स्वप्नातील शर्ट

Submitted by Sanjeev Washikar on 26 May, 2020 - 04:50

स्वप्नातील शर्ट
आज सुटीचा दिवस .मनात सहज विचार आला ,चला आज आपले कपड्याचे कपाट साफ सफाई करून आवरावे . कपाटातील सर्व कपडे मी हळू हळू बाहेर काढण्यास सुरवात केली. हे सर्व करत असताना अचानक माझी नजर त्यातील कांही तिन चार नवीन शर्ट्स वर पडली. ते अजून त्या पारदर्शक वेष्ठनातून बाहेर देखील काढले गेले नव्हते. यात असणारे ते नवनवीन रंगबेरंगी, आकर्षक,महागड्या उच्चं कंपनीतून खरेदी केलेले शर्ट्स पाहिल्यावर ते आपण अजून कसे काय घातले नाही याचे फार मोठे आश्चर्य मला वाटले.यात असणाऱ्या कांही नवीन शर्टा पैकी कांही शर्ट्स, निव्वळ फिटिंग बरोबर नाही म्हणून आळसाने दुकानातून बदलून आणायचे आहेत या करीत पडून राहिले आहेत . माणसाच्या आयुष्यात कालानुसार त्याच्या आवडी निवडी ,सवयी कशा सहज बदलतात, याचे माझे मलाच नवल वाटले व त्याचे हसू देखील मला आले.लहानपणी ह्या नवीन कपड्याच्या हव्यासापोटी आपण कुठल्या कुठल्या दिव्यातून जात होतो याची एक जुनी आठवण पटकन माझ्या डोळ्या समोर उभी राहिली
मी जेमतेम दहा वर्षाचा असेन, माझ्या बाबांनी मला कौतुकाने शर्ट साठी एक रंगबिरंगी कापड आणले होते . त्या काळी रेडिमेट कपडे वापरण्या पेक्षा कापड आणून ते टेलर कडून शिवून घेण्याची प्रथा होती. तयार कपड्यांची शिवण घट्ट नसते,ते अंगावर बरोबर बसत नाहीत असा कांहीतरी त्यांचा समज होता .त्यात प्रत्येकाचा खास ठरलेला असा एक पारंपरिक टेलर असायचा. बाबुराव हे आमच्या वडिलांचे त्या काळातील खास टेलर. माझ्या वडिलांचा या बाबुरावांच्यावर विशेष असा एक स्नेह होता . या बाबुरावांचे आणखीन एक वैशिष्ठ म्हणजे ते नवीनच कपडे शिवतात असे नव्हते तर इतरही शिवणाची कामे मग जुन्या पॅन्टची रिपेरी असो कि लहान मुलांचे कपडे असो की घरातले पडदे असो हे काम बाबूराव करीत असत . माझा मात्र ह्या बाबुरावावर खूपच राग होता . त्याचे कारण हि तसेच होते .घट्ट शिलाई वगैरे हे जरी खरे असले तरी एकदा का ह्या शिंपीदेवाकडे हे कपडे शिवायला दिले कि मग ते कधी शिवून मिळतील हे ब्रम्हदेव देखील सांगू शकत नसे . त्यात त्याचा स्वभाव फारच विसरभोळा .मध्यतंरी माझ्या वडिलांनी आपली नवीन पॅन्ट कमरेला सैल करण्यासाठी त्याच्या कडे दिली होती .बरेच दिवस झाल्या मुळे ते चौकशी करण्या साठी त्याच्या कडे गेले असता " अरे ! पॅन्ट कमरेला सैल करायला दिली होती होय !!! मला वाटलं तुमच्या जुन्या पँटच बाळाला जाकीट शिवायच आहे " हे ऐकल्यावर बाबांनी कपाळावर हातच मारून घेतला .सुदैवाने त्याने अजून तसे कांही केले नव्हते हे बरे झाले .
नेहमी प्रमाणेच, ह्या खेपेला देखील त्यांनी आमचे पारंपारीक टेलर बाबुराव यांच्या कडे मला नेहले. उलट सुलट चार वेळेस गोलगोल फिरवून बाबुरावानी माझ्या शर्टचे माप घेतले. त्यांच्या त्या खरड वहीत ते कुठल्या भाषेत, ती मापे लिहीत हो्ते, ते कुणास ठाऊक ? हे जे कांही ते लिहीत असत, ते त्यांना कपडा कटिंग करताना लक्षात येईल ना, असा प्रश्र्न माझ्या मनात उगीचच येत असे . मला तर इतर मुलांच्या प्रमाणे नवीन फॅशनचे आखूड व घट्ट कपडे घालायला आवडायचे तर हे चक्क " पोरग लहान आहे, जरा वाढत्या अंगाचेच शिवतो हं ! असे आमच्या बाबाना सांगत माप चांगलेच दोन दोन इंचाने जादाच धरत असे .
बर ! बाबुराव मुलाचा शर्ट कधी देणार ?"
अहो !! देतो कि , दोन दिवसात देतो " हे त्याचे नेहमीचेच ठरलेलं उत्तर असायचे .
बघ हं ,आज सोमवार आहे ,गुरुवारी सकाळी द्या म्हणजे झाले "
हो ! हो ! अगदी , अगदी. ह्या मुलालाच गुरुवारी पाठवून द्या कि हो साहेब , मग तर झाले .मी तर लहान होतो ,कधी एकदा हा स्वप्नातील रंगबिरंगी नवीन शर्ट अंगात घालून ,माझ्या मित्र मंडळी समोर रुबाबात मिरवतो असे मला झाले असायचे .कधी एकदा गुरुवार येतो आणि मला हा स्वप्नातील शर्ट घालायला मिळतो असे मला झाले होते .बाबुरावांनी सांगितल्या प्रमाणे ,मी एखाद्या कोर्टाच्या तारखे प्रमाणे गुरुवारी सकाळी बाबुरावाच्या दुकानात दत्त म्ह्णून हजर झालो . आज आपल्याला नवीन शर्ट मिळणार या आनंदाने मी फार उतावळा झालो होतो . काका माझा शर्ट झालाना ? द्या मग असे मी बाबुरावांना विचारताच "अरे ,इतक्या लवकर कसा होईल तुझा शर्ट .ते बघ, कापड आजून बादलीतच पाण्यात भिजत ठेवलय. त्याची खळ तर उतरायला पाहिजे कि नको. हे बघ बाळ ! तू असे कर, सोमवारी सकाळी ये ,मी तुला कुठल्याही परिस्थितीत शर्ट देतो" असे त्यांनी मला सांगितले त्याचे हे बोलणे ऐकून ,आज हे माझे नवीन शर्ट घालण्याचे स्वप्न, पाण्यातच जाणार ,हे माझ्या लक्षात आले .खिन्न मनाने मी घरी परत आलो.
परत सोमवारी सकाळी गेल्यावर " तु आलास होय , बरे झाले ! आजच तुझा शर्ट शिवून कंम्पलीट करणार होता, तो पर्यंत लग्नाची दोन कामे अर्जंट आली आहेत बघ ! . रात्रन दिवस काम करून करून, अगदी बुक्का पडलाय. दोनच दिवसात कुठ्ल्याही परिस्थीतीत तुझा शर्ट शिवून देतो .आला आहेस, तस माझं एक काम कर .मी जरा समोरच्या हॉटेल मधून नाष्टा करून येतो ,तो पर्यंत ह्या बाकावर बैस .कोणी आले तर टेलर पाच मिनिटातच येतील असे त्यांना सांग" असे म्हणून चांगले तास भर मलाच बसवून घेतले .ह्या माझ्या नवीन शर्टा साठी, मला कुठल्या कुठल्या दिव्यातून जावे लागणार आहे ,हे परमेश्वरालाच ठाऊक ? कधी काजी करायची आहेत तर कधी बटणे लावाची आहेत तर कधी इस्त्री करायची आहे ,अशी आनेक कारणे देत शेवटी पंधरा दिवसानी मला तो शर्ट मिळाला.हे टेलर दोन इंचाने शर्ट जास्त ठेवतो, असे का म्हणतात याचे अकलन मला आज झाले कारण हा शर्ट माझ्या अंगात घाले पर्यंत मी दोन इंचाने ढोबला झालो असणार . मी मात्र त्या शर्टाच्या आकर्षणा पोटी कोर्टाच्या तारखे प्रमाणे बाबुरावांची एक देखील तारीख -वेळ चुकवली नव्हती . सरतेशेवटी घरी आलो .अंगावर नवीन शर्ट चढवला. जणू स्वर्गातील इंद्राचा ऐरावत, आपण जिकूंन आणला आहे कि काय या अविर्भावात स्वतःला आरशात पाहू लागलो. आता खऱ्या अर्थाने आनेक हेलपाट्यांचे सार्थक झाले असे मला सारखे वाटू लागले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users