स्पेशल

Submitted by अव्यक्ता on 25 May, 2020 - 17:56

"Special"
"You are overqualified for this job"
5 मिनिटात दोनदा सांगून झालं होत तिचं.. मला हे करायचंच आहे असं निक्षून सांगितलं तेंव्हा कुठं तिनं होकारार्थी मान डोलावली.Offer letter मिळालं .Finally I was "just a Reliever. "
या मुलांसाठी काम करायची ईच्छा बरेच वर्ष मनात होती. कुठेतरी कधीतरी मागितलेलं मिळतंच..नेहाशी कदाचित त्याचमुळ ओळख झाली असावी. हा job मिळण्यामध्ये तिचा मोठा वाटा होता. जेमतेम सहा आठ महिने केला असेल मी पण अजूनही या मुलांची आठवण आली की कासाविस व्हायला होतं .
Special needs children..म्हणजे मतिमंद ,गतिमंद, वेडसर ,आत्ममग्न ,मानसिक दृष्ट्या अपंग मुलं.चारचौघात कधी उठून दिसणारी तर कधी इतर सामान्य मुलांसारखीच..मिसळून जाणारी..तसे यामध्ये अजूनही बरेच प्रकार आहेत.काही मुलं ही सामान्य शाळेमध्ये तरीही शिक्षण घेऊ शकतात पण इतरांना मात्र विशेष शैक्षणिक मदत घ्यावी लागते..
या मुलांसाठी एक मुख्य शाळा आणि इतर बहुतेक शाळांमध्ये कमितकमी एक वेगळा वर्ग राखून ठेवलेला होता. त्याची जागा इतर वर्गांपासून थोडी अलिप्त होती. Gate वरचा security code बरोबर प्रेस केल्याशिवाय आत प्रवेश नाही. बाहेर येतानाही वेगळा code .. तो दाबल्याशिवाय तिथून सुटका नाही. प्रत्येक रूम ला वेगळं कुलूप .. काढण्याची पध्दतही वेगवेगळी. खूप शिस्तबद्ध होत सगळं.
पहिला दिवस आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. तो 4 ते 7 वर्षाच्या मुलांचा वर्ग होता. मी बरोबर 9 वाजता पोचले. दार उघडल्या उघडल्या एखादया showstopper ला पहावं तशा सगळ्यांच्या नजरा माझ्याकडं वळल्या. 7/8 मुलं अर्धगोलात आपापल्या खुर्चांमध्ये बसली होती. वेडेवाकडे हावभाव करून गाणं म्हणण्याचा प्रयत्न सुरु होता त्यांचा .मला पाहताच एकदम सगळे शांत झाले. काही मुलं एकमेकांना चिकटली, काही टीचर्स कडे पळाली . मी हळूहळू पावलं टाकत आत गेले. माझा फोटो आधीच समोरच्या बोर्ड वर लावलेला होता .. तोही नावासहीत ! तरी कोणतंही मूल माझ्याकडं पाहीना. "lets welcome our new friend , मानसी " असं म्हणून गोड हसत टीचर नं माझं स्वागत केलं. मला सर्वांची ओळख करून दिली आणि तो पहिला राऊंड तासाभरात संपला. मॉर्निंग टी ब्रेक म्हणजे 10 मिनिटं . मला आज पहिला दिवस म्हणून तो
लवकर दिला गेला. मी वर्गाबाहेरच्या स्टाफ रूम मध्ये येऊन बसले. काहीच सुचेना.डोकं बधीर झालं !कॉफी करून घेतलेली ती तशीच ओतून दिली सिंक मधे .. पुढचा दिवस कधी संपतोय असं झालं. माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं . मोठ्या हौसेनं यांच्यासाठी काहीतरी करायचं वगैरे ठरवलं होतं,ते सगळं त्राण गळून पडलं पहिल्याच दिवशी. It was an emotional roller coaster ride for me !
गाडी सुरु करताना हात थरथरायला लागले. डोळे पाण्यानी गच्चं भरलेले. तशीच तडक मुलींना pickup करायला गेले .घरी येऊन त्यांना घट्ट मिठी मारून बसले थोडावेळ. "I cant do this " मनाशीच बोलले .
दुसरा दिवस उजाडला .. पुन्हा तोच relieving चा कॉल.. मी घेतला, ठरवलं होतं काल एक आणि केलं दुसरंच. पण हा दिवस थोडा बरा गेला .कदाचित परिस्थिती चं भान आलं होतं तोपर्यंत. नंतर असे कित्येक कॉल्स उचलले. कित्येक मुलं जवळून पाहिली.काही मनात पक्कं घर करून गेली.
प्रत्येकात एखादं वैशिट्य होतं. जसं की या मुलांमध्ये ..
Shania ...दोन बाजूला दोन लिंबं ठेवल्यासारखे गुबगुबीत गाल,केस मऊ रेशमी ,काळेभोर..थुलथुलीत शरीर..चेहेऱ्यावर बोलके भाव..नेहमी एकटीच चालायची walk ला गेल्यावर .हात धरायला गेलं की फटके मारायची . Shania एक उत्तम cartoonist होती. एखादं कॉमिक लिहावं तशा छोट्या छोट्या गोष्टी तयार करायची तिच्या चित्रांच्या.अक्षर खरोखर छापल्यासारखं ..एक शब्द लिहायला 10 मिनिटं कमीतकमी पण एकूणएक उत्तर लिहायची.. तिच्या पेसनं ..
Alice ...प्रचंड बोलकी .. एकच प्रश्न वारंवार विचारणारी.
पहिल्यांदा शिकवायला गेले तेंव्हा अभ्यास सोडून हिच्याच प्रश्नांना उत्तरं देत बसले. "whats your name again ?" "Manasi " हा दोन वाक्यांचा आमचा संवाद पाऊण तास चालला . Manasi नाव लक्षात ठेवणं हेच बहुतेक तिचं त्या दिवशीचं aim असावं . Alice सगळ्यांची काळजी करायची. एखादा मुलगा कधी जोरजोरात डोकं आपटून घायचा तर कधी एखादी मुलगी दिवसभर नुसती रडत रहायची ..मुसमुसून .. 13/14 वर्षांची मुलं पण मन मात्र एखादया तान्ह्या बाळासारखं ..कोवळं.. नाजूक ! Alice मग प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत रहायची "Are you ok ?" तिच्या कोणत्याच प्रश्नाचं त्या मुलांनी कधीच उत्तर दिलं नाही ..तिनही विचारणं सोडलं नाही .
Anabel .. शारीरिक वय ..१५ वर्ष.. मानसिक ..माहित नाही. हिचे पाय आत वळलेले होते. चेहेरा एकाच बाजूनं बोलका होता..पॅरलाईझ झाल्यासारखा . तोंडातून सतत लाळ गळायची . ती पुसायला बालवाडीतल्या मुलासारखा शर्टला रुमाल लावलेला असायचा. Anabel ला भरवावं लागायचं. तिच्या हाताला धरून, तो घास तिला तोंडापर्यंत नेऊन देणं एवढंच काम माझं ..पण ते शिताफीनं करावं लागायचं . डब्यापासून तोंडापर्यंत पोचताना कधी तो हात डावीकडं कधी उजवीकडं ..कधी पुढंमागं ..वरखाली ..कधी डायरेक्ट नाकात जायचा. तिच्यासमोर तिचा,घोड्यासोबत चा फोटो लावला होता. ते बघत रोजचं जेवण असायचं . Anabel verbal नव्हती. जेवताना दोनच शब्द "Anabel .. horsie " एवढंच फ़ोटोकडं बोट दाखवत म्हणायची.
Chen.. बॉब कट मधली चिनी मुलगी.. एका ढगळ झग्यात वावरायला मजा यायची तिला. वयानी Anabel एवढीच. चालता, बसताना हिला स्वतःच्या मानेला झटके द्यावे लागायचे.शरीरामध्ये एक प्रकारचा कंप असल्याने तिला एका जागी स्थिर बसता यायचं नाही. सतत हात पाय हालत राहायचे. अगदीच काही जमलं नाही तर ती घोघरा आवाज काढत राहायची. Chen ला इतरांना मदत करायला फार आवडायचं पण तिची मदत ना होता तो दुप्पट व्याप होऊन बसायचा. एखादी वस्तू आणून देताना कधी ती पडायची,कधी सांडायची .हातापायांच्या अनियमित हालचालींमुळे कोणतंच काम पूर्ण व्हायच नाही तीचं .
Mia .. गोरीपान लालसर रंगाची. थंडी असो वा पाऊस .. शॉर्ट्स आणि टी शर्ट मध्ये असायची. मी गेले की मला खेटून..चिकटून बसायची. माझा हात हातात घ्यायला आवडायचं तिला. तो दिला,की ती कुरवाळत रहायची. खूप share करायची माझ्यासोबत ..न बोलता ..फक्त हावभाव करून.. तिच्या अभ्यासाच्या पाटीवर तिच्या फॅमिली मेंबर्स चे फोटो लावलेले होते.. दर वेळी गेल्यावर ते न चुकता मला दाखवले जायचे..
आदी... त्या शाळेत सगळ्यात मोठा.दिसायला handsome, वागायला थोडा shy.. त्याचा टिफिन बघण्यासारखा असायचा. भाज्या,सॅलड्स ,पराठा ..एखाद स्वीट सगळं अगदी योग्य प्रमाणात भरलेलं असायचं . आईच प्रेम लगेच लक्षात यायचं ..आदी ला मोठी puzzles सोडवायला आवडायची. कोणी जवळ गेलं की तो एक्दम लाजाळुच्या पानांसारखं अंग चोरून घ्यायचा. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात.. आपल्याच जगात असायचा कायम.
Charlie... हडकुळा..कुबड काढून चालणारा. माझा चेहेरा पाहिला की एक विचित्र चमक यायची त्याच्या डोळ्यात .. मला खिजवायचे ..चिडवायचे शक्य तेवढे सगळे प्रयत्न करायचा .. response नाही मिळाला कि शेवटी पृष्ठभाग दाखवून नाचायचा .
Josh ..पहिल्यांदा पाहिलं तेंव्हा याच्या जवळ जायला फार घाबरले मी.एखाद्या सुमो ला लाजविल अशी अंगयष्टी होती त्याची ! तसा तो निरूपद्रवी होता खरं .. दिवसभर एका प्लास्टिक च्या ग्लोव्ह सोबत खेळत असायचा. बऱ्याचदा खुश असला की दिसेल त्याला मिठी मारायचा. त्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून मी दूर असायचे त्याच्यापासून . तरीही एकदा मला त्याने त्या मगरमिठीत घेतलंच. जीव घुसमटायला लागल्यावर टिचरनं मध्ये पडून सुटका केली माझी.
Brad.. आवाजावरून हे छोटं पिल्लू वाटायचं पण करामती अफाट होत्या एकेक. उकडायला लागलं की अंगावरचे एकन एक कपडे काढून बाहेरच्या झाडावर चढून बसायचा. 10 वर्ष वय आणि बांधा दणकट , त्याला खाली उतरवता उतरवता नाकी नऊ यायचे . कपडे घालायला लावणं वेगळंच .
Carter.. निळे गहिरे डोळे आणि भुरे कुरळे केस...कोपऱ्याकोपऱ्यातून चालायचा हा..त्याला मधोमध वावरायला अजिबात आवडायचं नाही. कायम लहान मुलांना खेळवणाऱ्या Carter चं बरोबरीच्या मुलांशी पटायचं नाही. त्याच्याकडे एक लकब होती. कडेकडेनी चालताचलता अचानक तो कधीतरी, एक्दम सामोरं यायचा.डोळ्यात डोळे घालून फक्त आरपार बघायचा ..काय हवं असायचं कुणास ठाऊक पण मग लगेच हसून बाजूलाही व्हायचा.
Emily ..नुकतीच teenager झालेली. कधी राग.. कधी प्रेम. तर कधी इतर भावना.. न सांगता येणाऱ्या. वादळ चालू असायचं तिच्या मनात विचारांचं ..Emily physically एक्दम fit होती. तिच्या आईनं तिला तसं ठेवण्यासाठी खूप मेहेनत घेतली होती. Single मॉम असूनही स्वतःची जबाबदारी चोख पार पाडत होती ती. Emily आणि तिच्या आईचं ट्युनिंग छान होतं . आठवड्यातून दोन दिवस न चुकता दोघींचं horse riding session असायचं एकत्र.
आज walk ला जाताना लांबवर रस्त्यात ती दिसली. आईचा हात घट्ट धरून रस्ता cross करायचा प्रयत्न सुरु होता तिचा. दोघी एकाच उंचीच्या .. पाच फूट पाच इंच ! दूर पर्यंत खरं तर कोणतीही गाडी नव्हती. Lockdown मुळ रस्ते ओसाड पडले होते .दोघीही एखाद्या घडाळ्याच्या लंबकाप्रमाणं पुढेमागे करत होत्या बराच वेळ. वाऱ्याची झुळुक आली तरी Emily मागे सरकत होती .शेवटी एकदाच्या मायलेकी पलीकडे पोचल्या .Emily नं उड्या मारत टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला ,गोल फिरली स्वतःभोवतीच आणि दिसेनाशी झाली काही क्षणात..
हे झालं काही ठराविक मुलांबद्दल. पण सगळीच मुलं अशी नव्हती. प्रमुख शाळेमध्ये सगळ्या अवघड केसेस होत्या. ती शाळाच खास या मुलांची होती.या शाळांमध्ये प्रत्येक मुलाला त्याच्या कुवतीप्रमाणं अभ्यास दिला जायचा. बाह्यजगाची शिस्त इथे लावली जायची नाही . त्यांची उत्तरं त्यांच्या मनस्थितीप्रमाणं बदलत असायची. नक्कीच त्यांना काही नियम घालून दिले होते शाळेत. ज्या मुलांना आवर घालता यायचा नाही,त्यांना शेवटची तंबी दिली जायची "5,4,3,2,1" अशी सूचना दिल्यावर त्यांना भानावर यायला मदत व्हायची . मग काही झालंच नाही अशा आविर्भावात ती पटकन दुसऱ्या कामात मन रमवून घ्यायची .प्रत्येक दिवसाचं यांचं वेगळं वेळापत्रक आखायचं . कधी swimming तर कधी dancing , रोज नवं काहीतरी असायचं. या कामादरम्यान भेटलेली लोकं इतकी मनमोकळी होती. पटकन मनातलं बोलून मोकळी व्हायची.सगळेच एकंदरीत समतोल राखून वागणारे होते.या मुलांबद्दलची त्यांची कळकळ क्षणोक्षणी जाणवत रहायची. अर्ध्या तासाच्या ब्रेक मध्ये आम्ही कधीकधी खूप गप्पा मारायचो. sharing मधून लक्षात यायचं की यापैकी बऱ्याच जणांच्या कुटुंबातील कुणी ना कुणीतरी "Special " आहे.
अजूनही तो शेवटचा दिवस आठवत रहातो अधूनमधून .
Summer holidays सुरु होण्याआधी मुख्य शाळेत म्हणजेच Base School मध्ये Chrismas Carols चा प्रोग्रॅम ठरवला गेला होता.नाताळची काही गाणी एकत्र म्हंटली जाणार होती . आजूबाजूच्या शाळांमधली Special मुलं त्या दिवशी Base ला जमली होती. टीचर्स ,रिलिव्हर्स,इतर सपोर्ट स्टाफ सगळेच छान तयार होऊन आले होते . Base मध्ये प्रत्येक मुलाला हाताळता येतील एवढी संगीत वाद्यं उपलब्ध होती. प्रत्येक मुलाला हातात एकेक वाद्य हाताळण्याची मुभा मिळाली होती . स्टाफ चेच काही मेंबर्स समोर perform करणार होते.. सुरुवात एका परिचित उडत्या चालीच्या गाण्यानी झाली. "Gingle bell .. Gingle bell .. " कोवळे हात अलगद वाद्य हाताळायला लागले. काही मुलं डोलायला लागली .. काही पायावर ठेका धरायला तर काही टाळ्या वाजवायला लागली. performing आर्टिस्ट मध्ये 2 singers , 2 violin आणि 2 गिटार वादक, एक drummer असा ग्रुप होता. माहोल छान सेट झाला होता. मुलांबरोबरच मोठेही त्यात सामील झाले होते.
उडत्या चालींकडून कल आता गंभीर गाण्यांकडे वळला. ड्रम स्थिरावून त्यांची जागा violin नी घेतली होती. या मुलांना शब्दांची जाण अतिशय कमी होती. पण ते संगीत थेट त्यांच्या मनापर्यंत जाऊन पोचत होतं.त्यांना सांभाळणाऱ्या टीचर्सही तितक्याच निरागस आणि कनवाळू होत्या.अशा भारावलेल्या वातावरणामध्ये त्यांनाही मनावर ताबा ठेवणं अशक्य होत होतं. कुणाला त्यांची मतिमंद मुलं आठवत होती तर कुणाला स्वतःचंच बालपण! मी Mia जवळ बसले होते. माझ्या लक्षात यायला वेळ लागला पण माझा घट्ट धरून ठेवलेला हात तिनं कधीच सोडला होता. लपवून आणलेल्या तिच्या पाटीवरच्या फोटोंवर तो फिरत होता. violin chya खोल सुरांनी सगळ्यांना गहिवरून आलं होतं.
Sam नावाची 50 वर्षांची teacher Aid स्वतःला अशा वेळी नाही सांभाळू शकली. Sam ची दोन्ही मुलं गतिमंद असून सज्ञान होती. आफ्रिकेत दोघंही स्वतंत्रपणे कमवून आपापलं पोट भरत होती. Sam ने स्वतःच्या मुलांना घडवल्यावर तिला आता अशाच इतर मुलांसाठी पुढचं काम करायचं होतं . आजमात्र तिथे मुलांच्या आठवणींनी व्याकुळ झालेलं पाहिलं तिला . सुरांबरोबर तिच्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रुंच्या धारा वाहत होत्या . मुलांना दिसू नये म्हणून केलेले सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते तिचे.काही वेळ असाच भारावलेला गेला. नंतर तिच्याच कलासमधल्या एका गोड छोट्या परीनी येऊन तिला हळूच जवळ घेतलं . काही क्षण मिठीत घेऊन मग तिच्या डोळ्यामधलं पाणी टिपलं. एकामागोमाग एक करत सगळीच मुलं Sam कड वळली. शब्दांशिवाय मग थोडा वेळ त्यांनी तिला फक्त सोबत केली.
कार्यक्रम संपला तेंव्हा काही मुलं उड्या मारत बाहेर आली ..पटकन गाडीमध्ये जाऊन बसली..काहींना पाऊल ही पुढे टाकता येईना . जणुकाही त्या संगीतानं त्यांना hypnotize करून टाकलं होतं . सगळ्यात शेवटी Sam आली. चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन. मला ek hug देऊन निघून गेली लगेच तिथून.
Merry Chrismas and a very happy new year to all ! मीही सगळ्यांना wish करून तिथून बाहेर पडले.
आता पुढचे दोन महिने कॉल येणार नव्हता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या होत्या.नंतर काही दिवस सकाळचे 8 वाजले की मन बेचैन व्हायचं. नकळत फोन कडे लक्ष जायचं.
कोणी कोणाकडून काय शिकायचं ? खरंच मोठा प्रश्न आहे. पण सध्या इतकं करता येईल?
असं "Special " कधी कुठे दिसलं तर ओठांच्या कडा ताणून त्याला स्मितहास्य देता येईल?बाकी काही नाही करता आलं तरी त्यांना जसंच्या तसं सामावून घेता येईल? फार अवघड नाही काही..गरज आहे फक्त Acceptance ची !

..अव्यक्ता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलं सुदृढ असणं आपण किती गृहीत धरतो या विचाराने थरकाप उडाला. रिलिव्हरचं काम नक्की काय असतं ते नाही समजले.

आम्ही जिथे राहतो तिथे अशी दोन अनाथालय आहेत. एक मुलाला शाळेत सोडायला जता येता रोजच लागते. तिथे असलेले सर्व जण जेव्हा कुलुपात बन्दिस्त असलेल्या दारातुन अथवा खिड्कितुन बघत असतात तेव्हा ते फार केविलवाणे दिसतात. नको वाटत बघताना त्यांच्याकडे. यात लहान वयापासुन ते अगदी साठीच्या वयाची मुल ( मुलच म्हणाव लागणार) दिसतात.
लहान असताना एकदा डेक्कन्च्या शाळेला भेट दिली होती. काटा आला होता अंगावर.