कॅनव्हास

Submitted by पाचपाटील on 25 May, 2020 - 03:03

आता हे लिहायलाच पाहिजे, असं काही हातघाईवर आलेलं प्रकरण नाहीये.
पण उगीच आपला चाळा म्हणून एखाद्या प्रेषितासारखं अद्भुत काही आपोआप येतंय का ओंजळीत, हे चेक करून बघावं म्हणून बसलोय.

समोर खिडकीची आयताकृती फ्रेम.

फ्रेमच्या पलीकडच्या बाजूला आकाश,त्याखाली झाडं, मोकळा रस्ता, बिल्डिंग्ज आहेत.
थोडावेळ बिल्डिंग्जच्या कोपऱ्यावर, थोडावेळ झाडांच्या फांद्यांवर वेळ काढणारे पक्षी आहेत.
वरती ऊंच घारींचे शांत लयीतले हालते एकमेकींना छेडणारे काळसर पुंजके आहेत.
कधी दिसतातय कधी नाहीत.
त्यांचं त्यांचं चाललंय आपलं.

आणि फ्रेमच्या अलीकडच्या बाजूला चेअर टाकून बसलेला मी.
एखादा पक्षी छोट्या डहाळीवर बसला की ती खाली-वर होते, किंवा तिच्याबरोबर माझं मनही खाली-वर होतं.
थ्री-डी मूव्ही बघायला बसल्यासारखं फिलींग काहीतरी.

मग समोरचा हा सगळा कॅनव्हास हळूहळू सूक्ष्म गतीनं बदलत जातो.
पांढुरकं आकाश हळूहळू लाल-पिवळसर होत जातं.
आता पक्ष्यांच्या हालचाली मंदावताहेत पण त्यांचे आवाज मात्र मोकळे-ढाकळे होतायत.
आणि लाल-पिवळसर उजेड झाडांच्या फांद्यांवर.

डोळ्यांच्या पापण्या मिटायला लागतात आणि त्यांचे आवाज माझ्याच आतून खोलवरून कुठूनतरी येतायत असा तंद्रीयुक्त भास.

कधीतरी डोळे उघडले की समोर पूर्ण काळं आकाश... आणि पक्ष्यांच्या जागी आता वटवाघुळं.
यांच्या मोठ्या पंखांचा झपाटा मोठा आहे.
घाईत दिसतायत.

तळव्याएवढे बारकुले पक्षी हवेत सूर मारताना जसे पोटात गुदगुल्या करत जातात, तसं यांचं नाही.

तर प्रश्न असाय की या सगळ्या कॅनव्हासमध्ये समजा मी नसतो तर काय झालं असतं ?

काही घंटा फरक पडला नसता !
आता या प्रतिक्रियेत विनोद निर्माण करायचा प्रयत्न होता सध्या तरी.

पण दुसरी एखादी वेळ असती तर याच वाक्यातून चिडचिड किंवा निराश निषेध व्यक्त झाला असता.

तर असोच.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy गेले होते लक्ष , प्रतिसाद द्यायचा राहून गेला.
तुम्ही लिहीत रहा. छान लिहीता तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा.

चिंतन आवडलं.
हे असे विचार माझ्याही मनात समुद्रकिनारी, तळ्याकाठी, खिडकीशी निरुद्देश बसले असताना, प्रवासात पळती दृश्ये पाहताना, एखाद्या रात्री निद्रादेवी रुसून बसली असताना येत असतात. 'मी कोण आणि माझ्या इथे असण्याचे प्रयोजन काय?' हा एक चिरंतन छळणारा प्रश्न आहे!
>>तर प्रश्न असाय की या सगळ्या कॅनव्हासमध्ये समजा मी नसतो तर काय झालं असतं ?
काही घंटा फरक पडला नसता !>> बरोबर!
विशेषतः ज्या परिस्थितीत मनात हे विचार आले आहेत (शरीर फ्रेमच्या अलीकडे असताना पल्याडविषयी चिंतन) त्या परिस्थितीत कॅनव्हासमध्ये नसल्याने काही फरक पडत नाही कृ ह घ्या Happy

मी कोण आणि माझ्या इथे असण्याचे प्रयोजन काय?' हा एक चिरंतन छळणारा प्रश्न आहे>>>>
येस्स.
आणि फावल्या वेळातलं टाईमपास कुतुहल एवढंच ह्या प्रश्र्नांचं आयुष्य.
पुन्हा चाकोरीतल्या गटांगळ्या असतातच.
कंटिन्यूयसली बॅक-माईंडला हा वाजत रहायला पाहिजे, तरच काही निभाव लागेल असं वाटतंय.

विशेषतः ज्या परिस्थितीत मनात हे विचार आले आहेत (शरीर फ्रेमच्या अलीकडे असताना पल्याडविषयी चिंतन) त्या परिस्थितीत कॅनव्हासमध्ये नसल्याने काही फरक पडत नाही कृ ह घ्या>>> Happy

अप्रतिम स्फुट आहे. माझ्याही मनातलं काहीतरी जागं केलं तुम्ही.
"कधीकधी पहाटे चालण्याचा व्यायाम करताना पथदिव्यांच्या माफक पुरेश्या प्रकाशात आपल्या सावल्या लांब लांब होतात आणि अंधारात विरून जातात. पुढचा दिवा आला की मागे आखूड होत जाऊन अचानक पायाखाली येतात आणि पुन्हा समोर लांब होत जातात. हा खेळ पाहाताना आपल्याला चालण्याची एक लय सापडते आणि मग मनात सभोवतालाचा विलय होत जातो. सूर्योदयाची वेळ होत आली की वातावरणात एक गारवा येतो, हळूच एखादी झुळूकही येते. आपल्याला सुखद वाटतंय इतकं कळतं. आपण भोवतालाचा भाग होऊन जातो किंवा ते भवताल आपल्यात विरतं, आपला भाग बनतं. पावलं लयीत पडतच असतात. आपण आहोत किंवा नाही काय फरक पडतो? मी म्हणजे हे सर्व आणि हे सर्व म्हणजे मी. हे सगळं आपल्यासाठी आहे आणि आपल्यासाठी नाहीसुद्धा.
मग अचानक आकाशातला एक बिंदू लखलखतो, एक किरणशलाका पृथ्वीवर झेपावते, आणि क्षणात नवल वर्तते. प्रकाश उमटतो, 'मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु' "
साठलेल्या अनेक अनुभवांचा पुन्हा प्रत्यय आला आपल्या लेखाने.

आपण भोवतालाचा भाग होऊन जातो किंवा ते भवताल आपल्यात विरतं, आपला भाग बनतं. पावलं लयीत पडतच असतात. आपण आहोत किंवा नाही काय फरक पडतो? मी म्हणजे हे सर्व आणि हे सर्व म्हणजे मी.>>>>>
सही !
अशा rhythm सापडलेल्या नशीबवान पहाटवेळा तुमच्यात दररोज उतराव्यात, या शुभेच्छा.. Happy

सुंदर वर्णन,माझ्या फ्लॅट च्या मागच्या बाजूस शेत आहे.सकाळी सगळे उठायच्या आधी मी मागच्या गॅलरी मध्ये बसून सकाळ चा आनंद घेते .

काही घंटा फरक पडला नसता!>>> Happy
खरंच. फरक पडतो?? नाही. नाहीच पडत.. एखादा जवळचा माणुस कायमचा गेला. तरी आपण जगतोच ना? तसच आपण गेलो काय अन राहीलो काय?! काही फरक पडत नाही.. हां पण एकच इच्छा आहे.. कायमच जाताना समोरच्या एकातरी माणसाच्या मनात आपण गेल्यावर अलगद कधीही न पुसल्या जाणाऱ्या पाऊलखुणा उमटवुन जायची..

चांगला मुद्दा मन्या - पण प्रश्न हा आहे कि त्याने काय फरक पडतो. माणूस गेल्यानंतर पाऊलखुणा उमटण्यापेक्षा जिवंत असताना उमटल्या तर जास्त चांगले.

@कटप्पा, गेल्यानंतर नाही ओ! जाताना..
छोट्या छोट्या गोष्टींतुन आपल्या माणसांना आनंद देता यायला हवा.. ही कधीच न संपणारी एक प्रोसेस असते.. जी आपण गेल्यावर इतरांच्या मनात आठवणरुपी पाऊलखुणा बनुन राहतात..

@ मन्या & कट्टप्पा .... आवर्जून दिलेल्या प्रतिसादांबद्दल तुमचे आभार.._/\_ Happy

सुंदर स्फुट लिहाले आहे. सुरवातीला कांहीं गोष्टी लक्षात आल्या नाहीत. नंतर प्रतिसाद वाचल्यावर सर्व उलघडा झाला. लिहीत रहा.