तरही - नकोसेच वाटे तुझे गाव आता

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 May, 2020 - 22:30

ओळीसाठी प्राजूचे आभार मानून..

इतंभूत झालेत बदलाव आता
नकोसेच वाटे तुझे गाव आता

तुला मिळवताना हरवते स्वतःला
नको जीवघेणा लपंडाव आता

गरजतोस येथे, बरसतोस तेथे ?
सहन होत नाहीय घुमजाव आता

किती काळ ठेवू भिजत घोंगडे हे ?
तुझ्या तू मनाचा छडा लाव आता

नशीबा तुझ्या वाग मर्जीप्रमाणे
तुझा सोसवेना बडेजाव आता

कुटुंबे मिळवलीस देशोधडीला
नको अंत पाहूस रे धाव आता

उथळ वाटणारी नदी खोल झाली
प्रवाहास आला ठहेराव आता

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults