रैन बसेरा

Submitted by ज्येष्ठागौरी on 1 June, 2020 - 04:08

रैन बसेरा
हा शब्द कधी ऐकला माहिती नाही पण नक्की हिंदी सिनेमातच असणार,बसेरा सिनेमातलं जहाँपे सवेरा हो बसेरा वही है,हे खूप वेळा ऐकलंय.पण रैन बसेरा हा शब्द फार भावला मनातून.ह्या शब्दात विलक्षण ऊब आहे असं वाटलं.रात्रीपुरता आसरा देणारं निवासस्थान असा अर्थ आहे ह्या शब्दाचा.थंडी किंवा पावसात उघड्यावर कुडकुडत रात्र काढणाऱ्यांसाठी तात्पुरता निवारा असा त्याचा शब्दशः अर्थ आहे.उत्तरेत विशेषतः थंडीत असा रैन बसेरा तयार करतात असं ऐकलंय.आत्ताच्या ह्या स्थितीत सरकार असेच बसेरे तयार करणार आहे.आणखी आठवलं की आपण घरोन्दा सिनेमातले घरासाठी धडपडणारे नायक नायिका "अस्मानी" या "आस्मानी" यातल्या योग्य शब्दासाठी लटके भांडलेले (अर्थातच गुलजारजींच्या शब्दात)पाहिले आहेत. आभाळ काही आपल्याला नवीन नाही पण आपण चक्क बघायचं थांबवलंय त्याच्याकडे अलीकडे.जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात नायिका नायकाला विचारते की तू कधी मोकळ्या आभाळाखाली पहुडला नाहीयेस आयुष्यात? आपल्याला तरी काय
ग्रह ताऱ्यांची ओळख तर शाळेतल्या अभ्यासापेक्षा तशीच झाली नाही का!अंगणात बाकीच्यांची जेवणं होईपर्यंत आकाशाकडे बघता बघता, व्याधाचा तारा सप्तर्षी हे बघताना डोळे पेंगुळून कधी मिटायचे कळायचं नाही.मग बापू उचलून बिछान्यावर नेऊन ठेवायचे तेंव्हा जाग आली तरी डोळे मिटलेले ठेवायचे कारण ते क्षण फार छान असायचे. हिंगण्याच्या शेतातून पाहिलेलं आभाळ फार सुंदर होतं. नंतर पन्हाळ्याला हेच सुंदर आभाळ पुन्हा भेटलं आणि शहरातल्या आणि खेड्यातल्या आभाळात जमीन अस्मानाचा(!) फरक असतो हे समजलं. खेड्यातलं आकाश निरभ्र असतंच पण अगदी गर्द अंधारामुळे खूप खरं दिसतं,खरं असतं. मुलांना आत्ता असणारा तारा थोड्या वेळानं कसा हलतो हे दाखवताना लहानपण पुन्हा जगले.झोप येण्यासाठी नाही पण कोवळ्या वयात वेडेपणा सिद्ध करण्यासाठी तारे मोजून पाहिलेत अनेकदा आपण.दर मिनिटाला गिनती चुकायची मग सुरुवात पहिल्यापासून. जमखिंडीला आजोबांच्या गच्चीतून बघितलेलं आभाळ वेगळं, शहरातलं कमी काळं दिसणारं आभाळ वेगळं.लेकीने केलेल्या स्कोपमधून दिसलेलं अगदी तेजाळ आकाश वेगळं. रात्रीच्या प्रवासात आपल्याबरोबरच येणारं आकाश वेगळं.शाळेतून आल्यावर पांढऱ्या ढगात वेगवेगळे आकार दाखवणारं आभाळ वेगळं.पण नंतर एक कळलं आभाळाच्या ह्या गंमती जमती ज्याच्या डोक्यावर छप्पर असतं त्यालाच भावतात. आपल्यालाही नेहमीच पावसाळ्यात किंवा थंडीत आपल्या उबदार घरी सुरक्षित राहताना ,उघड्यावर जे राहतात, त्यांच्या विचारांनी मनात एक अनाम अपराधीपण दाटून येतं.कर्माचा सिद्धांत असावा किंवा कोणाच्यातरी कृपाछायेनं आपल्या डोक्यावर छप्पर आहे.कदाचित चार भिंती एक छप्पर अशा घरात राहणाऱ्या आपल्या सगळ्यांना समजणार नाही अशा आसऱ्याची महती पण ज्यांना डोक्यावर छत्र नसतं त्यांनाच फक्त कळत असणार. ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही त्याला मात्र आभाळाची महती माहिती असते,नित्य परिचयाची असते.आणि त्यामुळे अति परिचयात होणारी अवज्ञाही त्याच्या नशिबात असते. कधी कधी आभाळ फाटतं, त्याला शिवण्याचा प्रयत्नही होऊ शकत नाही आणि मोकळ्यावरचं आयुष्य आणखी उघडं होतं. आपण शहारतो, घाबरतो तात्पुरतं. दरवर्षी पुराच्या घटना त्यातून होणारा संहार बातम्यातून पोचतो आपल्यापर्यंत. पण सध्या मात्र काहीतरी वेगळंच अस्मानी संकट आलंय.संवेदनशील मन आतून भरुन येतंय आणि मग ग्रेसांची कविता मनात हलक्या पावलांनी येते.
पाऊस आला पाऊस आला गारांचा वर्षाव |
गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव ||
मेघांचे कोसळती पर्वत दरी निनादे दूर।
गाव चिमुकला वाहून जाईल असा कशाला पूर ।
थांब जरासा हृदयी माझ्या ढगात लपल्या देवा।
काठावरती जरा आणू दे पुरात फसल्या नावा।
ग्रेस .
हे आत्ता फार प्रकर्षानं आठवतंय,आणि मग आठवतो तो करांगुलीवर गोवर्धन पर्वत पेलणारा तो जगदीश! त्याच्याखाली सुरक्षित असलेलं गोकुळ.काय वेगळंच आहे हे सगळं.चित्ररूपानी समोर आणलं तरी अंगावर रोमांच उभं करणारं.
मला एक गोष्ट आठवतीये की एक जण परमेश्वराशी वाद घालतोय की तू सांगितलं होतंस की तू सदैव माझ्या बरोबर राहशील. देवानी स्मितहास्य केलं ,हो तुझे ओल्या वाळूत पाय उमटले आहेत आणि माझेही, मग माणूस म्हणाला की माझ्या बरोबर प्रत्येक अडचणीत दुःखात राहशील असं सांगितलं होतंस पण माझ्यावर जेंव्हा संकट आलं तेंव्हा तू कुठे होतास?पायांचे ठसे तर एकाचेच दिसताहेत, तेंव्हा परमेश्वर म्हणाला की हो तेंव्हा मी तुला उचलून घेतलं होतं.तसं वेळ आली की तो उचलून घेतो किंवा अडचणींचा पहाड उचलून घेतो.हे सगळं आत्ता का आठवतंय पुन्हा पुन्हा!
रैन बसेरा ही संकल्पना मला त्याच्याशी निगडीत वाटते. एखाद्या अंधारून आलेल्या कोसळणाऱ्या, काकडणाऱ्या रात्री कोणीतरी दिलेला आसरा.आयुष्यात असे अनेक क्षण येतात की पुढे पूर्ण अंधार आहे असं वाटतं, एखाद्या अंधाऱ्या बोगद्यात शिरतोय , चाचपडतोय अशी भयानक भावना येते तेंव्हा कुठूनतरी कोणी सांगतं "अज्ञाताची भीति बाळगू नकोस,चालत रहा",कुठेतरी ते पटतं. आपण चालत राहतो.हाच रैनबसेरा असतो.हा आवाज एखाद्या सुहृदाचा असतो की अंतस्थ आत्म्याचा ठाऊक नाही.पण तो आसरा देतो अर्थात तात्पुरता, नंतर परत आपली लढाई आपल्यालाच लढायची असते हीच गोष्ट सत्य असते पण तो रैन बसेरा खूप काही देऊन जातो.
पुछो ना कैसे मैंने रैन बितायी,इक पल जैसे इक जुग बीता!हा अनुभव संकटात नवीन नसतोच.आत्ताही नाही.
कोणीतरी दिलेला भक्कम आधार.पाठीवर ठेवलेला आश्वासक हात. कुणाचे शब्द,कुणाचं मूक अस्तित्व, कुणाची मैत्रीपूर्ण साथ हाच रैन बसेरा असतो आणि कधी आपण रैन बसेरा बनतो दुसऱ्यासाठीअचानक. आपल्याला कधी तरी एकदा अशा रैन बसेऱ्याचा आधार मिळाला तर त्याची महती कळते आपल्याला तो दुसऱ्यासाठी बनता येतो.
का हे सगळं त्याचंच नियोजन आहे आणि आपला जन्म, त्यातली संकटं, जन्मजन्मीची भोग~ योगाची चक्रं,ह्याच भोगांची असलेली रात्र आणि योग बनून ह्यातून तोच विविध रुपांतून देत असणारा सहारा, तोच रैन बसेरा!काय आहे हा खेळ!आत्ता का जाणवतोय हा खेळ! सगळंच अनाकलनीय!कालपासून ह्या रैन बसेरा शब्दाचा असा विचार करत असताना राहुल देशपांडेचं सूर से सजी संगिनी ऐकलं आणि परत एकदा सर्रकनअंगावर काटा उभा राहिला.रैन बसेरे उठने दे डेरे,अब मेरी तनहाई हो नाम तेरे।पल भर का फन दे,
ऐकता ऐकता मी माझ्या घरात आत वळते, माझ्या आयुष्यभराच्या रैन बसेऱ्याकडे.... परमशक्तीचे पुनःपुन्हा आभार मानत पण तरीही रैन बसेऱ्यात राहणाऱ्या सगळ्यांबद्दल आत्यंतिक संवेदना आणि सहवेदना बाळगत..
ये दिल की इमारत बनती है दिल से।
दिलासा को छू के उम्मीदों से मिलके।
जहाँ पे बसेरा हो सवेरा वहीं है
ह्या आशेसहित....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख ललित!
ग्रेस यांची कविता सुंदर आहे. मी आधी वाचली नव्हती. बरीच सुगम पण आहे!
जहाँ पे सवेरा हो! काय अप्रतिम गाण्याची आठवण करून दिलीत. आता जाऊन ते गाणं ऐकते.

छान लेख . पण खूप गोड गोड आहे . आता भारतात मैलोन मैल चालनारे उपाशी लेबर आणि अमेरिकेत आफ्रिकन वंशजांवर होणारे अत्याचार ह्या बद्दल बघून वाचून असे काही असते वगैरे विश्वास उडाला आहे. गाणी व कविता सुरेख.

खूप छान लिहिलंय. मला तुमचं सगळंच लिखाण समंजस आणि संयमी वाटतं. असंच लिहीत रहा आणि इथे आणा.
मला हिंदीतले काही शब्द फार आकर्षक वाटतात, त्यातला हा एक. मागे कबिरांचा दोहा वाचला होता, 'ना कुछ तेरा, ना कुछ मेरा, दुनिया रैनबसेरा' तेव्हापासून तो शब्द मनात रूतून बसला आहे.