स्फुट - लव्ह बर्डस

Submitted by बेफ़िकीर on 29 May, 2020 - 11:38

*स्फुट - लव्ह बर्डस*
=====

तो चिवचिवाट आकांत असतो का?
ती नाजूक फडफड, व्यर्थ धडपड केल्याची जाणीव तर नसते?

ते चोचीत चोच घालणे, प्रेम असते की एकमेकांचे अश्रू पुसणे?
भरपेट राळ खाणे, भूक असते की वेळ घालवण्याचा एक उपाय?

कशालाही घाबरणे, नैसर्गिक असते की बघणाऱ्याचे मनोरंजन होऊन तरी तो पिंजरा उघडेल अशी वेडी आशा?

एकमेकांशी लाडिकपणे भांडणे, किरकोळ हक्कांसाठी केलेला लढा असतो की वेडसर मनःस्थितीतील विलाप?

कोथिंबिरीच्या काड्या चावणे, छंद असतो की मानवजातीवर स्वप्नातच उगवलेला सूड?

तीनशे रुपयाला मिळतो एक पक्षी!

पंधराशे रुपयांना पिंजरा!

या पक्ष्यांमध्ये, नीट बघितले तर दिसतात:

सुना

वृद्धाश्रमातील वृद्ध

पाळणाघरातील बालके

रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण

काय तर म्हणे.....!!!!!

लव्ह बर्डस!

त्यांना बघणारे, आपले जगणे आल्हाददायक करून घेतात

आणि ते

जगण्यामरण्याचा अर्थ एकच, हे सांगत राहतात

=====

-'बेफिकीर'! (२९ मे २०२०)

Group content visibility: 
Public - accessible to all site users