सूर लागला नाही

Submitted by निशिकांत on 4 June, 2020 - 12:20

गीत गायचे मनात होते, सूर लागला नाही
स्वप्नी त्याला भेटावे तर सखा झोपला नाही

चौकाटीतले सीमित जगही विशाल वाटत होते
त्रिजाच होते, व्यास व्हायचा ध्यास घेतला नाही

स्वप्नालाही स्वप्न पडावे इतकी भाउक का मी?
उत्तर शोधू कुठे, कसे जर प्रश्न समजला नाही

परक्यांना आपुले कराया सहजासहजी जमते
कधी आपुले परके झाले? गुंता सुटला नाही

कैद जाहले समासात मी आत्मवृत्त लिहिताना
सखा वावरे पानोपानी , खेद वाटला नाही

भूतकाळ मी वाचत वाचत, सांजवेळ घालवते
अशाश्वत "उद्या "बघावयाचा मोह जाहला नाही

जीवन म्हणजे सुखदु:खाची अंगतपंगत असते
फक्त सुखांना मागितले तर देव पावला नाही*

जसे महात्मा गांधी हसरे आले नोटांवरती
भाव घसरला पैशांचा जो कधी वाढला नाही

सांजवलेल्या आयुष्यी का भाववादळे उठती?
पेलत आले सोसाट्यांना, देह हारला नाही

येणे जाणे तुझे असावे स्वप्नांमध्ये बहुधा
दरवाजाही जाता येता कधी वाजला नाही

म्हणे सखी "निशिकांत "रंगते तझी राग गाताना
आळवताना विरह सूर मी तिचा ऐकला नाही

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users