ओळखाया लागलो

Submitted by निशिकांत on 26 May, 2020 - 23:09

संकटांच्या मी मुळांशी शोध घ्याया लागलो
आपुल्यांच्या मनसुब्यांना ओळखाया लागलो

अंधश्रध्दा पाळणारे लोक लाखो जमवुनी
ज्ञान जे नाही मला ते पाजळाया लागलो

कोणता देतोस पत्ता, राहसी देवा कुठे?
तू जरी नसतोस, मूर्ती मी पुजाया लागलो

गाज होतो सागराची, तर त्सुनामीही कधी
वयपरत्वे मी कपातच वादळाया लागलो

सभ्यतेचा फाटला बुरखा, तसा वेशीवरी
इभ्रतीच्या लक्तरांना वाळवाया लागलो

वर्तमानी खाक होता, शोधण्या हिरवळ जरा
बालपणच्या आठवांना चाळवाया लागलो

अश्वमेधाला निघाले, थाट पापाचा किती!
पुण्यसंचय व्यर्थ केला, हळहळाया लागलो

काळजावर कोरलेले नाव का मिटते कधी?
वाहते जखमी उसासे जोजवाया लागलो

बेरका "निशिकांत" हल्ली ईश चरणी लीन का?
संकटी देवास स्मरुनी, आळवाया लागलो

निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users