श्री क्षेत्र रामेश्वर (आचरा-मालवण)

Submitted by तुषार विष्णू खांबल on 2 June, 2020 - 07:51

श्री क्षेत्र रामेश्वर (आचरा-मालवण)

नुकताच देवीच्या गोधळ निमित्त आमच्या गावी (राठिवडे-मालवण) गेलो होतो. गोंधळ, होम आणि इतर कार्यक्रम संपवून मी आणि माझा आत्येभाऊ सागर मालवण फिरण्याचा आनंद घ्यायला निघालो. तेव्हा एक दिवस आम्ही आमचे मावस चुलते श्री. अनिल देसाई यांच्या गावी आचरा-मालवण येथे गेलो होतो. त्या निमित्ताने त्यांचा गावी असलेल्या रामेश्वर मंदिराला भेट देता आली.
आचरा गावात आचरा बंदर जसे प्रसिद्ध आहे असेच तिथले रामेश्वर देवस्थान देखील खूप प्रसिद्ध आहे. देवगडातील प्रसिद्ध श्री क्षेत्र कुणकेश्वर यांचा भाऊ अशी ख्याती असलेलं हे मंदिर ब्रिटिशांच्या काळापासून आजतागायत त्याच दिमाखात उभं आहे. या मंदिरात दररोज संध्याकाळी पिंडीला फुलांनी आणि वस्त्राने सजवले जाते. ठीक ८:००चा सुमारास सर गावकरी मंदिरात गोळा होतात आणि मनोभावे देवाची पूजा-आरती करतात.
दरवर्षी गुढीपाड्व्यापासून या ठिकाणी देवाच्या पालखीस आणि उत्सवास सुरुवात होते. रामनवमी दिवशी याच मंदिरात मोठा उत्सव आणि भंडारा असतो. तसेच हा पालखी सोहळा हनुमान जयंती पर्यंत असतो.
या मंदिरात साजरा होणारा गणेशोत्सव हा तब्बल ४२दिवस असतो. या कालावधी दरम्यान देवळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तसेच या मंदिरात ‘डाळपस्वारी’ हा देखील एक उत्सव असतो. या उत्सवावेळी देव गाव भेटीला निघतात. १२वाड्यांचा ह्या गावभेटीला भाविक देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. गावापासूनच काही अंतरावर 'जामडूल' नावाचे एक बेट आहे या बेटावर जाण्यासाठी ब्रिज देखील आहे. परंतु देव हे त्या ठिकाणी बोटीतूनच जातात. तसेच सर्व भाविक पुढे गेल्याशिवाय देव निघत नाही. या बेटावर एक ख्रिस्ती कुटुंब राहते. ते दरवेळी आलेल्या सर्व भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करते. मागच्या वेळेस ४००० भाविक या बेटावर गेले होते असे समजते. श्री रामेश्वराची कृपादृष्टी या गावावर सदैव असते. कितीही वादळवारा, पाऊस आला तरी या बेटाचे कुठलेही नुकसान होत नाही.
दर ३वर्षांनी या गावात ‘गाव पळन’ असते. ‘गाव पळन’ म्हणजे संपूर्ण गाव ३दिवस खाली करायचा. एकही जीव (अगदी गायी, म्हशी, कुत्रे, कोंबडे सुद्धा) गावात राहायचं नाही. दत्तपौर्णिमेनंतर हा सोहळा असतो. या परंपरेला एकदा अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानी विरोध केला होता. परंतु गावकर्यांनी आपली परंपरा कायम राखली आणि शेवटी हतबल होऊन अंनिसच्या कार्यकर्त्यांना तेथून माघारी परतावं लागलं. एकदा याच कालावधी दरम्यान गस्तीवर असलेली पोलिसांची गाडी चुकून या गावात घुसली. परंतु आत शिरताच काही वानर या गाडी समोर आले. एक वानर तर गाडीच्या बॉनेटवर चढून बसला. त्यानंतर सगळा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला व त्यांनी आपली गाडी माघारी घेतली.
अशा ह्या परंपरा आणि विविधतेने नटलेल्या आचरा-रामेश्वर देवस्थानाला आपण एकदा तरी अवश्य भेट द्यायलाच हवी.

तुषार खांबल

Group content visibility: 
Use group defaults