डोईवरी व्यथांना घेऊन चाललो मी

Submitted by द्वैत on 29 May, 2020 - 15:11

डोईवरी व्यथांना घेऊन चाललो मी
स्वप्ने अशीच मागे सोडून चाललो मी

चटके परिस्थितीचे सोसून जाहल्यावर
अंदाज सावल्यांचे बांधून चाललो मी

विसरू तरी कसे मी उपकार या धरेचे
माती तिची कपाळा लावून चाललो मी

सांगून हे कुणाला कळणार दुःख नाही
संवेदना स्वतःची मारून चाललो मी

आहेत श्वास काही श्वासात गुंफलेले
अलवार कोवळे से राखून चाललो मी

बोलू नकोस "द्वैता" कोणा खरी कहाणी
सारे खरे पुरावे गाडून चाललो मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा!!

"सांगून हे कुणाला कळणार दुःख नाही
संवेदना स्वतःची मारून चाललो मी"

किती लागला हा शेर हे सांगूच शकत नाही!!
इथे मला स्वतःची संवेदना मारावी लागतीये.. अप्रतिम लिहिलंय _/\_