाय किंवा वरण अथवा भाजीचा ठिपका दिल्याशिवाय नुसता भात वाढायचा नाही हा संबंध पान वाढण्याच्या सौन्दर्याशी जोडला गेला अर्थात जरी त्याच्या मागची कारणं वेगळी कानावर यायची तरी.तो अजूनही गेला नाहीये.
रात्री ओटा आवरुन झाल्यावर स्वयंपाकघराचा केर काढावा असं आई सांगायची,म्हणायची स्वयंपाकघर आशीर्वाद देतं.
अशा कित्येक सकारात्मक विश्वासांवर मी जगत आले. बापूंचा कर्मकांडावर विश्वास नव्हता पण बाबासाहेबांचं श्राद्ध हिरण्य करायचे तेही त्यांचं श्रद्धापूर्वक स्मरण म्हणून.
परीक्षेच्या दिवशी आई सांगायची आज ताट उचलू नका जेवण झाल्यावर ,त्याचं कारण नाही माहिती पण तो आनंद अवर्णनीय असायचा,
दह्याची कवडी हातावर द्यायची,पोट आणि डोकं शांत राहतं म्हणायची.नजर लागणे वगैरे या गोष्टींकडे मुळीच लक्ष देऊ नये असं म्हणायची आणि जे होणार ते होत असतं अशा विचारांनी ती नेहमी शांत असायची. अवडंबर नसलेलं तिचं पूजा किंवा सणवार साजरे करणं, बापूंचं सगळ्यांच्या वाढदिवसाचयादिवशी ग्रामदेवतांना जाणं ,रामरक्षा म्हणणं ह्या त्यांच्या त्यांच्या विश्वासाच्या गोष्टी होत्या.माझा नवरा वीस वर्षांपूर्वी जेंव्हा खूप आजारी होता तेंव्हा खरंतर मुलं खूप लहान होती,खर्च खूप उभा होता,त्याच्या ऑपरेशन दिवशी परिस्थिती गंभीर होती,बापू तेंव्हा सौम्य पक्षाघात आणि हृदयविकारानी अंथरुणात होते.मी अत्यंत अस्वस्थ स्थितीत घरी आले होते,सगळं चित्र धूसर होत ,सुदैवानं बापूंना फार माहिती नव्हती पण मला जवळ बसवून मोठ्या मायेनं म्हणाले मला अगदी खात्री आहे तो अगदी नक्की व्यवस्थित बाहेर येईल यातून,तू धीर धर. गळ्यात घट्ट दाटून आलेला आवंढा मी गिळला ,त्यांना खरी परिस्थिती माहिती नव्हती तरीही त्यांच्या शब्दांवर मी विश्वास ठेवला आणि तो विश्वासाचा धागा पुढचे अनेक परीक्षेचे दिवस मला साथ देत राहिला.अनेक सांसारिक अडचणींना यथामती , यथाशक्ती,यथाबुद्धी तोंड देताना हे धागे घट्ट बांधून ठेवत राहिले, राहताहेत ,आणि राहतीलही.
या दोघांनी positivity ची पुस्तकं वाचली नव्हती पण शिक्षण मात्र झालं होतं आणि पक्कं होतं.कृतज्ञता शब्दातून नाही तर मनापासून होणाऱ्या कृतीतून दिसायची.ती आता जास्त जाणवतीये.माझी
मुलं लहान असताना त्यांनाही प्रश्न पडायचे,बाहेरच्या जगात त्यांच्या आजूबाजूलाही मंडळी होती ,त्यांना भीती घालणारी माणसं होती ,आहेत, असणारेत. पूर्वी आम्हाला विचारुन त्यांना विश्वास वाटायचा .आता त्याबरोबरच त्यांचा स्वतःचा मेंदू आणि मन वापरुन अनुभवाच्या वाढत्या शिदोरीवर ती विश्वासाचे धागे निर्माण करतात किंवा पक्के करतात.कधी त्यांना आमच्या सल्ल्याची गरज लागते त्यांच्या भाषेत(just to make sure). मलाही अजून वाट चालताना अडचणी येतात,आचार विचारात काही गडबड होतीये असं वाटलं किंवा कधीतरी डळमळीत व्हायला झालं तर हे विश्वासाचे धागे घट्ट धरुन ठेवतात आता आईबापू नसले तरी ,माझ्या मार्गानी विचारांनी जाऊ देतात पण पडायच्या आधी सावरतात.हे धागे आयुष्यात कोणीही निर्माण करतं, परमेश्वर,गुरू, आई, वडिल मित्र,निसर्ग ,परिस्थिती. गंमत म्हणजे हे सगळे विश्वासाचे धागे कधीच मागे खेचणारे नव्हते आणि नाहीयेत.उलट पुढं जायला, प्रगती करायला अगदी पोषक आहेत. माणसांच्या सहृदयपणाचा चांगुलपणाचा, जगण्यातल्या साधेपणाचा, खरेपणाचा,संपन्नतेचा,कृतज्ञतेचा, कलात्मकतेचा आणि या आश्वस्त मूल्यांचा विश्वासाचा धागा ,त्या धाग्याची लड पुढे ओढली जातीये.अगदी सहज,आपोआप,अनादी,अनंत!
ज्येष्ठागौरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय.
वेणी घालणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करायचा हा आईचा दंडक मा>>>>>>> हे विसरले होते, आम्ही पण करायचो, शाळेत असेपर्यंत. पण नंतर स्वत:ची वेणी स्वतः घालायला लागल्यावर सवय सुटली.

काय सांगु, माझी आई 7-8 महिन्यापूर्वी अचानक कॅर्डीक अर्रेस्ट नी गेली, वयाच्या 56 वर्षी, तुमचा लेख वाचून आईची आठवण आली, तिच्या अश्या अनेक श्रद्धा होत्या, त्या विश्वासावर मी आयुष्यात अनेक प्रसंग पचवले, आई वडिलांच्या अश्या श्रद्धा च आपल्याला पाठबळ देतात

खूप सुंदर लिहिले आहे.
आमच्या कडे यातल्या बर्याच गोष्टी पाळायचे. शिवाय रोज gas वर पाणी शिंपडून नमस्कार करते आई. तिची श्रद्धा आहे की अन्नपूर्णेला स्मरण केल्याने स्वयंपाक पुरतो आणि त्रुप्त करतो. शिवाय दिवा/समयी/निरांजन विझले म्हणायचे नाही शांत झाले म्हणायचे असा दंडक होता. अजूनही माझ्या तोंडात 'शांत झाले' असेच येते.

वाह्....किती छान लिहीलंयस. आजुबाजुला घडणा-या घटना आणि प्रसंगांची स्वतःच्या विचारांनी आणि शब्दांनी किती सुंदर मांडणी करतेस. हेच सगळं आजुबाजुला घडत असतं पण त्यातून इतका सुंदर विचार तुझ्या ह्या लेखातून मिळाला.

उत्तम चिंतन.
पुण्यातल्या सगळ्यांच्या घरात असे संस्कार होते ...तुमच्यासारख्यानी जपले...
लेख आणि प्रतिसाद वाचून लहानपण जागे झाले...

पुण्यातल्या सगळ्यांच्या घरात असे संस्कार होते ...तुमच्यासारख्यानी जपले..>> हो हे खरे आहे. तुमच्या लेखांमध्ये बालपण जगता येत आहे.